Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पत्नीची आत्महत्या; पतीस सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चारित्र्याच्या संशयातून पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरसबारी (ता. पेठ) येथील एकास कोर्टाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांच्या कोर्टासमोर सुरू होता. प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार असलेल्या अल्पवयीन मुलीची साक्ष यात महत्त्वाची ठरली. घटना १० डिसेंबर २०१६ रोजी घडली होती.

दुगार्दास जाधव (३८, रा. आसरबारी, ता. पेठ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरसबारी शिवारात जाधव कुटुंबीय राहते. चार मुली असलेल्या जाधव दाम्पत्यामध्ये चारित्र्याच्या संशयातून नेहमी वाद होत असे. दिवसभर शेतकाम आणि संसाराच्या गाडा हाकणाऱ्या जनाबाईस मद्यपी दुर्गादासकडून सातत्याने मारझोड होत होती. ९ डिसेंबर २०१६ रोजी मध्यरात्री मद्याच्या नशेत घरी परतलेल्या दुर्गादासने चारित्र्याच्या संशयातून कुरापत काढून पुन्हा मारहाण केली. यामुळे कंटाळलेल्या जनाबाईने १० डिसेंबर २०१६ रोजी साडेसात वाजेच्या सुमारास स्वत:ला पेटवून घेतले. त्यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पेठ पोलिस स्टेशनमध्ये दुगार्दास विरोधात विवाहितेचा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. रेवती कोतवाल यांनी काम पाहिले. आरोपीच्या १५ वर्षांच्या मुलीने दिलेल्या साक्षीवरून शारीरिक व मानसिक छळाचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी दुगार्दास जाधव यास तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

तरुणाची हत्या; तिघांना कारावास

चोर समजून तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना २४ ऑगस्ट २०१७ रोजी दिंडोरी तालुक्यातील परमोरी औद्योगिक वसाहतीत घडली होती. या प्रकरणी वणी पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फुलन रामभवन राय, राधिका फुलन राय, रामविलास शिवपुंजन राय (सर्व रा. परमोरी शिवार, बॉटल कंपनी गोदाम, ता. दिंडोरी. मूळ रा. दिवाकलपूर, जि. चांदोली, उत्तर प्रदेश) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेत श्याम श्रीराम चकोर (२५) या तरुणाचा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी श्यामची आई लीलाबाई चकोर यांनी तक्रार दिली होती. २३ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी आतेभावासमवेत श्याम लखमापूर फाट्यावर गेला होता. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी परतल्यानंतर जेवण आटोपून तो घराबाहेर झोपला होता. दुसऱ्या दिवशी (दि. २४) परमोरी शिवारातील बॉटल कंपनीच्या गुदामाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. वणी पोलिसांनी केलेल्या तपासात तिघांनी चोर समजून केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. सरकारी वकिल अ‍ॅड. रवींद्र निकम यांनी ११ साक्षीदार तपासले. यामध्ये खुनाचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नसला तरी मुख्य आरोपी फुलन राय याने दोन साक्षीदारांना केलेल्या फोनवरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे कोर्टाने तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी व २४ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशासकाची चौकशी करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दि नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (नामको) बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासकाच्या कामावर नाराजी व्यक्त करीत सभासदांनी प्रचंड गोंधळ घातला. या सभेत प्रशासक जे. बी. भोरिया यांच्या साडेचार वर्षांच्या काळातील सर्व आर्थिक व्यवहारांची तीन सनदी लेखापाल समितीमार्फत चौकशी करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यात दोषी आढळल्यास रिझर्व्ह बँकेला कळवून कारवाई करण्याचेही या ठरावात नमूद करण्यात आले. यावेळी संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर पहिल्याच सभेत चौकशीचा ठराव करण्याची सूचनाही करण्यात आली.

आयटीआय सर्कल येथील 'नामको'च्या प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात ही सभा झाली. या सभेत गोंधळातही सर्व विषय पत्रिकेवरील विषयांना मंजुरी देण्यात आली. २०१४ मध्ये अनियमिततेच्या कारणावरून संचालक मंडळ बरखास्त करून रिझर्व्ह बँकेने प्रशासक म्हणून जे. बी. भोरिया यांची नेमणूक केली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने जुलै महिन्यात बँकेवरील प्रशासक हटवण्याचा निर्णय घेऊन ६ जानेवारी २०१९ च्या आत निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासकीय कारकिर्दीची ही शेवटची सभा होती. या सभेत मोठ्या संख्येने सभासद व माजी संचालक उपस्थित होते. सभेची सुरुवातच गोंधळाने झाली. त्यानंतर विविध आरोप करीत माजी संचालक व सभासदांनी प्रशासकावर प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना जाब विचारत गोंधळ घातला. काही प्रश्नांना प्रशासक भोरिया यांनी उत्तरे दिली. पण, त्यांना शेवटपर्यंत या सभेत फारसे बोलू दिले नाही.

या सभेत अहवालाची छपाई, सभासदांना न वाटलेला लाभांश, एनपीएत झालेली वाढ, कर्जवाटप, बँकेला दंड यांसह अनेक विषयांना हात घालत सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. प्रशासकांच्या चौकशीचा ठराव माजी संचालक हेमंत धात्रक यांनी मांडला, तर त्याला अनुमोदन माधवराव भांडगे यांनी दिले. त्यानंतर पां. भा. करंजकर यांनी सूचना केली.

माजी चेअरमन सोहनलाल भंडारी, माजी संचालक हेमंत धात्रक, गजानन शेलार, यांसह अॅड. अशोक जैन, राजेंद्र बाफणा, उमेश मुंदडा, चंद्रकांत कलंत्री, पां. भा. करंजकर, श्रीकृष्ण शिरोडे, माधवराव भांडगे, कौशल्या भगत, सीए डागा यासह सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. व्यासपीठावर प्रशासक भोरिया यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता साठे, मुख्य लेखापाल संघमित्रा काळे या उपस्थित होत्या. काळे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले.

