Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

निकालात निचांक कॉपीत उच्चांक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल निचांकी लागला आहे तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कॉपीबहाद्दर असल्याचे आढळून आले आहे. नाशिक विभागातील एक लाख चाळीस हजार ८२४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८६ विद्यार्थी गैरमार्ग प्रकरणात प्रकरणे उघडकीस आले. त्यातील १५ विद्यार्थ्यांना चौकशीअंती दोषमुक्त करण्यात आले होते.

उर्वरित ७१ विद्यार्थ्यांना मंडळ शिक्षासूचीनुसार कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी कॉपी करणाऱ्यांमध्ये ६२ विद्यार्थी पकडले गेले. नाशिक जिल्ह्यामध्ये ३०, धुळे जिल्ह्यात ०८, जळगाव जिल्ह्यात २४ व नंदूरबार जिल्ह्यात ०९ विद्यार्थ्यांचा समावेश या गैरमार्गी प्रकरणांमध्ये होता.

२०१२ साली कॉपीची ७९, २०१३ साली ४७, २०१४ मध्ये ३६ तर यावर्षी म्हणजेच २०१५ मध्ये ३० प्रकरणे प्राप्त झाली होती. या प्रक्रिया रोखण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबद्ध व सर्व घटक समावेशक असा 'गैरमार्गाशी लढा' या अभियानाचा कृती कार्यक्रम या वर्षीदेखील मंडळाने राबविला होता. संपूर्ण महाराष्ट्रात एकसूत्रीपणा हे तत्त्व विचारात घेऊन याबाबत नियोजन करण्यात आले होते.

त्यामुळेच मागील वर्षांचा विचार करता यावर्षी झालेल्या कॉपी प्रकरणांना आळा घालण्यात या अभियानाला यश मिळाल्याचे दिसते. हे प्रकरणे टाळण्यासाठी स्थानिक दक्षता समिती व केंद्रस्तर, पालकसभा, विद्यार्थ्यांचे उदबोधन, प्रजासत्ताकदिनी प्रतिज्ञा करणे आदी उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबविण्यात आले होते. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल होण्यास व परीक्षेतील गैरप्रकार कमी होण्यास मदत झाली असे मंडळाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गार्डनचा ठराव हलला

$
0
0



शिवसेनेच्या इशाऱ्यांनतर ठराव रवाना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील गार्डनची देखभाल व दुरूस्तीचा महापौर कार्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून पडून असलेल्या ठराव अखेर शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर हलला आहे. महापौरांनी सही करून अमंलबजावणीसाठी हा ठराव आता प्रशासनाकडे पाठविल्याने गार्डनच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

शहरात ४७० उद्याने असून, या उद्यानांची देखभाल व दुरूस्ती करण्याच्या ठेक्याची मुदत सहा महिन्यांपासून संपली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे याच उद्यानांना संजीवनी देण्यासाठी व नाशिकला गार्डनसिटी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महापालिकेत मनसेचीच सत्ता असतांना असा दुहेरी भास निर्माण झाला आहे. आयुक्तांनी या उद्यांनाच्या देखभालीचे काम खासगीकरणातून करण्याचा ठराव आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह सर्वांनीच विरोध केला. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी बचत गटांकडूनच काम करण्याचा ठराव केला. मात्र, दोन महिन्यांपासून हा ठराव महापौरांच्या कार्यालयात पडून असल्याने उद्यांनाची पूर्ण दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मनसेचाच महापौर राज ठाकरेंच्या भूमिकेला छेद देत असल्याचा आरोप शिवेसनेने करीत, या विरोधात आंदोलनाचा इशारा गटनेते अजय बोरस्ते यांनी दिला होता.

शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर महापौरांनी ख़ळबळून जागे होत अखेर या ठरावावर सही करीत, तो प्रशासनाकडे अंमलबजावणीसाठी पाठवला आहे. त्यामुळे प्रशासन आता त्यावर कारवाई करणार असून, पुन्हा उद्यानांच्या देखभालीचे काम बचत गटांकडे दिले जाणार आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून दुरूस्ती व देखभालीच्या दुरूस्तीत असलेले शहरातील गार्डनची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. तर महापौर कोणाच्या दबावाखाली काम करतात, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गार्डनसाठी पालिकेची बक्षिस योजना

$
0
0

गार्डनचे पालकत्व देण्याचाही प्रस्ताव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील उद्यांनाची दुरवस्था दूर करण्यासाठी महापालिकेने आता खाजगी व्यक्तींना गार्डनचे पालकत्व देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सोबत चांगल्या प्रकारे उद्यानांची देखभाल व दुरूस्ती करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थासाठी महापालिका बक्षिस देणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली आहे. तर शहरातील रस्त्यांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जवळपास चार हजार झाडे लावण्यात येणार आहे.

शहरातील उद्यानांची देखभाल आणि दुरूस्ती वादाचा मुद्दा राहिला आहे. देखभाली अभावी शहरातील उद्यांनाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बचत गटांसोबतच आता महापालिकेने उद्यानांच्या देखभाल पालकत्व तत्वावर खाजगी व्यक्ती आणि संस्थांना देण्याच्या प्रस्तावावर विचार करते आहे. व्यक्ती किंवा संस्थेने गार्डनची पालकत्व करण्याची तयारी दाखवली तर, महापालिका त्यांना गार्डनच्या देखभालीची जबाबादारी देणार आहे. सोबतच त्यांना आवश्यक मदतही करणार आहे. खाजगी व्यक्तींनी चांगल्या प्रकारे गार्डनची दुरूस्ती केली तर, त्यांच्यासाठी बक्षिस योजनाही राबविली जाणार आहे. जवळपास शहरातून २५ गार्डन विकसीत करणाऱ्यांना बक्षिस दिले जाणार आहे. त्यामुळे संस्था आणि व्यक्तींनी पालकत्वासाठी पुढे यावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

चार हजार झाडे लावणार

शहरातील रस्त्यांच्या सौदर्यांसाठी महापालिकेच्या वतीने महत्त्वपूर्ण रस्त्यांवर चार हजार झाडे लावण्यात येणार आहे. सौंदर्यीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी मोहगनी, शिरस, अशा वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांच्या सौदर्यात भर पडणार आहे.

