Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

३५० रिक्षाचालकांवर कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कर्णकर्कश्श हॉर्न, म्युझिक सिस्टिमचा मोठा आवाज तसेच वाहतूक नियमांना तिलांजली देऊन रिक्षा चालविणाऱ्या ३५० रिक्षाचालकांवर शहरात कारवाई करण्यात आली. यातील ५८ रिक्षा चालकांवर शालिमार येथे भद्रकाली पोलिसांनी कारवाई केली. नियमभंग करणाऱ्या चालकांच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक वाहतुकीत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकांबरोबरच बेशिस्त आणि महिलांचा अनादर करणाऱ्या रिक्षाचालकांचेही प्रमाण वाढते आहे. कॉलेजरोडसह शालिमार आणि नाशिकरोड पट्ट्यावर अशा उनाडटप्पू चालकांची मुजोरी वाढली आहे. याबाबतच्या तक्रारी थेट वरिष्ठ पातळीवर पोहचत असून, नियमबाह्य वर्तणूक असलेल्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे काम वाहतूक पोलिसांनी हाती घेतले आहे. मंगळवारी सकाळी भद्रकाली पोलिसांनी शालिमार येथे तब्बल ५८ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली. तर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी २९२ रिक्षा चालकांवर वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यातील बहुतांश रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, कोर्टातूनच त्या सोडविता येणार आहेत.

त्या रिक्षाचालकावर कारवाई

कर्णकर्कश म्युझिक सिस्टिमचा आवाज कमी करण्यास नकार देऊन महिलेला भर रस्त्यात उतरवून तिच्याशी वाद घालणाऱ्या रिक्षाचालकाचा वाहतूक पोलिसांनी शोध घेतला आहे. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी कॉलेजरोडवर घडला होता. सदर महिलेने फेसबुकवर सर्व प्रकार मांडल्यानंतर वाहतूक शाखेसह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी त्याची दखल घेतली. विशेष म्हणजे ही महिला एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची नातलग आहे. अल्ताफ दादामिया पानसरे (खडकाळी, भद्रकाली) असे या रिक्षाचालकाचे नाव असून, एमएच १५, इएच १४६२ या क्रमांकाची रिक्षा तो चालवत होता. कारवाईसाठी संबंधित रिक्षा चालकास कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, संबंधित रिक्षाचालकावर कारवाई न करता सरकारवाडा पोलिस स्टेशनला जाण्याचा सल्ला देणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचीदेखील चौकशी सुरू असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्युत परवान्यांबाबत मार्गदर्शन मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून विद्युत पर्यवेक्षक प्रमाणपत्र व परवाने आणि विद्युत ठेकेदार अनुज्ञप्तीबाबत मार्गदर्शन मेळाव्याचे शहरात आयोजन करण्यात आले आहे.

विद्युत निरीक्षक कार्यालय, महालक्ष्मी चेंबर्स, टाकळी फाट्यासमोर, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाजवळ, मुंबई-आग्रारोड, द्वारका येथे शनिवारी (दि. १९) सकाळी १०.३० वाजता हा मार्गदर्शन मेळावा होणार आहे. मेळाव्यामध्ये विद्युत पर्यवेक्षक परवानाधारकांसाठी विद्युत ठेकेदार अनुज्ञप्ती प्राप्त करण्याबाबत, तसेच तसेच विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी, पदविका, आयटीआय वायरमन, इलेक्ट्रिशियन पात्रता असणाऱ्या आणि एक वर्षाचा अनुभव घेतलेल्यांना तारतंत्री, विद्युत पर्यवेक्षक प्रमाणपत्र व परवाना मिळविण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. मेळाव्यास विद्युत तंत्रज्ञांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्युत निरीक्षक हे. ना. गांगुर्डे यांनी केले आहे.

-----

(थोडक्यात)

क्लब हाऊस भागाला कंटेनरचा वेढा (फोटो)

सातपूर : सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींत अवजड वाहनांना पार्किंगसाठी पुरेशा सुविधा मिळत नसल्याने रस्त्यांवरच वाहने उभी केली जातात. शनिवारी एमआयडीसीतील कारखाने बंद असल्याने सातपूर क्लब हाऊला कंटेनर्सचा वेढा पडल्याचे चित्र दिसून आले. केवळ योग्य पार्किंगची जागा उपलब्ध होत नसल्याने रस्त्यांवरच अवजड वाहने उभी करावी लागत असल्याचे चालकांनी सांगितले. त्यामुळे याप्रश्नी एमआयडीसीने पुढाकार घेण्याची अपेक्षा परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पांढऱ्या पट्ट्यांनी दिलासा

जेलरोड : उपनगर नाका ते जेलरोडदरम्यान रस्ता रुंद करण्यात आला आहे. या कॅनॉलरोडवर आता दोन्ही बाजूंना, तसेच मध्यभागी पांढरे पट्टे मारण्यात आल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. या पट्ट्यांमुळे रात्रीही दिशा मिळत आहे. त्यामुळे अपघातांची शक्यता कमी झाली आहे. उपनगर नाका ते इंगळेनगर चौकापर्यंत हे पट्टे मारण्यात आले असून, विजेच्या खांबांपुढे पिवळ्या रंगाचे फलक लावले आहेत. त्यामुळे येथे खांब असल्याचे वाहनचालकांच्या लगेचच लक्षात येते. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

'इप्कॉस'मध्ये रक्तदान शिबिर (फोटो)

सातपूर : 'सीटू'च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून इप्कॉस कंपनीत आयोजित रक्तदान शिबिरात कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांच्यासह १३० कामगारांनी सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कंपनीचे अध्यक्ष बॅनर्जी, राजेंद्र गाढवे,डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, तानाजी जायभावे यांच्या हस्ते करण्यात आले. विभागीय संदर्भसेवा रुग्णालयाच्या रक्तपेढीमार्फत आयोजित या शिबिरास कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिर यशस्वितेसाठी गणेश चौधरी, छगन सनेर, प्रशांत सोनजे, भरत कोळंबे, जे. डी. पाटील, सचिन बोरसे, संदीप दाभाडे, चंद्रकांत पाटील, प्रणव पटेल, नितीन देशमुख यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काझीगढीप्रश्नी पुन्हा ‘खल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदाकाठालगतच्या काझीगढी येथील रहिवाशांच्या सुरक्षेचे घोंगडे वर्षानुवर्षे भिजत पडले आहे. यंदाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भूस्खलनचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने येथे सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असा पत्रव्यवहार जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र, काझीगढीप्रश्नी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी असा काही तरी 'खल' होतो, ठोस उपाययोजना मात्र होत नसल्याची भावना येथील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

