Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

संस्कृत भाषा सभेची कार्यकारिणी जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संस्कृत भाषा सभेची नुकतीच अंतर्गत सभा झाली. सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणी अशी : अध्यक्ष- रमेश देशमुख, कार्याध्यक्ष- सरिता देशमुख, सहकार्याध्यक्ष- तेजश्री वेदविख्यात, कोशाध्यक्ष- शोभा सोनवणे, उपाध्यक्ष- डॉ. देवदत्त देशमुख, सदस्य- शुभांगी गोखले, रूपाली झोडगेकर, श्रद्धा शहा, नूपुर सावजी, सारंग भार्गवे, डॉ. अभिजित सराफ, अमित नागरे, पद्माकर महाजन, अंकुश जोशी. येत्या काळात संस्कृत भाषेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचा मानस कार्यकारिणीने व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पारा घसरला, चटके कायम!

$
0
0

दुपारी टळटळीत ऊन; उष्णतेच्या लाटेचा अंदाज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेले दोन दिवस चाळिशी पार गेलेल्या शहराच्या तापमानात शनिवारी हलकीशी घट झाली. मात्र, उन्हाचा पारा घसरला असला तरी चटके कायम आहेत. नाशिकमध्ये शनिवारी कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर १९.६ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाचीही नोंद झाली. गुरुवारी कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सिअस होते. नाशिकसह अहमदनगरमध्येही उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे खूपच गरज असेल तरच दुपारी १२ ते साडेतीन या वेळेत घराबाहेर पडा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास तापमान ३९ ते ४० अंशांच्या दरम्यान राहू शकते. एप्रिल-मेमध्ये मात्र कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे तरण तलावावर नागरिकांची गर्दी होत आहे, तर वाढत्या तापमानापासून बचावासाठी डेझर्ट कूलरला मागणी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीव्हीपॅटचे सेटिंग सिलिंग मुख्यालयातच

$
0
0

जिल्ह्याच्या प्रस्तावाची देशभरात अंमलबजावणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीदरम्यान व्हीव्हीपॅट मशिनची सेटिंग बिघडण्याची शक्यता गृहीत धरून भारत निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅटची सेटिंग आणि सिलिंग विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयात करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने सतर्कता दाखवित ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल आयोगाने घेतली असून देशभरात आता विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सेटिंग आणि सिलिंग होणार आहे.

वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) ही नाजूक यंत्र असून ती अधिक अंतरावर वाहून नेताना त्यांची सेटिंग बिघडण्याची भीती जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने व्यक्त केली होती. याबाबचे पत्र राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविण्यात आले. यंत्रांच्या हाताळणीतील जोखीम कमी व्हावी आणि सेटिंग बिघडून निवडणूक प्रक्रियेत गोंधळ उडू नये यासाठी जिल्हा मुख्यालयाऐवजी विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयांत या यंत्रांची सेटिंग आणि सिलिंग करणे उचित ठरेल असे या पत्रामध्ये नमूद केले होते. याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने रविवारी (दि. २४) प्रसिद्ध केले होते. जिल्हा प्रशासनाने निदर्शनास आणून दिलेली ही बाब निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतली असून विधानसभा मुख्यालयांमध्येच व्हीव्हीपॅटची सेटींग आणि सिलिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही विधानसभा मतदार संघांच्या यंत्रणेकडे ही यंत्र सोपविण्यास सुरुवात केली असून १५ विधानसभा मतदार संघांमध्ये तेवढ्याच स्ट्राँग रूमची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या निर्णयामुळे व्हीव्हीपॅट मशिन्सची हाताळणी सोपी आणि प्रभावी होणार असून तांत्रिक बिघाडाचे, सेटिंग हलण्याचे प्रकारही टाळता येणार आहेत.

अधिक अंतरांवरील मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशिन्स वाहून नेताना त्यांची सेटिंग हलण्याची शक्यता होती. त्यामुळे ऐनवेळी निवडणूक यंत्रणेपुढील अडचणी वाढल्या असत्या. विधानसभा मतदारसंघांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी मशिन्सचे सेटिंग आणि सिलिंग करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने मान्य केला आहे. देशभरात त्याची अंमलबजावणी होणार आहे.

- अरुण आनंदकर,

उपजिल्हा निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - चित्राची जागा

$
0
0

झिप झॅप झूम - चित्राची जागा

- -

प्राजक्ता सोनवणे, इयत्ता चौथी, नाशिक

- -

सर्वेश कांबळे, इयत्ता दहावी, नाशिक

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची मेट्रो कागदारवरच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीपूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नाशिक शहरात मेट्रो सेवा सुरू करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनी केलेली घोषणा हवेतच विरली आहे. मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत 'महामेट्रो'च्या माध्यमातून दोन महिन्यांत व्यवहार्यता अहवाल तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. परंतु, या घोषणेला आता तीन महिने उलटले, तरी अद्यापही अहवाल आलेला नाही. त्यामुळे मेट्रो कागदावरच असल्याची चर्चा आहे.

