Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विजयाची आनंद अन् पराभवाची सल

$
0
0

विजयाची आनंद अन् पराभवाची सल

इंडोनेशिया येथे झालेल्या एशियन गेममध्ये कबड्डीत इराणच्या मुलींच्या संघाने भारतीय मुलींच्या संघाला हरवून सुवर्णपदक पटकावले. इराणसारख्या संघाला कबड्डी हा खेळ नवखा असला तरीही या विजयामागे नाशिकच्या शैलजा जैन यांचा मोलाचा वाटा होता. त्या या संघाच्या प्रशिक्षिका आहेत. इराणच्या संघाला प्रशिक्षण देताना त्यांचा काय अनुभव होता त्यांच्याशी केलेली बातचीत...

इराणमध्ये प्रशिक्षकपदी जाण्याचा निर्णय कसा झाला

महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागात क्रीडा अधिकारी म्हणून मी नोकरी करीत होते. पूर्वीपासूनच कबड्डी माझा आवडता खेळ. क्रीडा अधिकारी असताना शहरातील शिवाजी स्टेडियम, यशवंत व्यायाम शाळा, गर्ल्स हायस्कूल, पुष्पावती कन्या शाळा, रचना विद्यालय येथे मी प्रशिक्षक म्हणून काम केले. दिल्ली येथे २००८ मध्ये इराणमधील मुलींच्या कबड्डी संघाच्यासाठी प्रशिक्षक पदासाठी मुलाखती झाल्या ती मी दिली होती. त्यानंतर २०१४ मध्ये मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झाले. माझ्या निवृतीनंतरचा वेळ मला कबड्डीच्या कोचिंगसाठी द्यायचा होता, मला एखाद्या शाळेने कोचिंगसाठी बोलावले असते तरी मी गेले असते. सुदैवाने मला इराणकडून बोलावणे आले. क्षणाचाही विलंब न करता मी त्यांना हो सांगितले. जाताना एकच अट होती माझ्या कामात कुणीही हस्तक्षेप करायचा नाही. ते त्यांनी मान्य केले. तेथील फेडरेशनने मला मोकळीक दिली आणि मग मी कामाला सुरुवात केली. २०१७ च्या जानेवारी मध्ये मी इराणला गेले.

प्रशिक्षणचे शेड्युल्ड कसे होते

इराणला गेल्यानंतर दीड वर्षांत तुमची टीम तयार करुन देईन असे सांगितले. त्यासाठी ८ महिने मी तीथे वास्तव्य करून होते. या काळात भाषेची, जेवणाची अडचण होती. त्यांचे काही शब्द समजायचे, काही समजत नव्हते हातवारे करुनच कम्युनिकेशन करावे लागत होते. काही कालावधीनंतर मी थोडीफार इराणी भाषा शिकले. या संघात एक मुलगी अतिशय अस्खलित हिंदी बोलायची, तिला विचारले तुला इतके चांगेल हिंदी कसे येते. ती म्हणाली, 'मी शहारुख खानचे चित्रपट पाहते.' तिच्या संवाद साधता येत असल्यामुळे भाषेचा प्रश्न मिटला होता. रोज सकाळी सात वाजता प्रशिक्षणाला सुरुवात व्हायची सकाळी ७ ते ८ फिटनेस, १० ते १२ कबड्डीचा सराव, १२ ते १ स्विमिंग संधायाकाळी पुन्हा ५ ते ७ कबड्डीचा सराव त्यानंतर विविध प्रकारचे मोटीव्हेशनल व्हिडीओ बघणे. सामन्यांचे शूट केलेले व्हिडीओ पाहून काय चुका होतायेत याचा अभ्यास करणे असा दिनक्रम होता. काही वेळा समुद्राच्या पाण्यात देखील सराव करून घेतला.

इतर देश कबड्डीत प्रगती करतायेत का‌?

कबड्डीत आपल्याला कुणी हरवू शकणार नाही असा भारतीय संघाचा समज होता, मात्र आता तो फोल ठरतोय. कोरिया, थायलंड, तैवान या देशानेही कबड्डीत प्रगती केली आहे. आपल्याकडे सामन्याच्या दोन महिने अगोदर तयारी केली जाते. इतर देशांमध्ये मात्र संपूर्ण वर्षभर तयारी होते. या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचे फिजीकल फिटनेस ट्रेनर आहेत. इराणच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांच्या मुलींकडे प्रचंड फिटनेस आहे. फक्त त्यांना टेक्निक समजावून सांगणे गरजेचे होते. ते मी प्रामुख्याने केले. इराणने मला ४५ मुली दिल्या होत्या. त्यातील १८ मुली या शेवटपर्यंत खेळविल्या.

भारतीय कबड्डी बद्दल काय सांगाल

आपल्याकडे एकंदरीतच सर्वच खेळांबद्दल अनास्था आहे. आपला सर्व भर हा शिक्षणावर आहे. खेळाला दुय्यम स्थान दिले जाते ते कुठे तरी हे बदलायला हवे, असे मला वाटते. प्रशिक्षकांनाही हवे तसे काम करू दिले जात नाही . त्याच्यावर दबाव असतो त्यामुळे रिझल्ट येऊ शकत नाही. बाहेर तुम्ही यश मिळवल्यानंतर आपल्या देशात आपण मोठे होतो. कबड्डीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास एकवेळ अशी येईल की बाहेरच्या देशाकडून तुम्हाला प्रशिक्षक बोलवावा लागेल. हॉकीसारखा खेळ आपण गमवून बसलोय. वेळीच सावध झालो नाही तर कबड्डी देखील आपल्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही

शेवटी सामन्याच्या वेळी परिस्थिती कशी होती

भारतीय संघाची कमतरता काय आहे हे मला माहीत होते. त्या तुलनेत इराणचा संघ काय करू शकतो हे देखील माहीत होते. इराणी मुली या ब्लाइंड गेम खेळत होत्या. आदल्या दिवशी कोरीया, बांग्लादेश बरोबर सामना झाला तो जिंकला होता. त्यानंतर एक सामना हरला. हाच हरलेला सामना आम्हाला विजयाकडे घेऊन गेला. शेवटच्या वेळी कव्हर कुठे आहे, आपल्याला कोणत्या डावाने खेळायचे आहे. हे त्यांच्या मनावर बिंबवले. मेडल आपलेच आहे हे त्यांना ठासून सांगितले. ज्यावेळी विजय मिळाला त्यावेळी एकीकडे माझा संघ विजयी झाल्याचा आनंद होता तर मी ज्या देशातून आले त्या देशाला हार पत्करावी लागते याचे दु:ख मनात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मातंग समाजाची वज्रमूठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, संविधानाचे रक्षण करावे यासह विविध मागण्यांसाठी मातंग समाजबांधव बुधवारी रस्त्यावर उतरले. जोरदार शक्तीप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सकल मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने साद देण्यात आली होती. जिल्ह्याच्या विविध भागांतून शेकडो वाहनांनी बांधव सकाळपासूनच गोल्फ क्लब मैदानावर दाखल झाले. 'जय लहुजी' लिहिलेले दुपट्टे, पिवळे ध्वज हातात घेऊन मोर्चाला सुरुवात झाली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद मार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला. तेथे साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बी. डी. भालेकर मैदानाजवळ मोर्चा विसर्जित करण्यात आला. त्यानंतर शेकडो आंदोलकांच्या वतीने शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या पिवळ्या झेंड्यांनी लक्ष वेधले. तेथे युवतींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनामध्ये म्हटल्यानुसार, मातंग समाजातील व्यक्ती तसेच मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी, सनातन संस्थेवर बंदी घालावी, अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सर्व मंजूर शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करावी, साठे महामंडळाचे भाग भांडवल वार्षिक एक हजार कोटी रुपये करण्यात यावे, साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, मातंग समाज, मांग-गारूडी समाजाचे सर्व्हेक्षण करून त्यांना दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे, वस्ताद साळवे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम तत्काळ सुरू करावे, सर्व अत्याचाराच्या प्रकरणांची सीबीआय चौकशी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात राजू वैरागर, संतोष अहिरे, यू. के. अहिरे, सचिन नेटारे, सुनील अहिरे, अशोक साठे, यशवंत शिरसाठ, राजू कांबळे, गोपाळ बस्ते, साहेबराव श्रृंगार, ओंकार सपकाळे, सूर्यकांत भालेराव, विठ्ठल नाडे, अनिल निरभवणे यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे रेल्वे कामाला गती द्यावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारतर्फे मनमाड- इंदूर मार्गाबाबत नुकताच 'एमओयू' करण्यात आला असून, नाशिक- पुणे हा रेल्वेमार्गही लवकर कार्यान्वित करावा, यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.

नाशिक-पुणे कनेक्टिव्हिटी हा नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नाशिक-पुणे-मुंबई हा खरे तर गोल्डन ट्रँगल असून, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले आहे. या ठिकाणच्या जागांचे भाव प्रचंड असून, जागेची उपलब्धताही फारशी नाही. त्यामुळे पुणे-नाशिकची कनेक्टिव्हिटी चांगली झाल्यास नाशिकच्या विकासाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नाशिक- पुणे नियोजित लोहमार्ग २४८ किलोमीटरचे अंतर अवघ्या अडीच तासांत पार केले जावे, असे नियोजन आहे. यामुळे सध्या ट्रॅफिकमुळे लागणारा सहा तासांचा वेळ निम्म्यावर येऊ शकेल, तसेच प्रवासी वाहनांच्या फेऱ्या कमी होऊन इंधन बचत होईल. यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाणही घटेल. रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जेची निर्मिती होईल. त्यामुळे कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पर्यावरणविषयक फायदे मिळतील, असेही पत्रात सांगण्यात आले आहे.

रेल्वे मंत्रालयाने आता नवीन कोचेस २२० किलोमीटर प्रतितास धावण्याच्या क्षमतेचे आणूनही रेल्वे ट्रॅकची क्षमता निम्मीच असल्याने ते अपेक्षित वेगाने धावू शकत नाहीत. ही बाब नवीन लोहमार्गात दूर होणार असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे गाडीचा वेग दुपटीने वाढणार आहे. यासाठी सरकार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

सध्या नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे. सविस्तर सर्वेक्षण, भूसंपादन, तसेच निविदा कार्यवाही याबाबत कालबद्ध पद्धतीने नियोजन होणे अपेक्षित आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेवर कार्यान्वित होण्यासाठी व प्रकल्पांची कामे सत्वर सुरू करण्याचा दृष्टीने याबाबत स्थानिक पातळीवर सर्व संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे आपल्या अध्यक्षतेखाली लवकरच आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही या पत्राद्वारे महाजन यांनी केली आहे.

उद्योगासाठी पथदर्शी प्रकल्प

नाशिकसाठी महत्त्वपूर्ण अशा इगतपुरी-मनमाड या १२४ किलोमीटरच्या तिसऱ्या रेल्वे लाइनचे कामही प्रस्तावित आहे. यामुळे इगतपुरी आणि मनमाड या दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच तिसरा व महत्त्वाचा नाशिकचा मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग धुळे आणि मालेगाव या शहरातून जाणार असून, तो नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे, असा आशावाद वर्तविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोष जनतेच्या माथी!

$
0
0

डेंग्यूप्रश्नी आरोग्य सभापतींचा अजब दावा; दंडात्मक कारवाईचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात साथीच्या आजारासंह डेंग्यूने थैमान घातले असून डेंग्यूबाधितांचा आकडा ११४ वर पोहचला आहे. मात्र, साथीच्या आजार व डेंग्यूचे खापर आरोग्य व वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यांनी नाशिककरांवरच फोडले आहे. शहरात पसरलेल्या डेंग्यूच्या साथीस लोकांचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचा अजब दावा करीत डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या घरात आढळल्यास संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत. परंतु, स्थायीने अजून या ठरावाला मंजुरी न दिल्याने कारवाई कशी करायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर आहे.

सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य समितीची सभा बुधवारी झाली. यावेळी डेंग्यूसंदर्भातील आकडेवारी सादर करण्यात आली. शहरात आतापर्यंत ११४ डेंग्यूचे बाधित रुग्ण आढळले असून साथींच्या आजारांनीही थैमान घातले आहे. समिती सदस्या शोभा साबळे, प्रतिभा पवार, नयन गांगुर्डे, रुची कुंभारकर यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमधील अस्वच्छता आणि असुविधांकडे लक्ष वेधताना डेंग्यूच्या वाढत्या प्रादूर्भावाविषयी नाराजी व्यक्त केली. शहरातील डेंग्यूच्या वाढत्या प्रादूर्भावाविषयी सदस्यांनी आक्षेप नोंदविताना प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि पेस्ट कंट्रोल ठेकेदाराच्या अनागोंदी कारभाराविषयी तीव्र शब्दांत टीकास्त्र डागले. संतोष गायकवाड यांनी प्रभागात डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याचे कर्मचारी तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले. डासांचा प्रादूर्भाव वाढलेला असताना आरोग्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून अधिकारी नगरसेवकांना उडवाउडवीची उत्तरे देतात, ऑनलाइन तक्रारी केल्यावरच निराकरण केले जाते. नगरसेवकांच्या सूचनांना महत्त्व दिले जात नाही, अशी तक्रार त्यांनी केली. पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याचे काम समाधानकारक नसल्याचे नमूद करीत ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कारवाई करणार कशी?

डेंग्यू डासांची उत्पत्ती घरांमध्ये साठवून ठेवलेल्या पाण्यात होते. बदनामी मात्र महापालिकेची केली जाते. त्यामुळे डेंग्यू निर्मूलनासाठी प्रबोधनाबरोबरच ज्या घरांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती होताना आढळून येईल, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश सभापतींनी दिले. तर हा प्रस्तावच स्थायीवर अडकून पडल्याने कारवाई कशाच्या आधारे करायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, २१० कर्मचाऱ्यांमार्फत शहरात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. घराचे छत व परिसर, भंगार, टायर्स, फ्रीज, कुलर्स, झाडाच्या कुंड्या, नवीन बांधकामे, टायर्स दुकाने येथील स्वच्छ पाणी काढण्याचे आवाहन महापालिकेने केली आहे.

महापौरांचा प्रभाग डेग्यूबाधित

शहरात ऑगस्टमध्ये ११४ रुग्ण आढळून आले असून त्यातील ६० टक्के रुग्ण दहा प्रभागांमध्ये आहे. यात सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ व १०, पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक एक व दोन, पूर्व विभागातील २३ व ३०, नाशिकरोड विभागातील २० व २१ सिडको विभागातील २५ व ३१ या प्रभागांमध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण असल्याची माहिती आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी दिली. प्रभाग क्रमांक एक हा महापौर रंजना भानसी यांचा आहे. महापौरांच्याच प्रभागात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने टीका होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीत चौफुल्यांवर अपघातांना मिळतेय आमंत्रण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरात असलेल्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींतील बहुतांश चौफुल्या अपघातांचे केंद्र बनल्या आहेत. बहुसंख्य चौफुल्यांवर रोजच अपघात होत असल्याने महापालिका व वाहतूक पोलिसांनी पाहणी करून किमान गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकावेत, अशी मागणी कामगारांसह अन्य वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

एमआयडीसीतील चौफुल्यांवर सायंकाळी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी सायंकाळी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. सातपूर एमआयडीसीत कार्बन नाका येथे रोजच सायंकाळी कोंडी होत असते. त्यातच महापालिका व एमआयडीसीच्या वादात साइडपट्या अडकल्याने असल्याने त्यांच्या दुरुस्तीकडे दोन्ही विभाग लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे कार्बन नाका चौफुलीवरील अपघातात काहींना प्राण गमवावे लागले आहेत. अंबड एमआयडीसीतदेखील अंबड गावाकडे जाणाऱ्या व डीजीपीनगर-२ कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर रोजच वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. या ठिकाणच्या वळणावर रोजच अपघात होत आहेत. अशा चौफुल्यांवर कायमच अपघात होत असल्याने गतिरोधक टाकण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

सातपूर व अंबड एमआयडीसीत असलेल्या चौफुल्यांच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची गरज आहे. महापालिका, एमआय़डीसी व वाहतूक पोलिसांनी एकत्रित पाहणी करीत गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकावेत, जेणेकरून अपघातांवर नियंत्रण मिळू शकेल.

-योगेश महाजन, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदरसे विकासासाठी प्रस्ताव सादर करा

$
0
0

आमदार फरांदे यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत मदरशांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा मदरशांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे.

अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन हॉलमध्ये बैठक झाली. यावेळी आमदार फरांदे यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी, शहर-ए-खतिब हाफिस हिसामुद्दीन खतिब, मौलाना शमशौद्दीन, सलीम पटेल, मीर मुख्तार अशरफी, हाजी नियाज शेख आदी उपस्थित होते. यावेळी फरांदे म्हणाल्या, की नोंदणीकृत मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सरकार राबवित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव येणे आवश्यक असून ते प्राप्त होत नसल्याने मदरशांच्या विकासाला अडचणी येत आहेत. ज्या मदरशांनी वक्फ बोर्डाकडे नोंदणी केलेली नाही अशा मदरशांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

दोन लाखापर्यंत अनुदान

मदरसे इमारतीच्या नुतनीकरण व डागडुजी, शुद्ध पाणी, प्रसाधन गृह, प्रयोगशाळा, इनर्व्हर्टर यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा नियोजन कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले.

तावडेंकडे बैठक घ्या

वक्फ बोर्डावर सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी नसून संचालक मंडळही बरखास्त झाले आहे. त्यामुळे अनेक प्रकरणे मंजुरीच्या प्रतिक्षेत असून वक्फ बोर्डासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे बैठक घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी मौलाना शमशौद्दीन यांनी केली. पुढील महिन्यात ही बैठक घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन फरांदे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोकड पळविणारे दोघे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाइनशॉपीमध्ये येऊन गल्ल्यातील रोकड बळजबरीने काढून पोबारा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक चंद्रकांत कसबे (रा. चिंचोली, ता. जि. नाशिक) आणि अजय निवृत्ती दोंदे (रा. उपनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. चिंटू सामदेव सिंग (रा. शिवाजीनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. अंबड एमआयडीसीत परकेज नावाचे वाइन शॉप आहे. सिंग बुधवारी (दि. २९)सायंकाळी दुकानात एकटे बसलेले असतांना ही घटना घडली. परिचित असलेले संशयित थेट दुकानात आले. त्यांनी दमदाटी करीत गल्ल्यातील सुमारे साडे चार हजाराची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता. याबाबत सिंग यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

