Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रंगात न्हाली तरुणाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरात धुळवडीच्या दिवशीच रंग खेळण्याची परंपरा असताना शहरात मात्र पारंपरिक पद्धतीने रंगोत्सव उत्साहाने साजरा झाला. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याचा साठा मुबलक असल्याने नागरिकांनी मुक्तपणे रंगांची उधळण केली. सामाजिक संघटनांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत काही ठिकाणी कोरडी रंगपंचमीही साजरी करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे शहरातील रहाडीवर देखील अबालवृध्दांनी गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास रहाडीच्या मानकऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजन करून रंग खेळायला सुरुवात झाली. पंचवटीच्या शनिचौकातील रहाडीचा मान रास्ते आखाडा तालीम संघाला, गाडगे महाराज पुलाजवळील रहाडीचा मान रोकडोबा तालीम संघाला तर तिवंध्यातील रहाडीचा मान मधली होळी तालीम संघाला असल्याने पदाधिकाऱ्यांनी पूजन करुन रंग खेळण्यास सुरुवात केली.

बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासूनच अनेक तरुण, चिमुकले घराच्या बाहेर रंग खेळण्यासाठी पडले होते. यात मुली व महिलाही मागे नव्हत्या. कमी पाण्याचा वापर करीत कशा पद्धतीने या सणाचा आनंद घेता येईल, याचा प्रयत्न केला जात होता. एकमेकांना घराच्या बाहेर काढत रंग लावत हा सण साजरा करण्यात आला. शहरातील चौका चौकात तरुणाई चित्रपटातील गाण्यावर जल्लोष करीत या सणाच्या उत्साहात अधिक भर घालत होते. पिचकाऱ्यांच्या साह्याने एकमेकांच्या अंगावर रंग टाकण्यात हे चिमुकले दंग झाले होते.

पंचवटी कारंजा, रविवार कारंजा अशोकस्तंभ, मेहेर महात्मागांधी रोड, मेनरोड परिसरात मोठ्या धुमधडाक्यात सादर करण्यात आली. काही सोसायट्यांमध्ये पाण्याचा वापर न करता कोरडा रंग खेळण्यात आला. परंतु, काही ठिकाणी मात्र कशाचीही तमा न बाळगता यथेच्छा पाणी खेळण्यात आले, संध्याकाळी रामकुंड, घारपुरे घाट, येथे नागरिकांनी आंघोळीसाठी गर्दी केली होती. नदीचे पाणी लाल झाले होते. यानंतर श्रमपरिहार म्हणून भेळभत्ता व पाववड्यांवर ताव मारतांना मंडळी दिसत होती. भद्रकाली येथील शिवसेवा मित्रमंडळाच्यावतीने मोठ्या धुमधडाक्यात रंगपंचमी साजरी करण्यात आली. येथे पारंपारिक पावडरच्या रंगाबरोबरच पाण्याचाही वापर करण्यात आला. डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

सेलिब्रेटींनीही केली रंगांची उधळण

नाशिकच्या कलाकारांनी परशुराम साईखेडकर नाट्यगृहाबाहेर येत रंगपंचमी साजरी करण्याचा पायंडाच पडला आहे. नेहमीच मुंबई-पुणे चमकवणारे, मूळ नाशिकचे असलेले सर्व कलाकार रंगपंचमीच्या दिवशी एकत्र जमतात. 'पसा'च्या बाहेर काही खेळ होतात. गाणी लावून त्यावर डान्स केला जातो. ही परंपरा यंदाही जपत नाशिकच्या कलाकारांनी रंगपंचमीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. रंगपंचमी साजरी करण्यासाठी आनंद ढाकिफळे, मोहन उपासनी, विद्या करंजीकर, दीपक करंजीकर, जयेश आपटे, पंकज क्षेमकल्याणी, आनंद क्षेमकल्याणी, विनोद राठोड, सुभाष दसककर, संजय गिते, विनायक रानडे, सुजीत काळे, सुमुखी अथनी, भूषण मटकरी, अमोल पाळेकर, ईश्वर जगताप, पल्लवी पटवर्धन, प्रमोद भडकमकर यांनी सहभाग घेतला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांकडे २२ विभागांची जबाबदारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेत नव्याने रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्याकडे आयुक्तांनी ४२ पैकी २२ विभागांची जबाबदारी सोपवली आहे. त्यात अतिक्रमण विभागासह आपत्ती व्यवस्थापन, क्रीडा, अग्निशमन दल शिक्षण मंडळाचा समावेश आहे. कामांच्या विभागणीमुळे सिंहस्थ कामांना गती येणार आहे.

