Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

८२ शाळांमध्ये २७ हजार लसीकरण

$
0
0

नाशिक : गोवर उच्चाटन व रुबेला आजारावरील नियंत्रणासाठी शासनाच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या चार दिवसात ८२ शाळांमधील २५ हजार १९० व मनपा रुग्णालयांमध्ये २३३५ बालकांना लसीकरण करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील सुमारे ४ लाख ९० हजार २१८ बालकांना लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. यासाठी पाच आठवड्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात सर्व शाळांमध्ये मोहीम राबविण्यात येणार असून, त्यानंतर आंगणवाड्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय, मनपा दवाखाने व सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही सदर लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या मोहिमेत मनपाचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सेविका, नर्सेस, आशा, अंगणवाडी सेविका व शाळेतील शिक्षक यांचा सहभाग प्राप्त झालेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंकर महाराज पालखी

$
0
0

श्री सदगुरू शंकर महाराज पायी पालखी सोहळ्याचे शनिवारी नाशिक येथे आगमन झाले. मुंबईनाका, त्र्यंबकनाका, शालिमार, मेनरोड, सराफ बाजारमार्गे ही पालखी मुरलीधर गल्लीतील विठ्ठल मंदीरात पोहोचली. तेथे सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रविवारी दुपारी अडीचपर्यंत भाविकांना येथे दर्शनाचा लाभ घेता येणार असून, त्यानंतर पालखी ओझरकडे मार्गस्थ होणार आहे.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाआरोग्य शिबिराचे नांदुरीत आज उद्घाटन

$
0
0

महाआरोग्य शिबिराचे

नांदुरीत आज उद्घाटन

मुख्यमंत्री, पालकमंत्री राहणार उपस्थित

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील नांदुरी येथे सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी रविवारी, २ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या अटल महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

कळवण, सुरगाणा, बागलाण, देवळा, आणि दिंडोरी तालुक्यातील गरजू रुग्ण या शिबिरात सहभागी होणार असून, पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार हे शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत. शिबिराच्या पूर्वतयारीबाबत शनिवारी नांदुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाशिबिराचे संयोजक रामेश्वर नाईक, आमदार डॉ. राहुल आहेर शिबिराच्या नियोजनाबाबत माहिती दिली. नियोजनाच्या धर्तीवर अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, उप विभागीय अधिकारी पंकज सिंहा, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, पालकमंत्र्यांचे विशेष सचिव संदीप जाधव आदी नांदुरी येथील अटल मैदानावर शनिवारी उपस्थित होते.

२० नोव्हेंबरपासून रुग्णांची पूर्व तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात करण्यात आली. तसेच २५ नोव्हेंबरपासून प्रत्येक गावात घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. नाशिक येथे झालेल्या शिबिरात आदिवासी भागातील रुग्ण येऊ शकले नाहीत, त्यांना नामांकित डॉक्टरांमार्फत उपचाराची चांगली संधी या शिबिरातून उपलब्ध होणार आहे. जवळपास दोन लाख रुग्णांच्या आरोग्याची तपासणी या शिबिरात होईल, अशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. अधिकाधिक रुग्णांना शिबिराचा लाभ व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव घरपट्टीवर खल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या, परंतु कराच्या फेऱ्यात नसलेल्या ६२ हजार मिळकतींना दंडात्मक कारवाईसह घरपट्टी आकारणीच्या नोटिसा मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर शहरात असंतोष उसळला आहे. मिळकतधारकांचा असंतोष पाहून महापौर व सभागृह नेत्यांनी याबाबत सोमवारी (दि. ३) बैठक बोलावून दिलासा देण्याची भाषा सुरू केली आहे.

सहा विभागांत पहिल्या टप्प्यात ३० हजार मिळकतधारकांना नोटिसांचे वाटप पूर्ण झाले असून, घरपट्टीच्या नोटिसा हातात पडल्यानंतर नागरिकांना शॉकच बसला आहे. खासगी सर्वेक्षकाच्या आधारे मिळालेल्या माहितीची कोणतीही शहानिशा न करताच या नोटिसा बजावल्याचे समोर आले असून, नोटिसांबाबतचा असंतोष बघता आता प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनीही याबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकूडन अपिलाची संधी असल्याचे सांगितले जात आहे, तर महापौर व सभागृह नेत्यांनी याबाबत बैठक घेण्याचे सूचित केले आहे.

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात नव्याने सापडलेल्या ६२ हजारपैकी ३० हजार मिळकतींची पडताळणी पूर्ण झाली असून, या मिळकतींना विभागीय अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा बजावण्यास आल्या आहेत. उर्वरित पडताळणी होत असलेल्या ३२ हजार मिळकतींनाही नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे. या मिळकतींकडून सहा वर्षांच्या पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी वसूल केली जात असून, तशा नोटिसाच मिळकतधारकांना पाठविण्यात आल्या आहेत. परंतु, या नोटिसा तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी एकतर्फी लागू केलेल्या करयोग्य मूल्य दरानुसार आकारण्यात आल्याने मिळकतधारकांना मोठा शॉकच बसला आहे. मिळकत सर्वेक्षणात आढळेल्या मिळकती सरसकट अनधिकृत ठरवून त्यांना अनधिकृत दराप्रमाणे घरपट्टीची आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे एका फ्लॅटला साधारण ८० हजार ते सव्वालाखापर्यंतच्या नोटिसा दिल्या जात असून, मिळकतधारकांना आपली बाजू मांडण्यासाठी २१ दिवसांची संधी देण्यात आली आहे. संबंधित मिळकतधारकांनी २१ दिवसांत अपिल दाखल केले नाही, तर त्यांच्याकडून बजावलेल्या नोटिशीच किंमत वसूल केली जाणार आहे. त्यामुळे या नोटिसा मिळाल्यानंतर शहरातील मिळकतधारकांमध्ये असंतोष उसळला आहे.

