Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

येवल्यात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. ऑनलाइन वृत्त, येवला

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात अन्न, पाण्याच्या शोधात असलेल्या एका हरणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मनमाड-नगर महामार्गावर ही घटना घडली. वाहनाच्या धडकेत ठार झालेले हरिण तीन वर्षांचे होते. वाहनाच्या धडकेनंतर रस्त्याच्याकडेला तडफडत असलेले हे हरिण ग्रामस्थांना दिसले. यानंतर गावकऱ्यांनी हरणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अपघातात ठार झालेले हरिण हे मादी जातीचे होते. ही हरिणी गरोदर होती. त्यामुळे अपघातात एक नव्हे तर दोन मुक्या प्राण्यांचा जीव गेल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

येवला तालुक्यातील अनेक गावं पाणी टंचाईचा सामना करत आहेत. वनक्षेत्रातील हरिण, काळवीट यासारखे वन्यजीव देखील त्याला अपवाद नाहीत. एरवी वनक्षेत्रातील आपल्या नैसर्गिक अधिवासात स्वच्छंदी विहार करणारे हे वन्यजीव आता उन्हाळ्याच्या तडाख्यात सैरभैर झाले आहेत. वनक्षेत्रातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यजीव चारा-पाण्यासाठी आता शेतशिवारातील वाड्यावस्त्यांसह रानोमाळ भटकंती करत आहेत. हरिण व काळविटांचे कळपच्या कळप गेल्या काही दिवसांपासून येवला वनक्षेत्राबाहेरील तालुक्याच्या पूर्व, दक्षिण पट्टयात दिसत आहेत.

नर काळवीटला जीवदान

अपघातात हरणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली असतानाच दुसरीकडे एका विहिरीत नर काळवीट पडल्याची घटना समोर आली. मात्र वनविभागाच्या मदतीने त्याला जीवदान मिळाले. तालुक्यातील चिचोंडी शिवारातील सुभाष गोसावी या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत ४ ते ५ वर्षांचा हा नर काळवीट पडला होता. गोसावी यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने पिंजऱ्याद्वारे काळवीटाला विहिरीतून बाहेर काढले आणि नंतर त्याला सोडून दिले.
68564156

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी रात्रीचे जागरण

$
0
0

दीड वाजता कमी दाबाने पुरवठा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील गोरेवाडी भागातील विविध उपनगरांत सकाळी आणि सायंकाळी होणारा पाणीपुरवठा काही दिवसांपासून बंद झाल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या भागात चक्क रात्री दीड-दोन वाजेच्या दरम्यान आठवड्यातून तीन ते चार दिवस अत्यंत कमी दाबाने पुरवठा होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

प्रभाग क्रमांक १९ मधील गोरेवाडी, नाशिककर मळा, जुना ओढा रोड, खंडू गायकवाड मळा य मोठ्या परिसरात काही दिवसांपासून सकाळ आणि सायंकाळी नियमित पाणी पुरवठ्याऐवजी रात्री दीड-दोन वाजेच्या दरम्यान पुरवठा होत आहे. तो अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. कधी कधी तर रात्रीही पाणी पुरवठा होत नाही. परिणामी या भागातील उपनगरांतील नागरिकांवर पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील खर्जुल मळ्यातही कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने या भागातही पाणी टंचाई निर्माण झालेली आहे.

जीर्ण जलवाहिनीचा फटका

नाशिकरोड जलकुंभापासून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ब्रिटिशकालीन असून ही जलवाहिनी सध्या अत्यंत जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी या जलवाहिनीला गळती सुरू आहे. याशिवाय ही जलवाहिनी गंजल्याने व्यास घटल्याने कमी क्षमतेने पाणी होत आहे. पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेत घट आल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. जलवाहिनी बदलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांकडे केली. मात्र, जनतेच्या या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

"गोरेवाडी भागात काही वर्षांपासून कमी दाबाने आणि अवेळी पाणी पुरवठा होतो. या भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने ती बदलण्याची मागणी करूनही स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केले. परिणामी स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

- अनिल बोकील, स्थानिक नागरिक

दारणा नदीचे रोटेशन बंद झाल्याने चेहेडी पंपिंग स्टेशन येथील बंधाऱ्यातील पाणीसाठा घटला आहे. त्याचा परिणाम सध्या येथून नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. चेहेडी पंपिंग स्टेशन बंधाऱ्यातून पाणी उचलण्यासाठी लवकरच आणखी एक पंप सुरू केला जाणार आहे.

- अविनाश भोये,

उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईव्हीएमच्या क्रमबदलीकरणाला सुरुवात

$
0
0

फोटो : सतीश काळे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध ठिकाणांहून जिल्ह्याला प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या पहिली क्रमबदलीकरण (फर्स्ट रँडमायझेशन- यादृच्छिकीकरण प्रक्रिया) प्रक्रिया जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळात बुधवारी सुरू करण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ही प्रक्रिया समजून घेतली. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन व व्हीव्हीपॅट यंत्राबाबतच्या शंकांचे निरसन करून घ्यावे, तसेच संपूर्ण मतदानप्रक्रिया समजून घ्यावी, असे आवाहन या वेळी मांढरे यांनी केले.

क्रमबदलीकरण प्रक्रियेला सकाळी सव्वादहाला सुरुवात झाली. या वेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, मतदान यंत्र व्यवस्थापन समितीच्या नोडल अधिकारी सरिता नरके, श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार प्रशांत पाटील, राजश्री अहिरराव, नायब तहसिलदार अमित पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संगणक प्रणालीच्या साह्याने क्रमबदलीकरण प्रक्रियेची पहिली फेरी कशारीतीने पूर्ण होईल, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वांना माहिती दिली. तत्पूर्वी आनंदकर यांनी या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. क्रमबदलीकरण प्रक्रियेंतर्गत मतदारसंघनिहाय यंत्रांचे वाटप होणार आहे. व्हीव्हीपॅट यंत्रांची वाहतूक करताना ती अत्यंत काळजीपूर्वक हाताळावीत, असे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात आले. मतदान केंद्रांपर्यंत व्हीव्हीपॅट मशीन नेताना ते ट्रान्स्पोर्ट मोडमध्ये असणे गरजेचे असल्याच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. संगणकप्रणालीद्वारे प्रथम व द्वितीय क्रमबदलीची प्रक्रिया कशापद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे, याची माहिती नरके यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दिली. विधानसभा मतदारसंघनिहाय १५ मतदारसंघांमध्ये ४,७२० मतदान केंद्रांना प्रत्येकी ५,५१३ बॅलेट व कंट्रोल युनिट आणि ५,९६९ व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आले.

ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी भाजपतर्फे बाळासाहेब पाटील, प्रकाश चकोर, उखाजी चौधरी, मनसेचे कार्यालयीन अध्यक्ष मनोज कोकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे सुनील आव्हाड, रामप्रसाद कातकाडे, शिवसेनेचे नाना काळे, संजय करंजकर, बहुजन समाज पक्षाचे अरुण काळे उपस्थित होते. मात्र, तरीही राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या सरमिसळ प्रक्रियेकडे पाठ फिरविली.

तीन दिवस चालणार क्रमबदल प्रक्रिया

विधानसभा मतदारसंघनिहाय बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रे नेमून देण्याची कार्यवाही पहिल्या क्रमबदल प्रक्रियेत सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया तीन दिवस सुरू राहील. ​​दुसऱ्या क्रमबदल प्रक्रियेत विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय बॅलट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रे नेमून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ही कार्यवाही १४ एप्रिलपूर्वी करावी लागणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील किमान ५० प्रतिनिधी अंबड वेअर हाऊसमध्ये उपस्थित राहतील. या सर्वांच्या चहापानासह जेवणाची चांगली व्यवस्था करा, असे निर्देश मांढरे यांनी दिले. याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक सुविधा आणि रुग्णवाहिकाही येथे उपलब्ध करून द्या, असे निर्देश निवडणूक उपजिल्हाधिकारी आनंदकर यांना दिले.

कोट

कोणते ईव्हीएम मशिन कोणत्या मतदारसंघात जाईल, याचे नियंत्रण कोणाच्याही हाती नाही. एखाद्या उमेदवाराला फायदा होईल, अशा पद्धतीने ईव्हीएममध्ये सेटिंग होण्याची सूतराम शक्यता नाही. दहा हजार प्राप्त मशिनपैकी कोणते मशिन प्रत्यक्षात वापरले जाणार हेच अद्याप निश्चित नाही. एडिटिंगची सुविधा नसल्याने सर्व्हरकडून प्राप्त झालेल्या यादीमध्ये बदल करणे हीदेखील केवळ अशक्य गोष्ट आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये, इतकेच नव्हे तर तेथील कोणत्या मतदान केंद्रावर क्रमबदलीकरण पद्धतीने निवडलेले मशिनच गेले का, हेदेखील पक्षप्रतिनिधी तपासू शकतील.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमान कार्यस्थळी अवतरले रिफ्लेक्टर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर एमआयडीसी परिसरात उभारल्या जात असलेल्या स्वागत कमानीच्या कामाची माहिती व्हावी यासाठी अखेर रिफ्लेक्टर लावण्यात आले आहे.

स्वागत कमानीच्या पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम ठेकेदाराने हाती घेतले आहे. परंतु, यात कमानीबाबत यंत्रणा अयशस्वी असल्याचे वृत्त 'मटा'ने दिले होते. 'मटा'च्या या वृत्ताची दखल घेत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सुरक्षा ठेवण्याबाबत आदेश नुकतेच दिले. कमानीच्या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराने रात्रीच्या वेळी वाहनांना काम सुरू असल्याची माहिती व्हावी, यासाठी रिफ्लेटकर लावण्यात आले आहे. दिवसा कमानीचे काम सुरू असल्याचे वाहनचालकांना कळत असले, तरी रात्री मात्र त्यांची तारांबळ उडत होती. ठेकेदाराकडून एकाबाजूने सुरक्षेसाठी रिफ्लेक्टर लावले आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूने किमान एकेरी वाहतूक सुरू असल्याचे फलक लावावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रव्यवहारात अडकला स्थायीचा निर्णय

$
0
0

निवडणूक शाखेकडे पुन्हा पालिका पत्रव्यवहार करणार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा बोलविण्याची परवानगी मागणाऱ्या महापालिका प्रशासनाला जिल्हा निवडणूक शाखेच्या आचारसंहिता कक्षाने सदस्य नियुक्तीबाबत स्पष्ट उत्तर न दिल्याने नगरसचिव विभागाकडून पुन्हा निवडणूक शाखेशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. स्थायी समिती सदस्यपद हे लाभाचे पद असल्याने नियुक्तीत वाद ओढावू नये, यासाठी निवडणूक शाखेकडून पुन्हा स्वयंस्पष्ट अहवाल मागविला जाणार आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे हे आज (दि. २८) सुटीवरून परत आल्यानंतर त्यांच्या स्वाक्षरीने पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले जाणार आहे.