हैदराबादच्या धर्तीवर ट्री पार्क

नाशिकला गार्डन सीटी करण्याच्या उपक्रमाअंतर्गत शहरात हैदराबादच्या धर्तीवर ट्री पार्क साकारण्यात येणार आहे. जवळपास ५० एकर क्षेत्रावर हा ट्री पार्क विकसीत केला जाणार असून, त्यासाठी जागेची चाचपणी केली जात आहे. म्हसोबावाडीच्या रिक्त असलेल्या ५० एकर जागेवर हा पार्क उभारण्याचा प्रस्ताव सद्यस्थितीत प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात येणार असून, पर्यटकांसाठी तो खास ठरणार आहे. हा पार्क अस्तित्वात आल्यास नाशिकच्या वैभवात भर पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिजोरीत आठ कोटी जमा

$
0
0

सवलत योजनेला मालमत्ताधारकांचा चांगला प्रतिसाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी सुरू केलेल्या सवलत योजनेला मे महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या महिन्यातील तीन टक्के सवलत योजनेअंतर्गत २६ तारखेपर्यंत पावणेआठ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. गेल्या वर्षी मे मध्ये झालेल्या वसुलीच्या सहापट वसुली झाली असून, मे अखेरपर्यंत ही वसुली दहा कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेन मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पाच, तीन, दोन टक्के सवलतीची योजना जाहीर केली आहे. त्यात जूनमध्ये घरपट्टी भरल्यास एकूण बिलाच्या पाच टक्के, मे मध्ये भरल्यास तीन टक्के आणि जूनमध्ये भरल्यात दोन टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेला एप्रिलमध्ये भरघोस प्रतिसाद मिळून तब्बल १२ कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. एप्रिलपाठोपाठ मे महिन्यातील तीन टक्के सवलतीला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. २७ मेपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत ७ कोटी ७४ लाख रुपये जमा झाले आहेत.

गेल्या वर्षी मे महिन्यात घरपट्टी वसुलीपोटी महापालिकेला एक कोटी १५ लाख रुपये मिळाले होते. मात्र, चालू वर्षी त्यात भरघोस अशी सहा कोटी 58 लाख रुपयांची भरघोस वाढ होवून ती सात कोटी ७४ लाख ४७ हजारांपर्यत गेली आहे. त्यामुळे पालिकेच्या सवलत योजनेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, मे अखेरपर्यंत हा आकडा दहा कोटींपर्यंत जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दि. २९ एप्र‌िलपर्यंत या योजनेत तब्बल सव्वा आठ कोटीची वसुली झाली आहे. तर मंगळवारी एकाच दिवशी महापालिकेच्या तिजोरीत २ कोटी ६४ लाखाची वसुली झाली आहे. यामुळे ही योजना मालमत्ताधारक व महापालिकेसाठी हिताची ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलमधून आणखी एका कैद्याचे पलायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून एक कैदी शेती काम करताना गुरुवारी दुपारी पळून गेला. वर्षभरापूर्वी कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून पळालेल्या कैद्याचा अद्याप शोध लागलेला नसतानाच दुसरा कैदी पळाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

कारागृह आणि पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी मोहम्मद इस्माईल इब्लिस (वय २८) याला घरफोडीच्या गुन्ह्यात १८ महिन्यांची शिक्षा झाली होती. पाच महिने त्याने कच्चा कैदी म्हणून कल्याण जेलमध्ये काढले होते. नंतर त्याला नाशिकरोडच्या कारागृहात हलविण्यात आले. त्याची सात महिन्यांची शिक्षा पूर्ण झाली होती. शुक्रवारी सकाळी साडेदहाला सुमारे तीस कैद्यांना शेती कामासाठी नेण्यात आले.

दुपारी दीडच्या सुमारास भोजनासाठी या कैद्यांना कारागृहात आणून त्यांची हजेरी घेण्यात आली असता मोहम्मद इब्लिस हा नसल्याचे लक्षात आले. परिसरात शोध घेऊनही त्याचा मागमूस लागला नाही. साडेतीनच्या सुमारास तो फरार झाल्याचे नाशिकरोड पोलिसांना कळविण्यात आले.

पोलिस उपायुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे, सहाय्यक निरीक्षक मिनीनाथ वाळेकर यांनी पोलिस व जेल प्रशासनाच्या मदतीने सामनगाव, एकलहरा, रेल्वेस्टेशन, गोरेवाडी परिसरात शोध मोहीम हाती घेतली. हा कैदी सापडेल या आशेने कारागृह प्रशासनाने तक्रार नोंदविण्यास विलंब लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी परिसरात अत्यंत छुप्या पध्दतीने चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर पोलिसांना छापा टाकत पोलिसांनी आठ व्यक्तींसह सहा महिलांना ताब्यात घेतले आहे. अलीकडील कालावधीत पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. यातील आरोपींना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, ताब्यात घेतलेल्या सहाही महिलांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

पंचवटी परिसरातील हॉटेल कुणाल येथे अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्तांना मिळाली होती. यानंतर सापळा रचत पोलिस आयुक्त जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली हेड क्वार्टर, गुन्हे शाखा, पंचवटी डिटेक्टीव्ह ब्रँच या विभागातील ३५ कर्मचाऱ्यांचे पथक बुधवारी रात्री या मोहिमेवर तैनात होते. बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमाराला सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोऱ्हे यांनी गुप्त माहितीच्या संदर्भानुसार हॉटेल कुणाल येथे बनावट गिऱ्हाईक पाठविले. यावेळी हॉटेलमधील टोळक्यातील मुस्तफा शेख याने त्या बनावट गिऱ्हाईकाशी सौदा करून पैसे घेतल्याची खात्री पटताच पोलिसांच्या पथकाने शिताफीने छापा टाकत घटनास्थळावरून आठ व्यक्ती आणि सहा महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ४० हजारांची रक्कम जमा करण्यात आली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये एक या टोळक्याचा व्यवस्थापक तर दुसरा म्होरक्या म्हणून कार्यरत होता. यातील एक जण पश्चिम बंगाल येथील असून, त्याचा दुसरा साथीदार हा मुंबईतील आहे. येथे गिऱ्हाईक म्हणून पोलिसांच्या ताब्यात सापडलेले सहाही आरोपी हे नाशिकमधील स्थानिक आहेत. आरोपींना कोर्टापुढे सादर केले असता पुढील दोन दिवसांसाठी त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर, या प्रकरणातील सहाही महिलांची रवानगी नाशिकच्या महिला सुधारगृहात करण्यात आली असल्याची माहिती सहायुक पोलिस आयुक्त सचिन गोऱ्हे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रातून मुख्य आरोपी बेपत्ता!