नाशिक महापालिकेचा समावेश 'ब' वर्गात झाल्याने शासनाकडून अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल चव्हाण यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार स्विकारला आहे. त्यामुळे आयुक्तांनी आपल्या कामांचे विभाजन केले असून अतिरिक्त आयुक्तांकडे २२ विभागांची जबाबदारी सोपवली आहे. कामांच्या विभागणीमुळे पालिकेतील कामांना गती मिळेल असा दावा केला जात आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीचा कहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हवामानातील बदलांमुळे अवकाळी पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले असून बुधवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये तब्बल १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल १,६९० हेक्टर तर एकट्या सिन्नर तालुक्यात १,५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गुरुवारीही पावसाने जिल्ह्यात चांगली हजेरी लावली असून रविवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

एकट्या सिन्नर तालुक्यात १,५०० हेक्टर पिकांवर घाला

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून या पावसाचा मारा सुरु झाला आहे. बुधवारी दिवसभरात पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात चांगलीच हजेरी लावली. यात सर्वाधिक पाऊस सिन्नर तालुक्यात ५१.७ मिलीमीटर इतका नोंदला गेला. सिन्नर तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो मात्र या तालुक्यात अवकाळीच्या जोरदार धारा बरसल्याने तालुक्यातील २७ गावांमधील तब्बल १,५०० हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर, नाशिक तालुक्यात द्राक्ष आणि गव्हाचे १०० हेक्टर, दिंडोरी तालुक्यात हरभरा, गहू, द्राक्ष यांचे ५० हेक्टर, निफाड तालुक्यात गहू आणि द्राक्षाचे ४० हेक्टर, सिन्नर तालुक्यात गहू, द्राक्ष आणि कांदा पिकाचे १,५०० हेक्टरवर नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. बुधवारच्या पावसात जिल्ह्यात एकूण ३ जनावरे मृत्युमुखी पडली असून ११० घरांची अंशतः पडझड झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ४४ गावांमध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. गुरुवारीही जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने मोठी हजेरी लावली असून त्याची दखल घेत या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, येत्या रविवारपर्यंत गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणखीनच हवालदिल झाले आहेत. तर, जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाचा हैदोस सुरु असतानाच सिन्नर तालुक्यात बुधवारी झालेल्या नुकसानीचे विस्तृत पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॉमा केअरसाठी लवकरच तरतूद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील ग्रामीण रुग्णालयाचा सन २००९ पासून खान्देश विकास पॅकेजमध्ये समावेश आहे. केवळ पाठपुरावा न झाल्याने हे काम प्रलंबित आहे. तसेच सटाणा येथील ट्राॅमा केअरसाठी एप्रिल महिन्यात कर्मचारी भरतीसाठी तरतूद करण्याची ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. ही माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार चव्हाण म्हणाल्या की, मुल्हेर येथे २२ जुलै २००९ मध्ये लोकशाही आघाडी शासनाने खान्देश विकास पॅकेज अंतर्गत मुल्हेरसह परिसरातील आदिवासी बांधवांना तातडीचे उपचार होऊन रुग्णसेवा मिळावी या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयास मंजुरी दिली होती. मात्र, यानंतरच्या काळात या ग्रामीण रुग्णालयासाठी गत काळात शासनदरबारी पाठपुरावा करण्यात न आल्याने प्रशासकीय मान्यता व आर्थिक निधी उपलब्ध होऊ शकला नाही. यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत व आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांना प्रत्यक्ष भेटून व्यथा मांडण्यात आली. यामुळे ना. सावंत यांनी या संदर्भात तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याबरोबरच जूनमधील पुरवणी अर्थसंकल्पात या कामाचा समावेश करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच, सटाणा शहरातील ट्राॅमा केअरसाठी मंजूर नसलेला कर्मचारी वर्ग तातडीने देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात येवून कर्मचारी भरती करण्याचे अभिवचन दिल्याने ट्राॅमा केअर युनिट सुरू होण्याच्या अपेक्षा वाढल्या असल्याची माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनींच्या मोर्चानंतर अधीक्षकाची बदली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या वसतिगृहातील अधीक्षकेच्या बदलीच्या मागणीसाठी मोर्चा काढूनही कार्यवाही न झाल्याने संतप्त विद्यार्थिनींनी कळवण येथे पायी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. सदरचा मोर्चा ठेगोंडा शिवारात अडवून महिला अधीक्षकांचा कार्यभार हस्तांतरीत करण्यात आल्यानंतर आंदोलकांनी मार्ग वळविला.

येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर आवारात आदिवासी विद्यार्थिनींचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहातील महिला अधीक्षक एल. बी. कापडणीस यांच्या कामकाजामुळे व वागणुकीमुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी त्रस्त झाल्या होत्या. परिणामी गत पंधरवाड्यातच या विद्यार्थिनींनी तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना भेटून निवेदन सादर केले होते. यानंतर नाशिक आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी पाठविले होते. यानंतर देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