महापालिका निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर भाजपच्या हाती सत्ता गेली. त्यामुळे नाशिकच्या विकासासाठी आता भरभरून मिळेल, अशी नाशिककरांची अपेक्षा होती. परंतु, ही अपेक्षा आता फोल ठरली आहे. नाशिकच्या सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे असलेली तोट्यातील बससेवा महापालिकेच्या माथी मारली. त्याची प्रक्रिया सुरू असतानाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. विभागीय महसूल आयुक्तालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा करीत त्यासाठी लवकरच व्यवहार्यता तपासणी करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेपूर्वी शहरात मेट्रोसाठीची चाचपणी करण्यात आली होती. दिल्लीस्थित अर्बन मास ट्रान्झिट सिस्टीम या कंपनीने शहरात सर्वेक्षण करीत नाशिकमध्ये मेट्रो सेवा व्यवहार्य नसल्याचा अहवाल सादर केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा नाशिककरांना मेट्रो सेवेचे स्वप्न दाखविले. या आढावा बैठकीनंतर तीन महिन्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरासाठी मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम राबविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. 'महामेट्रो'ला हा आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यासही आता तीन महिन्यांचा काळ उलटत आला असला, तरी अद्याप व्यवहार्यता तपासणी अहवाल तयार होऊ शकलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली मेट्रोची घोषणा हवेत विरल्याचे बोलले जात असून, केवळ निवडणुकांपुरतेच गाजर होते की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

---

आचारसंहितेचा दिलासा

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सिडको, नाशिक महापालिका आणि महामेट्रो एकत्रितपणे नाशिक शहरासाठी मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम राबविण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याचे जाहीर केले गेले. परंतु, त्यालाही दोन महिने उलटले असून, आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेत त्याबाबतची घोषणा करता येत नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, या आचारसंहितेनंतर लागलीच विधानसभेचीही आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे लागोपाठ येणाऱ्या दोन आचारसंहिता सत्ताधाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार असल्याची स्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-पुणे महामार्गांवर ‘टोलधाड’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने पुणे व मुंबई महामार्गांवरील टोलमध्ये दर वर्षीप्रमाणे वाढ केल्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या महामार्गांवर करण्यात आलेली वाढ 'होलसेल प्राइस इंडेक्स'प्रमाणे असली, तरी तिची झळ जिल्ह्यातील मुंबई, पुणे व मालेगाव-धुळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.

प्राधिकरणाने केलेली ही टोल दरवाढ मुंबई महामार्गावर पिंपळगाव बसवंत येथे, तर पुणे महामार्गावर चालकवाडी आणि हिवरगाव पावसा या टोल नाक्यावर लागू होणार आहे. विशेष म्हणजे चालकवाडी टोल नाका अद्याप सुरू झालेला नाही, तरी त्याचे दर जाहीर करण्यात आले आहेत. दि. १ एप्रिलपासून ही नवीन दरवाढ लागू होणार आहे.

नाशिक-चांदवडदरम्यान असलेल्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर ही दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांना मालेगाव, चांदवड, धुळे येथे जाण्यासाठी हे वाढीव दर लागणार आहेत. पिंपळगाव बसवंतहून गोंदे येथे जाण्यासाठी हा टोल मालेगाव, चांदवडमार्गे जाणाऱ्यांनाही बसणार आहे. पिंपळगाव बसवंत ते गोंदे या ५० किलोमीटरच्या रस्त्यासाठी ही वाढ असून, जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनांना त्यातून सुट देण्यात आली आहे. या टोल दरवाढीत कार, जीप, व्हॅन, एलएमव्ही वाहनांकरिता एकेरी फेरीसाठी इतर जिल्ह्यातील वाहनांना १४० रुपये टोल लागणार आहे, तर जिल्ह्यातील वाहनांना हाच टोल ७० रुपये राहणार आहे. त्याचप्रमाणे एलसीव्ही, एलजीव्ही, मिनी बस यासाठी २२५ रुपये इतरांसाठी, तर जिल्ह्यातील वाहनांसाठी ११५ रुपये टोल राहणार आहे. बस व ट्रकसाठी इतर जिल्ह्यांतील वाहनांना ४७५ रुपये, तर जिल्ह्यातील वाहनांना २३५ रुपये टोल राहणार आहे. त्याचप्रमाणे कमर्शिअल वाहनांसाठी ही दरवाढ वाहनांच्या प्रकारानुसार आहे. त्यात सर्वाधिक वाढ सात किंवा अधिक अॅक्सल असणाऱ्या अवजड वाहनांसाठी असून, ती तब्बल ९०१ रुपयांपर्यंत आहे.

---

पुणे महामार्गावरही वाढ

पुणे येथे जाताना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावरही टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यात कार व जीपसाठी ४५ रुपये, हलक्या वाणिज्य वाहनांसाठी ७० रुपये, तर ट्रक व बससाठी १५० रुपये टोल राहणार आहे. त्याचप्रमाणे इतर वाहनांचे दरदेखील वाढविण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोने खरेदी व्यवहारात गंडा

$
0
0

पाच लाख रुपयांची बॅग लांबविली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अल्पदरात सोने विक्रीस असल्याचे सांगून घरात घुसलेल्या चौघांनी पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हातोहात लांबविली. ही घटना पाथर्डी फाटा भागातील नरहरीनगर परिसरात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

भावेशकुमार जिवनलाल कलारिया (रा. पालीहिल अपार्ट.) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. दीपक सिंग, संतोष यादव, कल्याण आणि राजू नावाच्या संशयितांनी ही फसवणूक केली. संशयितांनी बुधवारी (दि. १३) दुपारी कलारिया यांच्याशी फोनवर संपर्क साधला. पावतीसह सोने असून ते विक्री करायचे असल्याचे सांगत संशयितांनी २५ हजार तोळे दराने हा व्यवहार निश्चित केला. कलारिया यांनी त्यांना आपल्या घरी बोलावले. संशयित आरोपींनी सोमवारी (दि. १८) कलारिया यांच्या घर येऊन पैशांची खातरजमा केली. यावेळी कलारिया पैशांसह तयार होते. संशयितांनी कलारिया यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने खऱ्या नोटा असलेली बॅग चोरी केली. बनावट नोटांची हुबेहुब बॅग ठेवून सोने घेऊन येतो, असे सांगून पोबारा केला. संशयित घराबाहेर पडताच कलारिया यांनी पैशांची खातरजमा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

ऑनलाईन फसवणूक

बँकेतून बोलत असल्याचे सांगून भामट्यांनी ग्राहकाच्या एटीएम कार्डची माहिती मिळवित लाख रुपयांची रोकड ऑनलाईन काढून घेतली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. विक्रमजित सतीप्रसाद भट्ट (रा. दत्तमंदिररोड, शिवाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चोरट्याने सोमवारी (दि. २५) ८८७३६४१९४९ या क्रमांकावरून भट्ट यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्याने सेंट्रल बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्डचा तपशिल घेतला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून परस्पर एक लाख तीन हजार २९३ रुपये ऑनलाईन काढून घेतले.