उपचारादरम्यान जखमी युवतीचा मृत्यू

केमिकलयुक्त प्लास्टिकचा ड्रम कापताना लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. युवती गेल्या शुक्रवारी (दि. २४) रात्री सातपूर एमआयडीसीतील शिवाजीनगर जखमी झाली होती. यात तिची आई व भाऊ देखील भाजला असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

प्रतिक्षा गंगेश्वर पांडे (१६, रा. हाजी चिकन सेंटर जवळ, कार्बननाका) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. पांडे कुटुंबीयांनी घरगुती वापरासाठी एमआयडीसीतून प्लास्टिकचा ड्रम खरेदी केला होता. हा ड्रम चाकू गरम करून कापताना दुर्घटना घडली होती. केमिकलयुक्त ड्रममध्ये तापलेला चाकू पडला आणि अचानक आगीचा भडका उडाला होता. यात प्रतिक्षासह तिचा भाऊ आणि आई गंभीर भाजली. तिघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आठवडाभरापासून मृत्युशी झुंज देणाऱ्या प्रतिक्षाचा मृत्यू झाला असून दोघा मायलेकांचीही परिस्थिती गंभीर असल्याचे समजते. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

जुगार खेळविणाऱ्या तीन जणांना अटक

जुगार खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी नाशिकरोड, सातपूर आणि इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने केली.

बाळू यमाजी मनकुनाईक (रा. सुंदरनगर, देवळालीगाव), कैलास छगन दोडके (रा. विराट संकुल, अंबड लिंकरोड) आणि नासीर मेहबूब पठाण (रा. खडकाळी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ते उघड्यावर जुगार खेळण्यास प्रवृत्त करीत असल्याने पोलिसांची कारवाई केली. वास्को चौकातील सार्वजनिक शौचालय भागात एक व्यक्ती नागरिकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, बुधवारी (दि. २९) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला असता बाळू मनकुनाईक हा स्वत:च्या फायद्यासाठी लोकांकडून अंक आकड्यावर पैसे घेऊन जुगार खेळवितांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून ४१० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्र्यंबकरोड परिसरात गुरुवारी (दि. ३०) दुसरा छापा टाकण्यात आला. इएसआय हॉस्पिटल मागे पोलिसांनी छापा टाकला असता कैलास दोडके हा जुगार खेळवितांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून ३८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत.

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी नासीर पठाण हा पोलिसांच्या हाती लागला आहे. तो अन्य साथीदारासमवेत जॉगिंग ट्रॅकवरील नीलगिरीच्या झाडाखाली मटका खेळवित होता. पोलिसांची चाहूल लागताच त्याचा साथीदार फरार झाला. संशयितांच्या ताब्यातून ९४० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार पाळदे करीत आहेत.

व्हिडीओ पार्लरवर छापा

भद्रकाली परिसरातील व्हिडीओ गल्लीत पोलिसांनी छापा मारून अश्लिल चलचित्र दाखविणाऱ्या एका व्हिडीओचालकास अटक करून त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल केला.

व्हिडीओ गल्लीतील साईराज व्हिडीओ पार्लरमध्ये अश्लिल चित्रपट दाखविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी (दि. ३०) दुपारी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी व्हिडीओ हॉलमध्ये बेकायदेशीर अश्लिल चित्रपट सुरू होता. या प्रकरणी व्हिडीओचालक निहाल गुलाब सय्यद (रा. काझीगडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

..

नांदूरनाका भागात एकाची आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नांदूरनाका भागातील दिलीप शिवराम गायकवाड (४५ रा. गणपतनगर, कापसे गल्ली) यांनी गुरुवारी (दि. ३०) आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांनी खिशात चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार ठरवू नये, असे नमूद केले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास हवालदार रोकडे करीत आहेत.

शेतमजुराने घेतला गळफास

मनमाड : नांदगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील ५० वर्षीय शेतमजुराने शुक्रवारी (दि. ३०) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. भास्कर निंभोरे असे त्याचे नाव आहे. कौटुंबिक कलहातून दारुच्या नशेत त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदुरे फेोटो


रविवारी ‘अर्थ’पूर्ण कार्यक्रमाची मेजवानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील एकता रिटेल किरणा मर्चंट्स नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे जळगावकरांसाठी रविवारी (दि.२) 'अर्थपूर्ण' कार्यक्रमाचे निशुल्क आयोजन करण्यात आले आहे. यात आर्थिक नियोजनासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. एकता रिटेल किराणा पतसंस्थेतर्फे २ सप्टेंबर रोजी 'अर्थपूर्ण' कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी दुपारी ३.३० ते ६ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. आनंदी आणि समाधानी आयुष्याचे गुपित उलगडणारा कार्यक्रम कुटुंबासह अनुभव घेण्यासारखा असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. आपल्याला आर्थिक नियोजनात उत्तम करण्यासाठी 'गुंतवणुकीची बाराखडी' व स्वतःसाठी कधी? या दोन विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 'लव्ह यू जिंदगी' या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते मनोज गोविंदवार हे संवाद साधणार आहेत.

प्रथम येणाऱ्याला प्राधान्य

जळगावकरांसाठी असलेल्या या कार्यक्रमाला मोजक्या २७० प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन एकता पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडिया व उपाध्यक्ष घनश्यामदास अडवाणी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवनिर्वाचित ११ सदस्यांवर अपात्रातेची टांगती तलावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिका निवडणुकीत राखीव २९ नगरसेवकांपैकी १८ नगरसेवकांनी प्रमाणपत्र सादर केले असून, ११ नगरसेवकांनी अद्याप प्रमाणपत्र सादर केलेले नाही. येत्या सहा महिन्याच्या मुदतीत सादर न केल्यास अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

जळगाव महापालिकेत १९ प्रभागातील ७५ जागांसाठी निवडणूक झाली. २९ जागा राखीव होत्या. राखीव उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे, बंधनकारक असते. त्यासाठी सहा महिन्यांची मुदतदेखील घेण्यात आली आहे. दरम्यान, आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी नवनियुक्त नगरसेवकांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचा आढावा घेतला. राखीव २९ नगरसेवकांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