स्टेजजवळ गोंधळ

नामकोच्या सर्वसाधारण सभेत गोंधळामुळे अनेक वेळा माईकची पळवापळवी दिसून आली. या सभेत सभासदांच्या आवाजाचा पाराही चढला. त्याचप्रमाणे प्रत्येकवेळी सभासद उभे राहून विरोध करीत होते. तर दोन विषयानंतर सर्व सभासदांनी स्टेजजवळ उभे राहून प्रश्न विचारून गोंधळ घातला. बँकेचे प्रशासक भोरिया यांना मराठी येत नसल्यामुळे अनेक सभासदांची अडचण झाली. काही सभासद मराठीत प्रश्न विचारत होते, तर काही जण हिंदीत बोलत होते. या सर्वांना भोरियांचे उत्तर हिंदीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिहर भेटीनिमित्ताने आज दिंडी सोहळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

श्रीराम वारकरी मंडळाच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी (दि. ६) सकाळी साडेसातला काळाराम मंदिर येथून नाशिक ते त्र्यंबकेश्वर हरिहर भेट दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून काळाराम आणि संत निवृत्तिनाथ महाराज यांची हरिहर भेट घडवून आणली जाते. दिंडीत हजारो वारकरी सहभागी होतात. दिंडीच्या मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे.

श्रावणातील एकादशीला गेली ३५ वर्षांपासून ही दिंडी काढण्याची परंपरा आहे. हरिहर भेटीच्या पायी दिंडीची सुरुवात काळाराम मंदिर येथून टाळ मृदुंगाचा गजरात होणार आहे. सकाळी साडेसातला निघणारी दिंडी दुपारी साडेचारला संत निवृत्तिनाथ महाराज समाधी स्थळावर पोहचेल. दिंडीच्या मार्गात सावरकर तरणतलाव येथे महापौर रंजना भानसी, पद्माकर पाटील आदींच्या उपस्थितीत तर सातपूर येथे आंबेकर कुटुंबीय व पिंपळगाव बहुला येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येईल.

महिरावणी येथे मुरलीधर पाटील यांच्यातर्फे स्वागत आणि फराळ वाटप केले जाणार आहे. दाते पॅलेस येथेही पालखीचे स्वागत होणार आहे. त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यातर्फे स्वागत झाल्यानंतर कुशावर्त येथे पूजन, अभंग, आरती होईल. संत निवृत्तिनाथ महाराज समाधी स्थळ येथे पूजन व आरतीनंतर हरिहर भेटीचा समारोप होईल. श्रीराम वारकरी मंडळाचे अध्यक्ष पोपटराव फडोळ, कोषाध्यक्ष दामोदर गावले, मधुकर काश्मिरे, खंडू चव्हाणके, लक्ष्मण गुळवे आदींनी या दिंडीचे आयोजन केले आहे.

सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजमध्ये तरुणीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उच्चशिक्षित तरुणीचा कॉलेजमध्ये एका परिचित विवाहित तरुणाने विनयभंग केला. ही घटना भोसला मिलिटरी स्कूल येथे घडली. किरकोळ वादाप्रकरणी पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे घ्यावी, या कारणातून सुरुवातीस वाद आणि नंतर विनयभंगाचा प्रकार घडला. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितास कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची लागलीच नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली.

शुभम रमेश सांगळे (रा. राज रेसि. नरहरीनगर) असे संशयिताचे नाव आहे. संशयित आणि पीडित तरुणी एकमेकांचे परिचित असून, त्यांचा कौटुंबिक वाद आहे. या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जाते आहे. सदर उच्च शिक्षित तरुणी सोमवारी कॉलेजला गेली होती. संशयित आरोपीने वर्गात जाऊन तिला बाहेर ओढत आणले. तसेच पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घ्या, नाहीतर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तात्काळ संशयितास ताब्यात घेतले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक चांदणी पाटील करीत आहेत.

कारमधून टेपची चोरी

पार्क केलेल्या दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी महागडे कारटेप चोरून नेल्याची घटना महात्मानगर भागात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब किसन साबळे (रा. सातमाऊली अपा. संदीपनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. साबळे यांची हुंडाई (एमएच १५ एफटी ७६९९) व नरेंद्र बग्गा यांची (एमएच १२ डीई ०९९६) कार सोमवारी रात्री महात्मानगर येथील एफरोड भागातील प्लॉट नं. १६६ मध्ये लावलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी दोघा कारच्या काचा फोडून कारमधील महागडे कारटेप आणि अन्य वस्तू असा सुमारे १५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.

दोन संशयित अटक

चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या दोघा संशयित चोरट्यांना अटक केली. संशयित देवळाली कॅम्प येथील सौभाग्यनगर भागात चोरी करण्याच्या तयारीत होते. ही कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, या प्रकरणी देवळाली कँम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण ज्ञानदेव तागडे (रा. धनगर गल्ली, देवळाली कॅम्प) आणि जय राजेंद्र उगले (रा. वरची गल्ली, दे. कॅम्प) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मध्यवर्ती युनिटचे दरोडा पथक मंगळवारी मध्यरात्री गस्त घालत असतांना संशयित पोलिसांच्या हाती लागले. सौभाग्यनगर येथील देवळाली सोसायटीजवळ शनी मंदिरामागील भागात हैदर व्हिलाच्या बाजूला संशयित चोरीच्या तयारीत दबा धरून बसलेले होते. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून अटक केली. संशयितांच्या ताब्यातून कटावणीसह धारदार शस्त्र, मिरची पूड असा ऐवज जप्त करण्यात आला. युनिटचे पोलिस नाईक गंगाधर केदार यांच्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक मुठाळ करीत आहेत.

लेव्हिट मार्केटला जुगारी अटकेत

देवळाली कॅम्प येथील लेव्हिट मार्केट भागात उघड्यावर सोरट जुगार खेळणाऱ्या मनोज सोळंकी व विठ्ठल भालेराव (रा. जुनी स्टेशनवाडी) या दोघांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून २४५ रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी सांयकाळच्या सुमारास झाली. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

कुटुंबीयांना कोंडले घरात

कुटुंबीय घरात असतांना बाहेरून कडी लावून घेत कोंडून ठेवल्याची घटना गणेशवाडी भागात घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन कायस्थ (रा. गणेशवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी ही घटना घडली. कायस्थ यांच्या घरी गोविंदनगर येथील युवराज रुस्तम गायकवाड व त्यांचे दोन साथीदार आले होते. कायस्थ यांच्यासह कुटुंबीय घरात असतांना संशयितांनी घरास बाहेरून कडी लावून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार हारुण शेख करीत आहेत.