भाजप नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे भाजपची सदस्यसंख्या १ ने कमी झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीवर सदस्यत्वाचे गुणोत्तर प्रमाणदेखील बदलले असून, नव्या प्रमाणानुसार शिवसेनेचा एक सदस्य स्थायीवर जाणार आहे. चारऐवजी पाच सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने विभागीय आयुक्तांकडे, तर त्यांनी महासभेच्या कोर्टात चेंडू ढकलला होता. सदस्य नियुक्तीचा निर्णय आता महासभेवर घ्यायचा असल्याने आणि सध्या आचारसंहिता सुरू असल्याने नगरसचिव विभागाने जिल्हा निवडणूक शाखेतील आचारसंहिता कक्षाशी पत्रव्यवहार करीत विशेष महासभा बोलविण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र आदर्शआचारसंहिता काळात स्थायी सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा घ्यावी की नाही, याबाबत या पत्रात थेट मार्गदर्शन न करता आचारसंहितेबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देर्शित केलेल्या सूचनांमधील प्रश्न क्रमांक २७ मधील उत्तरानुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे नमूद केले होते. यासोबत आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सुनावल्याने पालिका गोंधळात पडली होती. त्यामुळे नगरसचिवांनी आता हे प्रकरण अंगावर येऊ नये, यासाठी आस्ते कदम भूमिका घेतली आहे. आयुक्त सुटीवरून परत आल्यावर पुन्हा निवडणूक शाखेकडून स्वयंस्पष्ट अहवाल मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सदस्य नियुक्तीवरून पत्रव्यवहाराचा खेळ रंगून नियुक्ती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

...

तर, न्यायालयात वाद

बहुमत टिकवण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असून, आपलाच एक सदस्य स्थायीवर नियुक्त करणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून पु्न्हा न्यायालयात धाव घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यातच स्थायी समितीवरील सदस्य हे लाभाचे पद आहे. त्यामुळे त्याची नियुक्ती आचारसंहितेच्या रडारवर येऊ नये, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नियुक्ती नाही झाली तरी चालेल, परंतु वाद नको अशी भूमिका घेतल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसायात काळानुरुप बदल हवाच

$
0
0

व्यावसायिक चकोर गांधींचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदलत्या काळानुसार ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. ऑनलाइन व्यवहारांमुळे कॅशलेस व्यवहारास ग्राहक पसंती देत आहे. ही बाब व्यावयासिकांनी देखील हेरायला हवी. काळानुरुप प्रत्येक गोष्टीत बदल होतात. तसेच व्यवसायातही बदल हवाच, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय व्यावयासिक चकोर गांधी यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या नाशिक शाखेचा ४६ व्या वर्धापन दिन धनदाई लॉन्स येथे झाला. त्यावेळी गांधी यांनी 'सावधान धंदा बदलतो आहे' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उद्योजक राजेंद्र मेहता, संजय देवरे, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित कामत, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, ललित गांधी, उमेश दाशरथी, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले होते. वर्धापन दिन सोहळ्यात चेंबरच्या कार्याचा आढावा वाचण्यात आला. डॉ. मिथिला कापडणीस आणि सुरेश चावला यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता फाल्गुने यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकारीणी सदस्य अंजू सिंघल, स्वप्नील जैन, भावेश मानेक आदींनी परिश्रम घेतले.

... तर उद्योजकांनाही फायदा

उद्योजक राजेंद्र मेहता म्हणाले, की उद्योगातील नव्या तंत्रज्ञानानुसार कंपन्यांमध्ये उच्च शिक्षितांची संख्या वाढायला हवी. त्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यायला हवा. कंपनीतील कामगारांचा कौशल्य विकास व्हावा म्हणून उद्योजकांनी कार्यशाळा घ्याव्यात. प्रगत तंत्रज्ञानानुसार उद्योजकांनीही कार्यात बदल केल्यास फायदा नक्की होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकीचे बळ, मिळते फळ!

$
0
0

प्रवीण बिडवे

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

'ऐसे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ' या उक्तीचा प्रत्यय दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावात येतो. ग्रामस्थांचा दृढनिश्चयी बाणा अन् एकात्मतेमुळे या गावाने विकासाचे आयाम बदलले आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छतेचे अत्यंत प्रतिष्ठेचे नाशिक विभागाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक या गावाने अलीकडेच पटकावले. राज्यस्तरावरील पहिल्या पारितोषिकावर आपलीच मोहोर उमटविण्यासाठी हे गाव सिद्ध झाले आहे.

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड हे अवघ्या ४५० उंबऱ्यांचे गाव. विकासासाठीचे झपाटलेपण येथे पहावयास मिळते. विकास हा एकट्याने ओढावयाचा गाडा नाही. ती अंगणवाडीत जाणाऱ्या बालकापासून जख्खड आजोबांपर्यंत सर्वांचीच जबाबदारी आहे. गावातील सर्वच्या सर्व २,८५० ग्रामस्थ ही जबाबदारी पार पाडतात. म्हणूनच उत्तर महाराष्ट्रातील ६ हजार ६९६ गावांमधून अवनखेड या गावाला गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे पहिले १० लाखांचे पारितोषिक मिळाले. आता राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी १२ गावांमध्ये अवनखेडनेही दंड थोपटले असून, राज्याचे पहिले पारितोषिक मिळविण्याचा संकल्प सोडला आहे.

ग्राम स्वच्छता अभियान कशासाठी

ग्रामीण जनतेचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनस्तर उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग वाढावा, ग्रामीण जनतेला स्वच्छतेची सवय लागावी त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेतली जाते.

नाशिक विभागातील जिल्हानिहाय गावे

जिल्हा गावांची संख्या

नाशिक १९६०

जळगाव १५१३

अहमदनगर १६०२

नंदुरबार ९४३

धुळे ६७८

एकूण ६६९६

जिल्हास्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायती विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र असतात. त्यानुसार नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत एकूण १० ग्रामपंचायती विभागस्तरावर स्पर्धेसाठी पात्र होत्या.