यंदा सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात असले, तरी दुसरीकडे शहरी आणि ग्रामीण भागातील रहिवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी उपाययोजना करणे अपरिहार्य ठरले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून त्यासंदर्भात नियोजनास प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत उपाययोजनेच्या पत्रव्यवहारामुळे काझीगढी येथील रहिवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शहरातील गोदाघाटालगत उंच कड्यावर वसलेल्या धोकादायक स्थितीतील काझीगढीसंदर्भात सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजनांसंदर्भात सालाबादप्रमाणे पुन्हा 'खल' सुरू झाला आहे. येथे दोनशेहून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. ढासळण्याच्या स्थितीत असलेल्या मातीच्या टेकडीवर ही लोकवस्ती असून, पावसाळ्यात येथे दुघर्टना घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येतो. पावसाळ्यापूर्वी दर वर्षी महापालिका गढी खाली करण्याच्या नोटिसा रहिवाशांना बजावते. परंतु, येथे थाटलेला संसार हलविण्यास रहिवासी सहजासहजी तयार होत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या नोटिसांना अनेकदा रहिवाशांकडून दादही दिली जात नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी घडलेल्या माळीण येथील दुर्घटनेनंतर काझीगढी परिसरातील नागरिकांची सुरक्षा गांभीर्याने घेण्यात आली. त्यांच्या पुनर्वसनाबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने पूर्वीच्या घटनांची माहिती देत महापालिका प्रशासनाला मान्सूनपूर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत पत्रव्यवहार केला असून, दोनशे कुटुबांचे पावसाळ्यापूर्वीच पुनर्वसन करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संरक्षक भिंत कागदावरच!

काझीगढीचा काही भाग गतवर्षी पावसाळ्यात कोसळला होता. या दुर्घटनेत २० जण जखमी झाले होते. भुयारी गटारीचे पाणी जमिनीत सातत्याने मुरल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर महापालिकेने नागरिकांचे स्थलांतरही केले. मात्र, रहिवाशांनी कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली असली, तरी ती अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे काझीगढी येथील रहिवाशांना अजूनही धोकादायक स्थितीत राहावे लागते आहे. महापालिकेनेही येथे संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. मात्र, अद्याप ही संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमचे काम खूपच छान आहे

$
0
0

जवखेड्यात अभिनेता आमिर खानचे गौरवोद्गार

म. टा. वृत्तसेवा, अमळनेर

‘आम्ही तुमचे गावात आलो आणि खूप छान वाटले. तुमचे काम खूपच छान आहे. छान तुमची टीम आहे, असे गौरवोद्गार अभिनेता आमिर खान याने जवखेड्यात काढले. मंगळवारी (दि. १५) पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील जवखेड्यात मंगळवारी (दि. १५) बॉलिवूड अभिनेता आमिर खान, किरण राव यांच्या उपस्थितीत श्रमदान करण्यात आले.

धुळे येथून नवलनगर, मोहाडीमार्गे पूर्ण टीम मंगळवारी सकाळी जवखेडा येथे पोहोचले. सुरुवातीला पथनाट्य सादर करण्यात आले. या वेळी गावाच्या तरुणींनी पाणी फाउंडेशनवरील अहिराणी गीत ‘चैत्र ना महिनामा, जागृत व्हयनाय, जवखेडाना विकास करणाय’, ‘जुनं सारं विसरूया, जवखेड्याचा विकास करूया’ या गीतांचे मंदिरासमोर सादरीकरण केले. येथील एकजूट कधी कुठे पाहिलेली नसून, मोठ्या प्रमाणात महिला शक्ती मला गावात दिसून आली, असेही आमिर म्हणाला. जलसंधारणाचे काम करत असतानाच मनसंधारणही झाले. याप्रकारे आपण केलेल्या कामाने प्रेरणा मिळाल्याची कबुलीही आमिरने बोलताना दिली.

तरुणाईचा जल्लोष
आमिर खान गावी पोहोचताच गावातील तरुणांनी जल्लोषात घोषणा द्यायला सुरुवात केली. या वेळी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी रफिक शेख, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक विजय कोळी, उज्ज्वला पाटील, सरपंच सुभाष पाटील, सभापती वजाबाई भिल यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’त जेलची भरारी

$
0
0

वर्षभरात सव्वा सहा कोटींची कमाई

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर अनेक उद्योग व्यवसायांचे कंबरडे मोडले. मात्र, जीएसटी लागू झाल्यानंतर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाने २०१७-१८ या वर्षात सुमारे सव्वासहा कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले. तसेच शेतीतूनही ४० लाखांचे उत्पन्न प्राप्त करत राज्यात अव्वल क्रमांक मिळवला, अशी माहिती कारागृह अधीक्षक राजकुमार साळी आणि कारखाना प्रमुख पल्लवी कदम यांनी दिली.

ब्रिटिशांनी १९२७ मध्ये नाशिकरोड कारागृह बांधले. येथे साडेतीन हजार कैदी आहेत. राज्यात नाशिकसह नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत. मध्यवर्ती कारागृहात महसूलसाठी विविध कारखाने, उपक्रम असतात. नाशिकरोड कारागृहाचे दोनशे एकरवर क्षेत्र आहे. मुख्य कारागृहात नऊ कारखाने चालतात. त्यामध्ये विणकाम, सुतारकाम, शिवणकाम, चर्मकला, बेकरी, लोहकाम, धोबीकाम, रसायन, मूर्तीकला यासह नऊ विभागांचा समावेश आहे. शेती विभाग वेगळा आहे. या सर्व विभागात पक्के कैदी काम करतात. त्यांना या कामाचे वेतन मिळते.

पोलिस मोठे ग्राहक

महाराष्ट्र पोलिस हे नाशिकरोड कारागृहाचे मुख्य ग्राहक आहेत. पोलिसांना ४० हजार मच्छरदाण्या शिवणकाम विभागाने पुरविल्या. तर लोहकाम विभागाने पोलिसांसाठी तब्बल ६० हजार लोखंडी किटबॉक्स तयार केले. हे काम २०१५ पासून सुरू आहे. कारागृहातील पैठणीलाही मोठी मागणी आहे. एक पैठणी तयार करायला पंधरापेक्षा जास्त दिवस लागतात. आतापर्यंत शंभर पैठणींची विक्री झाली. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती आहे. लंडनमधील स्वंयसेवी संस्थेला कारागृहाने सतरंज्या पुरवल्या होत्या. ही संस्था पुन्हा उत्सुक आहे. कारागृह प्रशासन दर्जाशी तडजोड करत नाही. विणकाम विभागाला दर्जेदार कच्चा माल न मिळाल्याने काम अनेक दिवस बंद होते. या वर्षा अमरावती कोर्टाची ८३ लाखांची फर्निचरची मागणी असून काम सुरू आहे. नंदुरबारचीही ३७ लाखांची मागणी आहे.