भाजपच्या राखीव २२ नगरसेवकांपैकी १४ नगरसेवकांनी प्रमाणपत्र सादर केले असून, ८ नगरसेवकांनी सादर केलेले नाही. शिवसेनेच्या राखीव ५ नगरसेवकांपैकी ३ नगरसेवकांनी प्रमाणपत्र सादर केले असून, २ नगरसेवकांनी सादर केलेले नाही. तसेच १ अपक्ष उमेदवार असे एकूण ११ नगरसेवकांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते सहा महिन्याच्या मुदतीत नगरसेवकांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

निवडणूक खर्च; अखेरचे दोन दिवस

प्रशासनाने निवडणूक खर्चासाठी २ सप्टेंबर मुदत दिली आहे. ३७ उमेदवारांनी निकालापर्यंत खर्च सादर केले नाही. ४६ उमेदवारांनी शपथ पत्र सादर केले नाही. तसेच ७७ उमेदवारांनी निधी व तपशिल सादर केलेले नाही. दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्च सादर करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे तीन बातम्या एकत्र

$
0
0

धुळे, नंदुरबार जि. प. आरक्षण जैसे थे

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठीच्या गण आणि गट आरक्षण आणि त्याची रचना हे अन्यायकारक असल्याच्या मुद्यांवर करण्यात आलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. मंगेश पाटील यांनी 'जैसे थे'चा आदेश दिला आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धोंडू भदाणे आणि प्रभाकर बाधा पाटील यांनी याचिका दाखल केली आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात गट आणि गण आरक्षण हे अन्यायकारक असल्याने ते रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीचे घटनात्मक आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असे निर्देश दिले होते. राज्य शासनाचे या संदर्भात काही कायदे असतील तर त्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभाही देण्यात आली होती. धुळे जिल्हा परिषदेसाठीचे सध्याचे आरक्षण हे ७३ टक्क्यांपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे ५६ जागांपैकी ४१ जागा या आरक्षित होतात.

नागपूर खंडपीठासमोर वाशीम आणि अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणूक आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत राज्य शासनाने, या संदर्भात कायद्यात सुधारणा करावी लागणार असल्याने म्हणणे मांडण्याकरिता वेळ मागून घेतला. त्यावर खंडपीठाने 'जैसे थे'चे आदेश दिले होते. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने राज्य शासनाकडे विचारणा केली असता, त्यांनी नागपूर खंडपीठापुढे मांडलेले म्हणणेच मांडले. यावर खंडपीठाने धुळे आणि नंदुरबार येथील गट आणि गण आरक्षणाबाबत जैसे थेचे आदेश दिले. या प्रकरणी याचिकाकर्त्यांतर्फे वकील प्रवीण एम. शहा, राज्य निवडणूक आयोगातर्फे शिवाजी टी. शेळके तर राज्य शासनातर्फे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले.या याचिकेची सुनावणी ११ सप्टेंबरला होणार आहे.

000

ऑक्टोबरमध्ये धुळ्यात आचारसंहिता!

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल अजून वाजलेला नाही. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध मंजुऱ्या मिळवून घेण्यासाठी सध्या महापालिकेत नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. मात्र, दुसरीकडे मंजूर झालेली विकासकामे अदयाप पूर्ण झालेली नाहीत. पूर्वीची विकासकामे पूर्ण करा आणि मग नवीन कामांना सुरुवात करा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. धुळे महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतदेखील काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीनंतर एकीकडे इच्छुकांनी आपल्या प्रभागात कामाला सुरवात केली आहे, तर दुसरीकडे नगरसेवकांनी आपल्या प्रभागात विविध विकास कामांना मंजुरी मिळवून घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

0000

रांगोळी काढून खड्ड्यांचे पूजन

धुळ्यात शिवसेनेचे अनोखे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा,धुळे

शहरातील ८० फुटी रोडची गेल्या काही दिवसांपासून दूरवस्था झाली आहे. तसेच या ठिकाणी गटारीच्या कामासाठी खोदण्यात आलेला खड्डा देखील बुजलेला नाही. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांतच पूजन करून मनपा प्रशासनाचा निषेध केला. विशेष म्हणजे हा रास्ता खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या निवासस्थानाजवळील आहे.

खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी रांगोळी काढून पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे या भागात खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या भागातील रस्त्यांची ही अवस्था असेल तर शहरातील अन्य रस्त्याची काय दुर्दशा असेल असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. धुळे शहरातील विविध भागांत रस्त्यांची प्रचंड दूरवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या समस्येकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या ८० फुटी रोड भागात गटारीच्या कामासाठी एक खड्डा खोदण्यात आला आहे. हा खड्डा धोकादायक असून, या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरून जळगावकडे जाणाऱ्या बसेस जात असतात. तसेच ज्या कामासाठी हा खड्डा खोदण्यात आला आहे. ते काम देखील अद्याप पूर्ण झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगाव पान एक तापमान

सोशल कनेक्ट

$
0
0

नाशिककरांनी अनुभवली

अरणची 'नारळ हंडी'

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोविंदा पथकांना दहीहंडीचे वेध लागले असताना सोलापुरात आगळीवेगळी दहीहंडी साजरी करण्यात आली. सोलापुरातल्या अरण गावात अनोखी नारळ हंडी फोडण्यात आली. पांडुरंगाची पालखी अरणमध्ये आल्यानंतर नारळ हंडीचा सोहळा रंगला. या वेळी नाशिककरांनी ही दहिहंडी अनुभवली.

एका मोठ्या दोरीला उंचावर शेकडो नारळ बांधले जातात आणि मग ती दोरी हलवली जाते. या वेळी पडणारे नारळ घेण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ लागते. नाशिकमधील हजारो भाविक दरवर्षी हा सोहळा अनुभवतात. अरण येथील संत सावता महाराजांनी आपल्या मळ्यातच पांडुरंग पाहिला असून, ते कधीही पंढरीला गेले नाहीत. त्यांच्या भेटीसाठी देवच अरण येथे येत असल्याची परंपरा आजही पाळली जाते. आषाढ शुद्ध पक्षात सर्व संत देवाला भेटायला पंढरीला येतात, तर वद्य पक्षात देव सावता महाराजांना भेटायला अरण येथे जातात.