दोन तडीपार अटकेत

गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपार करण्यात आलेल्या दोघा तडीपार गुन्हेगारांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आले. बुऱ्हाण शाकीर शेख (२० रा. झिनतनगर, वडाळानाका) आणि वैभव उर्फ सोनू गजानन खिरकाडे (रा. मेहरधाम) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील वैभव याच्याकडे एक चॉपर आढळून आला. गडकरी चौकात शुक्रवारी (दि. २९) रात्री बुऱ्हाण गस्ती पथकाच्या हाती लागला. तर खिरकाडेला शुक्रवारी रात्री इंद्रकुंड भागातून त्याच्या साथिदारासह अटक करण्यात आली. संशयितांच्या अंगझडतीत धारदार चॉपर आढळून आला.

..

विवाहितेची आत्महत्या;

पती, सासूविरोधात गुन्हा

लग्नात भांडी घेण्यासाठी कमी पैसे दिले या कारणातून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासू विरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्ञानेश्वर सुरेश गवांदे व निर्मला सुरेश गवांदे (रा. वृंदावननगर, आडगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मायलेकाची नावे आहेत. पूनम ज्ञानेश्वर गवांदे (वय १९) या विवाहितेने गुरुवारी (दि.२८) आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत तिचे वडिल दिलीप सोनबा कोल्हे (वय ४२, रा. विडणी, जि. सातारा) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, पती ज्ञानेश्वर व सासू हे पूनमचा मानसिक व शारिरीक छळ करीत होते. लग्नात भांडी घेण्यासाठी कमी पैसे दिले, माहेरून पैसे आण असे म्हणून तिचा छळ सुरू होता. या छळास कंटाळून तिने आत्महत्या केली.

मायलेकीचा

सिडकोत विनयभंग

पाणी फेकतांना अंगावर पडल्याने संतप्त झालेल्या दोघांनी कुटुंबियास मारहाण करीत मायलेकींचा विनयभंग केला. सिडकोतील या घटनेप्रकरणी अंबड पोलिसांनी विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. रावसाहेब सुभाष देवरे आणि बंटी गंगाधर सूर्यवंशी (रा. दोघे सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. साईबाबानगरमधील महिलेने तक्रार दिली. विनयभंगाची घटना रविवारी (दि. २४) घडली. अंगणात पाणी फेकतांना संशयितांच्या अंगावर पाणी पडले. संशयितांनी महिलेसह तिच्या पतीस व मुलीस घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी दोघांनी महिला आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक कामाचा बाऊ!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी महापालिकेचे दीड हजार कर्मचारी आणि अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक कामांसाठी वर्ग केल्याचा महापालिकेतील विभागप्रमुखांचा दावा हा कांगावाच असल्याचे उघड झाले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणुक कामांसाठी अवघे ८४ अधिकरी कर्मचारी पूर्णवेळेसाठी वर्ग केले असून, ५७२ कर्मचाऱ्यांना मतदान आणि मतमोजणी या दोन दिवसांच्या कामांसाठी नियुक्ती दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अवघे ८४ कर्मचारीच कार्यरत असताना उर्वरित १४०० कर्मचारी कुठे गायब होतात, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. महापालिकेचे हे कर्मचारी बायोमॅट्रिक हजेरी लावून निवडणूक कामाचा बाऊ करीत गायब होत असल्याचे समोर आल्याने प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांकडून कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली होती. महापालिकेकडूनही मनुष्यबळ मागविण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने आपल्या १३०० कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेला दिली होती. या यादीसोबत पाणीपुरवठा, विद्युत, आरोग्य व वैद्यकीय विभागांतील कर्मचारी घेऊ नयेत, अशी विनंतीही करण्यात आली होती. मार्च महिना असल्याने वित्त आणि लेखा विभागांतील कर्मचारीही निवडणुकीसाठी वर्ग करू नयेत, अशी मागणीही करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने याची काळजी घेत आतापर्यंत महापालिकेचे ८४ कर्मचारी व अधिकारी निवडणूक कामांसाठी पूर्णवेळ आपल्याकडे वर्ग केले आहेत. ५७२ कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन, तर मतमोजणीसाठी दोन अशी चार दिवसांची ड्युटी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत महापालिकेचे केवळ ६५६ कर्मचारी आणि अधिकारीच घेतले असताना दुसरीकडे महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालये ओस पडत आहेत. महापालिकेतील विभागप्रमुख जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आमचे कर्मचारी निवडणूक कामांसाठी कसे पळविले जात आहेत, याच्या कहाण्या नागरिकांसह नगरसेवकांपुढे वाचत आहेत. अधिकारी व कर्मचारीच नसल्याने काम कसे करायचे, असा बागुलबुवा उभा करीत आहेत.

माहिती मागविल्यावर उलगडा

या सगळ्या प्रकाराची आयुक्त राधाकृष्ण गमे आणि प्रशासन उपायुक्त महेश बच्छाव यांनी गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून किती कर्मचारी आणि अधिकारी घेण्यात आले याची माहिती मागविण्यात आली. त्यात हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ ८४ कर्मचारीच वर्ग झाले असताना निवडणुकीच्या कामांसाठी महापालिका ओस का पडली, याची चौकशी केली जात आहे. विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांकडून कामचुकारपणा केला जात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. निवडणुकीचा बाऊ करून कर्मचारी आणि अधिकारी खासगी कामे करीत असल्याचा प्रशासनाला संशय असून, आता बायोमॅट्रिक हजेरी तपासली जात आहे. विभागप्रमुखांकडून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा अहवालही मागविण्यात आला आहे.