या पार्श्वभूमीवर संतप्त विद्यार्थिनींनी विंचूर-शहादा-प्रकाशा राज्य महामार्गावरून जाताना प्रांत कार्यालयाजवळ मोर्चा येताच प्रांत अधिकारी संजय बागडे यांनी मुलींनी थांबण्याचे आवाहन केले. वरिष्ठांना दूरध्वनीवरून माहिती देवून त्यांनी विद्यार्थिनींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थिनींनी हट्ट कायम ठेवीत मोर्चा पुढे नेणे सुरूच ठेवले. यानंतर ठेगोंडा शिवाराजवळ मोर्चा येताच प्रकल्प अधिकारी ए. ए. चव्हाण यांनी कळवणहून येत त्यांना रस्त्यात थांबविले. तोपर्यंत पोलिसही थांबले होते. संबंधित अधीक्षकेची बदली करण्यात आल्याचे सांगत त्यांच्या जागेवर पर्यायी दुसऱ्याने पदभार स्वीकारल्याचे विद्यार्थिनींना त्यांना वसतिगृहात सोडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंडगिरीविरोधात महिलांचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोडला सौरव बर्वे या सतरा वर्षाच्या युवकाच्या झालेल्या हत्याप्रकरणी आरोपींना कठोर शासन करावे, गुंडगिरीचा बिमोड करावा या मागणीसाठी गोरेवाडीतील महिलांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यावर शुक्रवारी मोर्चा काढत संताप व्यक्त केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले. सौरवची रंगपंचमीच्या रात्री साडेनऊच्या सुमारास जेलरोडच्या सैलानी बाबा चौकातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ कोयते आणि लोखंडी रॅडच्या सहाय्याने हत्या करण्यात आली होती. सौरव रहात असलेल्या गोरेवाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. महिला व नागरिकांनी सर्व संशयितांना अटक करावी, गुंडांचा कायमचा बंदोबस्त करावा आदी मागण्यांसाठी गोरेवाडीपासून मोर्चा काढला. मध्यवर्ती कारागृह रोड, भीमनगर, बिटको मार्गे मोर्चा पोलिस ठाण्यावर नेण्यात आला. पोलिस ठाण्याच्या आवारात महिलांनी तासभर ठिय्या दिला. वरिष्ठ निरीक्षक न्याहाळदे यांनी आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी साक्षीदारांनी पुढे यावे असे आवाहन केले. नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतली तर गुंडगिरीचा बिमोड करता येईल, असे सांगून कठोर कारवाईचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. मोर्चात शांताबाई पगारे, माधुरी भोळे, नाजाबाई सोनवणे, कमल निकम, शकंतुला धुळे, विमल तडवी, सत्याबाई गाडे, प्रतिमा पवार, ताईबाई भंडागे, जयश्री थोरात, शकंतुला देवरे, जीजाबाई साळवे, निर्मला हिरे, सुरेखा पवार, रेखा भामरे आदींचा समावेश होता.

संशयितांना अटक

सौरव बर्वेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी प्रतिक विजय बर्वे (२२), सचिन उर्फ पप्पू अरुण घाडगे, निलेश शंकर बोराडे (२१), सचिन अरुण कळमकर (२३, सर्व रा. जेलरोड) या चार जणांना ताब्यात घेतले असले तरी काहीजण अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने राबवलेल्या कृषी संजिवनी योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी या योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सरकारने कृषी संजीवनी योजनेला ३१ ऑक्टोबर २०१४ पर्यंत मुदतवाढ दिली होती. या योजने अंतर्गत कृषी ग्राहकांनी त्यांच्या ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या थकबाकीतील मुळ रकमेची ५० टक्के रक्कम भरली तर उरलेली ५० टक्के मुळ रक्कम व थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड माफ होणार होते. तसेच १ एप्रिल २०१४ नंतर वितरित करण्यात आलेल्या चालू वीज देयकाचा भरणा करणे क्रमप्राप्त होते. या मुदतवाढीमुळे या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कृषी ग्राहकांना ३१ मार्च २०१४ च्या मूळ थकबाकी रकमेच्या ५० टक्के रक्कम ३१ मार्चपर्यंत भरावी लागणार आहे. तसेच १ एप्रिल २०१४ नंतर वितरित करण्यात आलेल्या चालू वीज देयकाचा भरणा करणे क्रमप्राप्त आहे. आतापर्यंत कृषी संजिवनी योजनेत नाशिक जिल्ह्यातील २ लाख ८६ हजार ३५४ कृषी पंपधारक भाग घेण्यास पात्र होते. त्या पैका ७७ हजार ७८७ कृषी पंपधारकांनीच योजनेचा लाभ घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ४१५ कृषी पंपधारक या योजनेसाठी पात्र असून त्यापैकी ६६ हजार ७८८ कृषी पंपधारकांनीच योजनेचा लाभ घेतला आहे.

कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना किती रक्कम भरावी लागणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा किती लाभ होणार याचा संपूर्ण तपशील महावितरणने वितरित केलेल्या वीज बिलाच्या डाव्या बाजूला दिला आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेतून थकबाकी मुक्त व्हावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाही मिरवणुकीस भाविक मुकणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाही मिरवणुकीचा देखणा सुखसोहळा याचि देही याचि डोळा जवळून पहाता यावा अशी तमाम नाशिककरांची इच्छा आहे. मात्र, गतवेळी सरदार चौकात घडलेली चेंगराचेंगरीची दुर्घटना आणि यंदा बदलण्यात आलेला शाही मिरवणुकीचा मार्ग यामुळे प्रत्यक्ष गोदाघाट परिसरात थांबण्यासाठी भाविकांना खूप कमी जागा शिल्लक राहणार आहे. परिणामी हजारो भाविकांना मिरवणुकीच्या आनंद सोहळ्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

गतवेळी सरदार चौकात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. त्यामध्ये २९ भाविकांनी जीव गमावल्याने या सोहळ्याला गालबोट लागले. यंदा मात्र असे काही घडू नये म्हणून प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. सरदार चौकातील उतार धोकादायक असल्याने यंदा प्रशासनाने साधू महंतांची संमती मिळवून शाही मिरवणुकीचा मार्गही बदलला आहे.