$
0
0



पोलिसांचा कारभार संशयास्पद

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

राज्यातील बहुचर्चित सुरगाणा धान्य घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाहतूक ठेकेदाराचे नावच आरोपपत्रात नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणात एकीकडे तब्बल ७ तहसीलदारांचे निलंबन करुन थेट मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घातले असतानाच पोलिसांच्या कारभारावर संशय उपस्थित होत आहे.

सुरगाणा या आदिवासी भागातील तब्बल पाच कोटीहून अधिक रकमेच्या धान्य घोटाळ्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतल्यानेच एकाचवेळी सुमारे सात तहसीलदारांचे निलंबन झाले आहे. हा सारा प्रकार अतिशय चिंताजनक असतानाच तपास करणाऱ्या पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. हा सारा घोटाळा होण्यास वाहतूक ठेकेदार मे. एस. एन. मंत्री व त्यांचे संस्थेतील भागीदार यास कारणीभूत असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर सुरगाणा पोलिस स्टेशनमध्ये २६ जानेवारी रोजी दाखल झालेल्या फिर्यादीत एकूण ७ जणांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. त्यात गोदामपाल रमेश भोये, वाहतूक टेकेदार मे. एस. एन. मंत्री व त्यातील भागीदार मोरारजी भिकुलाल मंत्री, भागीदार सुशमा मोरारजी मंत्री, भागीदार संजय रामकृष्ण गडाख, भागीदार श्रीराम मंत्री यांचा समावेश होता. वाहतूक ठेकेदार आणि त्यांचे भागीदार यांनी धान्य गोदामात न आणता परस्पर संगनमताने काळ्या बाजारात विकल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शिवाय वाहतूक ठेकेदार आणि त्यांच्या भागीदारांनी अपहार केल्याचे कबूल केले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

हा साराच घोटाळा विधीमंडळात गाजल्यामुळे राज्य सरकारने त्याची तीव्र दखल घेतली. परिणामी, जिल्हा पुरवठा अधिकारी, सात तहसीलदार आणि एकूण १६ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली. मात्र, दिंडोरी कोर्टामध्ये सुरगाणा पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये वाहतूक ठेकेदार मे. एस. एन. मंत्री आणि त्यांचे भागीदार यांचा समावेश नसल्याची बाब उजेडात आली आहे. या दोषारोपपत्रात एकूण १३ जणांना आरोपी नमूद करण्यात आले असून त्यात तहसिलदार, गोदामपाल, पुरवठा निरीक्षक, वाहतूक ठेकेदार यांचा ट्रक ड्रायव्हर व मालक आणि धान्य व्यापारी यांचा समावेश आहे. म्हणजेच, ठेकेदाराकडे काम करीत असलेल्यांना आरोपी करुन ठेकेदारांनाच कशी सूट देण्यात आली, अशी शंका उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोल कामगारांचे आजपासून उपोषण

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत येथील वादग्रस्त टोल नाक्यावर सुरक्षा कामगारांचा प्रश्न पंधरा दिवसानंतरही सुटू शकलेला नाही. सुरक्षा कामगारांनी पुन्हा सेवेत घ्यावे म्हणून आज (दि. २९) पासून २८ कामगार बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. याबाबत कामगारांनी जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलिस अधीक्षक , निफाडचे विभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक, पिंपळगाव टोल प्रकल्प व्यवस्‍थापक व पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे. यामुळे टोल प्रशासन व कामगार यांच्यातील संघर्ष चिघळ्याची चिन्हे दिसत आहेत.

करार संपल्याचे कारण देत पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील सुरक्षा कामगारांना टोल प्रशासनाने सेवामुक्त केले आहे. कामागरांनी या निषेधार्थ भारतीय मजदूर संघ प्रणित टोल कामगार संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत टोल नाक्यावरील सर्व कामगारांनी कामबंद आंदोलन केल्याने १५ मे पासून टोल वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे. दररोज टोल कंपनीचे पन्नास लाख रुपयांचे नुकसान होत आहे. असे असूनही टोल प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम आहे.

करार संपलेल्या कामगारांना कोणत्याही परिस्थितीत कामावर घ्यायचे नाही ही टोल प्रशासनाची भूमिका आहे. याबाबत टोल कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे समजते. दरम्यान, आज शुक्रवारी दुपारी चार वाजेपासून महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अजय लोढा यांच्या नेतृत्वाखाली अतुल गायकवाड, सोमनाथ थोरात, तानाजी ढोणे, मिलिंद केदारे, रश्मी सिंहासने, आरती सुतार, नयना पठाडे, दिपाली साबळे आदी २८ कामगार उपोषणास बसणार आहेत. ही माहिती महाराष्ट्र टोल संघटनेचे अध्यक्ष पांडूरंग भडांगे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येथे कोण अंघोळ करणार?

$
0
0

गोदावरीची अस्वच्छता पाहून मुख्य सचिवांचा अधिकाऱ्यांना सवाल; कामांची केली पाहणी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

हे दृश्य पाहून येथे कोण आंघोळ करणार? असा प्रश्न राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी त्र्यंबकेश्वर येथील कचरा डेपोजवळच्या नव्याने बांधण्यात आलेल्या गोदावरी घाटाची पाहणी करताना केला. शहरातील सिंहस्थ कामांचा क्षत्रिय यांनी आढावा घेतला. तसेच, कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना करतानाच, कामे १५ दिवसांत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गुरूवारी दुपारी पाच वाजेच्यादरम्यान क्षत्रिय यांचे त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यांनी सुरुवातीला प्रमुख उच्चाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर नव्याने बांधण्यात आलेल्या घाटांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत विभागीय आयुक्त एकनाथ डवले, विभागीय पोलीस अधीक्षक जे. जे. सिंह, जिल्हाधिकारी दीपंद्रसिंह कुशवाह, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, मेळाधिकारी रघुनाथ गावडे, सहायक मेळाधिकारी महेश पाटील, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आणि सर्वसंबंधित विभागांचे अधीक्षक अभियंता, उपअभियंता आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

