Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रिक्षा-टॅक्सीचालकांचे प्रवासी देवोभवः

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कुंभमेळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रिक्षा, टॅक्सी व बसचालकांसाठी प्रवासी देवोभवः हे उद्दिष्ट ठेवून सौजन्य अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे पथनाट्य सादर करण्यात आले.

कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये देश-देशातील लाखो भाविक येणार आहेत. त्यांच्या मनात नाशिकची चांगली प्रतिमा तयार व्हावी, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या रिक्षा, टॅक्सीचालकांकडून भाविकांशी गैरवर्तणूक व लुबाडणूक होऊ नये, सौजन्याची वागणूक मिळावी या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. शहरातील बसस्टाप, रिक्षास्टँड येथे प्रबोधन केले जात आहे. आरटीओचे अधिकारी जीवन बनसोड, भरत कळसकर, सहाय्यक अधिकारी सतीश मंडोरा, मोटरवाहन निरीक्षक दीपक शिंदे, विनोद जाधव, महेश देशमुख, हर्षल सासे, डॉ. गिरीश मोहिते आदींच्या उपस्थितीत नाशिकरोड स्टेशन येथे झालेल्या मार्गदर्शन शिबिरात अडीचशे रिक्षा, टॅक्सीचालक सहभागी झाले.

लालसेपोटी रिक्षाचालकांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेऊ नये. जवळचे भाडे नाकारू नये, मीटरप्रमाणे दर आकारावेत. प्रवाशांना सौजन्याची वागणूक देऊन सुसंस्कृत नाशिक प्रतिमा कायम ठेवावी.

- जीवन बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी

व्यवसाय हीच आमची रोजीरोटी आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहत सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांना चांगली व प्रामाणिक सेवा देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. नाशिकची प्रतिमा कलंकित होऊ देणार नाही.

- अहमद शेख अजीज, टॅक्सीचालक

चालकांनी केलेला संकल्प

प्रवाशांशी सौजन्याने वागणार

व्यसनांपासून दूर राहणार

वाहनाची सर्व कागदपत्रे ठेवणार

रिक्षा-टॅक्सी व्यवसाय सेवा म्हणून करणार

मीटरचाच वापर करणार

गणवेश व वाहन स्वच्छ ठेवणार

प्रवासी मार्गदर्शिका व पर्यटन स्थळांचा नकाशा बाळगणार

शिस्तीचे पालन करणार

दुर्घटनेची माहिती पोलिसांना कळवणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नासिक के लोग बहुतही हेल्पफुल!

$
0
0

प्रशांत देसले, नाशिक

वीरेंद्रकुमार शर्मा. साधारण चाळीशीतील व्यक्ती. मूळचे बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातले. आपल्या संपूर्ण परिवारासह महाराष्ट्र दर्शनाला आले. तसं त्यांना केवळ कुंभमेळ्यात यायचं होतं पण काही कारणास्तव पर्वणीच्या आधी येण्याचं त्यांनी ठरवलं. शिर्डी, अजिंठा, औरंगाबाद, वेरूळ या स्थळांना भेट देत शर्मा कुटुंब गेल्या आठवड्यात नाशिकला आलं. तसं त्यांच्यासाठी महाराष्ट्र नवीन नाही. वडील काही वर्षे नोकरीनिमित्त नागपुरात असल्याने त्यांना इथल्या वातावरणाशी तोंडओळख होती. तसेच तोडकी-मोडकी मराठीही येते. चांगला पंधरा-वीस दिवसांचा दौरा आखून शर्मा कुटुंब थेट बिहारहून कारनं महाराष्ट्राच्या भटकंतीवर निघालं होतं.