गतवेळी सरदार चौकातून मिरवणूक येणार असल्याने म्हसोबा महाराज पटांगणावर भाविकांना प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे हजारो भाविकांना मिरवणुकीचा आनंद लुटणे शक्य झाले. मात्र, यंदा मिरवणूकच म्हसोबा महाराज पटांगणावरून येणार असल्याने हा मार्ग भाविकांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे कन्नमवार पूल ते रामकुंड या मार्गात खूपच कमी जागेत भाविक थांबू शकणार आहेत. मालेगाव स्टॅन्डमार्गे मिरवणुकीचा परतीचा मार्ग असल्याने हा मार्गही भाविकांसाठी बंद असणार आहे.

प्रशासनाचे विशेष लक्ष

सरदार चौकातही प्रवेश बंद असणार राहणार असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या एकूणच मार्गावर प्रशासन विशेष लक्ष पुरवित आहे. भाविकांना गोदाघाट परिसरातून मार्गस्थ होणाऱ्या शाही मिरवणूक सोहळ्याला मुकावे लागणार आहे. गतवेळी यशवंत महाराज पटांगणासून निलकंठेश्वर मंदिर, बालाजी कोट, मुकं देऊळ, मोदकेश्वर मंदिर, टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत भाविक थांबले होते. यंदा केवळ याच भागात भाविकांना थांबावयास मिळू शकते असे प्रशासनाकडून सुरू असलेल्या नियोजनावरून दिसते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जनतेपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सुविधा जनतेपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांनी केले. दादासाहेब गायकवाड सभागृह येथे झालेल्या डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या.

कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील यंत्रणेने कामगिरी उंचावण्याची अधिक प्रयत्नांची गरज आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशिलता बाळगण्याची गरज आहे, असेही चुंबळे यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालय कळवण, प्राथमिक आरोग्य केंद्रात खामखेडा (देवळा), पांढुर्ली (सिन्नर) आणि नैताळे (निफाड), तर उपकेंद्रात दरी (नाशिक), पिंप्री (येवला) आणि अजंग (मालेगांव) या केंद्रांना मान्यवरांच्या हस्ते डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच कुटुंब कल्याण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या आशा कार्यकर्त्या व संस्थात्मक प्रसुती वाढविण्यासाठी चांगले काम करणाऱ्या आरोग्य सेविकांनाही सन्मानित करण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, आरोग्य व शिक्षण सभापती किरण थोरे, आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, जि. प. सदस्य यतिन पगार, मनीषा बोडके, भारती पवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीशिवाय वर्कऑर्डर नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी सेस अंतर्गत प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाल्याशिवाय प्रत्यक्षात वर्कऑर्डरचे आदेश देता येणार नाहीत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. दरम्यान, या एकूण ३५ कोटींच्या विकासकामांसाठी मंजूर सदस्यांच्या हाती पडणाऱ्या १४ कोटी रुपयांचे ढासळलेले नियोजन आणि १९३ विकासकामांचा प्राधान्यक्रम या मुद्यांवरून सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला.

जिल्हा परिषदेस 'सेस' अंतर्गत कामांसाठी दोन टप्प्यात १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. या अंतर्गत १९३ विकासकामे प्रस्तावित आहेत. ३१ मार्चपर्यंत हा निधी उपयोगात येणे गरजेचे असल्याने हाती असलेल्या कालावधीत याचा उपयोग होईल का ? असा सवाल काही सदस्यांनी उपस्थित करीत या पैशांचे नियोजन झाले नसल्याचा मुद्दा मांडला. या विषयाच्या अनुषंगाने सभागृहाने केलेल्या ठरावानंतरही प्रोसिडींगमध्ये नव्या अटी घुसविण्यात येऊन मनमानी करण्याचाही आरोप यावेळी सदस्यांनी केला. मात्र, हा मुद्दा खोडून काढताना जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांनी प्रोसिडींगमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल झाले नसल्याचे सांगितले. दरम्यान सदस्यांकडून आक्षेप घेण्यात आलेल्या अटीही यातून रद्द करण्यात आल्या. या निधीच्या ढिसाळ नियोजनाबाबत सवाल उपस्थित करणारे सदस्य आणि संदिग्ध उत्तरे देणारे प्रशासन यांच्यात यामुळे जुंपल्याचे चित्रही या सभेत बघण्यास मिळाले. तर, प्रत्यक्षात कामांऐवजी सदस्यांची पार्श्वभूमी बघूनच कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात येत असल्याचा आरोप यावेळी सदस्यांच्या वतीने प्रशासनावर केला.

प्रत्यक्षात ३५ कोटी क्षमतेच्या कामांसाठी १४ कोटी निधी उपलब्ध होत असेल तर उर्वरित २१ कोटींची तरतूद कुठून करावी? असाही प्रश्न उपस्थित झाला. यावर बोलताना सीईओ सुखदेव बनकर यांनी सन २०१५-१६ च्या बजेटमध्ये २१ कोटींच्या या निधीची मागणी कुणीच उपस्थित न केल्याच्या मुद्यावर आश्चर्य व्यक्त केले. प्राथमिक शाळा निर्लेखनांतर्गत वर्गखोल्या मंजुरीसाठी २.५० कोटी मंजूर झाल्याचे तर आणखी दीड कोटींची मागणी केल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रहिम मोगल यांनी दिली. सर्वसाधारण सभेत एकूण २२ विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीवर वादळी ठरलेला ८० लाखांच्या व्याजाचा मुद्दाही अपेक्षेप्रमाणे सभेत आला.