क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शर्तभंग झाल्यास दंडाची वसुली

$
0
0

नाशिक : विविध प्रयोजनांसाठी सरकारने दिलेल्या जमिनींचा त्याच कारणांसाठी वापर होत आहे की नाही हे तपासण्याची मोहीम नाशिकचे नवनियुक्त तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी हाती घेतली आहे. १९७० पासूनचे मूळ पुरावे शोधण्यात येणार असून, शर्तभंग झाला असल्यास ६२ ते ९० टक्क्यांपर्यंत दंड आकारणी करण्यात येणार असल्याचा इशारा आवळकंठे यांनी दिला आहे. त्यामुळे जागांचा अन्य कारणांसाठी वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनेक प्रकरणांमध्ये शर्तभंग झाला असण्याची शक्यता असून त्यामुळे सरकारचा मोठा महसूल बुडाला असण्याचा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला आहे. नियमितीकरण केले असल्यास त्याबाबतचे पुरावे या मोहीमेत तपासले जाणार आहेत. शर्तभंग झाला असल्यास संबंधित मिळकत धारकांना दंडाच्या नोटीसा देण्याचे प्रयोजनही करण्यात आले आहे. रेडीरेकनरच्या दरानुसार ही दंडवसुली करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

fasttt

$
0
0

पिंपळगावात व्याख्यानमाला

पिंपळगाव बसवंत : येथील बसवंत प्रतिष्ठानतर्फे शहरातील शगुन लॉन्स येथे वसंत व्याख्यानमालेचे आयोजित करण्यात आले आहे. गीतकार कवी बाबासाहेब सौदागर दुसरे पुष्प गुंफताना 'माझ्या गाण्याची जन्मकथा' या विषयावर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कमी लक्ष्मण महाडिक, विजयकुमार मिठे, योगेश पाटील, रवींद्र मोरे, सतीष मोरे, गुलाब मोरे उपस्थित होते.

000

पोलीस भरतीपूर्व

शिबिराला सुरुवात

घोटी : घोटी पोलिस ठाण्याच्या वतीने घोटी येथील जनता विद्यालयात बारावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. पोलिस भरतीबाबत मार्गदर्शन व प्रात्याक्षिक यावेळी करण्यात आले. जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांच्या संकल्पनेतील भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सहायक निरीक्षक पंकज भालेराव यांनी मार्गदर्शन केले. भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, खेळांचे कौशल्य याबाबतची माहिती देण्यात आली.

000

उपाध्यक्षपदी प्रकाश गामने

घोटी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जटायू मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रशांत गामने यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपाने गामने यांची इगतपुरी तालुका भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. टाकेद परिसरात गामने यांचा दांडगा जनसंपर्क आहे. भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्हा प्रभारी सुनील बच्छाव, माजी आमदार शिवराम झोले, तालुकाअध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे यांनी त्यांचा घोटी कार्यालयात सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यसेवेचा विकास अद्यापही अपूर्णच!

$
0
0

डॉ. अभय बंग यांची खंत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजाच्या विकासाच मार्ग हा आरोग्यसेवेतूनच जातो. विज्ञानाने इतकी अफाट प्रगती केली असतानाही समाजाचा एक भाग आरोग्याच्या प्राथमिक सेवांसाठी झुंजतो आहे. हे चित्र विदारक आहे. या अर्थाने आरोग्यसेवेचा विकास अद्यापही अपूर्णच आहे, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली.

आरोग्य विद्यापीठात आयोजित 'अधिक अर्थपूर्ण आयुष्याकडे' या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नव्या पिढीतील डॉक्टरांनी विषमतेची ही दरी मिटविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अशा सेवेची समाजाच्या एका घटकाला नितांत गरज आहे, असे सांगताना त्यांनी 'सेवाग्राम टू शोधग्राम' असा विषय मांडला. मंचावर टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, डॉ. अश्विनकुमार तुपकरी, डॉ. संदीप माने, डॉ. श्रीराम सावरीकर, डॉ. आशुतोष गुप्ता, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी आपल्या कॉलेज जीवनात घडलेले प्रसंग कथन केले. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने हमाल, वेश्या, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. औरंगाबादमधील डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सेवांकुर संस्थेचे प्रणेते डॉ. अश्विनकुमार तुपकरी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात यासाठी सेवांकुरतर्फे देशातील विविध भागांमध्ये उपक्रम होतात. दुर्गम भागात तेथील वातावरणात आरोग्यविषयक सामाजिक प्रश्नांचा अभ्यास व्हावा, यासाठी ही संस्था कार्यरत पाहिजे.

ओरिजिन फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप माने म्हणाले की, स्वत:वर विश्वास ठेवून काम करा. डॉक्टरांनी निस्वार्थ सेवा करावी. रुग्ण हीच देवता असून, त्याची सेवा हे कार्य समजून कार्य करावे. समाजात सेवा करताना शांत मनाने कार्य करावे रुग्णाच्या भावनांची जाण ठेवावी, असे त्यांनी सांगितले. कौटुंबिक सलोखा जपत रुग्णांची सेवा करावी विद्यार्थ्यांची सेवाभावी जीवनशैली, योग्य वागणूक, कम्युनिकेशन स्किल वाढविण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. जामनगर येथील आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि आयुष मंत्रलय व वैद्यकीय शिक्षणमंत्र्ययांचे सल्लागार डॉ. श्रीराम सावरीकर म्हणाले की, समाजाभिमुख कार्य करण्यासाठी सर्वानी सहभाग घ्यावा. त्यासाठी आरोग्य सेवा हे उत्तम क्षेत्र आहे. हरित ऊर्जा व आषाढी एकादशीनिमित्त वारीत सहभागी वारकऱ्यांना तसेच मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी विद्यापीठातर्फे राबविण्यात आलेल्या निर्मलवारी उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

वाढत्या व्यसनांनी मोडतोय समाजाचा कणा

डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले की, देशात कॅन्सरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी बदलती जीवनशैली प्रामुख्याने कारणीभूत आहे. आपली आहार-विहार पद्धती, व्यायामाचा अभाव, प्रदूषण या गोष्टी आजारास कारणीभूत आहेत. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेली व्यसनाधीनता समाजाचा कणा मोडू पाहत आहे. यासाठी समाजप्रबोधन गरजेचे आहे. रुग्णांच्या गरजा जाणून घेणे व त्यानुसार कार्य करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकभर खाद्यपदार्थ फेकले रस्त्यावर