--

नगरसेवकांनाही भरली धडकी

महापालिकेच्या कर संकलन विभागाने मिळकतींची कोणतीही पडताळणी व शहानिशा न करताच मिळकतधारकांना नोटिसा बजावल्याचे समोर येत आहे. खासगी कंपनीच्या सर्वेक्षणाच्या आधारावरच नोटिसा बजावल्या असून, त्यात आता अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. एकाच इमारतीतील मिळकतधारकांची मिळकत सारखी असताना त्यांना वेगवेगळ्या कर आकारणीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. कम्पाउंडिंग पॉलिसीअंतर्गत दाखल असलेल्या इमारतींनाही अनधिकृत ठरवत त्यांच्याकडून पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी वसूल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे चुकीच्या नोटिसा हातात पडताच नागरिकांकडून थेट नगरसेवकांनाच लक्ष्य करण्यात आल्याने या नोटिसांची धडकी आता नगरसेवकांनाही भरली असून, त्यांनी पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

---

बिल्डरांचे खापर मिळकतधारकांवर

बिल्डरांनी नगररचना विभागाकडे प्लॅन दाखल केल्यानुसार बांधकाम केले नसल्याचे बहुसंख्य मिळकतींमध्ये समोर आले आहे. सर्वेक्षणात संबंधित बांधकाम नकाशापेक्षा जास्त बांधकाम आढळले असल्याने महापालिकेने या इमारतीच अनधिकृत ठरवत त्यांच्याकडून तीनपट दंडात्मक व पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी लागू केली आहे. बिल्डर मिळकत विकून मोकळे झाले असले, तरी नोटिसा आणि वाढीव घरपट्टीच्या जाचात मात्र मिळकतधारक अडकले आहेत. एकीकडे बॅँकांचे हप्ते, तर दुसरीकडे महापालिकेची लाख ते दीड लाखाची घरपट्टी आता कशी भरायची, अशा पेचात मिळकतधारक अडकले आहेत.

--

घरपट्टीच्या नोटिसा मिळाल्यानंतर नागरिक व नगरसेवकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. आम्ही नागरिकांसोबत असून, त्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. नवीन मिळकतींना बजावल्या जाणाऱ्या नोटिसांबाबत सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, त्यात नागरिकांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करू.

-रंजना भानसी, महापौर

--

या मिळकतींसदर्भात महासभेने मंजूर केलेल्या ठरावाऐवजी आयुक्तांनी त्यांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात घरपट्ट्या आल्या आहेत. परंतु, यासंदर्भात योग्य तो तोडगा समन्वयाने काढून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल.

-दिनकर पाटील, सभागृह नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पुरेसा वेळ दिलेला असताना तुम्ही तयारी करून आला नाहीत. आता दोन दिवसांची मुदत देत असून, ३ डिसेंबर रोजी तुम्ही आपले म्हणणे मांडले नाही, तर कोर्ट या प्रकरणाचा एकतर्फी निकाल देईल, अशा शब्दात जिल्हा व सत्र न्यायाधिश एन. जी. गिमेकर यांनी सरकारी व महापालिकेच्या वकिलांना सुनावले.

'माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो', असे वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भीडे यांच्याविरूध्द महापालिकेने कोर्टात खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी ७ डिसेंबर रोजी होणार आहे. या खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्टाने भीडे यांना सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. याच प्रक्रियेवर भीडे यांच्यावतीने अॅड. अविनाश भीडे यांनी बोट ठेऊन जिल्हा व सत्र न्यायालयात हरकत घेतली आहे. याबाबत यापूर्वी सुनावणी देखील झाली. त्यात कोर्टाने १ डिसेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. मात्र, आज सुनावणी सुरू होताच सरकारी पक्षाने युक्तीवादाची तयारी पूर्ण झालेली नसून, त्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली. यावर कोर्टाने नाराजी व्यक्त करीत ३ डिसेंबरपर्यंत तयारी करून तुमचे म्हणणे मांडा अन्यथा कोर्टाला आपला निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्तपावन मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चित्तपावन महिला मंडळाचा सहावा वर्धापनदिन गोळे कॉलनीतील काका गद्रे मंगल कार्यालयात शनिवारी उत्साहात पार पडला. नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. जाखडी यांचा अंतराळ क्षेत्रातील प्रवास मैथिली गोखले यांनी मुलाखतीतून उलगडला. 'नासा' या संशोधन केंद्रात काम करताना आलेले अनुभव यावेळी या मुलाखतीतून समोर आला. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण तारांगणामध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचीही माहिती दिली. विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्राविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने तारांगण प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी आधाराश्रम संस्थेचे अध्यक्ष विजय दातार यांना संस्थेसाठी रुपये पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळातील जान्हवी नातू, मंगला जोगळेकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिकस्थळांचे फेरसर्वेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रस्त्यावरील तसेच मोकळ्या भुखंडावरील धार्मिकस्थळांवरील कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर महापालिकेकडून सर्व ५७४ धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेडून समिती नियुक्त केली जाणार असून, या समितीसाठी सोमवारी पालिकेत अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवरील कारवाईला स्थगिती देत, या धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सभागृह नेते दिनकर पाटील यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेवून नव्याने नियोजन करण्याच्या अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व प्रशासन उपायुक्त महेश बच्छाव यांना सुचना दिल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने धार्मिकस्थळांचे सर्वेक्षण केले. त्यासाठी सन २००९ पूर्वीचे व नंतरचे असे दोन भागात वर्गीकरण केले आहे. परंतु, या सर्वेक्षणानंतर धार्मिकस्थळांच्या विश्वस्तांना विश्वासात न घेताच, कारवाई केली. त्यामुळे धार्मिकस्थळांवर कारवाईची वेळ ओढावली आहे. महापालिकेने दुसऱ्या टप्प्यात २००९ पूर्वीची ७२ आणि २००९ नंतरची ५०३ अशा एकूण ५७५ धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली होती. दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विश्वस्तांनी थेट उच्च न्याालयात धाव घेतली. न्यायालयाने या कारवाईला स्थगिती देत, पुन्हा नियमानुसार प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार एक समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीकडून धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण केले जाणार असून, त्यासंदर्भात शनिवारी चर्चा करण्यात आली. आता या समितीत कोण असावे, याबाबत अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक बोलविण्यात आली आहे.

बैठकीनंतर धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण होवून विश्वस्तांना या सर्व ५७५ धार्मिक स्थळांबाबत आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. समितीकडून प्रथम मोकळ्या भुखंडावरील १० टक्‍क्‍यांपुढील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर सर्वेक्षणाला व्यापक प्रसिद्धी देवून हरकती व सुचना मागवून त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, फोर-जी स्पेक्ट्रमचे वाटप करावे यासह विविध मागण्यांसाठी ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएलतर्फे सोमवारपासून (ता. ३) देशव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेकडो बीएसएनएल कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी बीएसएनएल कर्मचाऱ्यांना देय असलेला तिसरा वेतन करार लागू करण्याबाबत, तसेच बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम देण्यासबंधी आश्वासन दिले होते. मात्र, आठ महिने उलटूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम न मिळाल्याने ग्राहकांना अपेक्षित वेगवान इंटरनेट सेवा देता येत नाही. कर्मचाऱ्यांचे हक्क व ग्राहकांना वेगवान फोर-जी सेवा मिळावी, पेन्शन रिव्हिजन, पेन्शन अंशदान मूळ वेतनावर व्हावी यासह विविध मागण्यांसाठी 'बीएसएनएल'´मधील सर्व युनियन अँड असोसिएशनद्वारे देशव्यापी बेमुदत संप पुकारलेला आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा संप १०० टक्के यशस्वी करावा, असे आवाहन मधुकर सांगळे, शशिकांत भदाणे, राजेंद्र लहाने, दिलीप गोडसे, गौरव सोनार, गणेश बोरसे, अनिल आखाडे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झेडपीच्या कामकाजावर सदस्यांकडून संताप व्यक्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या सभेत विषयांवर निर्णयच होत नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. या सभेत स्थायी समितीचे सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी स्थायी समितीत निर्णय होत नसेल तर आम्ही यावे की नाही, असा उद्विग्न सवाल उपस्थित केला. तर बाळासाहेब क्षिरसागर व यतीन कदम या सदस्यांनी अजेंठा एक दिवस अगोदर मिळत असल्याचे सांगत कामकाजावरच प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर या सदस्यांनी घाईघाईने चर्चा नको असे सांगत सभा तहकूबची मागणी केली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सभा तहकूब केली.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी २.३० वाजता स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, समाजकल्याण समितीच्या सभापती सुनीता चारोस्कर, झेडपीचे सीईओ डॉ. नरेश गीतेंसह खातेप्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरुवातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी सभेचे विषय वाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर शासनाकडून प्राप्त झालेले परिपत्रकही विभागावार वाचन करण्यास सुरुवात झाली. पण, डॉ. कुंभार्डे यांनी सभा जर घाईघाईत घेणार असेल तर ती तहकूब करावी, असे सांगितले. नांदुरी येथे असलेल्या महाआरोग्य शिबिराची बैठक असल्यामुळे सीईओंना तेथे जावे लागणार असल्याचे सांगत ही सभा नंतर घेण्याची मागणी करण्यात आली. या सभेला स्थायी समितीच्या आठ सदस्यांपैकी चार सदस्य उपस्थित होते.