वीरेंद्रकुमार खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांची पत्नी, मुलं, भाऊ, त्याची पत्नी, वडील राजेंद्रप्रसाद शर्मा हे सगळे पूजाविधी आटपून सायंकाळी गोदेचा संथ प्रवाह न्याहाळत होते. कुतूहल म्हणून त्यांच्याशी गप्पा करायला सुरुवात केली. बिहार ते इथपर्यंतचा प्रवास, प्रवासादरम्यानचे अनुभव, महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळांबाबत चांगल्याच गप्पा रंगल्या. महाराष्ट्रातील रस्त्यांबाबत तर त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. यावरून बिहार आणि महाराष्ट्रातील प्रगतीचा नमेका फरक कळला. नाशिक परिसराबाबत वीरेंद्रकुमारचे वडील राजेंद्रप्रसाद जाम खूश होते. त्यांना इथला निसर्ग इतका आवडला की ते अगदी सहज बोलून गेले, 'मै सात-आठ साल नागपूर में रहा, लेकीन कभी नासिक नही आया, आज बहुत बुरा लग रहा है, अगर उस समय मुझे पता होता की नासिक इतना शांत और सुंदर शहर है, तो मै वापस अपने गाँव ही नही जाता, यही बस जाता...' हे सांगतांना त्यांच्या चेहऱ्यावर एक अतृप्त इच्छा झळकली.

गप्पांमध्ये त्यांनी नाशिक-त्र्यंबक प्रवासा दरम्यानचा एक प्रसंग सांगितला. पंचवटीतून रविवार कारंजामार्गे ते सीबीएसकडे जायला निघाले होते. आता त्र्यंबककडे जाण्यासाठी नेमका टर्न कुठून घ्यायचा हे त्यांना कळेना. शेवटी बरोबर त्र्यंबक नाक्यावर सिग्नल पडला, त्यांची गाडी थांबली. बाहेर थोडा रिमझ‌िम पाऊस सुरू होता. डाव्याबाजूला बसलेल्या वीरेंद्रकुमार यांनी सहज बाजूच्या प्रवाशी रिक्षावाल्याला विचारले, 'भाईसाब, त्र्यंबक जाना है', त्यांचा प्रश्न पूर्ण होत नाही तोच त्या रिक्षावाल्याने त्यांना सांगितलं, 'आप मेरे पिछे आओ.' तो सुजाण नाशिककर कोण होता हे त्यांना माहित नव्हतं, पण त्याने त्र्यंबकरोडवरील महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत त्यांना सोबत दिली. तेथे थांबून त्यांना सांगितलं, 'बाबूजी अब स‌िधा जानेका, डायरेक्ट त्र्यंबक पोहोचोगे.' रहदारीमुळे शर्मा कुटुंब त्याचं नाव विचारायला विसरले; मात्र ते मोठ्या कौतुकाने सांगत होते, 'ब‌िना जान पहचानके ओ भले आदमीने हमें रास्ता दिखाया, आपके नासिक के लोग बहुतही हेल्पफुल नेचर के हैं...' एका रिक्षावाल्याच्या छोट्याशा मदतीने शेकडो किलोमीटरवर राहणाऱ्या बिहारी कुटुंबाने नाशिककरांना धन्यवाद दिले... ते ही अगदी मोकळ्या मनानं...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे डेंग्यूचा शहरात वाढला प्रभाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात पावसाचे पुनरागमन होताच, साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जुलै महिन्यात वैद्यकीय विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात साथीच्या रुग्णांची संख्या दीड हजारांवर गेली आहे. जुलैत शहरात डेंग्यूचे ७६ संशयीत रुग्ण आढळून आले असून, अकरा जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. शासकीय आकडेवारी तोकडी असली तरी, दुसरीकडे खाजगी दवाखाने मात्र फुल्ल झाले आहेत.

जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात साथीच्या आजारांचा फैलाव काहीसा थांबला होता. मात्र पावसाचे पुनरागमन होताच, साथीच्या आजारांनीही पुन्हा दस्तक दिली आहे. जुलै महिन्यात वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीनुसार अतिसाराचे २७८ रुग्ण, काविळ ४, विषमज्वर १२, ताप ११०५, डेग्यू १५, सर्दी खोकलाचे ६६ रूग्ण आढळून आले आहेत. जुलैत डेंग्यूचे संशय‌ीत म्हणून ७६ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेत. त्यापैकी ३९ रुग्णांचे अहवाल वैद्यकीय विभागाला प्राप्त झाले आहेत. तर अद्यापही ३७ अहवाल प्राप्त झालेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-बंगळुरू बससेवा सिंहस्थामुळे झाली सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या निमित्ताने कर्नाटक एस.टी. महामंडळाने बंगळुरू-पुणे-नाशिक व्हॉल्वो बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे नाशिकची इतर राज्यांशी कनेक्टीव्हीटी वाढण्यासाठी मदत होणार आहे. नाशिक व बंगळुरू यांचा रेल्वे व विमान या दोन्ही मार्गांनी थेट संपर्क नाही. त्यामुळे बंगळुरुला जाण्यासाठी मुंबईला जाऊन रेल्वे व विमान या पर्यायांची निवड करावी लागत असे. यामध्ये वेळही जास्त खर्च होत असल्याने अडचणी येत होत्या. या सुविधेमुळे ही अडचण आता दूर होणार आहे.