आषाढ वद्य चतुर्दशी हा सावता महाराजांचा समाधीदिन, तर अमावास्या हा काल्याचा दिवस. काल्याच्या दिवशी पंढरपूरवरून निघालेली देवाची पालखी अरण येथे येत असून, पालखीचे स्वागत नाशिकचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती खैरे, माळी समाजसेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, सामाजिक कार्यकर्ते योगेश कमोद, कृषी उपविभागीय अधिकारी रमेश शिंदे, सचिन दप्तरे, पंढरी खैरे, जिजाबाई गिते आदी उपस्थित होते.

नाशिककरांचे आणि अरणचे सामाजिक बांधिलकीचे नाते आहे. नाशिकमधील माळी समाजातील पांडुरंग गायकवाड, शंकराव जेजूरकर, बाबूराव जेजूरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती खैरे यांनी १९८८ मध्ये समाजातील दानशूर व्यक्तींकडून देणगीरूपाने लाखो रुपयांचा निधी उभारून अरण येथे सभामंडप उभारला व देणगीदारांची 'सोन्यासारखी माणसे' ही स्मरणिका प्रकाशित केली. त्यावेळपासून जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते नित्यनेमाने संत सावता महाराज पुण्यातिथीच्या निमित्ताने अरण समाधिस्थळाला भेट देत असतात. नाशिककरांनी नुकतीच अरणला भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाम, नाईंटी आणि बरंच काही

$
0
0

राजेंद्र मलोसे - छेद

महारुबाबा जाधव नेहमीच माझ्याकडे येतात. वय वर्षे पंचाहत्तर, रापलेला गोरा रंग, पायजमा, सदरा, डोक्यावर पांढरी टोपी. तोंडात नेहमीच काहीतरी पदार्थ म्हणजे सुपारीचं खांड, पान, तंबाखू किंवा आताआताशी गुटखा. व्यवसाय बाजार करण्याचा. म्हणजे आठवडे बाजारात किराणा दुकान लावणे. आज चांदवड, तर उद्या उमराणे, परवा देवळा, तर तेरवा कळवण. मग एक दिवस नाशिकला जाऊन खरेदी. दोन दिवस आराम. तेजतर्रार स्वभाव आणि करारी नजर. बायकोची फार काळजी.

'कायमची आजारी ऱ्हाती हो'

'घरात लागंल ती वस्तू हाय, पण हिला काही जिरतच नाही'

'आपलं बगा, कसं मस्त काम हाय! रोज रात्री नाईंटी (९०) मारायची, जेवायचं, झोपायचं. सकाळी उठून कामाला लागायचं. येव्हढे बाजार करतो पन नखात दुखणं नाही. पह्यले तर बैलगाडीनं बाजार करायचो. तवा उमराण्याला मुक्काम. हातानेच भाकरी थापायच्या. कुटंबी जेवायचं, कुटंबी पानी प्यायचं. जुपली सकाळी बैलगाडी की चालले पुढे देवळ्याला. चौथ्या दिवशी कळवण आन मग पाचव्या दिशी चांदवडला मुक्कामी. लई तरास काढला. आन आत्ताचे पोट्टे मोटरसायकली हानत्या आन सिक्स्टीमध्ये आऊट होत्या.'

'महारुबाबा, तुम्हाला ही नाईंटी आणून कोण देतं?'

'आमचे जावई लई भारी मानूस! मिल्ट्रीत हायेत. आले की दोन खंबे घेवूनच येत्या. पन आपला नियम कडक नाईंटी मारायची पुढं थेंब नाही. ती संपली की पोरालाच सांगतो. घेवून ये रे तो बी आनतो. माह्यावाला पोरगा बी लई चांगला समदं ऐकतो माह्यावालं. मस्त चाललंय बगा. फक्त बायकूची त्येवढी काळजी. काही जिरतच नाही हो तिला लगेच डब्याला पळती. तिला बगा, दोन चार सलाईनी लावूनच टाका.'

********

एक दिवस आले.

'दादा, खांडकं खात्या का?'

'कधी कधी'

'आणू वले डबा, त्याच्याबरोबर नाईंटी पन आनून देतो. चांगला मिल्ट्रीचा माल हाये.'

'महारुबाबा, मी पीत नाही.'

'म्हनून तर अशे वाळकुटे ऱ्हायले तुम्ही आन चेहराबी नेहमी पडेल!' त्यांनी माझ्या अंगावर गुटख्याचे तुषार उडवले. ते उडाले हे त्यांनाही कळलं.

'सॉरी मागतो दादा, ते उडालं बगा' ते बाहेर जाऊन पिचकारी मारून आले.

'कोण आजारी पडलंय?' मी आपला चौकशी केल्यासारखा.

'बायकूच हो. तिचं पोट बिघडलं. आता बगा, सून म्हनली, लई चांगले मेथीचे लाडू करत्या तुम्ही आत्याबाई. तुम्हीच करा वले. ही बसली की बया लाडू वळाया. पाचपन्नास, शंभर लाडू वळून टाकले. आता केलेच स्वतःचे स्वतः, तर चवीला म्हनून एक अर्धा खाल्ला असेल. रातीपासून पोट दुखू ऱ्हायलं चालली डब्याला हे घ्या, तुम्हाला वानोळा आनला बघा लाडवाचा, चांगल्या तुपातले हायती. याला त्याला देऊ नका. रोज अर्धा, अर्धा तरी खा. संपले की सांगा वले. परत देतो. आता तुम्हाला तर म्हनलं, नाईंटी आनतो, तर तुम्ही'

'बरं, बरं, महारुबाबा, बघतो त्यांना मी.'

*********

काही दिवसांनी आले.

'दादा, लई आग होऊन राहिली हो पायाची. पहिल्यांदा असं वाटू ऱ्हायलं की सुई मारावी.'

मी तपासलं. मला वाटलं की हा न्युरिटीस आहे. मज्जातंतूदाह. त्यांना औषधे लिहून दिली.

'महारुबाबा, उद्या परत या. काही तपासण्या करून घेऊ.'

'मला काही रोग नाही. एक सुई मारा वले. बरं वाटाया पाहिजे. उद्या बाजार आहे.' दुसऱ्या दिवशी त्यांना मुलांनी धरूनच आणलं. महारुबाबा चांगले जोरात रडत गागत होते.