अजेंठा दिला बस स्टॅण्डवर

कोणत्याही सभेचा अजेंठा हा सदस्यांना सात दिवस अगोदर मिळायला हवा. पण, या अजेंठा एक दिवस अगोदर मिळाला असल्याचे स्थायी समिती सदस्य बाळासाहेब क्षिरसागर यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी इतिवृत्त मिळत नाही. ठरावाच्या नकला दिल्या जात नसल्याचे सांगितले. यानंतर यतिन कदम यांनी मला तर स्टॅण्डवर अजेंठा घेण्यासाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर याबाबत चौकशी करण्याचे आदेश अध्यक्षांनी देत अजेंठा व इतिवृत्त सदस्यांना देण्याचे आदेश दिले.

स्वतंत्र दिवस द्या

स्थायी समितीची बैठक महत्त्वाची असते. पण, ती दुपारी घेतली जाते. त्यामुळे ती दिवसभर असावी. त्यासाठी सकाळची वेळ नियोजीत करावी, अशी मागणी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आप’ची ‘मिस कॉल’ मोहीम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने मिस कॉल क्रमांक जाहीर करत महाराष्ट्रातील युवकांना जोडण्याची मोहिमेला सुरुवात केली आहे.

'आप'तर्फे पोस्टर्स-बॅनर्स व सोशल मीडियाद्वारे या मोहिमेचा प्रचार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे. या आघाडीमध्ये सामील होण्यासाठी ९९२०५५७५५७ या क्रमांकावर युवकांनी मिस कॉल द्यावा, असे आवाहन या आघाडीचे नाशिकचे अध्यक्ष योगेश कापसे व उपाध्यक्ष स्वप्नील घिया यांनी केले आहे. पक्षाच्या युवा आघाडीने प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी २७ जिल्ह्यांमध्ये युवा आघाडीच्या समित्या घोषित करण्यात आल्या आहेत. विधानसभा आणि बूथ स्तरावरील बांधणीला सुरुवात झाली असून, 'मिस कॉल' मोहिमेद्वारे अधिकाधिक युवकांना या प्रक्रियेमध्ये सामील करून घेण्याचा पक्षाचा मानस आहे. भ्रष्टाचार, जातीवाद व घराणेशाहीला तडा देत युवकांसाठी सक्षम पर्याय म्हणून पुढे येण्यासाठी या मिस कॉल मोहिमेची सुरुवात केली गेल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरामय व्याख्यान

$
0
0

'निरोगी जीवनासाठी व्यायाम आवश्यक'

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दैनंदिन बदलत्या जीवनशैलीचा विपरित परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे अनेक आजारांना मनुष्याला सामोरे जावे लागते, अशावेळी तणावमुक्त व निरोगी आयुष्यासाठी ध्यानधारणा, प्रणायम व नियमित व्यायाम या गोष्टी आवश्यक आहेत, असे प्रतिपादन डॉ. हेमंत ओत्सवाल यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात निरामय आरोग्य या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.

जीवनातील वाढणाऱ्या तणावामुळे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह या आजारांची निर्मिती आपल्या शरीरात होत असते. अशा विविध जीवघेण्या आजारांपासून आपले शरीर व मन दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम व पोषक आहार आवश्यक असल्याचेही डॉ. ओत्सवाल यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सादरीकरणातून आरोग्य विषयक माहिती दिली. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राजाराम माने, अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त रघुनाथ गावडे, दिलीप स्वामी, सुकदेव बनकर, प्रवीण पुरी आदी उपस्थित होते. विभागीय आायुक्त राजाराम माने यांच्या संकल्पनेतून निरामय आरोग्य या विषयावर डॉ. हेमंत ओत्सवाल यांनी व्याख्यान दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय हॉस्पिटलचे प्रश्न दुर्लक्षित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये वर्षाकाठी साडेचार ते पाच हजार छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. याशिवाय ओपीडीसाठी येणाऱ्या पेशंट्सची संख्याही मोठी आहे. संदर्भची वार्षिक उलाढाल ८० ते १०० कोटी रुपयांच्या घरात असताना या हॉस्पिटलबाबत लोकप्रतिनिधींची मात्र उदासिनता आहेत. हॉस्पिटलमधून खासगी हॉस्पिटलमध्ये रेफर केलेल्या पेशंटची संख्या लक्षात घेता हा आकडा आणखी वाढू शकतो.

कॅन्सर, ह्दय रोग, किडनी विकार अशा गंभीर आणि महागड्या आजारांच्या उपचारासाठी गोरगरीबांना सरकारतर्फे कमी खर्चात अथवा मोफत उपचार मिळावे यासाठी संदर्भ सेवा या विभागीय हॉस्पिटलची पायाभरणी तत्कालीन आरोग्य मंत्री दौलतराव आहेर यांनी आपल्या कार्यकाळात केली होती. त्या काळातील अत्यंत महागडी व गोरगरीबांना दुर्लक्ष ठरणारी सर्व यंत्रणा हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आली. आहेरांचे हे स्वप्न पूर्णत्वास गेले. या हॉस्पिटलमध्ये नाशिकसह अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यातील पेशंट येतात. इतकेच नव्हे; तर मराठवाडा विभागातील पेशंटही मोठ्या संख्येने गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी येतात.