ब्रॅण्डिंगचा प्रयत्न

शुद्धता, दर्जा, टिकाऊपणा आदींबाबत कारागृहाच्या वस्तू नंबर वन आहेत. त्यांचे आतापर्यंत ब्रॅण्डिंग, प्रसिद्धी होत नव्हती. आता त्यावर भर दिला जात आहे. दोन वर्षांपूर्वी मंत्रालयातील प्रदर्शनात भाग घेऊन हे कारागृह अव्वल आले. नाशिकच्या औद्योगिक प्रदर्शनातही स्टॉल लावण्यात आला. यंदा नाशिक वाइन फेस्टिवलमध्ये कारागृहाने लावलेल्या विविध वस्तूंच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला. कारागृह गेटवर दिवाळी मेळ्यात यंदा साडेचार लाखांच्या वस्तू विकल्या. रक्षाबंधन मेळ्यातही मोठी विक्री झाली. कारागृहात प्रथमच मूर्ती विभाग सुरू झाला. त्यामध्ये तयार झालेल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती उत्सवापूर्वीच संपल्या. त्यामुळे आगामी उत्सवासाठी ११ महिन्यांपूर्वीच मूर्तीकाम सुरू झाले असून दोन हजार मूर्ती तयार केल्या जाणार आहेत.

कारखान्याच्या नऊही विभागात बंदीजनांच्या मदतीने उत्पादन घेतले जाते. कारागृह प्रशासनाने चालू आर्थिक वर्षासाठी नऊ कोटी उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे. विक्रमी घौडदोड कायम ठेवत राज्यात अव्वल स्थान कायम टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वांची चांगली साथ मिळत आहे.

- राजकुमार साळी, कारागृह अधीक्षक

जीएसटी लागू होऊनही आम्ही सहा कोटीचा आकडा पार करु शकलो याचे समाधान वाटते. साळी साहेबांचे कुशल व्यवस्थापन व मार्गदर्शन उपयोगी पडले. विश्वासहर्ता, दर्जामुळे कारागृहाच्या वस्तूंना मोठी मागणी असते. नवी यंत्रे घेतल्याने उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे.

- पल्लवी कदम, कारखाना व्यवस्थापक

कारागृह उपाशी

नाशिकरोड कारागृह कल्पक उपक्रम राबवून दरवर्षी विक्रमी महसूल मिळवते. कारागृहाच्या विकासासाठी हा महसूल वापरता येत नाही. तो राज्य सरकारकडे जमा करावा लागतो. नंतर अनुदान स्वरुपात कारागृहाला निधी येतो. कारागृहाचे अनेक चांगले प्रकल्प, विकास कामे लालफितीच्या कारभारामुळे रखडली असून निधी वेळेवर मिळत नाही.

……………

विभाग................मिळलेले उत्पन्न

शिवणकाम : १,८९,३८,०००

लोहकाम : १,४७,००,०००

सुतारकाम : १,४४,००,०००

विणकाम : ६६,३६,०००

रसायन : ३७,४३,०००

बेकरी : १५,००,०००

धोबी : ६,५०,०००

मूर्तीकला : ५,७५,०००

चर्मकला : २,२५,०००

जेलचा वाढता उत्पन्न आलेख

आर्थिक वर्ष................उत्पन्न (रुपये)

२०१७-१८................६,१४,३७,०००

२०१६-१७................५,७५,४६,०००

२०१५-१६................४,३५,११,९५०

२०१४-१५............... २,५१,०४,०१७

२०१३-१४...............२,४५,५०,४६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीत शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, वनारे (ता. दिंडोरी) येथेही एका त्रस्त शेतकऱ्याने विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले. या घटनेची जिल्हा प्रशासनाने नोंद घेतली असून, जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३४ झाली आहे.

तुकाराम अर्जुन गायकवाड (वय ४७) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या नावे ४ हेक्टर ८१ आर जमीन असून, मडकीजांब येथील तलाठ्याने जिल्हा प्रशासनाला त्याबाबतची प्राथमिक माहिती दिली. गायकवाड यांनी १२ मे रोजी विष प्राशन केले होते. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी ननाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती खालावल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. परंतु, मंगळवारी (दि. १५) सकाळी पावणेआठच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत. गायकवाड यांनी कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली याचा शोध घेण्यात येणार असून, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाडे असलेली बॅग सापडली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडच्या आनंदनगर येथील बाभळीच्या झाडांमध्ये हाडे असलेली बॅग आढळल्याने खळबळ उडाली. ही हाडे मानवी आहेत की प्राण्यांची, याची खात्री उपनगर पोलिस करीत आहेत. या बॅगवर उर्दू अक्षरे असून, नाव व क्रमांक आहे. तसेच हाडांना रंग आहे. एखाद्या हॉस्पिटलने निष्काळजीपणे ही बॅग टाकून दिल्याचा पोलिसांचा कयास आहे.

मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विशाल पांडव या नागरिकाला ही बॅग दिसली. त्याने उपनगर पोलिसांना कळवले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, उपनिरीक्षक संदीप कांबळे, गणेश जाधव, सहाय्यक रासायनिक विश्लेषक प्रतिमा गोस्वामी हे दाखल झाले. पंचनामा करून बॅग ताब्यात घेण्यात आली. या हाडांची प्राथमिक तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. गरज वाटली तर न्यायवैद्यक प्रयोगशाळेत हाडांची डीएनए चाचणी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे थकविणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात तक्रार

$
0
0

मालेगाव बाजार समिती संचालक मंडळाची कठोर पावले

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध संचालक व प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. जय भोले ट्रेडर्सचे संचालक शिवाजी सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांचे २ कोटी ८६ लाख थकविले म्हणून येथील तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार आहे.

गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने मुंगसे येथील कांदा खरेदी विक्री केंद्रात जय भोले ट्रेडर्सचे संचालक शिवाजी सूर्यवंशी यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला. मात्र त्यांनी दिलेले धनादेश परत आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले. संचालक मंडळ व प्रशासनाने यात मध्यस्थी करीत तीन कोटी ७६ लाख रुपयांपैकी सुमारे १ कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरीत केले होते. मात्र दोन कोटी अद्याप थकीत आहेत. दरम्यानच्या काळात संचालक मंडळाचे पथक सूर्यवंशीच्या शोधात बंगलादेश येथे जावून आले. मात्र पथकाला खाली हात परतावे लागले होते.

शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याप्रकरणी अखेर सहकार विभागाने संचालक मंडळाला बरखास्तीची नोटीस बजावली आहे. याबाबत संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोमवारी आपले म्हणणे मांडले. आता संबंधित व्यापाऱ्यावर थेट पोलिस कारवाई करण्याची आमची तयारी असल्याचे उपसभापती सुनील देवरे यांनी 'मटा'ला सांगितले. याबाबत मंगळवारी बाजार समिती संचालक मंडळ तसेच शेतकरी यांनी तालुका पोलिस ठाण्यात निरीक्षक यांची भेट घेवून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्वकाल साधण्यासाठी त्र्यंबकमध्ये गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

अधिक मासाचा पर्वकाल साधण्यासाठी अमावस्येपासूनच भाविकांची गर्दी उसळली आहे. वर्षभर शनिवार, रविवार आणि शासकीय सुटी वगळता भाविकांचा ओघ तुरळक राहिला होता. उन्हाळी सुट्या असताना देखील लग्नसराई आणि वाढते तापमान यामुळे भाविकांची संख्या रोडावली होती. तथापि अधिकामासाच्या पूर्वसंधे पासूनच शहर गजबजले आहे. कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी होत आहे. अधिक महिना अर्थात धोंड्याच्या महिन्यात वाण देण्या-घेण्यासाठी भाविक येथे मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.