'लई आग होऊ ऱ्हायली दादा. लई आग पेटली.'

'आता होणार नाही तर काय सर? ह्या म्हाताऱ्याने आग होत होती पायांची म्हणून तिथे बाम लावला. त्यानंही थांबेना म्हणून त्या बामवर व्हिस्की ओतली. आता बघा भाजून हे फोड फोड आले' त्यांचा मुलगा चिरडून बोलला.

पायजमा वर करून बघितलं तर दोन्ही पाय बाम आणि व्हिस्कीने चांगलेच जळाले होते. बामवर व्हिस्की टाकल्यावर अजून काय होणार?

'महारुबाबा, हे काय करून घेतलं? त्याच्यावर बाम कशाला लावला? लावला तर लावला, वरून व्हिस्की कशाला ओतली?'

'माझा आपला समज हो दादा, काहीही झालं तरी नाईंटीनं बरं होतं'

'नशीब त्याच्यावर काडी नाही ओढली, नाही तर सगळ पेटलं असतं' पोरगा वैतागून म्हणाला.

महारुबाबाची नाडी जलद आणि क्षीण होत चाललेली. श्वास वाढू लागला. ते शॉकमध्ये गेले.

आता या नाईंटीमुळे महारुबाबांचं काय होईल?

पाय बरा होईल की?

(लेखक सुप्रसिध्द साहित्यिक आहेत.)

प्रतिक्रियेसाठी nashik.letters@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॅटर्डे क्लबतर्फे आज राज्यस्तरीय ‘उद्योगकुंभ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उद्योग जगतात कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय 'उद्योगकुंभ २०१८' चे शनिवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेपासून शहरातील हॉटेल एक्स्प्रेस इन, मुंबई आग्रा रोड येथे आयोजन करण्यात आले आहे.

'उद्योगकुंभ' मध्ये सहभागी होणाऱ्या राज्यभरातील नामवंत आणि यशस्वी उद्योजकांकडून उपस्थितांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यात उद्योगाच्या नवीन संधी, अंतर्गत उद्योग व्यवसाय विकास, व्यवसाय निर्मितीमधील समस्यांवर तोडगा, उद्योग व्यवसायातील बदलते तंत्रज्ञान, व्यवसायातील भांडवल उभारणी, कायदेशीर सल्ला आदी विषयांवर सर्व माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमात राज्यातील सुमारे आठशे उद्योजक हजेरी लावणार आहेत.

परिषदेसाठी राज्यमंत्री सुरेश हावरे, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आयटी तज्ज्ञ तथा लेखक अच्युत गोडबोले, प्रसिद्ध कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार, आंतरराष्ट्रीय सौंदर्यतज्ज्ञ रेखा चौधरी, मेक इंडिया उपक्रमातील राज्य सरकारचे भागीदार कॅप्टन अमोल यादव, उद्योजक सनराईज मोल्डचे संस्थापक भावेश भाटिया हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन

क्लाउड सर्व्हिसेसचे पियुष सोमाणी, ऑईल आणि एनर्जी तज्ज्ञ सुधीर मुतालिक, करार पद्धतीने कुक्कुटपालन निर्माते श्रीकृष्ण गांगुर्डे, उद्योगवाढ सल्लागार श्रीरंग तांबे, विक्रांत पोतनीस, आर्थिक सल्लागार पॅनल बाळकृष्ण चांडक आदी मान्यवर मागदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हरित डोंगर’ अंतर्गत एक लाख बीजारोपण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराजवळील डोंगर, टेकड्या, गड, किल्ले हिरवे झाल्यास शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, सिमेंटच्या जंगलात शहरात हिरवाई टिकून राहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे दरवर्षी हरित डोंगर हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाचे हे विसावे वर्ष आहे. गेल्या वीस वर्षांत संस्थेने नाशिकजवळील डोंगर, टेकड्या, घाट, गडकोट आदी परिसरात दहा लाखांपेक्षा अधिक बियांचे रोपण केले आहे.

उन्हाळ्यात रानमेवा खाल्ल्यानंतर त्याच्या बिया गोळा केल्या जातात. आंब्याची कोय, जांभूळ, चाफा, आवळा, चिंच, बहावा, चंदन, रामफळ, फणस, बदाम, हरडा, बेहडा, निंब, सावर, साग, शिसम, बकुळ आदींसह वीस जातीच्या देशी वृक्षांच्या बिया गोळा करण्यात आल्या होत्या. नाशिकचे डॉ. विजया सुळे यांनी तीस हजार बिया दिल्या, तसेच ज्येष्ठ नागरिक पोपटराव रावते यांनीदेखील विविध जातीच्या वृक्षांच्या बिया आणून दिल्या, तसेच नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात रानमेवा आणून दिल्याने हा उपक्रम यशस्वी करता आला. गेल्या तीन महिन्यांत हरसूल घाट, रामशेज, रतनगड, कळसूबाई, मुल्हेर, रावळ्या, पिसोळगड, वाघेरा, त्रंबक, पांडवलेणी, चामरलेणी, कसारा, पेठमधील घाट, खरपडी घाट आदी भागांत बियांचे रोपण करण्यात आले. त्र्यंबकजवळील कळमुस्टे घाटात विविध महाविद्यालयातील शंभर मुलांना या उपक्रमात सहभागी करून घेत एक लाख बियांचे रोपण करण्यात आले. येथील घाटामध्ये नेचर वॉक काढून संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी फुलपाखरे, वनफुले, कीटक, पक्षी आदींची माहिती विद्यार्थ्यांना दिली. संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, आशिष बनकर, आकाश जाधव, दर्शन घुगे, रोषण पेलमहाले, मंगेश कापसे, अपूर्व नेरकर, नितेश पिंगळे, प्रेम क्षत्रिय, अश्विनी वाकरे, कांचन कापसे, प्राची पाखळे, गौरी पाटील, मोनिका पालवे, रविना दळवी, ज्योती कोरी, वैष्णवी सांगळे, निकिता सहाणे, मनीष ओटे, प्रज्वल डहाळे, मुकुल बाविस्कर, गणेश भामरे, हेमंत सोनवणे, भैरव गाजरे, स्वप्नील सूर्यवंशी, अतिश राजपूत आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पट्टा व इतर सिंगल