सध्या १० वर्षांपूर्वी बसवलेली ही यंत्रणा आता कालौघात जुनी ठरते आहे. कम्प्युटराईज्ड यंत्रणा असल्याने तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हा फरक वर्षागणिक वाढतच जाईल. कोट्यवधी रुपयांची ही यंत्रणा गोरगरीबांना वरदान ठरते. दुर्दैवाने याकडे सर्वच स्तरातून दुर्लक्ष होते आहे. या हॉस्पिटलवर नाशिक व औरंगाबाद विभागातील लाखो पेशंट अवलंबून असताना लोकप्रतिनिधींची मात्र डोळेझाक होते. कधीतरी एखाद्य दुसऱ्या लोकप्रतिनिधीचा फोन कॉल येतो. मात्र, त्यात जवळच्या पेशंटच्या बेड पुरताच विषय मर्यादीत असतो. मध्यतंरी आमदार देवयानी फरांदे यांनी निधी मिळवून दिला खरा पण या निधीचा वापर नवीन इमारतीच्या उभारणीसाठी होणार आहे. आहे त्या सुविधांचा विचार यात झालेला नाही. वास्तविक संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या उपचारापोटी महिन्याकाठी किमान ७० लाखांचे उत्पन्न सरकार दरबारी जमा होते. म्हणजेच वर्षाकाठी हा आकडा ८४ कोटींच्या पुढे सरकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर येथील आरोग्य सुविधा पुरविल्या जात असताना शासनाचे हॉस्पिटलकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसते.

विभागातील सर्वच लोकप्रतिनिधींची हॉस्पिटलबाबत उदासिनता आहेत. यामुळे हॉस्पिटलमध्ये सरळ सरळ मनमानी होत असून, शस्त्रक्रियेतील अनियमितता आणि पेशंटला मिळणाऱ्या उपचारांमध्ये सोयीचे काम होताना दिसते. मूळात कालबाह्य होत असलेली यंत्रणा सक्षम करणे आणि उपचारांच्या नावाखाली निर्माण होणाऱ्या कोट्यवधींच्या काळ्या पैशांना ब्रेक लागणे महत्त्वाचे आहे.

डॉ. आहेर यांची भूमिका महत्त्वाची

संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये आर्थिक कारणांमुळे सुरू असलेली अनागोंदी लपून राहिलेली नाही. यात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच आमदार डॉ. राहुल आहेर यांची भूमिका महत्त्वाची ठरते. डॉ. आहेर नेहमी या हॉस्पिटलच्या कामकाजाशी निगडीत असतात. त्यामुळे डॉ. आहेर यांच्यासह प्रशासनाने गैरप्रकार करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवून गोरगरीबांसाठी आरोग्याचा राजमार्ग ठरणाऱ्या संदर्भ सेवा हॉस्पिटलला अधोगतीपासून वाचवावे, अशी मागणी करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तरच मराठी शाळा टिकतील

$
0
0

साने गुरुजी संस्थेचा

वर्धापनदिन उत्साहात

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

मराठी माध्यमांच्या शाळांकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. शिक्षकांनी आपली भूमिका योग्यरितीने पार पाडल्यास भविष्यात या शाळांचे भवितव्य उज्ज्वल राहील, या शाळांना चालना मिळेल. शासनाचे आजचे शैक्षणिक धोरण मराठी शाळांना मारक असून शाळा टिकवायच्या असतील तर शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण अध्यापन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन न्यू् एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी केले.

नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा ५७ वा वर्धापन दिन के. जे. मेहता हायस्कूलच्या सभागृहात उत्साहात झाला. त्यावेळी वैशंपायन बोलत होते. संस्थेचे सचिव प्रवीण जोशी, अध्यक्ष गणपतराव मुठाळ, खजिनदार मिलिंद शिवप्रसाद पांडे, विश्वस्त अनिल अरिंगळे, प्राचार्या अश्विनी दापोरकर आदी यावेळी उपस्थित होते. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना गौरविण्यात आले. सुरेखा दळवी आणि संदीप लेंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वैशंपायन म्हणाले की, आजच्या काळात शिक्षण संस्था चालवणे अवघड झाले आहे. संस्थेच्या प्रगतीत शिक्षकांबरोबर पालकांची भूमिकाही महत्त्वाची असते. पदाधिकारी आणि शिक्षकांच्या समन्वयातून शिक्षण संस्थेचे कार्य उभे राहते. साने गुरुजी संस्थेला मेहता व केला कुटुंबियांच्या दातृत्वाचा मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे या संस्थेची जडणघडण जोमाने होत आहे. प्रा. मंगेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. साधना धोंगडे यांनी प्रास्तविक केले. डी. बी. वाकचौरे, करुणा आव्हाड, सुधाकर चोपडे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेंट लॉरेन्स’ची अंतिम फेरीत धडक

$
0
0

लोगो

रासबिहारी करंडक क्रिकेट स्पर्धा

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेंट लॉरेन्स स्कूलने रासबिहारी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यांनी उपांत्य फेरीत सेंट लॉरेन्स संघाचा ७१ धावांनी पराभव केला. दुसरी उपांत्य लढत किलबिल स्कूल विरुद्ध न्यू एरा स्कूलमध्ये होणार असून, यातील विजयी संघ सेंट लॉरेन्स स्कूलचा आव्हानवीर असेल.