--

हजेरी लावून पसार

निवडणुकीच्या नावाखाली महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी मुख्यालयातून गायब होत असल्याचा संशय आता अधिकच बळावला आहे. सकाळी हे कर्मचारी बायोमॅट्रिक हजेरी लावून दिवसभार भटकंती करतात आणि सायंकाळी पुन्हा बायोमॅट्रिक हजेरी लावण्यासाठी येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ८४ कर्मचारी आणि अधिकारी वगळता अन्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा अहवाल सर्व विभागप्रमुखांकडून मागविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, तसेच विभागांना अचानक भेटी देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, कर्मचारी अनुपस्थित आढळला, तर थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात

$
0
0

संस्कृत संभाषण वर्ग उद्यापासून

नाशिक : संस्कृतभारतीतर्फे विनामूल्य संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन केले आहे. अशोकस्तंभावरील मोहिनीदेवी रुंग्टा विद्यालयात १ ते १० एप्रिल दरम्यान सायंकाळी ६ ते ७:३० या वेळेत हा वर्ग होणार आहे. सोप्या भाषेत संस्कृत संभाषण यामध्ये शिकविले जाणार असून शिबिरासाठी वय, शिक्षण याची कोणतीही अट नाही, असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

- -

शिक्षकेतर संघटनेची बैठक

नाशिक : महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेची सभा आयोजित करण्यात आली आहे. मा. रा. सारडा कन्या विद्यामंदिर, नेहरू उद्यानाजवळ येथे ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता ही सभा होणार आहे. २४ वर्षांची दुसरी कालबद्ध पदोन्नतीसाठीच्या न्यायालयीन प्रकरणांवर माहिती घेऊन चर्चा करणे, शिपाई कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन दाव्याची माहिती करुन घेणे, सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चितीच्या त्रुटींबाबत चर्चा करुन कार्यवाही ठरवणे असे विषय या सभेपुढे असणार आहे. ही सभा आज, ३१ मार्च रोजी होणार होती, मात्र त्यात बदल करण्यात आला असून ७ एप्रिल रोजी सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

- -

ध्यान शिबिराचे आयोजन

नाशिक : विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नाशिक शाखा व सन्मित्र ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओंकार ध्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते ५ एप्रिल या कालावधीत हे शिबिर अजय मित्रमंडळाचे सभागृह, इंदिरानगर येथे सकाळी ७.३० ते ८.३० यावेळेत होणार आहे. या शिबिराचा लाभ इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- -

वाचनालयाचा वर्धापनदिन उत्साहात

नाशिक : नाशिकरोड येथील स्वयंसिद्धा महिला विकास मंडळ संचलित सोहम सार्वजनिक वाचनालयाया दहावा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. ग्रंथ तुमच्या दारीचे सर्वेसर्वा विनायक रानडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर लेखक दत्ता पाटील प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. वाचन संस्कृती कशी टिकविली पाहिजे, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा अंजली विसपुते, उपाध्यक्षा मेघा पिंपळे, खजिनदार प्रतिभा कुंभकर्ण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजा पारुंडेकर यांनी केले. वाचनालयाच्या अध्यक्षा पुष्पा गवांदे यांनी प्रास्ताविक केले.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरास सक्तमजुरीची शिक्षा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेत जमिनीची मोजणी होऊन हद्द निश्चितीसाठी शेतकऱ्याकडून आठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मालेगाव येथील भूमीअभिलेख कार्यालयातील शिरस्तेदारास मालेगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २०११ मध्ये ही कारवाई केली होती.

दीपक झुलाल वाल्हे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिरस्तेदाराचे नाव आहे. तक्रारदाराने मालेगाव शिवारातील सर्व्हे नंबर ११५ - १ क्षेत्र १.४० ही शेतजमीन खरेदी केली होती. सदर शेतीची मोजणी करून हद्द निश्चिती करण्यासाठी तक्रारदाराने मालेगाव भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. अनेक दिवस उलटूनही कार्यवाही होत नसल्याने तक्रारदाराने शिरस्तेदार वाल्हे याची भेट घेतली असता त्याने लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने 'एसीबी'कडे याबाबत तक्रार केली होती. 'एसीबी'च्या पथकाने २० जानेवारी २०११ रोजी पडताळणी करून वाल्हे यास त्याच्याच कार्यालयात रंगेहात पकडून अटक केली. या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालला. सरकारतर्फे अ‍ॅड. संजय सोनवणे यांनी काम पाहिले. समोर आलेल्या साक्षीपुराव्यांनुसार न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ प्रमाणे एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड तर कलम १३ प्रमाणे २ वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अनुक्रमे एक महिना साधी कैद आरोपीस भोगावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेसह दोघांची रेल्वेखाली आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्टेशनलगत शुक्रवारी (दि. २९) महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजता पोल क्रमांक १८९/२६ जवळ एका अनोळखी महिलेने जेएनपीटी लोकल गाडीखाली आत्महत्या केल्याची माहिती पायलटने स्टेशन प्रशासनाला दिली. त्यानुसार ए. के. शर्मा यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यास कळविले. दुसऱ्या एका घटनेत एकलहरे भागात रेल्वे लाईनवर पोल क्रमांक १८८/१८ येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती गाडी क्रमांक १५०६५ च्या चालकाने स्टेशन प्रशासनाला दिली. नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन प्रबंधकांनी या घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसाना दिली. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकीचे बळ, मिळते फळ!