जिल्हा ग्रामपंचायतीचे नाव तालुका

नाशिक अवनखेड दिंडोरी

नाशिक राजदेरवाडी चांदवड

धुळे अजंदे बु शिरपूर

धुळे परसामळ शिंदखेडा

नंदुरबार वाटवी नवापूर

नंदुरबार राजविहीर तळोदा

जळगाव मेहेरगाव अमळनेर

जळगाव सुसरी भुसावळ

अहमदनगर लोणी बु राहाता

अहमदनगर वडनेर बु पारनेर

अशी होती १०० गुणांची परीक्षा

विषय गुण

शौचालय व्यवस्थापन ४०

पाणीगुणवत्ता २०

सांडपाणी व्यवस्थापन १०

लोकसहभाग १०

घनकचरा व्यवस्थापन ०५

घर/गाव परिसर स्वच्छता ०५

वैयक्तिक स्वच्छता ०५

स्मार्ट व्हीलेज संकल्पनेनुसार उपलब्धी ०५

एकूण १००

स्वच्छतेसाठी नेमणूक

जबाबदारी सोपविली की, कामे व्यवस्थित होतात, असा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा अनुभव आहे. गावातील त्या-त्या वस्तीवर स्वच्छता राखण्याची जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. त्या-त्या भागातील ग्रामपंचायत सदस्यांनी परिसरात आठ ते दहा जणांची समिती स्थापन केली आहे. आठवड्यात दोन दिवस निश्चित करण्यात आले असून, त्या दिवशी न सांगता प्रत्येकजण आपआपली जबाबदारी पार पाडतो.

शिवारही स्वच्छ

गावाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला आठ किलोमीटपर्यंत शिवार पसरले आहे. गावाचा केवळ दर्शनी भाग स्वच्छ ठेऊन उपयोग नाही. ग्रामस्थ गावापासून दूर मळ्यामध्ये राहात असतील तर तेथेही स्वच्छता नांदली पाहिजे याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. गावातील शेतकरी बांधव प्राधान्याने द्राक्ष आणि उसाचे पिक घेतात. त्यांच्या शिवारापर्यंत वायफाय सुविधा पुरविण्यात आली आहे.

पंतप्रधानांकडूनही अवनखेडचे कौतुक

गाव हागणदारीमुक्त, तंटामुक्त आहे. येथील कचराही नैसर्गिक साधनसंपत्ती मानून त्याचा गांडूळखत निर्मितीसाठी उपयोग केला जातो. त्याकरिता तसे युनिट गावात साकारण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून जख्खड आजोबांपर्यंत सारेच स्वच्छतेचे पुजारी आहेत. गावात वायफाय सुविधा, अत्याधुनिक स्वरूपाचे टॉयलेट्स, शालेय विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन आणि डिस्पोजल मशीन्स, शुद्ध पाण्यासाठी आरो यंत्रणा बसविण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या भाषणातून अवनखेडचा उल्लेख करून या ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.

आयएसओ मानांकन

आधारकार्ड ही अनिवार्य बाब झाल्याने गावातील सर्व ग्रामस्थांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. अंगणवाडी, प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे दिवे सौरउर्जेवर चालतात. गावात स्वामी पदमानंद सरस्वती महाराज सभागृहाचे नूतनीकरण सुरू आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गावात तंटे नाहीत अन् अतिक्रमणही नाही. सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोष खड्डे, परसबाग, बंदिस्त गटारे यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने मदत घेतली जाते.

स्वच्छता राहिली तर रोगराई पसरत नाही. त्यामुळे ग्रामस्थ स्वच्छतेला महत्त्व देतात. सर्वजण एकोप्याने राहतात म्हणूनच गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. गवत वाढू न देणे, रस्ते व त्यालगतचा परिसर स्वच्छ ठेवणे हे काम प्रत्येकजण आपली जबाबदारी समजून करतो. स्वच्छतेवर नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर समितीही काम करते.

- भिका शिंदे, ग्रामस्थ

अंगणवाडीत ४० बालके येतात. ते स्वच्छ व नीट नेटकी असावीत याकडे आमचा कटाक्ष असतो. कपडे अस्वच्छ असतील तर पालकांना बोलावून समजावून सांगितले जाते. साबणाने हात स्वच्छ धुणे, केस अधिक वाढू न देणे आणि डब्यामध्ये खाद्यपदार्थ देतानाही योग्य काळजी घेण्याबाबत बालके आणि पालकांनाही मार्गदर्शन केले जाते. बालकांची नखे वाढली असतील तर ती अंगणवाडीतही काढली जातात.

- जयश्री पिंगळ (अंगणवाडी सेविका)

चॉकलेटचे रॅपर देखील डस्टबीनमध्ये टाकण्याची सवय शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बाणविली आहे. शाळेतील वर्गांमध्ये नेलकटर ठेवले आहेत. पसायदानानंतर वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांची नखे तपासतात. ती वाढली असतील तर कमी करण्याबाबत सूचना देतात. गुरूवारी शाळेतच नखे काढली जातात. केस वाढलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी वर्गामध्ये उभे केले जाते. केस कमी करून येण्याच्या सूचना त्यांना दिल्या जातात.

- बाळूकाका शेवाळे, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय, अवनखेड

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार मिळणे हे अवनखेड ग्रामस्थांचे यश आहे. कोणत्याही चांगल्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामस्थांनी प्रत्येक वेळी हिरीरीने हा सहभाग दिला. राज्य स्तरावरील स्पर्धेत अवनखेडसह १२ गावांचा समावेश आहे. राज्य स्तरावरील समितीने अलीकडेच गावाची पाहणी केली असून, ग्राम स्वच्छतेचे राज्य स्तरावरील पहिले पारितोषिकही अवनखेडलाच मिळेल हा विश्वास आहे.