$
0
0

मुदतबाह्य असताना पडले मुलांच्या हातात

महापालिकेसह 'एफडीए'चे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुदत संपलेल्या लहान मुलांच्या खाद्य पदार्थाचा ट्रकच अज्ञात व्यक्तीने पंचवटी अमरधाम येथील रस्त्यावर टाकून पोबारा केला. खाद्यपदार्थांचे पॅकेट रस्त्यावर असल्याने या भागातील लहान मुलांनी पर्वणी साधली. मुदतबाह्य अन्नपदार्थांचे सेवन केल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. संबंधित व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पंचवटी अमरधाम येथून तपोवनात जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास ट्रकभर खाद्य पदार्थांचे पॅकेट रस्त्यावर टाकण्यात आले होते. यात स्कूल मस्ती, हलकेफुलके, डायए चिवडा, व्हिल्स, वेफर्स अशी नावे असलेल्या शेकडो पॅकेटचा समावेश होता. या पॅकेटच्या अन्न पदार्थांची मुदत २०१७ मध्येच संपलेली असून, हा साठा नष्ट करण्याच्या हेतूने संबंधित व्यक्तीने रस्त्यावर फेकला. यामुळे मानवी तसेच प्राणी जीविताला धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकास शोधून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ‘आक्रोश’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने कमी पटसंख्येचे कारण दाखवत १३५ अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय फेटाळला असतानाही, प्रशासनाने या अंगणवाड्या बंद केल्या आहेत. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत अंगणवाड्या कायमस्वरूपी बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयास स्थगिती देण्याची मागणी केली. प्रशासनाने कामावरून कमी केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर बुधवारी धरणे आंदोलन करीत 'आक्रोश' केला. यावेळी संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी अचानक 'रास्ता रोको' आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची धांदल उडाली. तब्बल दोन तास या महिलांनी 'रास्ता रोको' केल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत, त्यांना ताब्यात घेतले.

प्रशासनाने कमी पटसंख्या असल्याचे कारण देत १३५ अंगणवाड्या बंद केल्याने २७० सेविका आणि मदतनिसांवर बेरोजगारीची वेळ ओढवली आहे. महासभेने प्रशासनाचा हा निर्णय फेटाळून लावला होता. तरीही प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केली. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भारतीय हितरक्षक सभेच्या नेतृत्वाखाली बुधवारी महापालिकेबाहेर आंदोलन करीत प्रशासनाला निवेदन सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंगणवाड्या वाचविण्यासाठी पत्र लिहून आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या निर्धारणाचे अधिकार महासभेलाच असावेत व विद्यार्थी मर्यादा किमान १५ व कमाल २० पर्यंत केली जावी. शहराच्या लोकसंख्येनुसार अंगणवाड्यांची पुनर्रचना केली जावी. अंगणवाड्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. अंगणवाड्या १९९४ पासून सुरू झाल्या असताना भविष्य निर्वाह निधी मात्र गत दोन वर्षांपासून सुरू झाल्याने ज्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांना सेवानिवृत्तीनंतर जगणे सुसह्य व्हावे यासाठी आर्थिक मदतीची योजना सुरू करावी. अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी वर्ग, कर्मचारी, मुख्य अंगणवाडी सेविका, सेविका आणि मदतनीस यांना तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण दिले जावे. प्रशासन अंगणवाड्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी जोपर्यंत ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत अंगणवाड्या कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली जावी, आदी मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. निवेदनावर भारतीय हितरक्षक सभेचे सभानायक किरण मोहिते यांच्यासह कृष्णा शिंदे, भागवत गांगुर्डे, विकास रोकडे, संदीप कोळे, शरद जाधव यांची नावे आहेत.

दीडशे महिलांना अटक

दुपारी चार वाजेपर्यंत शांततेच्या मार्गाने सुरू असलेले धरणे आंदोलन अचानक आक्रमक झाले. महिलांनी पालिकेसमोरच 'रास्तारोको' सुरू केला. मुंढेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे पोलिसांची धांदल उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्हीकडचे रस्ते बंद केले. यावेळी महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला अधिक आक्रमक झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यातच राजकीय पक्षांनी एंट्री केल्याने तब्बल दोन तास 'रास्तारोको' आंदोलन चालले. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलनातील सुमारे दीडशे महिलांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६२ हजार घरांना नव्या दराने घरपट्टी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करयोग्य मूल्यात निवासी दरात ५० टक्के, तर अनिवासी दरात २५ टक्के कपातीची घोषणा केली असली तरी, सत्तारुढ भाजपसह विरोधक या निर्णयावर असमाधानी असून, निर्णयातील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेण्याची तयारी करीत आहेत. दुसरीकडे भाजपचे अविश्वास नाट्य फसल्यानंतर आता प्रशासनाने नवीन मालमत्तांच्या करयोग्य मूल्य दरवाढीची अंमलबजावणी सुरू केली आहे. महापालिकेने नुकत्याच केलेल्या मालमत्ता सर्वेक्षणात आढळलेल्या ६२ हजार मालमत्तांवर पूर्वलक्षी प्रभावाने नवीन मालमत्ता कराची आकारणी केली जाणार आहे. या मालमत्ताधारकांवर दंडात्मक कारवाई म्हणून सहा वर्षांची घरपट्टी वसूल केली जाणार असून, त्याबाबत महिनाभरात नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