नवीन बस स्थानकाच्याजवळ गोदावरी घाटाची पाहणी करतांना येथे पाणी असेल काय, अशी शंका क्षत्रिय यांनी उपस्थित केली. तसेच, याबाबत पोलिस प्रशासनाने माहिती दिली. त्यानंतर स्मशान आणि कचरा डेपोजवळील घाटाची पाहणी करतांना येथे कोण आंघोळ करण्यास धजावेल, असा सवाल उपस्थित केला. याबाबत स्थानिक अधिका-यांनी आम्ही पंधरा दिवसांत स्वच्छता करतो, असे आश्वासन दिले व अपूर्ण काम पूर्ण केले जाईल याची खात्री दिली. दरम्यान मेनरोड परिसरातील रस्त्यांची पायी चालत जावून शाहीमार्ग असलेल्या रस्त्याची पाहणी क्षत्रिय यांनी केली. कुशावर्तात उतरून तेथे पायावर पाणी घेतले व पाण्याच्या शुद्धतेसंदर्भात माहिती घेतली. त्यानंतर अहिल्या घाटाची पाहणी केली. हे काम सुंदर झाले आहे. मात्र, येथे भाविक कसे येतील असा सवाल उपस्थित केला. पोलिस प्रशासनाने हा घाट गर्दीचा रेटा वाढल्यावर सुरक्षितता म्हणून निर्माण केला आहे, असे सांगितले. यावेळेस या घाटांची माहीती प्रसिध्दीमाध्यमातून आतापासून जनतेपर्यंत जायला पाहिजे व त्यासाठी जाहिराती करायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

सरतेशेवटी त्यांनी प्रसिध्दीमाध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्र्यंबक येथे भरपूर व मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत, असा दावा क्षत्रिय यांनी केला. ते म्हणाले, की कुंभमेळ्यात रात्रीपासून गर्दी वाढते म्हणून भरपूर प्रकाश योजना व त्यासाठी पुरेपूर प्रमाणात वीज उपलब्ध राहील, अशी काळजी घेण्यात आली आहे. नाशिक जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाने चांगले काम केले आहे. काही काम अपूर्ण आहे, ते १५ दिवसांत पूर्ण होईल, असा विश्वास माझ्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे व ते तो सार्थ करतील याची मला खात्री आहे. सायंकाळी साधुग्राम येथे पाहणी करून क्षत्रिय नाशिक येथे रवाना झाले.

आज नाशिकला पाहणी

नाशिक दौऱ्यावर आलेले क्षत्रिय शुक्रवारी (२९ मे) शहरातील सिंहस्थ कामांची पाहणी करुन आढावा घेणार आहेत. यानिमित्ताने सर्वच सरकारी यंत्रणा जोरदार कामाला लागल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड महिन्यांवर येवून ठेपला आहे. तरीही सिंहस्थ कामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यापार्श्वभूमीवर क्षत्रिय नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत. सर्वप्रथम त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जावून सिंहस्थ कामांची पाहणी केली. तसेच, आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी साधू-महंतांशीही चर्चा केली. मुख्य सचिव गुरुवारी नाशिक मुक्कामी असून ते शुक्रवारी सकाळी रामकुंड, साधुग्राम परिसराची पाहणी करणार आहेत. तेथील कामांची सद्यस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांबाबत ते प्रशासनाला दिशानिर्देश देणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता ते सिंहस्थ आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आहेत. या बैठकीला सर्व सरकारी विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासलगावात वादळीवाऱ्याने कांद्याचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

वादळीवाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा लासलगावसह परिसरातील काही गावांना शुक्रवारी सायंकाळी बसला. विजेची तार पडल्याने बैलजोडी ठार झाली. तर तेरा कांदा शेड जमीनदोस्त झाल्याने कांदा व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

शुक्रवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. त्यानंतर पावणेपाच वाजेच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार झाले अन् वादळीवाऱ्याला सुरूवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता कि, परिसरातील अनेक मोठाली झाडे मुळासकट उन्मळून पडली. तर विजेचे खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. कांदा शेड कोसळून ३०० टनाहून अधिक कांदा भिजल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रकसह २३ वाहने शेड खाली दाबली गेली. दरम्यान, तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला रेल्वे आरक्षण केंद्राची प्रत‌ीक्षाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तोंडावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मार्च महिन्यापासून रेल्वेचे तिकीट आरक्षण केंद्र त्र्यंबक शहरात सुरु होणार होते. मात्र मे महिन्याची अखेर होत असूनही या केंद्राची भाविकाना प्रती‌क्षाच आहे. या केंद्रासाठी नगरपालिकेने रेल्वे विभागाला जागा उपलब्ध करुन दिल्यानंतरही माशी कुठे शिंकली, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

सिंहस्थ कुंभमेळा अवघा दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. कुंभमेळ्याच्या विविध कामांची सद्यस्थिती, अडी-अडचणी, विविध सरकारी विभागांमधील समन्वय आदींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दर मंगळवारी बैठक होते. मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, सिंहस्थ उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय किसवे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व त्या-त्या विभागांचे सिंहस्थ नोडल अधिकारी यास उपस्थित राहतात. गेल्यावेळी २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत सिंहस्थ कामांबाबत चर्चा करण्यात आली. यात सिंहस्थासाठी त्र्यंबकेश्वर शहरात रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र सुरु करावयाचे असल्याने या केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आली होती. याची दखल घेत त्र्यंबक नगरपालिकेने त्र्यंबक शहरातील बस स्टँडच्या शेजारी असलेल्या इमारतीत जागा उपलब्ध करुन दिली असल्याची माहितीही पालिकेचे मुख्याधिकारी एन. एम. नागरे यांनी सिंहस्थ बैठकीत दिली होती. जागेचा ताबा घेतल्यानंतर येथे रेल्वे प्रशासनाकडून फर्निचरसह विविध पायाभूत सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार होत्या. मार्च महिन्यापासून हे केंद्र कार्यन्वित होणे अपेक्षित होते. हे केंद्र तात्पुरत्या स्वरुपाचे असणार आहे. मात्र अद्यापपर्यंत हे केंद्र अस्तित्वात न आल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीचे प्रदूषण रोखा

$
0
0

स्वातंत्र्य सैनिकांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

गटारीकरणामुळे गोदावरी कमालीची प्रदूषित झाली असून, सिंहस्थ पर्वणीत भाविकांनी शाहीस्नान केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. सन २०१२ पासून निर्मल गोदा अभियान राबविले जात असतानाला या अभियानाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. येत्या १५ जूनपर्यंत प्रशासनाने संपूर्णपणे गोदावरी प्रदूषणमुक्त केली नाही नाही तर त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक त्यासाठी बेमुदत उपोषण करतील, असा इशारा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर यांनी शुक्रवारी हुतात्मा स्मारक येते पत्रकार परिषदेत दिला.