'राष्ट्रवादी'तील धुसफूस चव्हाट्यावर

सेस अंतर्गत १४ कोटींच्या निधीच्या ढिसाळ नियोजनाचा मुद्दा माजी जि. प. अध्यक्ष यांचे पती व जि. प. सदस्य नितीन पवार यांनी उपस्थित केला. यावेळी हे नियोजन माजी अध्यक्षांच्या कार्यकाळापासून असल्याने त्यांनी काय केले? असा सवाल विद्यमान अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांनी उपस्थित केला. यावर नितीन पवार यांनी प्रतिप्रश्न उपस्थित करताना, त्यांनी तर जि. प. चे वाटोळेच केले मात्र गत पाच महिन्यांपासून आपण काय करीत आहात ? असा उपरोधिक मुद्दा उपस्थित केला. या शाब्दिक चकमकीमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस ‍चव्हाट्यावर आली.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांमध्ये पावणे दोनशे शौचालये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि त्यांचे आरोग्यही सांभाळले जावे या उद्देशाने मार्च अखेरपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळांना आणखी १७० शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने दिले आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत जिल्हाभरात सुमारे ३ हजार ३५६ शाळा आहेत. यातील १७० शाळांना मार्च अखेरपर्यंत आणखी १७० शौचालयांच्या उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या शौचालयांसाठी १ लाख १४ हजार रुपये निधी देण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या शौचालयांसाठी ९५ हजार याप्रमाणे सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३९ शौचालये नांदगाव तालुक्यात तर सर्वात कमी १ शौचायल सिन्नर तालुक्यातील जिप शाळेत उभारण्यात येणार आहे.

नांदगाव - ३९

निफाड - ३१

इगतपुरी - २१

मालेगाव - १८

येवला - १५

दिंडोरी - १०

चांदवड - १०

बागलाण - ९

देवळा - ६

नाशिक - ४

पेठ - ४

कळवण - २

सिन्नर - १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लीन इंडियाला जोड प्रात्यक्षिकांची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातर्फे आयोजित फोर्स २०१५ या राष्ट्रीय स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेत 'क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया' या संकल्पनेला प्रत्यक्षिकांची जोड देण्यात आली आहे. स्वच्छतेच्या संकल्पनेवर आधारित बहुविध प्रकल्पांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग आणि सिव्हिल इंजिनीअरिंग स्टुडण्टस असोसिएशन (सेसा) यांच्या वतीने फोर्स २०१५ ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी प्रदूषण या थीमवर आधारित प्रकल्प सादर झाल्यानंतर यंदा 'क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया' ही थीम घेण्यात आली आहे. सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्राद्वारे प्रदूषण रोखण्यासंबंधीचे बहुविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत. स्पर्धेचे उदघाटन के के वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त काशिनाथ टर्ले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य केशव नांदूरकर, विभागप्रमुख डॉ. पी. डी. जाधव, इव्हेंट कोऑर्डिनेटर प्रा. श्रीकांत बाविस्कर, सेसा प्रेसिडेंट संदेश माने, प्रा. सुहास पंडित आदी उपस्थित होते. सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला आहे. ग्रीन बिल्डींग, ग्रीन आर्किटेक्चर, ग्रीन टाऊनशीप्स, ग्रीन बंगलो यासह विविध प्रकारच्या संकल्पनांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत. उदघाटन समारंभानंतर ब्रीज ओ मानिया, कॅड एन्झा, सर्व्हेइंग एव्हरेस्ट, टॉवर पॉवर, ड्रामा, पोस्टर स्पर्धा, क्वीझ स्पर्धा, स्नॅप हंट आदी कार्यक्रमांचे आयोजन झाले. ड्रामा आणि जनरल नॉलेजवर आधारित शनिवारी (दि. १४) कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुकिंग करूनही मिळेना सिलिंडर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

पंधरा ते वीस दिवसांपासून गॅस सिलिंडरचे बुकिंग करूनही मिळत नसल्याने लासलगाव व परिसरातील नागरिक येथील एचपी गॅस एजन्सीच्या कारभाराला वैतागले आहेत. सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या गॅस ग्राहकांनी बुधवारी येथील एजन्सीचे कामकाज बंद पाडत कर्मचाऱ्यांना काही वेळासाठी ऑफिसमध्ये कोंडून ठेवत संताप व्यक्त केला.

बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये सध्या कमालीची वाढ झाली आहे. घरपोच डिलेव्हरी मिळणे कठीण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून दररोज पहाटे पाच वाजेपासून शेकडो नागरिक सिलिंडर मिळेल या आशेने लासलगावच्या जाधव गॅस एजन्सीबाहेर रांगांमध्ये उभे राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही अनेकांना सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. याचा प्रत्यय बुधवारी लासलगाव येथे पहावयास मिळाला. पहाटेपासूनच शेकडो नागरिक सिलिंडर घेण्यासाठी रांगेत उभे होते. दुपारी बारा वाजेपर्यंत एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास थांबूनही सिलिंडर मिळत नसल्याने अखेर नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट ऑफिसमध्ये शिरकाव करीत कामकाज बंद पाडले आणि कर्मचाऱ्यांना कोंडले. एजन्सीची वितरण व्यवस्थाच कोलमडून पडल्याने आता सिलिंडरचा पुरवठा कधी सुरळीत होतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

गेल्या चार दिवसांपासून दररोज येथे सिलिंडर घेण्यासाठी फेरा मारत आहे. येथे आल्यावर एजन्सीकडून व्यवस्थित माहिती दिली जात नसून, तासनतास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळणे कठीण झाले आहे. - चंद्रकला कडरे, गॅस ग्राहक

बुकिंग करून महिना झाला. मात्र, एजन्सी आम्हाला केवळ फेऱ्या मारायला लावत आहे. पाच दिवसांपासून सिलिंडर घेण्यासाठी रिक्षाने येथे येत आहे. सिलिंडर तर मिळतच नाही रिक्षा भाडे वाया जात आहे. - ग्यासउद्दीन मणियार, ग्राहक

एचपी कंपनीकडूनच सिलिंडरचा पुरवठा कमी झाला असल्याने वितरण व्यवस्था कोलमडली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू असून, पुरवठा वाढवून वितरण सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. - बाळासाहेब जाधव, संचालक, जाधव गॅस एजन्सी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांवर पुन्हा बुलडोझर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिकमध्ये काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा सातपूला झंझावात पहायला मिळाला. गंगापूररोड बारदान फाटा ते अशोकनगर बस स्टॉपपर्यंत रस्त्यालगतची शेकडो अनधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे अनेक वर्षांपासून अशोकनगर रस्त्याचा गुदमरलेला श्वास मोकळा झाला.

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहरात मुख्य रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात अनेक वर्षांपासून गंगापूररोडवरील मोठ्या प्रमाणात असलेल्या हॉटेलांच्या अतिक्रमणावर महापालिकेने बुलडोझर चालविला होता. यामुळे शहरातील प्रसिद्ध गंगापूररोडवरील अतिक्रमण काढल्याने अनधिकृत शेडधारकांनी त्याची धास्ती घेत स्वतःहून अतिक्रमण काढले. परंतु, अनेक दिवसांपासून सातपूरला अतिक्रमण मोहिमेने विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच गंगापूररोडवरील बारदान फाट्यापासून अतिक्रमण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यात बारदान फाट्यावरच असलेल्या अनधिकृत हॉटेलचे सर्वात प्रथम अतिक्रमण काढण्यात आले. यानंतर बारदान फाटा ते शिवाजीनगर कार्बननाकापर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले अनधिकृत शेड व वॉलकंपाऊंडचे अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आले. दुसऱ्या भागात शिवाजीनगर कार्बन नाका ते अशोकनगरपर्यंतच्या रस्त्यालगतचे अतिक्रमणही जमिनदोस्त करण्यात आले. अतिक्रमण मोहीम सुरू असतांना बघ्यांची एकच गर्दी मोहिमेच्या ठिकाणी झाली होती. परंतु, बारदान फाटा ते शिवाजीनगर कार्बननाकापर्यंत गंगापूर पोलिस ठाणे, तर कार्बननाका ते अशोकनगरपर्यंत सातपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी होत असलेली गर्दी पांगविण्याचे काम करत होते. मोहिमेत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे यांसह नगररचना, विद्युत, आरोग्य व अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. तसेच गंगापूर व सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, अधिकारी व पोलिस हवालदार यांनी मोहिमेत चोख बंदोबस्त ठेवला.

हवालदाराकडून विरोधाचा प्रयत्न

महापालिकेच्या मोहिमेत जाधव नावाच्या हवालदाराने भवर टॉवर समोरील अतिक्रमण हटविण्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी विभागीय अधिकारी पगारे यांनी हवालदारास आपण ऑनड्युटी असल्याची जाणीव करून दिली. यानंतर गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाधव हवालदारास बाजूला करत त्यांचे पत्र्याचे शेड हटविण्याचे आदेश दिले. जाधव यांच्या मुलांनी जेसीबी चालकावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला करत जाधव यांचे अनधिकृत शेडचे अतिक्रमण अखेर काढलेच. यावेळी कायद्याचे पालनाची जबाबदारी असलेल्यांनीच कायदा हातात घ्यावयाचा काय, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

मटाच्या वृत्ताची महापालिकेकडून दखल

'मटा'ने अनधिकृत हॉटेलांमुळे रस्त्यांच्या कामात अडथळा येत असल्याचे वृत्त प्रसारित केले होते. याची दखल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने घेत सर्वच अनधिकृत हॉटेल्स अतिक्रमण मोहिमेत हटविण्यात आली. तसेच उर्वरित हॉटेल्सचे अनधिकृत अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मवीर एक्स्पोला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के के वाघ इंजिनीअरींग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल विभागाच्यावतीने आयोजित कर्मवीर एक्स्पोला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेत देशभरातील तब्बल ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांचे अत्यंत नावीन्यपूर्ण प्रकल्प यात सादर झाले असून, शनिवारी या एक्स्पोचा समारोप होणार आहे.