- नरेंद्र जाधव, सरपंच अवनखेड

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागस्तरीय समिती

राजाराम माने, विभागीय आयुक्त - अध्यक्ष

सुदर्शन कालिंके, मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण - सदस्य

शिवाजी दहीते, अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे - सदस्य

डॉ. किरण मोघे - उपसंचालक माहिती व जनसंपर्क - सदस्य

प्रतिभा संगमनेरे - उपायुक्त विकास - सदस्य सचिव

स्वागत अन् बँडबाजाला नकार

गावाची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या सरकारी समितीचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत केले जाते. या स्वागताआड समितीला खूश करण्याचा प्रयत्न अधिक असतो हे नव्याने सांगायला नको. परंतु, विभागीय स्तरावर गावांची पाहणी करणाऱ्या समितीने स्वागत आणि बँडबाजाला स्पष्ट शब्दांत नकार दिला. सर्व औपचारिकतांना फाटा देऊन गावाच्या पाहणीला महत्त्व दिले. समितीमधील काही सदस्यांनी गावाचे डॉक्युमेंटशन तपासले तर काहींनी थेट ग्रामस्थांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. खरोखरच लोकसहभाग आहे का हे तपासण्यासाठी ग्रामस्थांना अनपेक्षित प्रश्न विचारण्यात आले. स्पर्धेत सहभागी काही गावांमध्ये समितीला शौचालयांचा वापर चारा साठवणुकीसाठी होत असल्याचे आढळले, तर काही गावांचा दर्शनी भाग लख्ख असला तरी सांडपाणी दूर कोठे शोष खड्ड्यात न सोडता जलाशयात सोडल्याचे आढळून आले. अशी गावे स्पर्धेतून बाद झाली. घनकचऱ्याचे काय करता? असे प्रश्न महिलांना तर नखे कोणत्या दिवशी कापतात असा प्रश्न कोणत्याही विद्यार्थ्याला विचारले गेले. केवल डॉक्युमेंटेशनवर विश्वास ठेऊन गुण न देता प्रत्यक्ष पाहणी, संवाद आणि क्रॉस व्हेरिफिकेशनला महत्त्व देण्यात आले.

गावाने काय केले?

घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत प्रकल्प निर्मिती

बंदिस्त गटारांची निर्मिती

सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी शोषखड्डे

परसबाग निर्मिती

प्रत्येक घरी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी शौचालये

नदीकाठालगत कचरा टाकू नये याकरिता जॉगिंग ट्रॅक निर्मिती

जनावरांच्या मलमूत्राचेही व्यवस्थापन

विद्यार्थ्यांची नखे व केस कापण्याबाबत पाठपुरावा

जलजन्य आजार पसरू नयेत याकरिता टीसीएलचा वापर

शाळेत बसविले सॅनिटरी नॅपकीन व डिस्पोजल मशिन

वैयक्तिक स्वच्छता आणि घर स्वच्छतेलाही प्राधान्य

गावात १०० टक्के आधारकार्डधारक

गावकरी देतात श्रमदानाला महत्त्व

स्मशानभूमी परिसरात हिरवाई

सौर उर्जेवर चालतात सार्वजनिक दिवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीचा शॉक

$
0
0

ऐन उन्हाळ्यात जादा आकारणी; एक एप्रिलपासून अंमलबजावणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीची दरवाढ १ एप्रिलपासून लागू होणार असल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याविरोधात वीज ग्राहक संघटनाही आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. ऐन निवडणुकीत ही दरवाढ लागू होणार असल्याने विरोधी पक्ष सुद्धा याला प्रचाराचा मुद्दा करणार आहे. या दरवाढीला सर्वच क्षेत्रातातून प्रचंड विरोध असून त्यात सरकारला लक्ष्य केले जात आहे.

वीज दरवाढ सरासरी ६ टक्के असल्याने वीज ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात आर्थिक चटकाही सहन करावा लागणार आहे. राज्यभर ही दरवाढ होणार आहे. जिल्हाभरात १४ लाख ७५ हजार १६३ वीज ग्राहक आहेत. वीज नियामक आयोगाने १२ सप्टेंबर २०१८ रोजी या दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यानंतर ही दरवाढ आता अंमलात येणार आहे. या दरवाढीतून वीज वितरण कंपनीला ८२६८ कोटी रुपये मिळणार असून त्याची झळ मात्र ग्राहकांच्या खिशांना बसणार आहे.

अशी आहे दरवाढ

महावितरणाच्या ० ते १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना वीजदर ५.३० रुपये प्रति युनिट होता. आता हा दर १६ पैशांनी महागणार असून व हे दर ५ रुपये ४६ पैसे होणार आहे. १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे दर हे २४ पैशांनी महागणार आहे. ५०० युनिटपर्यंत वीजवापर करणाऱ्यांना हे दर १५ पैशांनी महागणार आहे. तसेच स्थिर दर आकारातही १० रुपये दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ८० रुपयाचे हे दर ९० रुपये होणार आहे.

असे आहे जिल्ह्यातील वीज ग्राहक

वापर मालेगाव सर्कल नाशिक सर्कल

घरगुती २६२६६३ ७३६७८४

व्यावसायिक २२८०४ ८८३५९

औद्योगिक ४१८६ ९९०५

कृषी १४७१३९ १७४३१०

सार्वजनिक पाणीपुरवठा ६०४ ११३८

पथदीप १४७१ ३६४३

पॉवरलूम १२५७१ ९

इतर ३५०३ ६०७४

एकूण ४५४९४१ १०२०२२२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षाचालकाने केले साडेपाच तोळे सोने परत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

वणी (ता. दिंडोरी) येथील एक कुटुंब सिडकोत येत असताना त्यांची बॅग रिक्षात राहिली होती. त्या बॅगेत साडेपाच तोळे सोने होते. ही बॅग रिक्षाचालकाने अंबड पोलिसांच्या माध्यमातून बॅगमालकाला परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल रिक्षाचालकाचा सत्कार करण्यात आला.