$
0
0

प्रवीण बिडवे

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

'ऐसे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ' या उक्तीचा प्रत्यय दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावात येतो. ग्रामस्थांचा दृढनिश्चयी बाणा अन् एकात्मतेमुळे या गावाने विकासाचे आयाम बदलले आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छतेचे अत्यंत प्रतिष्ठेचे नाशिक विभागाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक या गावाने अलीकडेच पटकावले. राज्यस्तरावरील पहिल्या पारितोषिकावर आपलीच मोहोर उमटविण्यासाठी हे गाव सिद्ध झाले आहे.

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड हे अवघ्या ४५० उंबऱ्यांचे गाव. विकासासाठीचे झपाटलेपण येथे पहावयास मिळते. विकास हा एकट्याने ओढावयाचा गाडा नाही. ती अंगणवाडीत जाणाऱ्या बालकापासून जख्खड आजोबांपर्यंत सर्वांचीच जबाबदारी आहे. गावातील सर्वच्या सर्व २,८५० ग्रामस्थ ही जबाबदारी पार पाडतात. म्हणूनच उत्तर महाराष्ट्रातील ६ हजार ६९६ गावांमधून अवनखेड या गावाला गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे पहिले १० लाखांचे पारितोषिक मिळाले. आता राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी १२ गावांमध्ये अवनखेडनेही दंड थोपटले असून, राज्याचे पहिले पारितोषिक मिळविण्याचा संकल्प सोडला आहे.

ग्राम स्वच्छता अभियान कशासाठी

ग्रामीण जनतेचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनस्तर उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग वाढावा, ग्रामीण जनतेला स्वच्छतेची सवय लागावी त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेतली जाते.

नाशिक विभागातील जिल्हानिहाय गावे

जिल्हा गावांची संख्या

नाशिक १९६०

जळगाव १५१३

अहमदनगर १६०२

नंदुरबार ९४३

धुळे ६७८

एकूण ६६९६

जिल्हास्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायती विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र असतात. त्यानुसार नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत एकूण १० ग्रामपंचायती विभागस्तरावर स्पर्धेसाठी पात्र होत्या.

जिल्हा ग्रामपंचायतीचे नाव तालुका

नाशिक अवनखेड दिंडोरी

नाशिक राजदेरवाडी चांदवड

धुळे अजंदे बु शिरपूर

धुळे परसामळ शिंदखेडा

नंदुरबार वाटवी नवापूर

नंदुरबार राजविहीर तळोदा

जळगाव मेहेरगाव अमळनेर

जळगाव सुसरी भुसावळ

अहमदनगर लोणी बु राहाता

अहमदनगर वडनेर बु पारनेर

अशी होती १०० गुणांची परीक्षा

विषय गुण

शौचालय व्यवस्थापन ४०

पाणीगुणवत्ता २०

सांडपाणी व्यवस्थापन १०

लोकसहभाग १०

घनकचरा व्यवस्थापन ०५

घर/गाव परिसर स्वच्छता ०५

वैयक्तिक स्वच्छता ०५

स्मार्ट व्हीलेज संकल्पनेनुसार उपलब्धी ०५

एकूण १००

स्वच्छतेसाठी नेमणूक

जबाबदारी सोपविली की, कामे व्यवस्थित होतात, असा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा अनुभव आहे. गावातील त्या-त्या वस्तीवर स्वच्छता राखण्याची जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. त्या-त्या भागातील ग्रामपंचायत सदस्यांनी परिसरात आठ ते दहा जणांची समिती स्थापन केली आहे. आठवड्यात दोन दिवस निश्चित करण्यात आले असून, त्या दिवशी न सांगता प्रत्येकजण आपआपली जबाबदारी पार पाडतो.

शिवारही स्वच्छ

गावाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला आठ किलोमीटपर्यंत शिवार पसरले आहे. गावाचा केवळ दर्शनी भाग स्वच्छ ठेऊन उपयोग नाही. ग्रामस्थ गावापासून दूर मळ्यामध्ये राहात असतील तर तेथेही स्वच्छता नांदली पाहिजे याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. गावातील शेतकरी बांधव प्राधान्याने द्राक्ष आणि उसाचे पिक घेतात. त्यांच्या शिवारापर्यंत वायफाय सुविधा पुरविण्यात आली आहे.

पंतप्रधानांकडूनही अवनखेडचे कौतुक

गाव हागणदारीमुक्त, तंटामुक्त आहे. येथील कचराही नैसर्गिक साधनसंपत्ती मानून त्याचा गांडूळखत निर्मितीसाठी उपयोग केला जातो. त्याकरिता तसे युनिट गावात साकारण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून जख्खड आजोबांपर्यंत सारेच स्वच्छतेचे पुजारी आहेत. गावात वायफाय सुविधा, अत्याधुनिक स्वरूपाचे टॉयलेट्स, शालेय विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन आणि डिस्पोजल मशीन्स, शुद्ध पाण्यासाठी आरो यंत्रणा बसविण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या भाषणातून अवनखेडचा उल्लेख करून या ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.

आयएसओ मानांकन

आधारकार्ड ही अनिवार्य बाब झाल्याने गावातील सर्व ग्रामस्थांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. अंगणवाडी, प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे दिवे सौरउर्जेवर चालतात. गावात स्वामी पदमानंद सरस्वती महाराज सभागृहाचे नूतनीकरण सुरू आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गावात तंटे नाहीत अन् अतिक्रमणही नाही. सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोष खड्डे, परसबाग, बंदिस्त गटारे यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने मदत घेतली जाते.

स्वच्छता राहिली तर रोगराई पसरत नाही. त्यामुळे ग्रामस्थ स्वच्छतेला महत्त्व देतात. सर्वजण एकोप्याने राहतात म्हणूनच गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. गवत वाढू न देणे, रस्ते व त्यालगतचा परिसर स्वच्छ ठेवणे हे काम प्रत्येकजण आपली जबाबदारी समजून करतो. स्वच्छतेवर नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर समितीही काम करते.