दुष्काळात तेरावा महिना

मे महिन्याच्या उत्तरार्धात अधिक महिना आला आहे. भाविकांची गर्दी उसळली असताना शहरात एक दिवसआड पाणी पुरवठा होत आहे. ग्रामस्थांना घरी पाहुणे, यात्रेकरू येत असताना त्यांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत असल्याने दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा प्रत्यय येत आहे.

खासगी वाहतूक सुसाट

अधिक महिन्याचा पर्वकाल साधण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी उसळली आहे. बहुतांश भाविक बस प्रवासाला प्राधान्य देतात. यातूनच नाशिक-त्र्यंबक मार्गावर बस प्रवासी वाढले आहेत. तथापि याचे कोणतेही नियोजन बस महामंडळ प्रशासनाने केलेले नाही. नाशिक आणि त्र्यंबक दोन्ही स्थानकावर प्रवासी बसची वाट पाहत खोळंबलेले आढळतात. सायंकाळी तर बसची संख्या अत्यंत कमी आहे. नाशिक-त्र्यंबक मार्गावर २२ थांबे आहेत. यातील काही ठिकाणी बस थांबतच नाहीत. परिणामी प्रवासी खासगी वाहतुकीला प्राधान्य देत आहेत.

प्रवाशांची फसवणूक

नाशिक-त्र्यंबक मार्गावर खासगी वाहतूक सुसाट धावत आहे. त्र्यंबक येथून नाशिकला जातांना ही वाहने कोणत्या स्थानकात जाणार याचा पत्ता नसतो. भाविक, प्रवाशांना नाशिक येथून पुणे, मुंबई, धुळे, रेल्वेप्रवासासाठी नाशिक रोड स्टेशन आणि नाशिकमध्येच असेल तर रामकुंड, पंचवटी आदी ठिकाणी जायचे असते. नाशिक येथे याकरिता वेगवेगळे बसस्थानक आहेत. परप्रांतीय भाविकांचा मात्र खासगी वाहनधारकांमुळे गोंधळ होतो. काही खासगी वाहनधारक तर परप्रांतीय प्रवाशांची फसवणूकही करतात. त्यामुळे बस प्रशासनाने योग्य तो निणर्य घेण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता, पाण्यासाठी महिला आक्रमक

$
0
0

मालेगाव पालिकेवर आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील प्रभाग क्र ३ मधील द्याने, रमजानपुरा परिसरात दररोज साफसफाई व्हावी, कचरा नियमितपणे उचलला जावा, पाणीपुरवठा सुरळीत व्हावा आदी प्रमुख मागण्यांसाठी या भागातील महिला व नागरिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सोमवारी मोर्चा काढला.

सामाजिक कार्यकर्ते शेख शमीम शेख शकील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी कर उपायुक्त राजू खैरनार यांच्यापुढे समस्याचा पाढा वाचला. द्याने रमजानपुरा भागात नियमित साफसफाई होत नाही. कचरा उचलला जात नाही. सफाई कामगार एक एक महिना येत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे अनेकवेळा रस्त्याने अपघात होवून अनेकांना दुखापत झाली आहे. तसेच सर्वे नं. १७५, २१३ व २२० येथे जलवाहिनी टाकण्यात आली असली तरी अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे परिसरातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, अशा विविध समस्या उपायुक्त खैरनार यांच्यापुढे मांडल्या.

दरम्यान उपायुक्त खैरनार यांनी मोर्चेकरी महिलांशी चर्चा करून जलवाहिनीचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना शहर अभियंता सचिन माळवळ यांना दिल्या. तसेच स्वच्छता विभागाचे अधिकारी सोनवणे यांना स्वच्छता करण्याचा सूचना देत रस्त्यावरील पथदिवे त्वरित सुरू करण्याची ग्वाही दिली. खैरनार यांच्याशी चर्चेनंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी मोर्चात रफिक किराणावाला, अमीन अकबर, शेख अंजुम, एकीलाबानो यांच्यासह या परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा

$
0
0

लोगो- चर्चा तर होणारच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अशोकामार्ग परिसरात कुत्रा चावल्याने मालकास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. हे प्रकरण थेट पोलिस स्टेशनपर्यंत पोहचले असून, श्वानमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांची संख्या मोठी आहे. अशा श्वानप्रेमींसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

इंदिरानगर परिसरात काही दिवसांपूर्वी एका वृद्धेवर चार ते पाच गाईंनी जबरदस्त हल्ला चढवला होता. महिलेला थेट आयसीसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. ही घटना ताजी असताना आता पाळीव श्वानाने ११ वर्षांच्या बालिकेला चावा घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी अविनाश चंद्रमोहन बोडके (४४, रा. फ्लॅट क्रमांक १, प्रतीक पार्क, लिंगायत कॉलनी, गणेश बाबानगर, अशोकामार्ग) यांनी फिर्याद दिली आहे. २४ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास बोडके आपल्या ११ वर्षांच्या मुलीला घेऊन बागेत निघाले होते. श्रेया आणि अविनाश मोपेडवरून जात असताना नितीन आंधोळकर यांनी पाळलेला श्वान त्यांच्या दुचाकीच्या दिशेने झेपावला. श्वानाने श्रेयाचा चावा घेऊन जखमी केले. घटनेनंतर संबंधीत श्वानमालकास बोडके यांनी जाब विचारला. मात्र, श्वानमालकाने हात वर केले. याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा म्हणून बोडके यांनी पाठपुरावा सुरू केला. अखेर मुंबईनाका पोलिसांनी कलम २८९ प्रमाणे श्वान मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास हवालदार एस. पी. क्षीरसागर करीत आहेत. कलम २८९ हे पाळीव जनावरांबाबत असून, प्राणी पाळणाऱ्या व्यक्तीने दुर्लक्ष केल्यामुळे तसेच प्राण्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येतो. हा गुन्हा सिद्ध झाल्यास मालकाला सहा महिन्यांपर्यंत शिक्षा अथवा दंड किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. महापालिकेकडे अवघ्या दोन हजार पाळीव श्वानांची नोंद असून, श्वान मालक नोंदणीसह इतर सुरक्षा साधनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध धडक कारवाईची गरज