इलेक्ट्रिकल विभाग आणि आयईटी (युके) नाशिक लोकल नेटवर्क यांच्यावतीने या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या एक्स्पोच्या उद्घाटन समारंभप्रसंगी कॅटाफार्मा केमिकल्सचे चेअरमन डॉ. श्रीकांत कारवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कल्पना तंत्रज्ञानाने बदलतील. स्वतःवर भरवसा ठेवून काम करायला हवे. एक दिवस तंत्रज्ञान बदलेल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी एमएसएस इंडियाचे एमडी मंगेश नटाल, कोसो इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष उमेश वानखेडे, इलेक्ट्रो फॅबचे एमडी युत्कर्षा सांगवी, अविनाश शिरोडे, अजय कहाने, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी एक्स्पोची माहिती दिली. केंद्र सरकारने मांडलेल्या मेक इन इंडिया या संकल्पनेला या एक्स्पोमध्ये अधिक चालना देण्यात आली आहे. देशाच्या विविध भागातील विद्यार्थी एक्स्पोत सहभागी झाले असून, त्यांनी खासकरून समाजोपयोगी व अपारंपरिक ऊर्जेवर आधारीत प्रकल्प सादर केले आहेत. स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बस डेपो कागदोपत्री पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथे नवीन बसडेपोचे काम पूर्ण झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात दोन महिन्याहून अधिक काळापासून येथे पंप बसू शंकलेला नाही. आताही कामे पूर्ण झाल्याचे कागदीघोडे नाचविणारे महामंडळ लवकरच पंप बसविला जाईल, असेच सांगण्यात मश्गूल आहे. त्यामुळे कुंभमेळा तोंडावर आला असताना हे काम पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात सर्व सरकारी विभागांनी सिंहस्थाच्या कामाचे सुक्ष्म नियोजन केले असताना महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे काम मात्र संथगतिने सुरू आहे. शहरात सध्या दोन बस डेपो आहेत. त्यांच्या माध्यमातून शहर वाहतुकीचे नियोजन करण्यात येत असते. गेल्या काही वर्षात शहराचा भौगोलिक विस्तार वाढल्याने शहराला आणखी एका बस डेपोची गरज होती. ही गरज ओळखून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथे नव्याने बस डेपो मंजूर करण्यात आला. त्याच्या कामाला देखील

सुरुवात करण्यात येऊन काही काम पूर्ण करण्यात आले. हा बस डेपो सुरु करण्यासाठी येथे पेट्रोल पंपाची आवश्यकता आहे.

या पेट्रोल पंपाचे काम अजून सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे पेट्रोल पंपाविना बस डेपो सुरू झाला, तर पेट्रोल भरण्यासाठी गाड्या नाशिकला येणार का असा प्रश्न आहे. नव्याने होत असलेल्या डेपोतील रस्ते मुरूम टाकून तयार करण्यात आले आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर येथे गाड्या आणणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे या डेपोतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत आहे. तसेच येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाही.

त्यामुळे कर्मचारी येथे काम कसे करणार याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. सिंहस्थात डेपो सुरू झाल्यानंतर अडचणींचे निराकरण करण्यास अवघड जाईल. नवा एसटी डेपो टप्प्याटप्याने प्रायोगिक तत्वावर सुरू करावा नाशिकरोड व आसपासच्या गाड्या तेथून सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.

काम पूर्ण झाल्याचा दावा

नाशिकरोडच्या डेपोचे काम पूर्ण झाल्याचा दावा एसटी प्रशासनाने ३१ जानेवारी रोजी दिवाकर रावते यांनी घेतलेल्या मिटिंगमध्ये केला होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही घेतलेल्या मिटिंगमध्ये काम पूर्ण झाल्याचा दावा महामंडळाने करून आपली पाठ थोपटून घेतली होती. महामंडळाच्या दृष्टीने काम पूर्ण झाले असेल, तर डेपो का सुरू केला जात नाही, असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसी कंपन्यांमध्ये पीएचडी सेंटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय पातळीवर औषधांचे उत्पादन करणाऱ्या फार्मसी कंपनीत संशोधन आणि विकासाचे काम चालत असेल तर तेथेच पीएचडीचे सेंटर सुरू करण्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रयत्नशील असल्याची माहिती कुलगुरु डॉ. अरुण जामकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात संशोधनाला अधिक चालना मिळणार आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एज्युकेशन अॅड रिसर्च (नायपर) ही संस्था नाशिकला स्थापन करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आयोजित 'मटा राऊंड टेबल कॉन्फरन्स'मध्ये डॉ. जामकर बोलत होते. नाशिकमध्ये ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या बहुराष्ट्रीय कंपनीचे अत्याधुनिक असा संशोधन आणि विकास विभाग (आर अँड डी) आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात विविध प्रकारच्या औषधांवर संशोधन करुन नवनवीन औषधे बाजारात आणली जात आहेत. अशा प्रकारचा विभाग हा त्या फार्मसी कंपनीची खऱ्या अर्थाने संपत्ती असते. ही बाब लक्षात घेऊन आणि संशोधनाला चालना मिळावी म्हणून त्या विभागालाच पीएचडी सेंटरची मान्यता देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे डॉ. जामकर यांनी सांगितले. विभागात काम करणारे अधिकारीच या सेंटरद्वारे विद्यार्थ्यांना गाईड म्हणून उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरात किंवा गावातच पीएचडीची संधी उपलब्ध होऊ शकेल. इच्छूक कंपन्यांनी त्यांचा प्रस्ताव विद्यापीठाला सादर करावा, असे आवाहनही कुलगुरुंनी केले आहे. फार्मसी कंपन्यांना करावयाच्या संशोधनाचा विषय विद्यार्थ्यांना दिला तर विद्यार्थी याच विषयात प्रकल्प सादर करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण असा विषय मिळेल तर कंपनीला त्या विषयातील संशोधन करुन माहिती उपलब्ध होईल. शिक्षण क्षेत्र आणि उद्योग यांची सांगड घालण्यास ही बाब अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास डॉ. जामकर यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी धिंगाणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुरुवार पाठोपाठ शुक्रवारीही जिल्ह्याच्या काही भागाला अवकाळी पाऊस व गारपिटीचा सामना करावा लागला. दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसासह तुफान गारपीट झाली. तसेच, येवला, नांदगाव व जिल्ह्याच्या इतर भागांतही जोरदार पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. दिंडोरी तालुक्यात काही भागात चार इंचाचे गारांचे थर साचले होते. रात्री उशिरापर्यंत अवकाळीचे थैमान सुरूच होते. गहू, कांदा व भाजीपाल्याचेही मातेरे झाले आहे.