- भिका शिंदे, ग्रामस्थ

अंगणवाडीत ४० बालके येतात. ते स्वच्छ व नीट नेटकी असावीत याकडे आमचा कटाक्ष असतो. कपडे अस्वच्छ असतील तर पालकांना बोलावून समजावून सांगितले जाते. साबणाने हात स्वच्छ धुणे, केस अधिक वाढू न देणे आणि डब्यामध्ये खाद्यपदार्थ देतानाही योग्य काळजी घेण्याबाबत बालके आणि पालकांनाही मार्गदर्शन केले जाते. बालकांची नखे वाढली असतील तर ती अंगणवाडीतही काढली जातात.

- जयश्री पिंगळ (अंगणवाडी सेविका)

चॉकलेटचे रॅपर देखील डस्टबीनमध्ये टाकण्याची सवय शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बाणविली आहे. शाळेतील वर्गांमध्ये नेलकटर ठेवले आहेत. पसायदानानंतर वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांची नखे तपासतात. ती वाढली असतील तर कमी करण्याबाबत सूचना देतात. गुरूवारी शाळेतच नखे काढली जातात. केस वाढलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी वर्गामध्ये उभे केले जाते. केस कमी करून येण्याच्या सूचना त्यांना दिल्या जातात.

- बाळूकाका शेवाळे, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय, अवनखेड

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार मिळणे हे अवनखेड ग्रामस्थांचे यश आहे. कोणत्याही चांगल्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामस्थांनी प्रत्येक वेळी हिरीरीने हा सहभाग दिला. राज्य स्तरावरील स्पर्धेत अवनखेडसह १२ गावांचा समावेश आहे. राज्य स्तरावरील समितीने अलीकडेच गावाची पाहणी केली असून, ग्राम स्वच्छतेचे राज्य स्तरावरील पहिले पारितोषिकही अवनखेडलाच मिळेल हा विश्वास आहे.

- नरेंद्र जाधव, सरपंच अवनखेड

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागस्तरीय समिती

राजाराम माने, विभागीय आयुक्त - अध्यक्ष

सुदर्शन कालिंके, मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण - सदस्य

शिवाजी दहीते, अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे - सदस्य

डॉ. किरण मोघे - उपसंचालक माहिती व जनसंपर्क - सदस्य

प्रतिभा संगमनेरे - उपायुक्त विकास - सदस्य सचिव

स्वागत अन् बँडबाजाला नकार

गावाची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या सरकारी समितीचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत केले जाते. या स्वागताआड समितीला खूश करण्याचा प्रयत्न अधिक असतो हे नव्याने सांगायला नको. परंतु, विभागीय स्तरावर गावांची पाहणी करणाऱ्या समितीने स्वागत आणि बँडबाजाला स्पष्ट शब्दांत नकार दिला. सर्व औपचारिकतांना फाटा देऊन गावाच्या पाहणीला महत्त्व दिले. समितीमधील काही सदस्यांनी गावाचे डॉक्युमेंटशन तपासले तर काहींनी थेट ग्रामस्थांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. खरोखरच लोकसहभाग आहे का हे तपासण्यासाठी ग्रामस्थांना अनपेक्षित प्रश्न विचारण्यात आले. स्पर्धेत सहभागी काही गावांमध्ये समितीला शौचालयांचा वापर चारा साठवणुकीसाठी होत असल्याचे आढळले, तर काही गावांचा दर्शनी भाग लख्ख असला तरी सांडपाणी दूर कोठे शोष खड्ड्यात न सोडता जलाशयात सोडल्याचे आढळून आले. अशी गावे स्पर्धेतून बाद झाली. घनकचऱ्याचे काय करता? असे प्रश्न महिलांना तर नखे कोणत्या दिवशी कापतात असा प्रश्न कोणत्याही विद्यार्थ्याला विचारले गेले. केवल डॉक्युमेंटेशनवर विश्वास ठेऊन गुण न देता प्रत्यक्ष पाहणी, संवाद आणि क्रॉस व्हेरिफिकेशनला महत्त्व देण्यात आले.

गावाने काय केले?

घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत प्रकल्प निर्मिती

बंदिस्त गटारांची निर्मिती

सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी शोषखड्डे

परसबाग निर्मिती

प्रत्येक घरी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी शौचालये

नदीकाठालगत कचरा टाकू नये याकरिता जॉगिंग ट्रॅक निर्मिती

जनावरांच्या मलमूत्राचेही व्यवस्थापन

विद्यार्थ्यांची नखे व केस कापण्याबाबत पाठपुरावा

जलजन्य आजार पसरू नयेत याकरिता टीसीएलचा वापर

शाळेत बसविले सॅनिटरी नॅपकीन व डिस्पोजल मशिन

वैयक्तिक स्वच्छता आणि घर स्वच्छतेलाही प्राधान्य

गावात १०० टक्के आधारकार्डधारक

गावकरी देतात श्रमदानाला महत्त्व

स्मशानभूमी परिसरात हिरवाई

सौर उर्जेवर चालतात सार्वजनिक दिवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटशिक्षणाधिकारी कुंवर निलंबित

$
0
0

नाशिक : गटशिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्यावर शिस्तभंगाची बडगा उगारून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शिक्षकांकडे पैशाची मागणी, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, नियमबाह्य नियुक्त्या अशा तक्रारी शिक्षकांनी केल्यानंतर त्यात तथ्य आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या संबंधीचे पत्र अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी चांदवड पंचायत समिती, नाशिक पंचायत समिती, नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाले आहे. कुंवर या २०११ ते २०१३ दरम्यान चांदवड पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या कालावधीत त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी शिक्षकांनी केल्या होत्या. या तक्रारींनुसार त्यांची चौकशी सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेच्या वेळेविरोधात गुरुजींची सामूहिक रजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कडाक्याचे ऊन, दुष्काळी परिस्थिती यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने ठरवून दिलेली शाळेची वेळ शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहे. शाळा सकाळ सत्रातच भरविण्यात याव्यात, अशी मागणी करूनही ११ ते ५ या वेळेतच शाळा भरविण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शनिवारी सामूहिक रजा घेत निषेध नोंदवला. जिल्ह्यातील बारा हजार शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे सांगण्यात आले.