आयुक्त मुंढे यांच्या करवाढीच्या निर्णयावरून सत्तारुढ भाजपने आणलेले अविश्वासाचे नाट्य संपल्यानंतर प्रशासनाने करवाढीसंदर्भात काढलेला आदेश क्र. १३९ ची अंमलबजावणी शहरात आता सुरू झाली आहे. मुंढेंनी करवाढीसंदर्भात काढलेल्या आदेश क्र. ५२२ मुळे शहरातील नवीन मालमत्तांच्या करयोग्य मूल्य दरात पाच ते सात पटींपर्यंत वाढ झाली होती. त्यामुळे शहरात करवाढीच्या या निर्णयावरून मोठे वादळ उठले होते. महासभेने स्थगिती दिल्यानंतरही आयुक्तांनी त्याची अंमलबजावणी केल्याने थेट अविश्वासाचे हत्यार सत्तारुढ भाजपने उपसले होते. या प्रस्तावानंतर मुंढेंनी करवाढ निम्म्यावर आणली होती. त्यामुळे अविश्वासाचे नाट्य संपले होते. तरीही करवाढीतल्या बदलावर सत्तारुढ भाजपसह विरोधक असामाधानी असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, दुसरीकडे प्रशासनाने सुधारीत करवाढीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचा पहिला फटका मालमत्ता सर्वेक्षणात आढळलेल्या परंतु, कराच्या फेऱ्यात नसलेल्या ६२ हजार मालमत्तांना आता नव्या दराने आकारणी सुरू केली आहे. या मालमत्तांनी घरपट्टीसाठी वेळेत नोंदणी न केल्याने त्यांना कायद्यातील तरतुदींनुसार पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. गत सहा वर्षांची दंडात्मक घरपट्टीची आकारणी केली जाणार आहे. त्यांना महिनाभरात नोटिसा पाठविल्या जाणार आहेत. त्यामुळे नव्या करयोग्य मूल्याचा पहिला फटका या मालमत्तांना बसणार आहे. शेती क्षेत्रावरील तीन पैशांची करआकारणी बाबत प्रशासनाने आस्तेकदमची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

पुन्हा अपील करावे लागेल

आदेश क्र. ५२२ नुसार महापालिकेने शहरातील जवळपास साडेचारशे मालमत्तांना वाढीव दराने घरपट्टीची आकारणीच्या नोटिसा यापूर्वीच बजावल्या आहेत. परंतु, आता करवाढीबाबत नव्याने आयुक्तांनी शुद्धीपत्रक काढून करवाढ निम्म्यावर आणली आहे. त्यामुळे या मालमत्ताधारकांबाबत पेच निर्माण झाला आहे. त्यांना नोटिसा मिळाल्याने आपली घरपट्टी कमी करण्यासाठी पालिकेकडे अपील दाखल करावे लागणार आहे. त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर नव्या दराने होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम कदम जोड

$
0
0

मनसेने मारले जोडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे. ठक्कर बाजार येथील मनसे कार्यालयाच्या बाहेर कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. अपंग बांधवांच्या प्रहार संघटनेने देखील ईदगाह मैदानाबाहेर कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय महामार्ग सहाचे काम बंद!

$
0
0

आर्थिक वादाने हजारो मजूर बेरोजगार
...
पंकज काकुळीद, धुळे
सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नवापूर ते अजंगदरम्यानच्या रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद झाले आहे. यामुळे सुमारे एक हजारांहून अधिक मजुरांना आपल्या गावी परत पाठवून देण्यात आले आहे, अशी माहिती महामार्गाचे काम करणाऱ्या ‘जीएचव्ही’ या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाकडे महामार्गाच्या कामबंदबाबत कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे प्रकल्प संचालकांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. हा सर्व प्रकार पाहता राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला मूळ ठेकेदार कंपनी व काम करणारी सब जीएचव्ही ठेकेदार कंपनी यांच्या आर्थिक वादामुळे विलंब होणार आहे.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून सुमारे १४० किमी. अंतरावरून सुरत-नागपूर राष्ट्रीय महमार्ग क्रमांक सहाचे गेल्या दीड वर्षापासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामाचे मूळ ठेकेदार मुंबई येथील ‘आयएल ॲण्ड एफएस’कडून ‘जीएचव्ही’ या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. सुमारे अडीच हजार कोटींपेक्षा रुपयांपेक्षा अधिक हा ठेका असून, दीड वर्षाच्या कालावधीनंतर महामार्गाचे काम आता दोन्ही कंपनीच्या आर्थिक वादामुळे बंद पडले आहे. कंपनीकडे जिल्ह्यासह परराज्यातील सुमारे एक हजाराहून अधिक मजूर काम करीत होते. मात्र, काम बंद झाल्यामुळे मजुरांनादेखील आपापल्या गावी परत पाठविण्यात आले आहे. तर येत्या काही दिवसांत कंपनीचे अधिकारीदेखील माघारी जाण्याच्या तयारीत असल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत मूळ ठेकेदार कंपनीकडून सब ठेकेदार कंपनी जीएचव्हीला देण्यात येणारा आर्थिक फंड बंद करण्यात आला असल्याचे समजते. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला बाधा निर्माण होऊन काम बंद झाले. जीएचव्ही कंपनीचे अधिकारी अन्सारी यांनी माहिती देताना सांगितले की, मूळ ठेकेदार कंपनीकडून आर्थिक पुरवठा बंद झाल्याने महामार्गाचे काम बंद होऊन दोन महिने होण्यात आले. याबाबत आता दिल्लीतून राजकीय यंत्रणांनी लक्ष घालून काम पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. तर महामार्गाच्या कामासाठी धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह परराज्यातील देखील मजूर दाखल झाले होते. त्यांनादेखील त्यांच्या गावी जाण्यास सांगण्यात आले आहे. आता काम कधी सुरू होईल हे माहिती नाही. तसेच आम्ही अधिकारीदेखील परत आमच्या गावी जाणार असल्याचे अधिकारी म्हणाले.

मंत्र्यांनी लक्ष द्यावे
धुळे जिल्ह्यात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे तर दिल्लीत कार्यरत असतात. याबाबत डॉ. भामरे यांनी माहिती घेऊन काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शानदार सोहळा पार पडला होता. मात्र, आता या बंद कामाकडे मंत्र्यांनी लक्ष देत वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरीचा संशय; वृद्धाची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

मोबाइल चोरीच्या संशयावरून मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना सिडकोत घडली. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गजानन सदाशिव भगत यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे वडील सदाशिव अर्जुन भगत (वय ५५) हे शांताई अपार्टमेंट, मटालेनगर, कामटवाडे येथे चौकीदाराचे काम करीत होते. यावेळी शेजारील पेठकर यांच्या बंगल्यातील ड्रेनेजचे काम करण्यासाठी बाहेरून चार अज्ञात कामगार आले होते. या कामगारांमधील एकाचा मोबाइल गहाळ झाला. यावेळी कामगारांनी भगत यांच्यावर संशय व्यक्त करून त्यांना चापटीने मारहाण केली. यात भगत जखमी झाले. यानंतर चारही कामगार तेथून पळून गेले. त्यानंतर सायंकाळी भगत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी चार अज्ञात कामगारांविरुद्ध भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे आरटीओ कार्यालयात मुंबई पथकाकडून चौकशी

$
0
0

नागरिकांच्या तक्रारीनंतर धडक कार्यवाही

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नेहमीच वादात सापडत असलेल्या येथील धुळे प्रादेशिक परिवहन म्हणजेच आरटीओ कार्यालयात मुंबई येथील दक्षता विभागाच्या पाच अधिकाऱ्यांचे एक पथक चौकशीसाठी दाखल झाले आहे.