मागील दोन वर्षांपासून कर्नाटक राज्य परिवहन महामंडळातर्फे नाशिक-बेळगाव-नाशिक ही पुणे-कोल्हापूरमार्गे बससेवा नियमितपणे चालू असून, ही बस नाशिककरांना बेळगावशी जोडण्याबरोबरच पुण्याला जाण्यासाठीही सोयीची आहे. ही मल्टीएक्सेल व्हॉल्वो बस नाशिकहून सायंकाळी ६:१५ वाजता निघून बेळगावला पहाटे ५-५:३० ला पोहोचते. बेळगावहून पण परतीची तीच वेळ आहे. दररोज असणारी ही सेवा नाशिककरांना अत्यंत फायदेशीर ठरली आहे. नियमितपणे स्वच्छता व दुरुस्ती, वक्तशीरपणा, प्रवाशांचा आदर हे कर्नाटक बससेवेचे वैशिष्ट्य असल्याने प्रवाशांमध्येही ही बससेवा लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, कर्नाटक बस महामंडळामुळे कर्नाटकातील सर्व जिल्हे एकमेकांशी व्हॉल्वो बससेवेने जोडलेले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक-बंगळुरू बससेवेमुळे थेट जोडले जात आहे. ही कनेक्टिव्हीटी नाशिककरांसाठी फार महत्त्वाची आहे. निदान एकतरी बस नाशिकहून सुरू होण्याची गरज आहे, असे राहुल सोनवणे यांनी सांगितले.

यापूर्वी झाला विरोध

दोन वर्षांपूर्वी नाशिक महाराष्ट्र टाइम्सने या बेळगाव बससेवेबद्दल सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. साधारण दोन वर्षांपूर्वी ज्यावेळेस ही बस सेवा सुरू झाली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, नाशिकच्या विभागातून कर्नाटकच्या या बससेवेला काही प्रमाणात दुय्यम वागणूक दिली गेल्याने या बसच्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. तिकीटदरात वाढ केल्यानंतरच बसेस फलाटावर लावण्यात येतील, अशी भूमिका काही अधिकाऱ्यांच्या वतीने घेण्यात आल्याने कर्नाटकच्या बसेसचे भाड्यात वाढ करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लासेसचालकांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनमानी करून शिक्षणाचा दर्जा घसरविणाऱ्या खासगी क्लासेसवरील निर्बंध शासनाने कडक केल्यानंतर खासगी क्लासेसचालकांनी या विरोधात एल्गार पुकारला आहे. हे निर्बंध शिथिल करण्यात यावेत आणि काही मुद्द्यांवर क्लासेसचालकांनाही शासनाने विचारात घ्यावे, या मागणीसाठी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी (दि.५) जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली जाणार आहे.

असोसिएशनच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यभरात खासगी क्लासेसचे पेव फुटले असून, याचे दुष्परिणाम थेट शिक्षणाच्या दर्जावर होत असल्याचा मुद्दा विधानसभेपर्यंत उपस्थित झाला होता. शिक्षणमंत्र्यांनी याबाबतचे निर्बंध कठोर केले होते. या निर्णयानंतर राज्यभरातील क्लासेसचालक एकवटले आहेत. रविवारी नाशिकसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये क्लासेसचालकांच्या बैठका झाल्या. नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत बुधवारी (दि.५) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे शिवाजीराव कांडेकर यांनी दिली.