दर वर्षी १ मार्चपासून शाळांच्या वेळेत बदल करण्यात येतो. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास, बसण्यास गैरसोय होऊ नये ही यामागील कारणे आहेत. राज्यभरात हे बदल करण्यात येतात. नाशिकमध्ये मात्र जिल्हा परिषदेकडून शाळांच्या वेळांबाबत तीन ते चार वेळा पत्रक काढून वारंवार बदल करण्यात आले. या बदलांनंतरही ठरविलेल्या वेळा विद्यार्थी, शिक्षकहिताच्या नसल्याची भूमिका घेत शिक्षकांनी सामूहिक रजा आंदोलन केले. काही शाळांध्ये पत्र्याच्या खोल्या असून, लाइट, पाण्याची कमतरता असल्याने शाळा सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेतच भरवाव्यात, अशी शिक्षकांची मागणी आहे. या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला नाही, तर सोमवार-मंगळवारपासून शाळा बंद आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षक समितीकडून देण्यात आली.

- -

काही शिक्षकांकडून शाळा सकाळ सत्रात भरविण्याची मागणी केली जात आहे. काही शिक्षकांना मात्र ११ ते ५ ही वेळ हवी आहे. त्यामुळे वेळेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या विषयावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या तरी शाळा ११ ते ५ या वेळेत भरत आहेत.

\B-वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

\B- -

वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांचे दुपारच्या शाळेत प्रचंड हाल होत असल्याने सकाळीच शाळा असावी, अशी आमची मागणी आहे. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये १ मार्चपासून शाळा सकाळ सत्रात भरविण्यात येत आहेत. नाशिकमध्येही इतके वर्ष हा बदल केला जात असे.

\B-आनंदा कांदळकर, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प भारतीय लोकशाही व निवडणूक प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने कॅन्टोन्मेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळेमध्ये लोशाही पद्धतीने विद्यार्थी निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करताना प्रत्येक विद्यार्थ्यांने मतदान केले. आजचे विद्यार्थी हे भावी मतदार असल्याने त्यांना भावी काळात लोकशाही व त्या लोकशाहीचा मुख्य घटक असलेले मतदान ही प्रक्रिया कशी पार पडते हे समजण्यासाठी मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी यांच्या पुढाकाराने अशा पद्धतीची निवडणूक घेण्यात आली. लोकशाहीप्रती सजग करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमासाठी प्रत्येक इयत्तेतून एक याप्रमाणे यश गजर (पहिली), प्रतीक्षा भोसले (दुसरी), चेतना सूर्यवंशी (तिसरी), संचिता अहिरे (चौथी) यांना उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले यांकडून उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून गोपनीय मतदान घेण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेऊन मतदान करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या उपक्रमासाठी पोपट खंडिझोड, राजेंद्र ताजनपुरे आदींसह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

प्रयत्नशील होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवृत्त पोलिसांना सन्मानाने निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलातील मार्चअखेर निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शनिवारी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. बऱ्याच कालावधीनंतर झालेल्या या सोहळ्यात सेवानिवृत्तांचे हितचिंतक आणि कुटुंबीय असे सुमारे दोनशेहून अधिक नागरिक उपस्थित होते. या उपस्थितीमुळे हा सोहळा चांगलाच रंगला.

शहर पोलिस दलातील सहाय्यक आयुक्त शांताराम पाटील, एएसआय अरुण आहेर (अंबड), पुंजा कातकाडे (बॉम्ब शोध पथक), विजय मगर (मुख्यालय), अशोक अहिर (वाहतूक शाखा), पद्माकर गामणे (बिनतारी संदेश) आणि सुनील शहाणे (पंचवटी) यांच्यासह पोलिस शिपाई भास्कर चव्हाण (अंबड) हे सर्व जण मार्चअखेर निवृत्त होत आहेत. आयुक्तालय प्रशासनाच्या वतीने शाल श्रीफळ देवून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच पोलिस खात्याची आठवण करून देणारी फोटो फ्रेम देऊन त्यांना निरामय निवृत्त आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंदवलीतील शिवनगरवर दगडांचा वर्षाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील आनंदवलीतील शिवनगर परिसरातील घरांवर गत बुधवार (दि. २७)पासून वेगवेगळ्या दिशेने दगडफेक सुरू आहे. येथे दिवस-रात्र दगडांचा मारा होत असून, या ठिकाणी राहणारे काही रहिवासी जखमीदेखील झाले आहेत. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली असून, पोलिसांनी समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

आनंदवली परिसरात असलेल्या शिवनगर येथील नदीकिनारी असलेल्या झोपडपट्टी वसाहतीतील १५ ते १६ घरांतील रहिवासी या प्रकारामुळे धास्तावले आहेत. गत बुधवारी दुपारी चार वाजता येथील काही घरांवर दगड येऊन धडकले. प्रथमच अशी घटना घडल्याने नागरिकांनी दुर्लक्ष केले. मात्र, नंतर हा प्रकार वाढत गेला. नागरिकांनी या घटनेची माहिती गंगापूर पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, दगड कोठून आले, हेच समजत नसल्याने पोलिस आल्या पावली माघारी फिरले. त्यानंतर मात्र समाजकंटकांची हिंमत वाढली. त्यामुळे सातत्याने दगडफेक सुरू झाली. या ठिकाणी सर्वच घरे पत्र्यांची असून, दगड कोठून येईल, याचा नेम राहिलेला नाही. दगड पत्र्यावर पडला, की मोठा आवाज होतो. त्यामुळे धावपळ उडत आहे. आतापर्यंत तीन वेळा दगड लागला. हातात बसेल एवढ्या आकाराचा दगड, वीट, फरशीचा तुकडा असे काहीही फेकले जाते, असे अश्विनी ससाणे या त्रस्त महिलेने सांगितले. या परिसरातील काही जणांनी आपले मोबाइल व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू करून छतांवर ठेवले. मात्र, दगड नेमके कोणत्या दिशेने येतात, यावर प्रकाश पडला नसल्याचे राजू रोकडे या नागरिकाने सांगितले. दरम्यान, या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला. स्थानिक नागरिकांना याचा थांगपत्ता लागला नाही. आमचाही शोध सुरू आहे. मात्र, यासाठी तेथे कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त कसा तैनात करणार, असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे.