$
0
0

काही ना काही  कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या शहरातील बहुसंख्य महिलांना रिक्षाने प्रवास करणे अपिरहार्य ठरते. मात्र, काही टवाळखोर रिक्षाचालकांच्या गैरवर्तणुकीमुळे अनेक महिलांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. पण, अशा घटनांची तक्रार करण्याकडे त्या दुर्लक्ष करतात. मात्र, आता महिला सतर्क होताना दिसत आहेत. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला असून, एका महिलेने रिक्षाचालकाच्या मुजोरीबाबत थेट सोशल मीडियात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित बेशिस्त रिक्षाचालकावर कारवाईला चालना मिळू शकली. पोलिसांनी केवळ एका कारवाईवर न थांबता बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध धडक मोहीम राबविणे गरजेचे झाले. वेळोवेळी अशी कारवाई झाली, तरच नाशिकच्या रस्त्यांवरील बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लागण्यासह महिलांनादेखील निर्धोकपणे प्रवास करणे शक्य होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

रिक्षाचा प्रवास बनला 'रिस्की'

आज प्रत्येकाकडे दुचाकी अथवा चारचाकी वाहन असले, तरी कधी ना कधी रिक्षात बसण्याची वेळ प्रत्येकावर येते. नाशिकमध्ये रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराचा नमुना आपण रस्त्यावर नेहमी पाहत असतो. काही टवाळखोर रिक्षाचालकांमुळे महिलांसाठी रिक्षाचा प्रवास 'रिस्की' बनत चालला आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे .

-धनंजय गोडसे

नियम मोडण्यात आघाडी

शहराच्या  विविध भागात अनेक रिक्षाचालक व्यवसाय करतात. वाहतूक पोलिस अनेकदा पोटावर पाय नको या उद्देशाने  त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत. त्याचाच गैरफायदा घेत काही मुजोर रिक्षाचालक मनमानी करताना दिसतात.  रिक्षा चालविताना या चालकांकडून नेहमीच वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे इतर वाहतुकीवरही ताण येतो.

-दत्तात्रय गायकवाड 

'प्रवासी देवो  भव:'ला हरताळ 

नाशिकमधील सिग्नलवर काही  रिक्षाचालक सिग्नल हिरवा नसतानादेखील सर्रासपणे तो तोडून निघून जातात. महत्त्वाची सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अशी धोकादायक पद्धतीने वाहतूक  होत आहे. परिणामी 'प्रवासी देवो भव:' या ब्रीदालाच जणू हरताळ फासला जात आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी बेशिस्तांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

-संदेश गांगुर्डे

कारवाईऐवजी सल्ले दुर्दैवी

पोलिस काय आणि वाहतूक पोलिस काय, या दोघांवरही कायद्याची अंमलबजावणी करीत  असताना कोणाकडून काही चूक झाली असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आहे. मात्र, बेशिस्त रिक्षाचालकांकडून एखाद्या महिलेची छेड काढली जात असताना पोलिसांनी कारवाई न करता चुकीचे सल्ले  दिले जातात हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

-मधुकर गोडसे 

सर्वांनीच बाळगावी सतर्कता

अनेक रिक्षाचालक तीस-चाळीस वर्षे प्रामाणिकपणे रिक्षा चालवीत उपजीविका करीत आहेत. मात्र, काही जण  केवळ पैसे कमावण्यासाठी हा व्यवसाय करतात. त्यांच्यात सेवाभाव नसतो. त्यामुळे अनेक गैरप्रकार घडताना दिसतात. त्याचा महिलांना जास्त त्रास होतो. त्यामुळे महिलांसह सर्वांनीच रिक्षाने प्रवास करताना पुरेशी सतर्कता बाळगायला हवी.

- प्रदीप पाटील

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनैश्वर महाराजांचा जयघोष…...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहर परिसरातील शनी मंदिरांत शनैश्वर यागासह सुरू असलेले विविध धार्मिक विधी… दर्शनासाठी भाविकांच्या लागलेल्या रांगा अन् शनी महाराजांचा सुरू असलेला जयघोष अशा भक्तिमय वातावरणात मंगळवारी शनैश्वर महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा झाला.

रंगरंगोटी करून सजविलेले शनी मंदिरे, त्यांच्यासमोर आकर्षक मंडपांची केलेली उभारणी, शनी महाराजांच्या स्तोत्राचे सुरू असलेले पठण, शनैश्वर यागाचे आयोजन, रुईच्या माळा शनी मूर्तीला अर्पण करून तेलाचा अभिषेक करणारे भाविक असे चित्र शहरातील ठिकठिकाणच्या शनी मंदिरांत दिसून आले.

पंचवटीत शनैश्वर याग

पंचवटीतील शनी चौकातील श्री शनी मंदिर ट्रस्टतर्फे लघुरुद्राभिषेक करण्यात आला. सायंकाळी शनैश्वर महाराजांचा सवाद्य पालखी सोहळा झाला. पंचवटी परिसरात ही पालखी मिरवणूक काढण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार जानोरकर, उपाध्यक्ष सुनील महंकाळे, सचिव सुनील कोठुळे, विश्वस्त रघुनंदन मुठे, भास्करराव करकळे आदींनी ग्रहराज शनैश्वर पीडा परिहारार्थ व जनकल्याणार्थ सनवग्रहमख शनैश्वर यागाचे आयोजन केले.

पेठरोडला शोभायात्रा, बोहडा

पेठरोड येथील रामनगर येथे श्री शनैश्वर महाराज उत्सव समितीतर्फे शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी मकरंद गर्गे यांच्या पौरोहित्याखाली शनी महापूजा व तेलाचा महाभिषेक करण्यात आला. गणपती पूजन, पुण्याहवाचन, माकापूजन, मुख्य देवता, नवग्रह स्थापन पूजन करून दुपारी सांगता करण्यात आली. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री दशावतारी सोंगे (बोहडा) कार्यक्रम झाला. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा श्री शनैश्वर महाराज उत्सव समितीचे लक्ष्मण धोत्रे, नंदूभाऊ पवार, अनिल कोठुळे, अनिल कुसाळकर, पोपटराव इंगळे, सोमनाथ लोणे यांनी सत्कार केला.

...या मंदिरांतही पूजन

रामकुंड, काळाराम मंदिर दक्षिण दरवाजा, तपोवन, शर्वायेश्वर महादेव मंदिर, नांदूर, आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद आदी ठिकाणच्या शनी मंदिरांतदेखील भाविकांनी पूजा आणि दर्शनासाठी गर्दी केली होती. आज, बुधवारी (दि. १६) रोजी सायंकाळी शनी चौक, पेठरोड आदी शनी मंदिरांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

रामकुंडावर स्नानासाठी गर्दी

शनी जयंतीनिमित्त सकाळपासूनच भाविकांची रामकुंडावर स्नानासाठी गर्दी झाली होती. रामकुंडावर स्नान केल्यानंतर भाविक शनी मंदिरांत दर्शनासाठी जात होते. मंदिरांच्या भोवताली पूजा आणि प्रसादाची दुकाने थाटण्यात आली होती. शनी महाराजांना अर्पण करण्यात येणारे वस्त्र, श्रीफळ, तेल, अगरबत्ती, कापूर, रुईच्या माळी आदी विक्रीसाठी उपलब्ध होते. मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या भोवतालचे रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले होते.