वसंत हुदलीकर यांनी निर्मल गोदा अभियानास पाठिंबा दर्शवित सांगितले की, नाशिकला भाविक हे गोदावरीत स्नानासाठी येत असतात. याकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. दर बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळासाठी आधीच नियोजन करायला हवे होते. सुमारे २१ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात कुंभमेळा पर्वणीत सुमारे एक कोटी भाविक येतील, असा प्रशासनाचाच दावा आहे. प्रदूषित गोदावरीत स्नान झाले तर भयावह रोगराई पसरून आरोग्य आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल. याचा कोणीही गांभीर्याने विचार करायला तयार नाही. निर्मल गोदा अभियानाचे कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत घेत गोदावरी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी जनजागृती करीत आहेत. गोदावरीप्रेमी संस्थांसह सुमारे दहा हजार नागरिकांनी अभियानाला उत्स्फूर्त पाठिंबा देत अभियानात सहभागी झाले आहे. मात्र, देशाला भ्रष्टाचारी सरकार व नोकरशहा मिळाल्याने सर्व यंत्रणाच कुचकामी ठरत आहेत. पैसे कशात मिळतील याकडे अधिक लक्ष असल्याने गोदावरी प्रदूषणमुक्तीकडे लक्ष पुरविण्यासाठी कोणीही तयार नाही. यासाठी आम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलो नव्हतो अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी निर्मल गोदा अभियानाचे नितीन शुक्ल, जगबीर सिंग, अनिल सिंग, प्रमोदनी चव्हाण, हेमंत जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांना अँकरिंगचे आकर्षण

$
0
0

>> सई बांदेकर

ती आली, तिने बघितलं आणि तिने जिंकलं! बघता बघता जमलेल्या सगळ्या मोठ्यांच्या नकळत तिने बच्चे कंपनीच्या पार्टीत त्यांनाही सामील करून घेतलं. तसाच इव्हेंट दरम्यान तो. जमलेले चार-पाच हजार प्रेक्षक. तो सांगेल त्याप्रमाणे कार्यक्रमाच्या आधी एन्जॉय करत वॉर्म-अप करू लागले. ते दोघेही आपल्या लाइफस्टाईलचा एक अपरिहार्य भाग झाले आहेत. 'ते' म्हणजे 'अँकर्स'. महिन्यातून एकदा तरी काहीतरी निमित्ताने ते आपल्याल्या भेटत असतात. बर्थ डे पार्टीज, किटी पार्टीज, बारसे, लग्नसमारंभ अथवा मोठमोठे इव्हेंटस् अशा कितीतरी गोष्टी सातत्याने आपल्या आजूबाजूला होत असतात. त्याच अनुषंगाने हे सगळे अँकर्स आपले चित्त वेधून घेत असतात.

खरंच, कोणताही कार्यक्रम भावतो तो त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाने. आजच्या लाइफस्टाइलला साजेशा एका आधुनिक प्रकारच्या निवेदन शैलीने अर्थात अँकरिंगने नाशिकमध्ये पण आता बऱ्यापैकी जम बसवला आहे. मुख्य म्हणजे तरुणाईला हा ट्रेण्ड चांगलाच आकर्षित करतो आहे.

एफएम रेडिओच्या माध्यमातून आपल्या जादुई आवाजाने लोकांना आपलेसे करून घेणारा आर जे भूषण हा एक उत्तम अँकरदेखील आहे. त्याची सहज शैली, ओघवती भाषा आणि लोकांशी थेट भिडण्याची स्टाईल जाम खास आहे. त्याच्यामते नाशिकमध्ये या क्षेत्रात येण्यासाठी तरुणांना शंभर टक्के वाव आहे. या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तो म्हणतो की केवळ भारदस्त किंवा चांगला आवाज महत्वाचा नसून स्वर, भाषा, कोणता शब्द कुठे वापरावा वगैरेचा अभ्यास असणे पण आवश्यक आहे. प्रेक्षकांना अँकरकडून परफेक्शनची अपेक्षा असते. म्हणूनच स्पष्ट उच्चार, न अडखळता बोलणे हे महत्वाचे ठरते. आजकाल लोकांना पण खूप गोष्टींची माहिती असते, म्हणून स्वतः अपडेटेड राहणे आवश्यक आहे.

असंच एक खळाळतं, कॉन्फीडन्सने ओतप्रोत भरलेलं व्यक्तीमत्त्व म्हणजे अँकर शिल्पा. अँकरिंगचे ग्लॅमर नाशिकमध्ये रुजण्याच्या आधीपासून ती या क्षेत्रात आहे. ती म्हणते, आधी लोक वाढदिवस, बारसे इ. कार्यक्रमांमध्ये गरजेइतपतच खर्च करायचे, आता मात्र ती 'लक्झरी' झाली आहे. अशा कार्यक्रमांनादेखील आता इव्हेंटचे स्वरूप आले आहे. आलेल्या पाहुण्यांची जास्तीत जास्त करमणूक कशी होईल घ्याकडे सगळ्यांचा कटाक्ष असतो. तिच्या मते चांगला अँकर होण्यासाठी कॉन्फीडन्स आणि भाषेबरोबरच तुम्ही स्वत:ला कसे सादर करता आणि तुमच्या कामात प्रोफेशनॅलिझम कसे जपता हेदेखील महत्त्वाचे आहे. सादरीकरणात उत्स्फूर्तपणा आणि हजरजबाबीपणाला महत्त्व आहे.

तिची बहीण शलाकादेखील या क्षेत्रातच स्थिरावली आहे. तुम्हाला आवड असेल तरच तुम्ही इथे टिकू शकता. बाहेरून ग्लॅमर दिसते पण इथे मेहनतदेखील खूप घ्यावी लागते. खासकरून कॉर्पोरेट क्षेत्रामधले मोठेमोठे कार्यक्रम करताना आधी खूप तयारी करावी लागते. पण रोज नवीन लोक, नवीन जागा फिरणे हा एक नवीन अनुभव देऊन जातो असे ती म्हणते.

अँकर विशू म्हणजे असेच एक उत्साही व्यक्तीमत्त्व. तो देखील दुजोरा देतो की आवड आणि मेहनत करण्याची तयारी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अँकर हा मित्रासारखा असतो समोरच्या प्रेक्षकांना नेमक काय हवे आहे किंवा कसे कनेक्ट करायचे हे समजणे महत्वाचे आहे, असे तो सांगतो.