मुंबईतील अधिकाऱ्यांनी आज अचानक धाड टाकून ही कारवाई केली. या कारवाईत काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी तर कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. काही गाडी मालकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. अचानक पडलेल्या या धाडीमुळे आरटीओ कार्यालयात खळबळ उडाली आहे. दिनेश फुलचंद परदेशी, विजय पाटील (दोघे रा. धुळे) यांनी काही दिवसांपूर्वी परिवहन आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. येथे गाड्या पासिंग करताना पैशांची मागणी होते. सरकारी शुल्का व्यतिरिक्त अधिकचे पैसे घेण्यात येतात. आरटीओ अधिकारी येथे थांबत नाहीत, यासह अन्य तक्रारी यामध्ये त्यांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत बुधवारी दुपारी अचानक परिवहन विभागातील दक्षता विभागाच्या (व्हिजिलन्सच्या) पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने धुळे आरटीओ कार्यालयात धाड टाकली.

या पथकात सहाय्यक आयुक्त पी. पी. कोलवाडकर, रावसाहेब वाघ, घळसी व अन्य अधिकारी आहेत. या वेळी पथकाकडून आस्थापना, पासिंग, रजिस्ट्रेशन आदी विभागातील सर्व कागदपत्रांची तपासणी केली जात होती. राज्यासह प्रत्येक जिल्ह्यात आरटीओ विभागाचे स्वतंत्र कार्यालये आहेत. त्या जिल्ह्यातील वाहने त्या-त्या जिल्ह्यांच्या आरटीओ कार्यालयात पासिंग करणे, रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. मात्र, तरीसुद्धा धुळे आरटीओ कार्यालयात मध्य प्रदेश, मुंबई, नाशिक, जळगाव या जिल्ह्यातील नवीन गाड्या पासिंग व रजिस्ट्रेशन होत असल्याच्या तक्रारी होत्या. उशीरापर्यंत ही चौकशी आणि तपासणी सुरू होती. याबाबत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नी माहिती देण्यास नकार दिला.

दोन नागरिकांनी परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यामध्ये कार्यालयात भ्रष्ट कारभार चालतो, अधिकारी येथे थांबत नाहीत, यासह अन्य तक्रारी होत्या. या अनुषंगाने आम्ही चौकशीसाठी येथे आलो असून, चौकशी सुरू आहे.
-प्रशांत कोलवाडकर, दक्षता पथक प्रमुख, मुंबई परिवहन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसजवळ वाहनचोर अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महागड्या दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या संशयिताला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. हेमंत राजेंद्र भदाणे (वय २५, रा. ध्रुवनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पाच लाख रुपयांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हेमंत हा चोरीची दुचाकी विक्रीसाठी सीबीएस परिसरात येणार असल्याची माहिती गंगापूर पोलिस स्टेशनचे शिपाई नितीन नेटारे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक के. जे. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांनी सीबीएस परिसरात सापळा रचला. संशयित हेमंत हा केटीएम बाइक विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले. हेमंतने चोरलेल्या तीन बुलेट सोलापूर येथे विक्री केल्याचे तपासात पुढे आले. यासह पल्सर हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस उपनिरीक्षक समीर वाघ, हवालदार माणिक गायकर, विष्णू उगले, दत्तू गायकवाड, तुलसीदास चौधरी यांनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांच्या अपरोक्ष आगपाखड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सत्तारुढ भाजपनेच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आणलेल्या अविश्वास प्रस्तावाचे नाट्य बारगळल्यानंतर आता त्यांना घेरण्याचे प्रयत्न सर्वपक्षीयांना सुरू केले असून, त्याची प्रचिती गुरूवारी स्थायीच्या बैठकीत आली. स्थायी समिती सभांना वारंवार गैरहजर राहणाऱ्या मुंढेंविरोधात सत्तारूढ आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार हल्लाबोल करत आरोपांच्या फैरी झाडल्या. नगरसेवक निधी, विकासकामांचे प्रस्ताव, अभ्यासिका आणि ग्रीनफिल्ड प्रकरणाची खर्च वसुलीवरून सदस्यांनी आक्रमक होत प्रशासनाकडून घेतल्या जाणाऱ्या सोयीच्या भूमिकेचा समाचार घेतला. आयुक्तांची हुकूमशाही चालू देणार नाही, असे सांगत दीडशे लोकांवर नेतेगिरी करू नका असा टोला लगावला.

सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रभाग क्रमांक ३० मधील शिव कॉलनी भागात अभ्यासिका बांधण्याच्या प्रस्तावावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. विकासकामांसाठी आयुक्तांनी त्रिसूत्री लावली असताना, एकीकडे अभ्यासिका नाकारल्या जातात तर दुसरीकडे कशा मंजूर केल्या जातात याबाबत संतोष साळवे यांनी जाब विचारला. सरकारी निधीतून ही अभ्यासिका होत असल्याचा दावा शहर अभियंत्यांनी केला. मात्र, त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. नांदूरनाका येथील वाहतूक बेटाचे मंजूर काम ऐनवेळी रद्द करण्याच्या मुंढेंच्या निर्णयाचा निषेध करताना तत्कालीन आयुक्तांच्या मान्यतेने महासभा आणि स्थायी समितीने मंजूर केलेली विकासकामे आयुक्त मुंढे यांनी कोणत्या अधिकाराने रद्द केली, असा संतप्त सवाल उद्धव निमसे यांनी केला. शासन निधीतील काम असल्यामुळे अभ्यासिकेचा प्रस्ताव कार्यवाहीत आणल्याचा दावा प्रशासन करीत असेल तर भाजप आमदारांच्या निधीतील कामे आयुक्तांनी का रद्द केली, असा सवाल दिनकर पाटील यांनी उपस्थित केला. भाजप आमदारांचा अपमान करण्याचा प्रयत्न मुंढे करीत असल्याचा आरोपही पाटील यांच्याकडून केला गेला. यापुढे आयुक्त बैठकीला असतील तेव्हाच बैठकीला येऊ अशा इशाराही सदस्यांनी यावेळी सभापतींना दिला. आयुक्तांनी आतापर्यंत केवळ बजेट आणि कलम २१० च्या प्रस्तावांवेळीच स्थायीला हजेरी लावली होते. त्यामुळे ते निवडक कामांच्या वेळीच स्थायीच्या बैठकीला येतात असा आरोप केला.