००००००

नाशिकरोडला पालखी मिरवणूक

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडला शनी जयंती उत्साहात साजरी झाली. देवळालीगाव, विहितगाव परिसरातील अण्णा नवग्रह मंदिर, दसक, लोखंडे मळा, उपनगर आदी ठिकाणच्या शनी मंदिरांत दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. बिटको चौकापासून देवळालीगावापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यात सामाजिक, राजकीय मंडळींसह तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

तैलाभिषेक, मांडव-डहाळे

देवळालीगावातील शनी मंदिरात शनैश्वर मित्रमंडळ व जयंती उत्सव समितीतर्फे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे तैलाभिषेक, सकाळी मांडव-डहाळे, महाआरती झाली. त्र्यंबकबाबा भगत, अण्णा गुरुजी महाराज, विजय भोई, आमदार योगेश घोलप, अॅड. शांतारामबापू कदम, त्र्यंबकराव गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, बिझनेस बॅंकेचे अध्यक्ष विजय चोरडिया, सुधाकर जाधव, जगन आगळे, अरुण जाधव, डॉ. प्रशांत भुतडा, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, बाळनाथ सरोदे, संतोष सहाणे, श्याम गोहाड आदी उपस्थित होते. बिटको चौकापासून देवळालीगावापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंगेश लांडगे, संतोष माळवे, अजय कडभाने, नीलेश खुळगे, अमर सुखय्या, विलास ताजनपुरे, उन्मेश गायकवाड, अतुल जावरे, नीलेश लांडगे, सागर कडभाने, बबलू नाडे, शुभम टाकळकर आदींनी संयोजन केले

ब्रह्म मुहूर्तावर पूजन

विहितगाव परिसरातील अण्णा गणपती नवग्रह मंदिरात पहाटे साडेतीनला ब्रह्म मुहूर्तावर अण्णा गुरुजींच्या हस्ते तैलाभिषेक, मंत्रपठण, शनी याग व नंतर महाआरती झाली. खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, पोलिस निरीक्षक रवींद्र माने, शुभांगी रत्नपारखी, सुधीर अंबावणे, शेखर अण्णा नायडू आदींची प्रमुख उपस्थिती होती. यजमान मिलिंद दांबले, दीपकभाई लुणावत, प्रवीण लुणावत आदींच्या हस्ते पूजा झाली. दिगंबर त्रिपाठी यांनी पौरोहित्य केले. नितीन भोजणे, पंकज कवळी, दीपेश पटेल, कांतिलाल पटेल, नरेश शहा, परेश अग्निहोत्री आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वारकरी विश्व जीवनगौरव’ने भाऊराव महाराजांचा सन्मान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वैकुंठवासी भाऊराव महाराज यांनी वारकरी ज्ञान संपादित करून आपले संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसारासाठी वाहिले. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन विश्वशांती वैष्णव धर्म सोहळ्याच्या वतीने नाशिकमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात त्यांचा मरणोत्तर वारकरी ‌विश्व जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्रभूषण वारकरीरत्न हभप बाबा महाराज सातारकर यांच्या हस्ते प्रमिला भाऊराव रावळगावर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी वासुदेव महाराज रावळगावकर, सोपान महाराज रावळगावकर उपस्थित होते. भाऊराव महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, गुजरात आदी भागात व्यसनमुक्ती, हुंडाबळी, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, तसेच सामाजिक एकोपा जोपासण्यासाठी आपल्या कीर्तन-प्रवचनांच्या माध्यामातून समाजप्रबोधन करून ज्ञानदान केले. त्यांच्या तिसऱ्या पिढीकडूनदेखील आजही त्यांचे कार्य सुरू आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाने त्यांच्या कुटुंबीयांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

(फोटो) (सोशल कनेक्ट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीमंती सोहळ्यांमध्ये राबताहेत चिमुकले हात

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

डोळे दिपून टाकणाऱ्या श्रीमंती लग्नसोहळ्यांच्या आनंदामागे अनेक चिमुकले हात राबत असल्याचे दुर्दैवी चित्र शहरात आहे. अनेक लॉन्समध्ये सर्रासपणे बालकामगार काम करीत असल्याचे दिसून आले. कायद्याने चौदा वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास मनाई आहे. चौदा वर्षांवरील मुले (अठरापर्यंत) चार तासांपेक्षा अधिक काम करणार नाहीत, असेही बंधन आहे. प्रत्यक्षात हे केवळ कागदावर असल्याचे नाशिकमध्ये दिसून येते आहे.

नाशिकच्या विविध भागांत असलेल्या लॉन्समध्ये साजऱ्या होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालकामगार काम करताना दिसतात. जेवणाच्या थाळ्या उचलणे, खरकटी काढणे, झाडू मारणे अशा अनेक कामांमध्ये काही प्रतिष्ठित लॉन्समधून बालकामगारांकडून काम केले जात आहे. याशिवाय मुलांचा वापर करून रस्त्यावरील सिग्नलवर भीक मागणे, गजरे विकणे, खेळणी विकणे हे चित्रही रोजचेच आहे. अशा या घटकांकडे अनेक सामाजिक संस्था व प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

सन २०१३ मध्ये 'आंतरराष्ट्रीय मजूर संघटने'च्या आकडेवारीनुसार सध्या जगात ५.२ कोटी बालकामगार आहेत. १.७ कोटी भारतात आहेत, म्हणजे भारतातील एकूण कामगारांपैकी बालकामगारांची संख्या सहा टक्के आहे. उपरोक्त कायद्यामुळे संघटित क्षेत्रातील बालकामगारांची संख्या कमी झाली असली, तरी असंघटित क्षेत्राची कायद्यातून सुटका होत असल्याने तेथे बालकामगारांची संख्या वाढून त्यांची परिस्थिती अधिक हलाखीची होत आहे. केवळ कायद्याने बालकामगार प्रश्नांची सोडवणूक होऊ शकत नाही, त्यासाठी मूलभूत आर्थिक-सामाजिक परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे. यासाठी बालकामगारांना शिक्षण देणे हाच पर्याय आहे. बालकामगार निर्माण होण्यास आई-वडिलांचा अशिक्षितपणा, अज्ञान, व्यसन, दारिद्र्य आदी घटक कारणीभूत असतात. घरात खाणारी वाढती तोंडे व पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालवण्यासाठी अर्थार्जन करावे लागत असल्याचे दिसून येते. २०१५-१६मध्ये राज्यात ७,२७,४३२ बालकामगार होते.

कायदा काय म्हणतो ?