गोल्फ क्लब मैदानावर झालेल्या ३५ षटकांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट फ्रान्सिस स्कूलने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सेंट लॉरेन्स संघाने ३५ षटकांत ८ बाद १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात १६९ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या सेंट फ्रान्सिस स्कूल संघाची फलंदाजी डळमळीत झाली. सेंट लॉरेन्स संघाच्या गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. त्यामुळे संघ ९५ धावांत गारद झाला. सेंट लॉरेन्स संघाने ७१ धावांनी विजय नोंदवून अंतिम फेरीत नाव निश्चित केले.

सेंट लॉरेन्स स्कूलचा वेदान्त पाटील याने प्रभावी गोंलदाजी करीत ७ षटकांत ४ बळी टिपले. त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला. सिद्धेश मेटकर, सचिन पाटील आणि सतीश हांडोरे पंच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाची ‘नाशिक पेलेटॉन’ स्वबळावर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे ५ व ६ जानेवारीदरम्यान 'नाशिक पेलेटॉन २०१९' ही राष्ट्रीय पातळीवरील सायकल स्पर्धा होणार असून, यंदा ग्रुपऐवजी वैयक्तिक विजेता निवडणार असल्याची माहिती नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, संयोजक विशाल उगले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या सहा वर्षांपासून ही स्पर्धा होत असून, यंदाचे हे सहावे वर्ष आहे. पहिली पेलेटॉन स्पर्धा २०१४ मध्ये झाली.

नाशिक पेलेटॉन या दीर्घ पल्ल्याच्या (१५० किमी) स्पर्धेत जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या अवघड घाटवळणांवरून नाशिक पेलेटॉनचे स्पर्धक मार्गक्रमण करणार आहेत. या वर्षीच्या स्पर्धेत थोडे बदल करण्यात आले असून, १५० किलोमीटरची ही स्पर्धा आतापर्यंत तीन रायडर्सच्या ग्रुपमध्ये होत होती. मात्र, अनेक वेळा उत्तम रायडर्सला चांगले साथीदार मिळत नसल्यामुळे भ्रमनिरास व्हायचा. त्यामुळे यंदा १५० किलोमीटरची पेलेटॉन स्पर्धा सांघिक प्रकारात न होता वैयक्तिक प्रकारात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सायकलिस्टना इतर स्पर्धांत फायदा व्हावा, यासाठी १५ व ५० किलोमीटरच्या स्पर्धांचे वयोगट बदलण्यात आले आहेत. स्पर्धेत एकूण बक्षिसांची रक्कम १५ लाखांपर्यंत आहे. घाटातील अंतर कमीत कमी वेळेत पार करणाऱ्या स्पर्धकाला जसपालसिंग विर्दी घाटाचा राजा स्मृती चषक किताब ६ जानेवारी रोजी स्पर्धा संपल्यानंतर लगेच देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख २ जानेवारी २०१९ पर्यंत आहे. ऑनलाइन अर्जासाठी nashikcyclists.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनने केले आहे.

१५० किमीची पेलेटॉन स्पर्धा

१८ ते ३० वयोगट (महिला व पुरुष)

३१ ते ४० वयोगट (महिला व पुरुष)

४० वर्षांवरील वयोगट (महिला व पुरुष)

स्पर्धेचा मार्ग

सिटी सेंटर मॉल- वाडीवऱ्हे चौक- घोटी फाटा- टोल नाका- भावली डॅम फाटा- कसारा घाट- तेथून परत घाटनदेवी- भावली डॅम- आंबेवाडी गाव- वासाळी फाटा- घोटीकडे पिंपळगाव मोर- घोटी- नाशिक (हॉटेल गेट वे)

५० किलोमीटरची स्पर्धा

(१८ वर्षांवरील सर्व वयोगटांसाठी)

स्पर्धेचा मार्ग

नाशिक- त्र्यंबकेश्वर- नाशिक

१५ किलोमीटर स्प्रिंट पेलेटॉन

१२ ते १४ वयोगट (मुले आणि मुली)

१५ ते १८ वयोगट (मुले आणि मुली)

५ किलोमीटर जॉय राइड

सर्व वयोगटांसाठी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यजमानांचे आव्हान संपुष्टात

$
0
0

राष्ट्रीय फुटसाल स्पर्धा

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फुटसाल असोसिएशन ऑफ नाशिक आणि फुटसाल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे सुरू असलेल्या मिनी गटाच्या राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेत यजमान महाराष्ट्राचे आव्हान तेलंगणा संघाने संपुष्टात आणणले. तेलंगणासह दिल्ली, सीबीएससी, दीव-दमन या संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. दोन्ही उपांत्य सामने २ डिसेंबर रोजी होणार असून, त्यानंतर अंतिम सामना खेळविला जाणार आहे.

पहिल्या उपांत्य सामन्यात दीव- दमन संघाने मुंबईचा ८-० असा धुव्वा उडवला, दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात यजमान महाराष्ट्राला तेलंगणाकडून २-१ असा निसटता पराभव पत्करावा लागला. पहिल्या सत्रात महाराष्ट्राने एक गोल करून आघाडी मिळवली होती. मात्र, दुसऱ्या सत्रात तेलंगणाच्या खेळाडूंनी लागोपाठ दोन गोल करून २-१ अशी आघाडी मिळवली. तेलंगणाची हीच आघाडी यजमानांना महागात पडली. अखेरपर्यंत यजमानांना कोणतीही संधी मिळाली नाही. तिसऱ्या उपउपांत्य सामन्यात दिल्लीने कर्नाटकवर ५-१ असा विजय मिळवत कर्नाटकचे आव्हान सहज परतवून लावत उपांत्य फेरी गाठली. चौथ्या उपउपांत्य सामन्यात सीबीएससी संघाने दादरा-नगरहवेली संघाचे आव्हान ३-० असे मोडीत काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज तोडगा निघणार?