प्रकाश मुरलीधर सोनार (रा. वणी) हे त्यांच्या पत्नीसह नाशिकला आले. सोनार कुटुंबीय पवननगरपर्यंत एमएच १५ एफयू ०३३७ या रिक्षातून आले. रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षाचालक वाल्मीक आत्माराम गायकवाड यांच्या लक्षात आले की, प्रवाशांची बॅग रिक्षातच राहिली आहे. त्याने तातडीने अंबड पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी बॅगेत असलेल्या कागदपत्रांवरून बॅगमालकाचा शोध घेतला. पोलिसांनी सोनार यांना पोलिस ठाण्यात बोलावून बॅग त्यांच्या ताब्यात दिली. यावेळी या बॅगेत सुमारे साडेपाच तोळे सोन्याचे दागिने व कपडे असल्याचे दिसून आले. मात्र रिक्षाचालकाने कोणत्याही प्रकारे स्वार्थ न ठेवता ही बॅग परत केल्याने पोलिसांसह सर्वांनीच त्याचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हाती येणार स्मार्टफोन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंगणवाडीमधील कामकाज १ मेपासून पेपरलेस होणार असून येथे आता रजिस्टरऐवजी मोबाइल अ‍ॅपच्या वापर केला जाणार आहे. यासाठी या कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोनही दिले जाणार आहे. त्यामध्येच लसीकरण व गृहभेटीच्या दैनंदिन नोंदी व बालकांच्या दैनंदिन नोंदी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे रजिस्टरवरील दैनंदिन नोंदीचे काम संपुष्टात येणार आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने विकसित केलेल्या मोबाइल ॲपचा त्यासाठी वापर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात सर्व स्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम स्मार्ट होणार आहे. या स्मार्ट फोनमधून सर्व माहिती आणि दैनंदिन अहवाल ऑनलइन भरता येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांनी बुधवारी कार्यशाळा घेतली. यात कुटुंबांची सर्व माहिती अद्यावत करून मोबाइल ॲपबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाभरात मोबाइल अॅपचा प्रभावीपणे वापर करून जबाबदारीने काम करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी यावेळी दिले. येत्या आठवडाभरात सर्व मोबाइल फोन अंगणवाडी सेविकांना उपलब्ध होणार असून त्यानंतर पुन्हा २ एप्रिल ते ११ एप्रिल या काळात सरकारकडून याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली. कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका, पर्यवेक्षिका आदी उपस्थित होते.

कोणते काम करणे शक्य?

अंगणवाडीत पूरक पोषण आहार, औषधी वाटप, बालकांचे वेळोवेळी वजन घेणे गरोदर माता, बालकांचे वजन, लसिकरण यासह इतर बाबींची कामे असतात. या सर्व कामांचा अहवाल अंगणवाडी सेविकांना केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागत असतो. तो आता स्मार्ट फोनद्वारे देता येणे शक्य होणार आहे.

वेळेची बचत

दुर्गम भागात रस्त्यांची व वाहनांची कमतरता लक्षात घेता असे अहवाल वेळेत सादर करण्याची मोठी कसरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावी लागते. मात्र, आता या स्मार्ट फोन आणि मोबाइल अॅपमुळे वेळेत बचत होणार असून सदरची माहिती तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत बघता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडमध्ये मंगळवारी (दि. २६) विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन जणांचा हृदयविकाराने तर एकाची प्रकृती अचानक बिघडल्याने मृत्यू झाला. एका अनोळखी इसमाचा मृतदेह सुभाषरोडला आढळून आला असून त्याची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. याशिवाय अन्य एका घटनेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत विवाहितेचा अंत झाला.

पांडुरंग माधवराव भावसार (वय ६८, रा. माळी कॉलनी, जेलरोड), बाळू शामराव बेलसरे (वय ७१, रा. गोरेवाडी, जेलरोड) या दोन नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला. त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रकृती अचानक बिघडल्याने देवराम कारभारी पवार (वय ७५, रा. शिंदेगाव) यांचाही रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच सामनगाव रोडवरील जयप्रकाशनगरमधील रहिवाशी पूजा अनिकेत साठे (वय २१) या विवाहितेने घरात सोमवारी (दि. २५) दुपारी बारा वाजेच्या दरम्यान अंगावर स्वतः रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात ती शंभर टक्के भाजली. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू असतांना पूजाचा मंगळवारी सकाळी सहा वाजता मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतभेद विसरून कामाला लागा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

युतीच्या नेत्यांमधील दुरावा कमी करण्यासाठी बुधवारी रात्री पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चिंतन बैठक झाली. यात महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकणे गरजेचे असल्याचे सांगत, हेवेदावे आणि मतभेद विसरून उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागा, असे आदेश दिले.

गेली साडेचार वर्षे एकमेकांना लाखोल्या वाहणाऱ्या शिवसेना आणि भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी युती केली आहे. परंतु, वरिष्ठ नेत्यांनी केलेली युती स्थानिक नेत्यांच्या पचनी पडलेली नाही. शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये अद्याप दुरावा आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकदा मनोमिलन सोहळा पार पडला असला तरी, नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजप अंतर्गतच उमेदवारांवरून मोठी नाराजी आहे. शिवसेनेचा एक मोठा गट गोडसेंच्या विरोधात आहे, तर भाजपच्या माणिकराव कोकाटेंनी बंड पुकारले आहे. दिंडोरीतही भाजपच्या भारती पवारांविरोधात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे युतीच्या नेत्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाथर्डी फाट्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये युतीच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीला ग्रामविकास राज्य मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसेंसह जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्याह युतीचे आमदार उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी मतदारसंघ निहाय उमेदवारांच्या स्थितीचा आढावा घेत, प्रचाराची रणनीती आखली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तूल, काडतुसे बाळगणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर बसस्थानक परिसरात पिस्तूल, मॅगझिन व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी आलेल्या एका संशयिताला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