१४ वर्षाखालील मुलांना काम करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मात्र, स्वत:च्या कुटुंबियांच्या मालकीच्या उद्योगांमध्ये, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात १४ वर्षांखालील मुलांना काम करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, लॉन्समधून बालकामगार कामावर ठेवणे हा दखलपात्र गुन्हा ठरवला असून, त्याचा भंग केल्यास तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येते. बालकामगार सुधारणा विधेयकात देशात सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा विचार केला आहे. शेती, कलाकुसर या क्षेत्रात देशातील अनेक कुटुंबांमध्ये मुले आपल्या आई-वडिलांना मदत करतात. नवीन विधेयकातील तरतुदीनुसार, स्वत: कुटुंबीयांच्या मालकीच्या उद्योगांमध्ये, चित्रपट, मालिका, जाहिराती आणि क्रीडा क्षेत्रात १४ वर्षांखालील मुलांना काम करता येऊ शकेल. मात्र, शाळा सुटल्यानंतर त्यांना हे काम करावे लागेल.

अल्पवयीन मुलांना कायद्याने बंदी असताना लॉन्समधून त्यांच्याकडून अशा प्रकारे काम करून घेणे चुकीचे आहे. समाजाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळली, तरच बालकामगारांची मुक्तता होईल.

- अॅड. अशोक आडके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागर संपर्क यात्रेत सहभागी व्हा

$
0
0

जागर संपर्क यात्रेत सहभागी व्हा

राजाराम पानगव्हाणे यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेस कार्यकर्ता जागर संपर्क यात्रेस जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी व युवकांनी सहभागी होऊन काँग्रेसला बळकट करण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले. काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. लासलगाव-पाटोदा मार्गावरील चांदर पाटील मंगल कार्यालयात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता जागर संपर्क मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित यांनी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यातील महिला व युवतींचीही साथ आवश्यक असून, त्यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेसच्या माध्यमातून पंचायत राज या संकल्पनेचाही प्रसार जिल्हाभरात करण्यासाठी मेहनत घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अॅùड. आकाश छाजेड म्हणाले, 'जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना एकत्र आणून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी एकदिलाने काम करण्यासाठी जिल्ह्यातील युवा कायकर्ते तयार आहेत. या युवाशक्तीला प्रोत्साहन देऊन सरकारविरोधात जोरदार लढाई लढायची वेळ आली असून, या संपर्क यात्रेच्या माध्यमातून त्यादृष्टीने पहिले पाऊल उचलले आहे.'

लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक राहुल दिवे म्हणाले,'नवीन नेते, युवा नेतृत्व तयार करायचे असेल तर काँग्रेसने युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भविष्यात ताकद देणे गरजेचे आहे.' या कार्यकर्ता जागर संपर्क यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या अन्यायकारक धोरणांवर कडाडून हल्लाबोल चढविण्यात येणार असून, या संघर्षाचे प्रतीक म्हणून एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस नितीन काकड, जिल्हा एनएसयुआय अध्यक्ष राहुल कदम, उपाध्यक्ष कुशल लुथरा यांच्यातर्फे संपर्क यात्रा समितीस आसूड भेट देण्यात आला. जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष गुणवंत होळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. येवला विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विकास चांदर पाटील यांनी आभार मानले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार, अश्विनी आहेर, जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील आव्हाड, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, राजेंद्र मोगल, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस गुणवंतराव होळकर, जिल्हा युवक काँग्रेस माजी अध्यक्षा साधना जाधव, प्रदेश एनएसयुआय सरचिटणीस नितीन काकड, प्रदेश युवक काँग्रेस सचिव स्वप्नील पाटील, नाशिक जिल्हा एनएसयुआय अध्यक्ष राहुल कदम, उपाध्यक्ष कुशल लुथरा, युवक काँग्रेस लोकसभा अध्यक्ष सचिन कोठावदे, जिल्हा इंटक अध्यक्ष भास्कर गुंजाळ, प्रकाश अडसरे आदी उपस्थिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्णा पतसंस्थेस सव्वा कोटी नफा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेस १ कोटी २० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती चेअरमन सुभाष येवला यांनी दिली. या पतसंस्थेच्या नाशिकमध्ये रविवार पेठ, पवननगरसह त्र्यंबकेश्वर, विंचूर आणि मालेगाव अशा पाच ठिकाणी शाखा आहेत.

या पतसंस्थेची मार्च २०१८ अखेर सभासदसंख्या २१७९ इतकी असून, वसूल भागभांडवल १ कोटी ४२ लाख रुपये आहे. पतसंस्थेकडे ३१ कोटी ८५ लाखांच्या ठेवी असून, २२ कोटी ६८ लाखांचे कर्जवाटप केलेले आहे. पतसंस्थेची गुंतवणूक १८ कोटी १५ लाख रुपये असून, ४६ कोटी खेळते भांडवल आहे. पतसंस्थेकडे ७ कोटींचा स्वनिधी आहे. या पतसंस्थेच्या प्रगतीत संस्थापक चेअरमन भास्कर कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाइस चेअरमन अविनाश कोठावदे, मानद कार्यकारी संचालक ओमप्रकाश जाजू, जनसंपर्क संचालक केशव वाणी, ज्येष्ठ संचालक सुभाष बिरारी आदींचे योगदान लाभलेले आहे.

मृत्युंजयी निधी

पतसंस्थेचे दोन वर्षांपूर्वी सभासदत्व स्वीकारलेल्या सभासदांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना मृत्युंजयी निधी देण्यास वार्षिक सभेत मंजुरी देण्यात आली आहे. १ एप्रिलपासून योजनेस प्रारंभ झाला असून, निधन पावलेल्या क्रियाशिल सभासदास २१ हजार, सर्वसाधारण सभासदास ११ हजार रुपयांचा मृत्यूंजयी निधी दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे ५६ टन कचरा संकलित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अलिबाग जिल्ह्यातील रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून सुमारे ५६ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. जिल्हाभरातील शासकीय कार्यालये आणि प्रमुख रस्त्यांवर या अभियान राबविण्यात आले.

नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, लासलगाव, इगतपुरी, सिन्नर, सटाणा, येवला व नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले आदी ठिकाणी रविवारी सकाळी अभियान राबविण्यात आले. २ लक्ष ७७ हजार ९१८ चौरस मीटर क्षेत्रफळ व १११ किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करून ५६ टन कचऱ्याचे संकलन झाले. या अभियानात २६१४ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. संबंधित नगरपालिकांनी या कचऱ्याच्या संकलनासाठी वाहनांचीही उपलब्धता करून दिली.