$
0
0

कोतवाल संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

..

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा आणि सहावा वेतन आयोग मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या तेरा दिवसांपासून काम बंद ठेवून धरणे आंदोलन करणाऱ्या राज्यातील कोतवालांच्या मागण्यावर आज, रविवारी (दि.२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठोस निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेतर्फे राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा पदाचा दर्जा देऊन सहावा वेतन आयोग लागू करावा, या मागण्यांसाठी राज्याध्यक्ष गणेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली काम बंद ठेवून येथील विभागीय आयुक्तालयापुढे धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरूच होते. शनिवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या दालनात पुन्हा एकदा कोतवालांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. कोतवालांच्या मागण्यांचा सकारात्मक प्रस्ताव मंत्रालयात सचिवांकडे पाठविल्याची माहिती यावेळी विभागीय आयुक्तांनी दिली. या प्रसंगी छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर, भाजपचे पदाधिकारी सुनील आडके आदींसह संघटनेचे उपाध्यक्ष सुनीत गमरे, माधुरी हंकारे, सरचिटणीस भारत पवार, जयवंत जाधव, राज्य संपर्कप्रमुख बाळू झोरे, नितीन चंदन, विवेक देशमुख, गणेश गोसावी, बाळा भोनकर, राजेंद्र बोदेले, अनंत भोसले आदी उपस्थित होते.

...

समित्यांचे अहवाल परस्परविरोधी

कोतवाल हे महसूल खात्यातील गावपातळीवरील पद आहे. वतनदारी रद्द झाल्यापासून कोतवाल हे वेतनावरील पद तयार करण्यात आले होते. मात्र, आता कोतवालांना मानधन देऊन हे पद अवर्गिकृत असल्याचे शासन सांगते. यासाठी शासनानेच नेमलेल्या विविध समित्यांच्या अहवालाचा आधार शासनाने घेतला. मात्र या समित्यांनी शासनाला खोटे अहवाल देऊन शासनाची दिशाभूल केली असून, काही समित्यांचे अहवाल परस्परविरोधी आहेत. त्यामुळे अशा अहवालांच्या आधारे कोतवालांच्या सेवेबाबत घेतलेले निर्णय अन्यायकारक ठरले असल्याची माहिती शनिवारी कोतवालांच्या राज्य संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. सुरेश माने यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदुरीला विशेष निधी द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी नांदुरी व परिसरातील ग्रामपंचायतींवर उत्पन्न नसताना आर्थिक भार पडत असल्याने सर्व मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी विशेष पॅकेजची मागणी भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे केली आहे. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते.

सप्तशृंगगडावरील यात्रा कालावधीत पार्किंगसह पायी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी पिण्याचे पाणी, रस्ते, शौचालये, सुसज्ज एसटी स्थानक असण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पाण्यासाठी केटीवेअर बंधारे व मूलभूत सुविधांची गरज आहे. त्यासाठी विशेष निधी मंजूर करावा, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

जिल्हा दुष्काळी जाहीर करा

परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील आदिवासी तालुके आताच कोरडेठाक पडले असून, हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त होऊन हानी झाली आहे. शेती, घरदार सोडून आदिवासी बांधव शहरात जात आद्त. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत निर्माण झाल्याने उर्वरित आदिवासी तालुक्यांसह संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करून तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी केली आहे. ते रविवारी नांदुरी येथे आदिवासी, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी पुन्हा करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या दिवशी एकही माघार नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंन्ट बँकेच्या २१ संचालकांच्या पंचवार्षिक निवडणुकीत शनिवारी एकाही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नाही. उमेदवारी अर्ज वैध झाल्याची यादी प्रसिध्द झाल्यानंतर आता माघार घेण्यासाठी १ ते ४ डिसेंबर ही मुदत दिली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी कोण माघार घेतो याबाबत उत्सुकता होती. मात्र वैध २०० उमेदवारांपैकी एकाही उमेदवारांनी माघार घेतली नाही. पण, माघारीसाठी बऱ्याच उमेदवारांनी अर्ज नेल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.

रविवारी सुटी असल्यामुळे आता सोमवार व मंगळवारी माघार घेण्यासाठी गर्दी होणार आहे. त्यानंतर पाच डिसेंबरला अंतिम उमेदवारी यादी व चिन्ह वाटप केले जाणार आहे. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबर रोजी मतदान असून, त्याची तयारी करण्याचे कामही आता सुरू झाले आहे. राज्यभरात या बँकेचे सभासद असून, सुरत व हैद्राबाद येथेही शाखा आहेत. त्यामुळे तिची तयारी आतापासूनच करण्यात येणार आहे.