दिंडोरी तालुक्यात ओझरखेड, वणी-पिंपळगाव परिसर, मावडी फाटा, बहादुरी, तीसगाव येथे तुफान गारपीट झाली. शेतामध्ये सुमारे चार इंचाचा गारांचा थर साचला होता. शेतात पांढरी चादरच पसरल्याचे दृश्य दिसत होते. या भागात निर्यातक्षम द्राक्षे मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असल्याने द्राक्ष उत्पादकांवर कु-हाडच कोसळली आहे.

निफाड तालुक्यात लासलगाव, विंचूर, नैताळे, शिवरे फाटा, निफाड, कोठुरे, पिंपळस, चांदोरी आदि भागात अवकाळी पावसाच्या सारी कोसळल्या आहेत. नांदगाव व येवला तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. गेल्या मार्चची पुनरावृत्ती गेल्या वर्षी मार्च महिन्यातच तुफान गारपीट झाली होती. ४, ५, ६, ९ व १३ मार्च या काळातच अवकाळी पाऊस व गारपिटीचा मारा झाला होता. यंदा पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याची विक्रमी आवक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याची विक्रमी आवक झाली. दिवसभरात तब्बल ४५ हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली होती. कांदा विक्रीसाठी सुमारे २२०० वाहने बाजार समितीत दाखल झाल्याने बाजार आवर गर्दीने फुलून गेले होते.

एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणत आवक झाल्याने लासलगावच्या मुख्य रस्त्यांवर कांद्याच्या ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेकवेळा ट्रॅफिक जॅम झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. सध्या निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. तयार झालेला कांदा अवकाळी पावसात खराब होण्याची भीती असल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. त्यातच रविवारी साप्ताहिक सुट्टी व सोमवारी माथाडी कामगारांनी मुंबई येथे एक दिवसाचा संप करणार असल्याचे जाहीर केल्याने सोमवारीही बाजार समिती बंद राहणार आहे. सलग सुट्यांमुळे व बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन वाढीसाठी सर्व्हेक्षण गरजेचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टुरिझम वाढविण्यासाठी नामांकीत व्यावसायिक संस्थेकडून सर्व्हेक्षण व्हायला हवे. तसेच, हेरिटेज वॉकची संकल्पना अस्तित्वात आणायला हवी, असा सूर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि ट्रॅव्हल एजन्टस् असोसिएशन ऑफ नाशिक (तान) द्वारे आयोजित नाशिक टुरिझम कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन सोहळ्यात उमटला.

हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आयोजित तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रामचंद्र भोगले, राधाकिसन चांडक आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. पर्यटनवाढीसाठी टूर कंपन्यांनी नाशिकला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. परिषदेत देशरातील टूर कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

पर्यटनाच्या दृष्टीने ना‌शिकच्या वैशिष्ट्यांची माहिती त्यांना देण्यात आली. नाशि‌कमध्ये अजूनही हॉटेल्सची संख्या कमी आहे. ती वाढायला हवी, अशी अपेक्षा महापौर मुर्तडक यांनी व्यक्त केली. तर, पर्यटन वाढीसाठी पर्यटन विकास आराखडा तयार करून तो अंमलात आणता येऊ शकतो, असा विश्वास बग्गा यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये पर्यटनस्थळे आहेत. परंतु, अजूनही सोयी सुविधांची कमतरता असल्याची खंत आयुक्त डॉ. गेडाम यांनी व्यक्त केली.

हॉटेल गाईड या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. राधाकिसन चांडक, नारायण शेलार आणि महेंद्रपाल चौधरी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र चेंबर्सचे संतोष मंडलेचा, तानचे दत्ता, सिराज शेख आदींनी परिश्रम घेतले. उमेश पठारे, जयंत ठोंबरे, अनुराधा मटकरी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images