नाशिकमध्ये राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरुण पवार, रत्नमाला राणे, रुची कुंभारकर, अर्चना थोरात, पुष्पा आव्हाड, सुवर्णा मटाले, रंजना बोराडे, सुरेश खेताडे आदींचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपोषणमुक्तीसाठी शेवगा पिकवा

$
0
0

जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. नरेश गिते यांचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेवग्याचे झाड आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून कुपोषण निर्मुलनासाठी सदरचे झाड वरदान आहे. शेवग्याच्या झाडाचे फुल, शेंगा, पाला यापासून आवश्यक पोषकतत्व प्राप्त होत असल्याने दैनंदिन आहारात याचा वापर कारणे गरजेचे आहे. प्रत्येक अंगणवाडी, आरोग्यकेंद्र व कुपोषित बालकांच्या घर-परिसरात शेवगा पिकविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. नरेश गिते यांनी केले. येवला पंचायत समितीची आढावा बैठक डॉ. गिते यांच्या उपस्थितीत येवला येथील महात्मा फुले नाट्यगृहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

शेवग्याच्या झाडांच्या बिया आणून सर्व खातेप्रमुखांच्या हस्ते ग्रामसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका आदींना त्याचे वाटप करण्यात आले. डॉ. गिते म्हणाले, की ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेवगा लावून त्याचे संगोपन करावे. गरोदर माता, कुपोषित बालक यांच्यासाठी त्याचा वापर करावा. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात शेवगा लावून जिल्हा शेवगामय करण्याचे आवाहन डॉ. गिते यांनी केले.

यावेळी डॉ. गिते यांनी कुपोषणाबाबत सर्व यंत्रणेला मार्गदर्शन केले. कुपोषण निर्मूलन झाल्यास सुदृढ व बौद्धिक पिढी तयार होणार असून त्यांचा शारीरिक व मानसिक विकास झाल्यास निश्चितच आपल्या सर्वांनाही कामाचे समाधान मिळणार आहे. कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून जिल्हा कुपोषणमुक्त करणारच, असा निर्धारही डॉ. गिते यांनी यावेळी व्यक्त केला.

बैठकीच्या सुरुवातीलाच ग्रामबाल विकास केंद्र, तालुकास्तरीय प्रशिक्षण, आरोग्य व आहार संहिता याबाबत डॉ. गिते यांनी आढावा घेतला. जिल्हा व तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच ग्रामसेवकांनाही याबाबत प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले. मे महिन्यात अंगणवाडी सेविकांना सुट्या घ्यावयाच्या असतील तर त्यांना मुभा असून ज्या अंगणवाडी सेविकांना ग्राम बाल विकास केंद्राचे काम करावयाचे असेल त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम करावे असेही डॉ. गिते म्हणाले.

विविध विभाागांचा आढावा

महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी आहार संहितेबाबत माहिती देताना ग्रामसेवकांनी ग्रामविकास आराखड्यातील १० टक्के रक्कम अंगणवाडीच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. आयुष्यमान भारत योजनेचा प्राथमिक केंद्रानुसार आढावा घेण्यात आला. पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी दूषित पाणी नमुने, टीसीएल तपासणी, नादुरुस्त शौचालयांचा आढावा घेतला. सामान्य पप्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी ग्रामस्वराज्य साप्ताह, अफरातफर प्रकरण, प्रलंबित प्रकरण, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, वृक्ष लागवड, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, आपले सरकार पोर्टल याबाबत सविस्तर आढावा घेतला. तर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. सर्व घरकुलांची आधारशी जोडणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सिंचन विहिर, विहीर पूनर्भरण, पाणी पुरवठा योजना, ग्राम पंचायतीमधील जनसुविधेचे कामे, घरकुल आदी योजनाची अपूर्ण बांधकामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी डॉ. गिते यांनी सर्व संबंधितांना दिले. आढावा बैठकीस जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. गिते यांची गुपचूप एन्ट्री

तालुका आढावा बैठक सुरू असताना डॉ. गिते हे मागील दाराने गुपचूप येऊन कर्मचाऱ्यांमध्ये बसले. यावेळी आहार व आरोग्य संहितेचा आढावा घेण्यात येत होता. डॉ. गिते आल्याची कुणालाच गंधवार्ता नव्हती अर्धा ते पाऊन तास डॉ. गिते मागील खुर्चीवर बसून सर्व ऐकत होते. यावेळी नगरसूल येथील आरोग्यसेविका मोबाइलवर व्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदर आरोग्यसेविकेस बैठकीतून काढून देत त्यांची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. डॉ. गिते यांच्या गुपचूप एन्ट्रीने अधिकाऱ्यांसह कर्मचारी अवाक् झाले.

कुपोषण निर्मूलनाचा नारा

डॉ. गिते यांनी कुपोषण या विषयाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. यावेळी कुपोषण निमूर्लन झालेच पाहिजे, हे घोषवाक्य डॉ. गिते यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वदवून घेतले. जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडूनही सदरचे घोषवाक्य सर्वांसमोर म्हणून घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन सोनोग्राफी केंद्रे सील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील रुग्णालये व प्रसुतीगृहांची तपासणी सुरू केली असून, दोन बड्या रुग्णालयांतील सोनोग्राफी सेंटरमध्ये अनियमितता आढळून आल्याने ती सील करण्यात आली आहेत. या रुग्णालयांतील टुडी इको यंत्रणेत त्रुटी आढळून आल्याने वैद्यकीय विभागाने ही कारवाई केली आहे. त्यामध्ये राजेबहाद्दर आणि सुविचार या दोन हॉस्पिटल्सचा समावेश आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने सध्या शहरातील सर्व रुग्णालये आणि प्रसुतीगृहांची पीसीपीएमटी कायद्याअंतर्गत तपासणी केली जात आहे. विविध पथकांद्वारे ही तपासणी केली जात असून, रुग्णालयांमधील सोनोग्राफी केंद्रांवर विशेष नजर ठेवली जात आहे. रुग्णालयांमध्ये असलेल्या सोनोग्राफी सेंटर्सची कसून तपासणी केली जात आहे. त्याअंतर्गत शहरातील राजेबहाद्दर हॉस्पिटल आणि नाशिकरोड येथील सुविचार हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरमध्ये असलेल्या टुडी इको यंत्रणेत त्रुटी आढळून आल्या. टुडी इकोसाठी गर्भलिंग निदान चाचणीप्रमाणेच नियमावली आहे. परंतु, या दोन रुग्णालयांतील टुडी इकोमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे नियमांची पूर्तता नसल्याने वैद्यकीय विभागाने या दोन्ही रुग्णालयांमध्ये असलेले सोनोग्राफी सेंटर्स सील केले आहेत. या रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, खुलाशासाठी वेळ देण्यात आली आहे. नियमांची पूर्तता केल्यानंतरच ही सेंटर्स सुरू होणार आहेत.

२७१ रुग्णालयांची नोंदणी बाकी

महापालिकेने शहरातील सर्व रुग्णालये व प्रसुतीगृहांना नोंदणी व नूतनीकरण बंधनकारक केले आहे. त्यानुसार आतापर्यंत ५८४ रुग्णालये व प्रसुतीगृहांपैकी ३१३ रुग्णालयांनी नियमानुसार नोंदणी केली आहे. २७१ रुग्णालयांची नोंदणी बाकी आहे. २७१ पैकी जवळपास १०० रुग्णालयांचे नोंदणीचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु, महापालिकेने लागू केलेल्या नियमांची शहरातील दीडशेपेक्षा जास्त रुग्णालये पूर्तता करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई अटळ मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images