निमसेंचा सभात्याग

नांदूरनाका भागात वाहतूक बेट बांधण्याचा प्रस्ताव मंजूर होऊन काम सुरू होण्याची वेळ आली असतानाच ती कामे आयुक्त मुंढे यांनी रद्द केली. यासंदर्भात उद्धव निमसे यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर अधिकाऱ्यांना त्यांची उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे सभापतींसह सदस्यही संतप्त झाले. अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने उत्तरे दिली जात असल्याने उद्धव निमसे यांनी सभात्याग केला. त्यामुळे सभापती आडके यांनी विभाग प्रमुखांना सविस्तर माहिती न दिल्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या.

नगरसेवक निधीवर आक्षेप

नगरसेवकनिधीतील कामे रद्द करण्याच्या मुंढे यांच्या निर्णयावरही सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. बजेट मंजूर होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर नगरसेवकांना प्रत्येकी १२ लाखांचा स्वेच्छानिधी देण्याची उपरती कशी झाली, असा संतप्त सवाल संतोष साळवे, कोमल मेहरोलिया, दिनकर पाटील, मुशीर सय्यद यांनी केला. या आधीच्या आयुक्तांनी व लेखाधिकाऱ्यांनी नगरसेवक निधी दिला तो, चुकीचा होता का असा सवाल करत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी १२ लाख ३३ लाखांच्या स्वेच्छानिधी बाबत मुख्य लेखाधिकारी सुहास शिंदे यांनी खुलासा केला. मात्र, यापूर्वी ५०-७५ लाखांचा नगरसेवकनिधी उपलब्ध करून देणाऱ्या तत्कालीन आयुक्तांचा कारभार बेकायदेशीर होता का, असा सवाल करत प्रशासनाकडून नगरसेवकांचा छळ केला जात असल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केला. आयुक्तांशी चर्चा करून नगरसेवकनिधीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे जाहीर करत सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी या वादावर पडदा टाकला.

शंभर लोकांवर छाती फुगते

स्थायीत संतोष साळवे आणि दिनकर पाटील यांनी मुंढेंच्या हुकूमशाही कारभाराचा जाब विचारला. मुंढेंकडून नगरसेवकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप करत, आम्ही अधिकार अजून गहाण टाकले नाही असा टोला साळवेंनी लगावला. आम्ही कोणाला घाबरत नाही, असे सांगत शंभर-दीडशे लोकांवर छाती फुगवून आयुक्त खुर्चीवर कसे उभे राहू शकतात, असा सवाल साळवेंनी केला. आमच्या निवडणुकीत प्रचाराला दीड हजार लोक असतात, आम्ही ५० हजार लोकांमधून निवडून येतो असा टोला त्यांनी लगावला. ९ महिन्यांनंतर स्वेच्छानिधी देणे हा अपमान असून बिल्डरांच्या कामांसाठीच ते स्थायीत येतात, असा आरोप केला. तर या आधीचे आयुक्त बेकायदेशीर कामे करीत होते, का असा सवाल दिनकर पाटील यांनी उपस्थित करीत, ते नगरसेवकांचा छळ करत असल्याचा आरोप यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त खडसेंची अखेर बदली

$
0
0

ट्रकचालक, मालक असोसिएशनतर्फे तडवी यांना घेराव

म. टा. वृत्तसेवा, धुळे

प्रादेशिक परिवहन कार्यालयात मुंबई येथील दक्षता पथकाकडून तपासणी गुरुवारी होत असतानाच खान्देश ट्रक, चालक, मालक असोसिएशनतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. के. तडवी यांना घेराव घालण्यात आला होता. त्याची दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात येथे नियुक्ती असलेले नंदुरबारचे सहाय्यक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांची तत्काळ बदली करण्यात आली. त्यांच्या जागी जे. आर. चव्हाण यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, अधिकारी खडसे हे मनमानी कारभार करीत अर्थपूर्ण व्यवहार केल्याशिवाय काम करून देत नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. दरम्यान, मुंबई पथक हे जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात तपासणीसाठी रवाना झाले असल्याचे सांगण्यात आले.

धुळ्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण हे रजेवर गेले आहेत. त्यासाठी नंदुरबार येथील सहाय्यक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांना धुळ्यात तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती दिली होती. ते यापूर्वीदेखील येथे कार्यरत होते. परंतु, खडसेंबद्दल गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असल्याने त्यांच्याबद्दल ट्रकचालक व मालकांमध्ये रोष आहे. मुंबई येथील दक्षता पथकाकडून गुरुवारी तपासणी सुरू असतानाच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. के. तडवी यांना घेराव घालत संदीप खडसेंबद्दल तक्रारींचा पाढा वाचला. त्यांना येथून परत पाठविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. साधारण दोन तास हे आंदोलन केल्यानंतर अधिकारी संदीप खडसे यांची बदली करण्यात येऊन पी. के. तडवी यांनी खडसे यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. ते पत्रच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दाखविण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्प पूर्तीपूर्वीच ‘एनओसी’!

$
0
0

अनिल महाजनांसह बिल्डरवर कारवाईचे आयुक्तांचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे निवृत्त मुख्य अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन यांनी निवृत्तीच्या शेवटच्या दिवसात ६०० सदनिकांच्या अनमोल नयनतारा गोल्ड या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अग्निशमन विभागाचा 'ना हरकत दाखला' (एनओसी) दिल्याचा प्रताप समोर आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रकार उजेडात आला.