शिक्षणमंत्र्यांचे पाऊल

खासगी कोचिंग क्लासेसचे फुटलेले पेव, शिक्षणाचा घसरणारा दर्जा, फसव्या जाहिरातींच्या माध्यमातून क्लासेसचे अतिक्रमण, नफेखोरीसाठी तुडविले जाणारे फीचे निकष, कॉलेजेसच्या सोबत बहुतांश क्लासेसचे असणारे टायअप आदी मुद्दे काही दिवसांपूर्वी लक्षवेधीदरम्यान उपस्थित करून शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले होते.

जिल्ह्यात बाराशे क्लासेस

नाशिक जिल्ह्यातील नोंदणीकृत क्लासेसचालकांची संख्या सुमारे बाराशेच्या घरात आहे. यामध्ये शहरामध्ये सुमारे ४५० तर जिल्ह्यात सुमारे ७०० क्लासेस असल्याची माहिती असोसिएशनचे कांडेकर यांनी दिली. शासनाकडून क्लासेसचे इन्फ्रास्ट्रक्चर, पार्किंग सुविधा, रजिस्ट्रेशन फी आदी मुद्द्यांबाबत कठोर निकष करण्यात आले. अनेक मुद्द्यांवर शासनाने नियमावली ठरविताना किमान क्लासेसचालकांनाही विचारात घ्यावे. प्रत्येक क्लासेसचालकाची स्थिती स्थिर क्लासेसचालकांसारखी नाही. अनेकजण प्रतिकूलतेशी दोन हात करीत विद्यादानाचा वसा चालवितात. त्यांच्यावर आवाक्याबाहेरील अटी लादू नये, अशा अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंध माझा वेगळा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाच्या कानाकोपऱ्यातून कुंभमेळ्यानिमित्त शहरात दाखल होणाऱ्या साधू-महंताच्या कपाळावर लावलेले गंध (तिलक) सर्वसामन्यांचे कुतुहूल वाढवत आहेत. विविध आकाराचे आणि रंगाचे हे गंध चार पध्दतीने लावले जातात. यातून साधू-महंतांची एक वेगळीच ओळख प्रस्थापित होते.

साधू-महंतांनी कपाळावर लावलेले निरनिराळे गंध लावण्यासाठी प्रामुख्याने चार पध्दतीचा अवलंब केला जातो. यात शुक्ल श्री, श्री श्री, बिंदी श्री आणि ऋतुर्मस श्री अशा प्रकारांचा समावेश होतो. शुक्ल श्री तिलक लावणाऱ्यांना सैनिक म्हणून गणले जाते. यांच्या कपाळावर फक्त चंदनाचा गंध असतो. त्याचा आकार विभिन्न असला तरी त्यात इतर रंगाचा समावेश सहसा नसतो, अशी माहिती कुरूक्षेत्र येथून आलेल्या कमलदास महाराज यांनी दिली. युध्द परिस्थितीत लढाई आवश्यक होती.

मात्र, गंध लावणे सुध्दा गरजेचे असल्याने साधू-महंत घाईने कपाळावर शक्य होईल तसा गंध लावीत. यानंतर, ते विजयी होत असे. त्यामुळे, शुक्ल गंधास विजयश्री असेही म्हणतात. बिंदी श्री प्रकारामध्ये सफेद चंदनाच्या गंधामध्ये बिंदीसारखा आकार असतो. सीता मातेने ही बिंदी साधूंना लावली होती. तेव्हापासून बिंदी लावण्याची पध्दत पडली. बिंदी श्री पध्दतीने तिलक लावणाऱ्या साधूंना हयात असेपर्यंत आपल्या गंध लावण्याच्या प्रकारात बदल करता येत नाही. बिंदी श्री गंध लावणाऱ्या साधूचे देहावासन झाले की त्यांच्या कपाळावर शुक्ल श्री गंध लावण्यात येतो. यानंतर त्या साधूची सैनिक म्हणून गणना होते. याउलट, शुक्ल श्री गंध लावणाऱ्यांची असून त्यांना जिवंतपणीच हा गंध लावावा लागतो, असे कमलदास महाराजांनी स्पष्ट केले.