अशोक बाबुराव खुळे (वय ४७, रा. खडकपुरा, सिन्नर शहर) असे संशयिताचे नाव आहे. तो तालुक्यातील वडांगळीचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर अहमदनगर जिल्ह्यातील लोणी, मुंबईतील घाटकोपर इतकेच नव्हे, तर आंध्र प्रदेशातही एन. डी. पी. एस कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक अशोक करपे, उपनिरीक्षक संदीप कहाळे, हवालदार प्रकाश चव्हाणके, दिलीप घुले, प्रीतम लोखंडे, नीलेश कातकाडे संदीप लगड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावांच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक वादातून दोघा जावांवर चाकू हल्ला करून त्यांचा निर्घृण खून करणाऱ्या सिडकोतील एकास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी जन्मठेप आणि तेरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सिडकोतील शिवाजी चौक परिसरात ६ सप्टेंबर २०१३ रोजी ही घटना घडली होती. नितीन सुभाष पवार (वय २५, रा. सूर्यनारायण चौक, पवननगर, सिडको) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत मेघा राजेश नवलाख व ऋतुजा नवलाख (रा. दोघी शिवाजी चौक, सिडको) यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला होता. आरोपी पवार हा मेघा नवलाख यांचा चुलत भाऊ असून, त्यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीतून वाद होता. मेघा यांच्या घरी जाऊन त्याने चाकू हल्ला केला. त्यांची जाव ऋुतुजा नवलाख मदतीला धावून आल्या. त्यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आल्याने त्यादेखील गंभीर जखमी झाल्या. दोघींना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी पवार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, अ‍ॅड. व्ही. एस. तळेकर यांनी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. न्यायालयाने साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी पवार याला जन्मठेप व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदन झाडे चोरणारी टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिडके कॉलनी परिसरातील फार्म हाऊसमधून चंदनाची झाडे तोडून नेणाऱ्या व त्यांना हटकणाऱ्या सुरक्षारक्षकास मारहाण करणाऱ्या टोळीला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. टोळीतील सर्व संशयित बेलापूर (जि. अहमदनगर) येथील असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

संजय मानिक जाधव (वय २२, रा. दत्त मंदिरजवळ, अंबड), विजय शंकर गायकवाड (वय २२, रा. पपया नर्सरीजवळ, सातपूर रोड), रामा विलास कोळी (वय ४०, रा. दत्तमंदिर जवळ, अबंड लिंक रोड), लक्ष्मण तात्याबा पवार (वय २२, रा. शेणिगाव, इगतपुरी) अशी संशयितांची नावे आहेत. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पहाटे संशयित तिडके कॉलनीतील सपट फार्म हाऊस येथील चंदनाचे वृक्ष तोडून घेऊन चालले होते. सुरक्षा रक्षकाने हटकले असता, त्याला मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दरोड्यासह वृक्ष तोड अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रात्रीस खेळ चाले मनोमिलनाचा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठीची नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया संपली असली तरी, जिल्ह्यात युती आणि आघाडीमध्ये मनोमिलन आणि हेव्यादाव्यांचा खेळ अद्याप सुरूच आहे. नाशिक आणि दिंडोरीची निवडणूक प्रक्रिया अजून सुरू झाली नसल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नाराजांची मनधरणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. दिवसा मतदारांच्या भेटीगाठी घ्यायच्या आणि रात्री नाराजांची समजूत काढली जात आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झाल्याने आता चित्र स्पष्ट झाले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसे, राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ रिंगणात आहेत. सोबतच भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. वंचित आघाडीकडूनही पवन पवार रिंगणात आहेत. गोडसेंना उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेचा एक मोठा गट नाराज आहे, तर भाजपच्या उमेदवारांच्या बंडाने गोडसेंसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोडसेंकडून नाराज आणि असंतुष्टांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे समीर भुजबळ यांच्यासमोर एकाचवेळी विरोधकाशी दोन हात करण्यासह मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमधील हेवेदावे दूर करण्याचे आवाहन आहे. राष्ट्रवादीकडून मान सन्मान मिळत नसल्याने आणि प्रचारावेळी विचारले जात नसल्याने राष्ट्रवादीशी जुळवून कसे घ्यायचे असा सवाल काँग्रेसचे नेते करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस नेत्यांची मनधरणी करण्यात नाकीनऊ आहेत. काँग्रेसचे नेते अजूनही प्रचारात सक्रीय न झाल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी रात्रीच्या वेळी भेटीगाठी घेण्याचा फंडा अवलंबला जात आहे. भाजपला हरवणे कसे काँग्रेसहिताचे आहे, हे त्यांना पटवून द्यावे लागत आहे. दिंडोरी मतदारसंघातही भाजप आणि राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरू आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडाच्या पवित्र्यात असून त्यांची मनधरणी करताना नेत्यांच्या नाकीनऊ आले आहेत. चव्हाण यांचा गुरूवारी मेळावा होणार असून, त्यात काय निर्णय घेतात,यावरच भाजपच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून धनराज महालेंच्या विजयात अडसर ठरणारे माकपचे जे. पी. गावित यांचे बंड शांत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे यासाठी उमेदवारांसह पक्षांकडून रात्रीची वेळ निवडण्यात येत असून त्यासाठी बैठका आणि मैफली रंगत असल्याच्या चर्चा आहेत.

मनसेचे वेटिंग

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपविरोधात मतदान करण्याची भूमिका जाहीर केली असली तरी कोणाला मतदान करायचे, याबाबतचे धोरण अद्याप स्पष्ट नसल्याने मनसैनिक संभ्रमात आहेत. हा संभ्रम दूर करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मनसेचे दोन शिलेदार ठाकरेंना भेटले. यावेळी त्यांनी अद्याप कोणाचाही प्रचार करू नका असे सांगत ६ एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर भूमिका स्पष्ट करेल, असे सांगितल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांची सध्या आस्ते कदम भूमिका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको विभागात ४६ टक्केच वसुली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको मार्चएंडच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी वसुलीचा धडका सुरू असताना महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाने यंदा केवळ ४६ टक्‍केच घरपट्टीची वसुली केली आहे. ही वसुली वाढविण्यासाठी थेट जप्ती आणि लिलावाच्या अंतिम नोटिसा थकबाकीदारांना देण्यात आल्याचे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी सांगितले. नाशिक महापालिकेच्या वतीने घरपट्टी आणि पाणीपट्टीसाठी दरवर्षी प्रत्येक विभागीय कार्यालयाला उद्दिष्ट देण्यात येत असते. सिडको परिसरातून यंदा ४५ कोटी रुपयांची घरपट्टीची वसुली होणे अपेक्षित आहे. मात्र अद्यापपर्यंत केवळ २१ कोटी ५० लाखांची वसुली झाली आहे. त्यामुळे यंदा केवळ ४६ टक्‍केच वसुली झाली आहे. वसुली वाढविण्यासाठी महापालिकेने २१ दिवसांची मुदत असलेली जप्ती व लिलाव नोटिसा देण्याचे काम सुरू केले आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्यांवरही प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली असून, पाणीपट्टी न भरणाऱ्याचे थेट कनेक्शन तोडण्यात सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांनी पाणीपट्टी भरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १०० बड्या थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. लवकरच उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास कुमावत यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आसरा संस्थेतर्फे चालकांचे प्रबोधन