प्रकल्पाच्या कामात अनियमितता असतानाही अंतिम 'एनओसी' देण्यात आली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, महाजन यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करत, संबंधित बांधकाम व्यावसायिक कंपनी बाफना बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सवर कारवाईचे आदेश दिले आहे. सोबतच संबधितांना अग्निशमन परवाना रद्द करत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न देण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हे क्रमांक ९०५मध्ये अनमोल नयनतारा गोल्ड नावाने सहाशे सदनिकांचा मोठा प्रकल्प आहे. परंतु, या प्रकल्पात परवानग्या देतांना अधिकाऱ्यांनी चुकीची कामे केल्याचे स्थायीच्या बैठकीत समोर आले आहे. या प्रकल्पाची पाच वर्षांपासून घरपट्टी व पाणीपट्टी वसूल होत नसल्याची तक्रार सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पत्राद्वारे केली होती. त्याच पत्राचा आधार घेत त्यांनी स्थायीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला गेला. संबंधित प्रकल्पाकडून पाणीपट्टी वसूल केली नाही, तक्रारीनंतर घाईघाईने पाणीपट्टी अदा करण्यात आली, मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. अशी यंत्रणा बसविल्यानंतर त्याबाबत अग्निशमन दलाकडून 'एनओसी' घ्यावी लागते. मात्र, इमारत पूर्ण नसताना महाजन यांनी निवृत्तीच्या अखेरच्या दिवसात अंतिम 'एनओसी' दिली. नागरिकांना या दाखल्यासाठी वेठीस धरले जात असतांना, दुसरीकडे काम पूर्ण आधीच अधिकारी ठेकेदारांचे कसे कामे करतात, असा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला.

'एनओसी'ची प्रकरण लक्षात आल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी केली. त्यात अग्निरोधक यंत्रणेत अनेक त्रुटी असून त्या नियमानुसार बसवण्यात आल्या नसल्याचा अहवाल सादर करण्यात आला. त्या अहवालानुसार, आयुक्तांनी संबंधित इमारतीचा अग्निशमन विभागाची अंतिम 'एनओसी' रद्द केली आहे. तसेच फायर नॉर्मनुसार प्रकल्पात काम केले जात नाही तोपर्यंत भोगवटा प्रमाणपत्र न देण्याचे आदेश नगररचना विभागाला आयुक्तांनी दिल्याची माहिती प्रशासन उपायुक्त मेहश बच्छाव यांनी बैठकीत दिली. सोबतच संबधित बिल्डरवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

'अतितत्परता' भोवली

यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये अनिल महाजन यांच्या चौकशा सुरू असतांनाच, पुन्हा त्यांच्या मागे या प्रकल्पावरून एक चौकशी लागली आहे. आयुक्त मुंढे यांनी या प्रकरणात अतितत्परता दाखविण्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांची पुन्हा विभागीय चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे महाजन यांच्या अडचणी अधिकच वाढणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅडमिंटन स्पर्धा

$
0
0

बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्ज्वलचे तिहेरी यश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर येथे महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या प्रज्ज्वल सोनवणेने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. सबज्युनियर गटात एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारात विजेतेपद तर ज्युनियर गटात प्रज्ज्वलने उपविजेतेपद मिळविले.

सब ज्युनियर गटात एकेरीमध्ये खेळतांना उपांत्य फेरीत त्याने नागपूरच्या ओजस गेडामचा पराभव केला. ह सामना २-१ ने जिंकून प्रज्ज्वलने अंतिम फेरी गाठली. त्याचा दुहेरीचा जोडीदार ठाण्याच्या ओम गोवंडी यांच्याशी त्याची अंतिम लढत झाली. या सामन्यातही प्रज्ज्वलने वर्चस्व राखत पहिला सेट २१-१८ जिंकून आघाडी घेतली. परंतु दुसऱ्या सेटमध्ये त्याला १८-२१ असा पराभव झाल्यामुळे १-१ अशी बरोबरी झाली. परंतु तिसऱ्या सेटमध्ये प्रज्ज्वलने संयमाने खेळ करून २१-१२ ने सेट जिंकून या गटाचे विजेतेपद पटकावले.

सब-ज्युनियर गटाच्या दुहेरी प्रकारात प्रज्ज्वल सोनवणेने ओम गोवंडीच्या साथीने खेळतांना उपांत्य फेरीत इरफान खान (औरंगाबाद) आणि नागेश चामले (लातूर) यांचा सरळ २-० असा पराभव केला. त्यानंतर त्यांची लढत आद्य पारसनीस आणि श्रेय्यस साने या पुण्याच्या जोडीविरुद्ध झाली. या अंतिम सामन्यातही प्रज्ज्वल आणि ओम या जोडीने आपापसात समन्वय राखून हा सामनाही २१-१८, २१-१६ असा जिंकून दुहेरीचे विजेतेपद मिळविले. त्यानंतर ज्युनियर गटाच्या अंतिम फेरीत प्रज्ज्वलची लढत पुण्याच्या दर्शन पुजारीशी झाली. या सामन्याअधी प्रज्ज्वलला विश्रांतीसाठी फारच कमी अवधी मिळाल्यामुळे त्याने या सामन्यात फारसा प्रतिकार न करता खेळ केला. त्यामुळे त्याला ०४- २१ आणि ०५-२१ अशा गुणांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे उपविजेतेपदावर त्याला समाधान मानावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खातेधारकाची फसवणूक

$
0
0

नाशिक : बँक खातेधारकाच्या चालू खात्यामधील पैसे परस्पर काढून खातेधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ठाणे जनता सहकारी बँकेमध्ये हा प्रकार घडला आहे. शंकर जोधाराम संगतानी (वय ५४, रा. टाकळीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. मार्च २०१२ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत गंगापूर रोडवरील ठाणे जनता सहकारी बँकेतील व्यवस्थापक दंडवते आणि सहायक व्यवस्थापक परदेशी यांनी शंकर संगतानी यांच्या चालू बँक खात्यातील सहा लाख रुपये काढले. त्यासाठी त्यांची संमती किंवा स्वाक्षरी न घेता हे पैसे राधेय फोर्जिंगच्या खात्यावर वर्ग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत फसवणुकीची तक्रार दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images