अलीकडे कॉर्पोरेटमध्ये इव्हेंट कल्चर आले आहे. बर्थ डे पार्टीज, लग्नसमारंभ, संगीत, हाय-प्रोफाईल इव्हेंट्स, कॉन्सर्ट, म्यूझिकल इव्हेंट्स, इतर सामाजिक कार्यक्रम इ. मध्ये अँकरही तितकाच महत्त्वाचा आहे.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरीप्रकरणी तोतया पत्रकाराला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्रकार असल्याचे भासवून वाहनचोरीचा उद्योग करणाऱ्या भामट्यास भद्रकाली पोलिसांनी शुक्रवारी शुक्रवारी सकाळी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन चार चाकी वाहनासह एक पल्सर आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली.

अमन उर्फ अबुजर अबुल कलाम देशमुख (वय ३०) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. मूळचा विदर्भाचा रहिवाशी असलेला देशमुख मागील एका वर्षापासून हिरावाडी परिसरातील अयोध्यानगरी, त्रिकोणी बंगला, रूम नंबर ५६ येथे वास्तव्यास आहे. त्याच्याकडील विविध वाहनांवर चंद्रिका टाईम, महाराष्ट्र न्यूज चॅनेल असे नावे लिहिलेली होती. पोलिसांनी पाळत ठेऊन भद्रकाली परिसरातील दूधबाजार येथून त्याला अटक केली. यावेळी तो एमएच ०२ बी ई १४३ या पल्सरवर होता. ही पल्सर देखील मुंबईतील कांदिवली येथून चोरल्याचे समोर आले. देशमुखने पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून स्कॉर्पिओ (इं​जिन नंबर-बीएस ८४ डी २९९९६) व इंडिका (चेसी नंबर-एमएटी ६११४३३ एपीएन ४३६४) वाहनांची चोरी केली असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पण झाले.

चोरी केलेल्या वाहनांवर चंद्रिका न्यूज असे लिहून तो या कार ट्रॅव्हल्स कंपनीकडे भाड्याने देत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयित देशमुखकडून एक आरसी बूक, व्हिजिटींग कार्ड, चंद्रिका न्यूज चॅनेलचे ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच डॉ. सुचिता भोकरे, मेडिकल ऑफिसर, सिव्हिल हॉस्पिटल असे ओळखपत्र आणि मुख्य अभियंता, नाशिक विभागाचे दिलीपकुमार भामरे यांच्या नावाने बनवलेले ओळखपत्र जप्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाथर्डी खत प्रकल्पाचा तिजोरीवर वाढीव बोजा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाथर्डी खत प्रकल्पाचा साडेपाच कोटीचा वाढीव मोबदला देण्याचा प्रस्ताव सोमवारच्या स्थायी समिती बैठकीत सादर करण्यात येणार आहे. महापालिकेला दीड कोटीच्या मोबदल्याऐवजी न्यायालयाच्या आदेशाने व्याजासकट साडेपाच कोटी द्यावे लागणार आहेत. तसेच जे. डी. बिटको रुग्णालयात एक्सरे मशीनच्या दुरुस्तीसह सिंहस्थ कामांचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.

सोमवारी स्थायी समितीची बैठक होणार आहे. यात पाथर्डी खत प्रकल्पाच्या जागेच्या वाढीव मोबदला प्रकरणी साडेपाच कोटी अदा करण्याचा विषय ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पात जमिनीचा मोबदला एक कोटी ४८ लाख रुपये असला तरी व्याजापोटी महापालिकेला चार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच प्रकरण सोडविले नसल्याने हा फटका बसला आहे. न्यायालयाचा निकाल जागा मालकाच्या बाजूने लागल्याने महापालिकेला आर्थिक फटका बसला आहे. या प्रस्तावासोबत जाहिरात फलक, सिंहस्थात पाणीवितरणाचा ठेका, भूसपांदन, बिटको रुग्णालयात एक्सरे मशीनच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थ कामांसाठी मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या शिल्लक कामांसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी जाहीर केला. साधुग्रामसह लांबलेल्या इतर कामांचा आढावा क्षत्रिय यांनी घेत अनेक सूचना मांडल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीपूर्वी क्षत्रिय यांनी विविध कामांची पाहणी केली. बैठकीसाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, विशेष पोलिस महानिरीक्षक जे. जे. सिंग, महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह इतर विभागाचे विभाग प्रमुख हजर होते. सिंहस्थ कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याने अनुमानित संख्येनुसार भाविकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळेल याचे नियोजन करावे, असे निर्देश क्षत्रिय यांनी दिले. पर्वणीच्या दिवशी घाटावरील पाण्याची आवश्यक पातळी कायम राहील याची दक्षता घेण्यात यावी, घाटाला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे, कन्नमवार घाटाजवळील उताराच्या भागात भाविकांना त्रास होणार नाही, यादृष्टीने मार्गाची रचना करण्यात यावी, नदी पात्राच्या स्वच्छतेकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष द्यावे, असे मुद्दे त्यांनी सुचवले.

नव्या घाटांमुळे भाविकांना पवित्र स्नानासाठी चांगली सोय उपलब्ध झाली असून या घाटांची माहिती राज्याबाहेरील भाविकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात यावेत, असेही ते म्हणाले. जिल्हा प्रशासनाने केलेले सुक्ष्म नियोजन आणि वाहतुकीच्या नियोजनाबद्दल मुख्य सचिवांनी समाधान व्यक्त केले. प्रशासनाने सुक्ष्म नियोजन चांगले केले त्याला स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजरची जोड दिल्यास अधिक फायदा होईल. त्यामुळे अचानक आलेल्या आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाणे शक्य होईल. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता मिळण्याबाबत विचार करण्यात येईल, असे क्षत्रिय यांनी सांगितले. बाह्य वाहनतळ ते अंतर्गत बसस्थानकापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारेच केवळ वाहतूक होणार असल्याने बसेसच्या स्वच्‍छतेकडे विशेष लक्ष देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि वक्तशीरपणाबाबत सूचना देण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले.

साधूग्राम, रामकुंडसंदर्भा लवकरच बैठक

साधुग्रामचे लांबलेले काम, रामकुंड परिसराच्या सुभोभीकरणाकडे झालेले दुर्लक्ष, अधिकारी कर्मचाऱ्यांची कमरतात अशा प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी दोन ते तीन दिवसात उच्चाधिकारी समितीची बैठक आयोजित करण्यात येईल, असे क्षत्रिय यांनी स्पष्ट केले.