$
0
0

आसरा संस्थेतर्फे

चालकांचे प्रबोधन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या दत्त मंदिर सिग्नलवर आसरा सामाजिक फाउंडेशनतर्फे पोलिसांच्या मदतीने वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. वाहतुकीचे नियम आणि हेल्मेट वापराचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले.

झेब्रा क्रासिंग व सिग्नल तोडू नये, दुचाकीचालकांनी हेल्मेटचा आवर्जून वापर करावा, वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, वाहतूकीचे नियम पाळावे आदी सूचना वाहनचालकांना करण्यात आल्या. वाहनचालक व नागरिकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. आसरा फाउंडेशनचे संस्थापक पिंटू थोरात व सहकारी उपस्थित होते. त्यांना वाहतूक पोलिसांचेही सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत साहित्याचा मार्गदर्शक हरपला

$
0
0

\Bप्रा. डॉ. यशवंत पाठक यांना आदरांजली अर्पण \B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'यशवंतचे आपल्यातून नकळत निघून जाणे अद्यापही खरे वाटत नाही. आपल्या सोबत त्याचा सहवास कायम असल्याचे क्षणोक्षणी वाटते. यशवंतचा संत साहित्याचा अभ्यास आणि प्रत्येकाशी जवळीकतेने असलेले वर्तन हृदयात घर करून बसले आहे. यशवंत आपल्यात नसला तरी त्याचे विचार सदैव असणार आहेत. पण, त्याच्या जाण्याने संत चळ‌वळीतील एक उत्तम मार्गदर्शक हरपला', अतिशय भावपूर्ण वातावरणात अशा भावना स्वर्गीय प्रा. डॉ. यशवंत पाठक यांच्या शोकसभेत व्यक्त झाल्या.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ निरुपणकार, ग्रंथकार स्वर्गीय प्रा. डॉ. पाठक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सार्वजनिक वाचनालय नाशिक तर्फे कलादालनात बुधवारी सायंकाळी शोकसभा झाली. त्यावेळी हभप सिन्नरकर महाराज म्हणाले, की यशवंत आणि मी एकाच वर्गात होतो. बालपणापासून त्याचा संत साहित्याचा अभ्यास मी ज‌वळून पाहिला आहे. यशवंत आपल्यातून गेल्याचा निरोप मिळाला तेव्हाही त्या वृत्तावर विश्वास बसला नाही. यशवंतच्या जाण्याने संत साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण, यशवंतचे विचार आणि त्याने मांडलेल्या भूमिका अविरत राहतील.

डॉ. तुळशीराम गुट्टे म्हणाले, की रसाळ बोलण्यातून यशवंत समोरच्याला आपलंस करून घ्यायचा. यशवंतच्या सानिध्यात संत साहित्याला सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्याचा सहवास लाभलेल्यांना जणू संत साहित्याची संजीवनी लाभली आहे. पुरुषोत्तम सावंत म्हणाले, की आध्यात्माची जवळून ओळख असणारा व्यक्ती आपल्यातून गेला आहे. यशवंत पाठकांच्या जाण्याने अध्यात्माची एक बाजू मोडली आहे. तसेच यशवंत हा आदर्श आणि आनंदायी जीवन जगण्याचा प्रेरक होता. शलाका सावंत म्हणाल्या, की यशवंत पाठकांच्या सहवासातून सगळेजण अमृततुल्य साहित्याची माहिती झाली. आयुष्यात इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांसोबतचा सहवास भाग्यवंतांनाच मिळतो. त्यामुळे आजची पिढी अतिशय उत्कृष्ट अभ्यासकाला आणि मार्गदर्शकाला मुकली आहे. सावानाचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांसह शहरातील साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शंकर बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले.

पुन्हा असे व्यक्तिमत्त्व घडणे नाही

डॉ. उल्हास रत्नपारखी म्हणाले, की यशवंतचे जाणे हे नकळत असले तरी त्याच्या जाण्याने महानतेला स्पर्श केला आहे. यशवंतासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा घडणे नाही. शिवाय त्याने केलेला संत साहित्याचा अभ्यास पुढील कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे तो आज आपल्यातून हरपला असला तरी त्याचे विचार आणि भूमिका कायम राहणार आहे', अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’ची अर्जसंख्या १३ हजारांच्या पार

$
0
0

शाळांमधील जागा : ५ हजार ७३५

आतापर्यंत आलेले अर्ज : १३ हजार ६८३

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षणहक्क कायद्यानुसार सुरू असलेल्या आरटीई प्रक्रियेसाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये प्रक्रिया राबविण्यात येत असून, ५ हजार ७३५ जागांसाठी तब्बल १३ हजार ६८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. ३० मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून, अर्जसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव आहेत. या जागांवर प्रवेशासाठी आरटीई अर्ज प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेस ३० मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीईबाबत जनजागृती वाढीस लागल्याने मोठ्या प्रमाणात गरजू पालक अर्ज करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या नावांची लॉटरी काढून त्यामार्फत प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी समितीकडून करण्यात येणार आहे. या पडताळणीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

यंदा जागांच्या तुलनेत अर्जसंख्या अधिक असल्याने लॉटरी प्रक्रियेकडे पालकांचे लक्ष लागले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पहिली लॉटरी काढली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>