--

भगताला नागरिकांचा विरोध

दगडफेकीने जोर पकडला तसे या भागात भानामती व इतर जादुटोण्याची चर्चा सुरू झाली. त्रस्त नागरिकांनी प्रत्येकी तीन हजार रुपये काढून भगतला पाचारण करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्रस्त नागरिकांनी यास विरोध केला. असा प्रकार करण्याची आवश्यकता नसल्याबाबत नागरिकांचे एकमत झाल्याने हा प्रस्ताव बारगळला.

--

गेल्या बुधवारपासून १५ ते १६ घरांवर सातत्याने दगडफेक होत आहे. त्यामुळे रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे. या घटनेमागे असलेल्या समाजकंटकांना शोधून पोलिसांनी कारवाई करावी. वेगात येणारा दगड महिला, लहान मुले किंवा वृद्धास लागल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.

-आनंद जाधव, त्रस्त रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुली दीडशे कोटींपार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेला यंदा घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीतून ३० मार्चअखेर तब्बल १५८ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याने महापालिकेच्या रिकाम्या तिजोरीला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच महापालिकेने घरपट्टी वसुलीतून शंभर कोटींचा टप्पा पार केला असून, घरपट्टी वसुली ११३ कोटींपर्यंत गेली आहे.

आज, रविवारी (दि. ३१) आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने महापालिकेने कर संकलनासाठी आज सर्व कर संकलन केंद्रे रात्री आठ वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेला जीएसटी अनुदानानंतर घरपट्टी आणि पाणीपट्टीतून दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न मिळते. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता घरपट्टी वसुलीसाठी २५३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले होते, तर पाणीपट्टीची मागणी ५४ कोटींपर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु, करगोंधळामुळे महापालिकेला उद्दिष्टापर्यंत पोहोचणे यंदाही शक्य झालेले नाही. मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ५९ हजार नवीन मिळकती चालू आर्थिक वर्षात कर आकारणीच्या टप्प्यात आणण्यात प्रशासनाला आलेले अपयश यामुळे मुंढे यांनी घरपट्टीसाठी अपेक्षिलेले उद्दिष्ट गाठणे अशक्यप्राय बनल्याने घरपट्टीचे वसुलीचे उद्दिष्ट १४९ कोटींपर्यंत घटविण्यात आले होते. मात्र, हे सुधारित उद्दिष्ट गाठणेही महापालिकेच्या घरपट्टी वसुली विभागाला यश मिळू शकलेले नाही. ३० मार्चअखेर घरपट्टीपोटी ११३ कोटी रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकला आहे. अर्थात, महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच घरपट्टीच्या महसुलाने ११० कोटींचा पल्ला पार केला आहे. पाणीपट्टीचे चालू आर्थिक वर्षात ५४ कोटी, तर थकबाकीचे ५५ कोटी असे १०९ कोटींचे उद्दिष्ट होते. परंतु, ३० मार्चअखेरपर्यंत केवळ ४५ कोटींचाचा महसूल जमा होऊ शकला आहे. घरपट्टीचे ७६, तर पाणीपट्टीचे ५५ टक्के उद्दिष्ट साध्य होऊ शकले आहे.

---

३७९ नळजोडण्या तोडल्या

घरपट्टीसोबतच पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेने यंदा कठोर पवित्रा अवलंबला आहे. थकित पाणीपट्टी वसुलीसाठी ३३ हजार थकबाकीदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत, तर पाणीपट्टीची थकबाकी जमा न करणाऱ्यांच्या आतापर्यंत ३७९ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पंचवटी विभागातील सर्वाधिक ११३, त्या खालोखाल नाशिकरोड ८९, नाशिक पश्चिम ७३, नाशिक पूर्व ३८, सातपूर ३६, तर नवीन नाशिक विभागात ३० थकबाकीदारांच्या नळजोडण्यात खंडित करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर फक्त फोटो...

गटशिक्षणाधिकारी किरण कुंवर निलंबित

$
0
0

नाशिक : गटशिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्यावर शिस्तभंगाची बडगा उगारून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शिक्षकांकडे पैशाची मागणी, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, नियमबाह्य नियुक्त्या अशा तक्रारी शिक्षकांनी केल्यानंतर त्यात तथ्य आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या संबंधीचे पत्र अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी चांदवड पंचायत समिती, नाशिक पंचायत समिती, नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाले आहे. कुंवर या २०११ ते २०१३ दरम्यान चांदवड पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

...................

या कालावधीत त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी शिक्षकांनी केल्या होत्या. या तक्रारींनुसार त्यांची चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. निलंबनाच्या कारवाईनुसार कुंवर यांना खाजगी नोकरी स्वीकारल्यास, व्यवसाय केल्यास या गैरवर्तणुकीबद्दल दोषी ठरणार असून कारवाई केली जाणार आहे. तसेच त्या निर्वाह भत्त्यावरील हक्कही गमावून बसतील, असे पत्रकात म्हटले आहे.

- - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images