मुख्य सचिवांनी केली विविध कामांची पाहणी

सिंहस्थात गोदावरीत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. कोणाची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने नियोजन करून त्याची नीट अंमलबजावणी झाली पाहिजे. ठिकठिकाणी भाविकांना सूचना लक्षात येतील, अशी ध्वनिक्षेपण यंत्रणा बसवावी. मार्गदर्शक फलक व नकाशाही लावण्यात यावा. सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, कामांची गती वाढवावी, पावसाचा अंदाज घेऊन नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केल्या आहेत. शुक्रवारी क्षत्रिय यांनी सिंहस्थ कामांची पाहणी केली. त्यावेळी जिल्हा व महापालिका प्रशासनातील सर्व अधिकारी यांच्याशी चर्चा करीत कामांचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. साधूग्राम, पॉवरस्टेशन, नव्याने बांधलेले विविध घाट, रामकुंड आदी भागांची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नदीला लागून लोखंडी संरक्षण करणारी जाळी बसविण्याची सूचना केली. लक्ष्मी नारायण पूल, कन्नमवार व टाळकुटेश्वर पुलादरम्यान बांधलेल्या नवीन घाटाची माहिती घेत सूचना केल्या. यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी आगामी १०० वर्षांसाठी नक्कीच कामात येईल असे घाट बनविल्याचे सांगितले. शांतता सुव्यवस्थेबाबत केलेली व्यवस्था व नियोजनाची माहिती पोलिस आयुक्त जगन्नाथन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी जयंत जाधव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनेक इच्छूकांमुळे चुरशीच्या ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्षपदावर आमदार जयंत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हाध्यक्षपदी अॅड. रविंद्र पगार यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. सोबतच प्रदेश कार्यकारिणीमध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. भारती पवार यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे राष्ट्रवादीवर माजी मंत्री छगन भुजबळ यांचा वरचष्मा कायम राहिला आहे.

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदासाठी अर्जुन टिळे, देवांग जानी, दिलीप खैरेसह सहाजण इच्छूक होते. त्यामुळे शहराध्यक्षपदाची नियुक्ती प्रदेश पातळीवर सोपविण्यात आली होती. अखेर इच्छूकांमधील वाद टाळण्यासाठी शहराध्यक्षपदाची जबाबदारी आमदार जयंत जाधव यांच्यावर टाकण्यात आली आहे. तर जिल्हाध्यक्षपदावर अॅड. रविंद्र पगार यांना कायम ठेवण्यात आले आहे. माजी आमदार दिलीप बनकर यांनीही जोर लावला होता. मात्र प्रदेशाने पगारांच्या बाजूने आपले वजन टाकले आहे. तर प्रदेश कार्यकारीणीच्या उपाध्यक्षपदी अनपेक्षितरित्या मांजी मंत्री ए. टी. पवार यांच्या सून डॉ. भारती पवार यांची निवड करण्यात आली आहे. दिंडोरी मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली होती. तरूण आणि सुशिक्षित महिला असल्याने त्यांची प्रदेशपातळीवर वर्णी लावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थात सेल्फीद्वारे हजेरी

$
0
0

>> विनोद पाटील, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रत्यक्ष नियुक्तीच्या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदाराचे कर्मचारी थांबत नसल्याने भाविकांसह प्रशासन यंत्रणेवरील ताण वाढतो. या सिंहस्थात मात्र अशा दांडीबहाद्दर आणि बनवेगिरी करणाऱ्यांना आळा बसणार आहे. खास सिंहस्थासाठी महापालिका ऑनलाइन हजेरीचा सेल्फी मोबाइल अॅप तयार करत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रत्यक्ष नियुक्तीच्या ठिकाणाहून सेल्फी काढून तो अॅपवर अपलोड झाल्यानंतर त्याचे व्हेरिफिकेशन झाले की, कर्मचाऱ्याची ऑनलाइन हजेरी लागणार आहे. अशा प्रकारचा प्रयोग देशात प्रथमच होत आहे.

सिंहस्थात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापरावर जिल्हाधिकारी डॉ. दीपेन्दसिंह कुशवाह आणि महापलिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी भर दिला आहे. त्यासाठी हायटेक तंत्रज्ञानाची मदत घेऊन मनुष्यबळाचा कमीत कमी वापर करण्याचे प्रयत्न सिंहस्थात होत आहेत. सिंहस्थात एक कोटीपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजनाचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर असून, जास्तीत जास्त मनुष्यबळ हे फिल्डवर ठेवावे लागणार आहे. भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी महापालिका, जिल्हाप्रशासन आणि खाजगी ठेकेदारांचे कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. सिंहस्थात प्रत्येकाला आपल्या कामांच्या जबाबदारीचे वाटप केले जाणार आहे. कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले असून, या अॅपच्या माध्यमातून त्याची हजेरीही तपासली जाणार आहे.

गत सिंहस्थात नियुक्तीवर असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दांड्या मारल्याचे अनेक प्रकार उघडकीस आल्याने कामकाजाचे नियोजन ढासळले होते. यामुळे चेंगराचेंगरी व इतर घटनांमध्ये प्रशासनाच्या मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला होता. तर अशा प्रकारांमुळे अनेक सुविधाच मिळाल्या नसल्याने भाविकांच्या रोषालाही प्रशासनाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यंदा हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आधुनिक मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करून सेल्फीच्या माध्यमातून ऑनलाइन हजेरी लावण्याचा फंडा महापा‌‌लिकेने शोधला आहे.

गैरसोय टाळण्यासाठी आणि संबंधित व्यक्ती नियुक्तीच्या ठिकाणी हजर आहे की, नाही हे या अॅपच्या माध्यमातून समजणार आहे. सिंहस्थाच्या काळात हा अॅप महत्त्वपूर्ण ठरणार असून, तो इतर धार्मिक कार्यक्रमांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो.

डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त, मनपा, नाशिक

देशातील पहिलाच प्रयोग

सेल्फीच्या माध्यमातून ऑनलाइन हजेरी लावण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. महापालिकेत याचे मुख्य केंद्र राहणार असून, संपूर्ण यंत्रणेवरच या अॅपच्या माध्यमातून नजर ठेवता येणार आहे. या सिंहस्थात हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर कुंभमेळ्यासह देशभरातील धार्मिक कार्यक्रमांसाठी तो राबविता येणार आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेवरील भार काही अंशी कमी होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयजींनी मागवला अहवाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपींना दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याची बाब 'मटा'ने चव्हाट्यावर आणल्यानंतर पोलिस प्रशासन चांगलेच हादरले आहे. या साऱ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक (आयजी) जे. जे. सिंग यांनी तातडीने नाशिक पोलिसांकडे अहवाल मागितला आहे.