$
0
0

शेतमजुराची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील ५० वर्षीय शेत मजुराने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. भास्कर निंभोरे असे त्याचे नाव असून, कौटुंबिक कलहातून दारूच्या नशेत त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

000

बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

मेंढी शिवारात भास्कर गिते यांच्या वस्तीवर शुक्रवारी (दि. ३१) पहाटे पाचच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाल्याची घटना घडली. परिसरात बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी घराबाहेर पडण्यास धजावत नाही. वनविभागाने बिबट्यास जेरबंद करून बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

भास्कर विठोबा गिते यांचे कुटुंब गुरुवारी रात्री झोपले असताना त्यांच्या वस्तीवर शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने हे कालवड शेतात फरफटत नेले. जनावरांच्या हंबरण्याच्या आवाजाने भास्कर गिते व त्यांच्या घरातील नागरिक बाहेर आले असता तोपर्यंत बिबट्याने धूम ठोकली. वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मेंढी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. लवकरात लवकर पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐश्वर्या गोवर्धनेला पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदेच्या वतीने दिला जाणारा क्रीडाक्षेत्रातील मानाचा सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार नाशिकमधील केटीएचएम कॉलेजची विद्यार्थी राष्ट्रीय रोलबॉल खेळाडू ऐश्वर्या महेश गोवर्धने हिला प्रदान करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील कराड येथे वेणूताई चव्हाण स्मारकात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, राष्ट्रीय क्रीडा अधिवेशनाचे सभापती डॉ. डी आर. जाधव, जिल्हा समादेशक पै. अमोल साठे, कराड शहराच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल देण्यात येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायन्स क्लब फोटो न्यू

हा तर नाशिकचा लखोबा लोखंडे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

'तो मी नव्हेच' नाटकातील लखोबा लोखंडे याच्याप्रमाणेच वेगवेगळे नाव धारण करून वाहनांची चोरी, घरफोडी आणि धनादेशांची चोरी करून बँकांमधून रकमा हडपणारा रतेश उर्फ रितेश विश्राम कर्डक (वय २१) याला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पंचवटी, आडगाव, गंगापूर, अंबड व म्हसरुळ अशा पाच पोलिस ठाण्यांत फसवणूक, घरफोडी आणि वाहनचोरीचे तब्बल ११ गुन्हे दाखल झालेले आहेत.

कर्डक याने नाशिक शहरात विविध ठिकाणी कधी ऑफिसबॉय तर कधी वाहनचालकाचे काम करीत असे. कामाच्या ठिकाणी मालकाचा विश्वास संपादन करून धनादेश चोरून त्यावर मालकाची बनावट साक्षरी करून बँकेतून रक्कम काढून घ्यायचा. या प्रकारात फसवणूक झाल्याचे मालकाच्या लक्षात आल्यावर त्याच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत.

गंगापूर रोड येथे २०१३ मध्ये रितेश कर्डक हे खरे नाव वापरून अनिल पाठक यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करताना त्याने पाठक यांची सँट्रो कार १ लाख ५ हजार रुपयांना विकली. राजस्थान भवानीपुरा येथे रामजशजी मीना यांची गहाण जमीन घेतली. त्या जागा मालकाकडून ११ एकर शेती २७ लाख रुपयांना नावावर करून घेतली. बुधा हलवाईचे दिलीप वाघ यांच्याकडे २०१४ ला हरिश पूजारी या नावाने वाहनचालकाचे काम करताना त्यांची तवेरा गाडी पाथर्डीफाटा येथे बेवारस सोडून दिली. गंगापूररोडला विक्रम कपाडिया यांच्याकडे दिगंबर पुजारी या नावाने वाहनचालकाचे काम करताना त्यांची होंडा सिटी कार अहमदनगर येथे एकाला अडीच लाख रुपयांना विकली.

अंबडमध्ये २०१७ ला श्रीराम मार्केटिंग कंपनीत हेडा नावाच्या व्यक्तीकडे रवींद्र या नावाने ऑफिसबॉय म्हणून काम करताना त्यांचे ५ धनादेश चोरले. ४० हजारांच्या कोऱ्या धनादेशांवर मालकाच्या नावाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून चेक वठविले. सावरकर नगर येथील सोम कन्स्ट्रक्शन कंपनीत धीरज मत्सागर या नावाने ऑफिसबॉय म्हणून काम करताना धनादेश चोरून खोटी स्वाक्षरी करून ते वटविण्याचा प्रयत्न केला. सातपूर एमआयडीसीत पुष्कराज ट्रेडर्स येथे मत्सागर नावाने ऑफिसबॉय म्हणून काम करताना तेथे मालकाची स्वाक्षरी असलेला कोरा धनादेश चोरून ४० हजारांची रोकड बँकेतून काढली. भद्रकाली येथील एजी ग्रुप यांच्याकडे ऑफिसबॉय म्हणून काम करताना ४ धनादेश चोरून ४५ हजार रुपये काढले.

मेघदूर शॉपिंग सेंटरला बन्सीलाल डेरे यांच्याकडे मे २०१८ मध्ये ऑफिसबॉय म्हणून काम करताना तीन धनादेश चोरी करून १ लाख रुपये काढले. ऑगस्ट २०१८ मध्ये संजय नवल यांच्या सीबीएस येथील व्यंकटेश डेव्हलपर्स येथे ऑफिसबॉय म्हणून काम करताना ६ धनादेश चोरी करून ६० हजार रुपयांची रोकड काढली. सीतागुंफा येथील स्नेहसदन येथील होस्टेलमधून लॅपटॉप घेऊन तो विकला. पंचवटी कारंजा येथून २ लॅपटॉप घेऊन मुंबईला ६ हजार रुपयांना विकले.

स्वत:च्या घरातून चोरले २५ लाख

रितेश कर्डक याने २०१० साली स्वतःच्याच घरातून तब्बल २५ लाख रुपयांची चोरी केली होती. त्यावेळी वडिलांनी पोलिसांत तक्रार केली होती. यानंतर त्याला अटकही झाली होती. त्याच्या या कारनाम्यांमुळे पोलिसही चक्रावले असून, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images