उमेदवारांचा प्रचार सुरू

'नामको' निवडणुकीत वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रमुख पॅनलच्या उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. तर काही उमेदवारांनी वैयक्तिक संपर्क साधून उमेदवारीची चाचपणी सुरू केली आहे.

पॅनलसाठी बैठका

नामकोच्या निवडणुकीत चार पॅनल निवडणुकीत असणार आहे. पण, या सर्व पॅनलकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे कोणाला पॅनलमध्ये घ्यावे व कोणाला नकार द्यावा, यासाठी बैठका व चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ मातांनाही मिळतोय जगण्याचा आशवाद

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

एचआयव्हीबाधित गर्भवती महिलेकडून तिच्या बाळाला एचआयव्ही संक्रमणाची शक्यता अधिक असली तरी एकात्मिक सल्ला व मार्गदर्शन केंद्रांना (आयसीटीसी) हे संक्रमण रोखण्यात यश येऊ लागले आहे. अचूक तसेच वेळेत निदान आणि त्वरीत उपचारांमुळे एचआयव्हीबाधित महिलाही निरोगी आणि सुदृढ बालकांना जन्म देत असून, हे प्रमाण तब्बल ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे एचआयव्हीग्रस्त मातांनीही आपल्या निरोगी बाळासाठी जगण्याचा आशावाद उमलू लागला आहे.

एचआयव्ही एड्स या आजारावर परिणामकारक औषधे उपलब्ध होऊ लागल्याने एचआयव्हीग्रस्तांचे आयुर्मान वाढू लागले आहे. परंतु, रुग्णाला एचआयव्हीमुक्त करणारे कोणतेही औषध अद्याप विकसित होऊ शकलेले नाही. त्यामुळे एचआयव्हीबाधित व्यक्तीला या आजाराची आयुष्यभराची सोबत होते. गर्भवती माता एचआयव्हीबाधित असेल तर तिच्या होणाऱ्या बाळाला या आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच गर्भवती मातांच्या समुपदेशनासह एचआयव्हीशी संबंधित तपासण्या करवून घेण्यास आरोग्य यंत्रणेच्या एकात्मिक सल्ला व मार्गदर्शन केंद्रांनी प्राधान्य दिले आहे.

गर्भवती महिला सरकारी किंवा खासगी हॉस्पिटल्समध्ये तपासणीसाठी आल्यानंतर त्यांच्या विविध तपासण्या करण्यात येतात. यामध्ये एचआयव्ही तपासणीचाही आग्रह धरला जातो. इतकेच नव्हे तर एचआयव्हीची तपासणी का गरजेची आहे, याबाबत समुपदेशनही करण्यात येते.

२०१४-१५ ते २०१७-१८ या चार वर्षांत हजारो गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३२१ गर्भवती महिलांना एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. एड्समुळे धास्तावलेल्या अशा महिलांना धीर देत त्यांचे समूपदेशन केले जाते. त्यांच्या होणाऱ्या बालकाला एचआयव्ही संसर्गापासून वाचविण्यासाठी तत्काळ एआरटी सेंटरच्या (विषाणू विरोधी उपचार केंद्र) माध्यमातून औषधोपचार सुरू करण्यात येतात. अशा रुग्णांची पूर्वी 'सीडी फोर' तपासणी करून उपचाराची दिशा ठरविली जात असे. परंतु, उपचारांना प्राधान्य असल्याने 'सीडी फोर' तपासणीत वेळ न घालविता तातडीने औषधोपचारांना महत्त्व दिले जाऊ लागले आहेत.

आईकडून बाळामध्ये एचआयव्हीचे संक्रमण थोपविण्यासाठी संबंधित रुग्णामधील व्हायरल लोड कमी करणे आवश्यक असते. त्या पद्धतीच्या औषधोपचारांमुळे व्हायरल लोड कमी होण्यासही मदत होत आहे. औषधांमुळे बाळास एचआयव्ही होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी होते. बाळ १८ महिन्यांचे होईपर्यंत त्यांची नियमित तपासणी केली जाते. त्यामुळे नवजात अर्भकांमध्ये एचआयव्हीचे संक्रमण रोखण्यात यश येऊ लागल्याची माहिती एकात्मिक सल्ला व मार्गदर्शन केंद्रांच्या सूत्रांनी दिली आहे.

प्रत्येक गर्भवती महिलेने एचआयव्ही तपासणीचा आग्रह धरायला हवा. एचआयव्हीची लागण झाली असल्यास एआरटी सेंटरद्वारे अशा महिलांवर तत्काळ औषधोपचार सुरू करण्यात येतात. एकात्मिक सल्ला व मार्गदर्शन केंद्राने अशा संसर्गाचे प्रमाण शुन्यावर आणण्याचे आमचे उद्दिष्ट असून, याकामी गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सहकार्य आवश्यक आहे.

- योगेश परदेशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी एडस निर्मूलन विभाग

वर्ष .................................................................एचआयव्हीबाधित गर्भवती.............................एचआयव्हीग्रस्त अर्भके

२०१४-१५.................................................................८१.................................................................७

२०१५-१६.................................................................९४.................................................................२

२०१६-१७.................................................................६०.................................................................१

२०१७-१८.................................................................८६.................................................................२

एकूण.................................................................३२१.................................................................१२

(क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images