राज्यभरात गाजलेल्या सुरगाणा धान्य घोटाळ्याच्या तपासात काळेबेरे होत असल्याची बाब 'मटा'ने उघडकीस आणली. हा सारा घोटाळा होण्यास वाहतूक ठेकेदार मे. एस. एन. मंत्री, त्यातील भागीदार मोरारजी भिकुलाल मंत्री, भागीदार सुशमा मोरारजी मंत्री, भागीदार संजय रामकृष्ण गडाख, भागीदार श्रीराम मंत्री हे जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाहतूक ठेकेदार आणि त्यांचे भागीदार यांनी धान्य गोदामात न आणता परस्पर संगनमताने काळ्या बाजारात विकले, शिवाय वाहतूक ठेकेदार आणि त्यांच्या भागीदारांनी अपहार केल्याचे कबूल केले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. हे सारे असतानाही दिंडोरी कोर्टामध्ये सुरगाणा पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये वाहतूक ठेकेदार मे. एस. एन. मंत्री आणि त्यांचे भागीदार यांचा समावेश नसल्याची उजेडात आले. ठेकेदाराकडे काम करीत असलेल्या वाहतूक प्रतिनिधी, वाहनचालक, ट्रकचालक यांना आरोपी करून ठेकेदारांनाच कशी सूट देण्यात आली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला. खुद्द मुख्यमंत्री आणि पुरवठामंत्र्यांनी हा घोटाळा गांभीर्याने घेतल्याने अशा प्रकारची बाब उघड झाल्याने नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक जे. जे. सिंग यांनी या साऱ्या प्रकरणाचा अहवाल नाशिक ग्रामीण पोलिसांकडे तातडीने मागितला आहे. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपींचा समावेश दोषारोपपत्रात होण्याची शक्यता आहे.

जबाबही शाही थाटात

सर्वसाधारणपणे प्रत्येक आरोपीचा जबाब हा पोलिस स्टेशशनमध्येच घेतला जातो. मात्र, नाशिक पोलिसांची धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी मे. एस. एन. मंत्री आणि त्यांच्या भागीदारावर विशेष मर्जी आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्वांचा जबाब हा सुरगाणा पोलिस स्टेशनमध्ये नाही तर चक्क मंत्री यांच्या नाशिकरोड येथील ऑफिसमध्येच घेण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर अधिकच संशय व्यक्त होत आहे.

सुरगाणा धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपींचा समावेश दोषारोपपत्रात नसल्याची बाब मी 'मटा' मध्ये वाचली. ही बाब अतिशय गंभीर असल्याने या प्रकरणाचा अहवाल मी तातडीने मागविला आहे.

- जे. जे. सिंग,

पोलिस महानिरीक्षक, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओढ्यालाच थांबणार रेल्वे

$
0
0

नांदूर-मानूर घाटावर स्नानाचे नियोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळा पर्वणी काळात औरंगाबाद-नाशिक महामार्गाने येणाऱ्या भाविकांची खासगी वाहने, तसेच महामंडळाच्या बसेससाठी माडसांगवी येथे बाह्य व अंतर्गत वाहनतळ उभारण्यात आले आहे. सिंहस्थासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे ओढा रेल्वेस्टेशनवरच थांबणार असून, भाविकांना येथे उतरविण्यात येणार आहे. औरंगाबाद महामार्ग व रेल्वेने येणाऱ्या भाविकांना माडसांगवी येथील वाहनतळावरून एसटी बसने नांदूर-मानूर येथे गोदावरी नदीवर तयार करण्यात आलेल्या घाटावर स्नानासाठी नेले जाणार आहे.

सिंहस्थासाठी शहराबाहेरच पार्किंगचे नियोजन आहे. भाविकांच्या खासगी वाहनांसाठी माडसांगवी येथील गायरानात १८ हेक्टरवर (४५ एकर) वाहनतळाची उभारण्यात केली जात असून, नांदूर घाटावरून हे अंतर ४.६ किलोमीटर आहे. औरंगाबाद-नाशिक महामार्गाने येणारी खासगी वाहने, तसेच अंतर्गत वाहतूक करणाऱ्या बसेस या माडसांगवीच्या वाहनतळावर रोखल्या जातील. तसेच या भाविकांच्या सुविधेसाठी चार निवारा शेड उभारण्यात येत असून, त्यामध्ये ४0 हजार भाविकांची सोय होणार आहे. हे निवारा शेड नांदूरगाव प्राथमिक शाळा, वसंतदादा पाटील माध्यमिक शाळा, नांदूर नाका शाळा, वैष्णव गार्डन मंगल कार्यालय असणार आहेत.

नांदूर-मानूर घाटावर स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांना माडसांगवी येथील वाहनतळावरून ४.६ किलोमीटर पायी जावे लागणार आहे. त्यांचा जाण्याचा मार्ग माडसांगवी, नांदूरगावमार्गे नांदूर - मानूर गोदावरी घाट असा असणार आहे. परतीसाठी नांदूर घाट, नांदूरगाव, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, प्राथमिक शाळा, मानूर फाटा मार्गे पुन्हा माडसांगवी वाहनतळ असा आहे. पर्वणीकाळातील शाही मिरवणूक व शाहीस्नान संपल्यानंतर या मार्गावरील भाविकांना मिर्ची ढाबा चौफुली, के. के. वाघ उड्डाणपुलाखालून संतुष्टी ढाबा मार्गे नवीन शाही मार्गाने पुढे चालत रामकुंड येथे स्नानासाठी जाता येईल., तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या मार्गावरील भाविकांना टाकळी मलजल निस्सारण केंद्र व या भागातील घाटाकडे वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या घाटावर अधिक भाविकांची गर्दी झाल्यास सुमारे ५ हजार भाविकांना या रस्त्यावर तात्पुरती रोखण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागातील मार्गावरील ५ किलोमीटरचे बॅरेकेडिंग करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाकडून या मार्गावर ११ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्याचे नियंत्रण नाशिकरोड येथील नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे. या मार्गावर नांदूरगाव, नांदूर घाट, माडसांगवी व ओढा रेल्वेस्टेशन अशा चार पोलीस चौक्या, दोन वॉच टॉवर व एकूण ३२ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. या चौकांचे निरीक्षण पोलीस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images