श्री श्री तिलक पध्दतीमध्ये लाल रंगाचा अंतर्भाव असतो. रामानंदी आणि श्यामानंदी या देवतांच्या भक्तानुसार सुध्दा गंधामध्ये बदल होतो. श्यामानंदी, गोडिया, रामानंदी, विष्णूस्वामी आणि विराग्यी अशा संप्रदायातून चुर्तः संप्रदायाची निर्मिती होते. यातील विष्णूस्वामी हे गृहस्थी धर्मात देवाची सेवा करतात. त्यामुळे त्यांच्या गंधाचा आकार बदलू शकतो, असे कमलदास महाराजांनी स्पष्ट केले. गंध वेगवेगळा असला तरी देवाची भक्ती हाच सर्वांचा अंतिम ध्यास असल्याचे कमलदास महाराजांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाड्यांमध्येही घराणेशाही!

$
0
0

अनिल पवार, नाशिक

घराणेशाही ही फक्त राजकारणात चालते असे आपल्याला वाटत असले तरी साधू-महंतांमध्ये तसेच आखाड्यांमध्येही घराणेशाही सुरू झाली आहे. पूर्वी आखाड्यांमध्ये असा प्रकार नव्हता. मात्र, अलिकडच्या काळात आखाड्यांमध्ये घराणेशाही म्हणजे आपले वारस नेमण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

पूर्वी गुरुकुल शिक्षण पध्दत होती. शिष्य गुरूच्या घरी जाऊन शिक्षण घेत असे. कालानुरूप यात बदल होत गेले. तसेच साधू-महंतही शिष्य करताना जातपात, धर्म मानत नव्हते. मात्र, अलिकडे यामध्ये मोठा बदल झाला आहे. अनेक आखाड्यांकडे शेकडो एकर जमीन, साधनसंपत्ती आहे. अनेक आखाडे शेती करतात. त्यातून उत्पन्न मिळते. यामुळे हे उत्पन्न राखण्यासाठी आपल्यातीलच कोणीतरी असावे, अशी भावना आखाड्यांच्या प्रमुखांमध्ये निर्माण झाली. आखाड्याची मालमत्ता राखण्यासाठी पुतण्या किंवा भाचा यांनाच शिष्य करून त्यांच्याकडे आखाड्यांचे वारस म्हणजे प्रमुख नेमण्याची परंपरा सुरू झाली आहे.

शासनाकडे एकूण तेरा रजिस्टर आखाडे आहेत. जवळपास प्रत्येक आखाड्यांत नात्यागोत्याने ‌‌शिरकाव केला आहे. तसेच आखाड्यांमध्ये जातीपातीचे राजकारण सुरू झाले आहे. राजकीय पक्षांप्रमाणेच आखाड्यांमध्ये राजकारणाने शिरकाव केला आहे. पूर्वी कोणालाही शिष्य वा भक्त बनवले जात असे. आज मात्र तशी स्थिती नाही. प्रत्येक आखाड्यांच्या उत्पन्नाचा लेखाजोखा घेतला जातो. तसेच मिळालेले उत्पन्न कोठे खर्च केले याचा ‌हिशेब ठेवला जाऊ लागला आहे. याचमुळे त्या त्या ठिकाणच्या आखाड्यांतील साधूंच्या बदली करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. अनेक आखाड्यांमध्ये तीन वर्षांत साधू-महंतांच्या बदल्या केल्या जातात. तसेच या आखाड्यांमध्ये येणाऱ्या साधूंना तीन दिवसापेक्षा जास्त दिवस राहता येत नसल्याचेही सांगितले जाते. मुक्काम वाढलाच तर त्या साधूला काम करावे लागते. या पध्दतीमुळे आश्रम हा प्रकार सुरू झाला. आपल्या नात्यागोत्यातील मंडळींची राहण्याची व्यवस्‍था व्हावी म्हणून काही साधूंनी स्वतःचे आश्रम बांधून घेतले. तेथेही शिष्य पध्दत राबविताना नात्यातीलच व्यक्तीची नेमणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

मोहमायेची बेडी कायम!

संसारिक माणूसच फक्त घराणेशाही किंवा वारसाहक्क नेमताना आपल्या रक्तातील व्यक्तीला प्राधान्य देत असे ही गोष्ट आता साधूंनाही लागू झाली आहे. साधूही या मोहमायेतून सुटू शकलेले नाहीत. हीच गोष्ट काही सेवा केंद्रांनाही लागू झाली आहे. आश्रम व सेवा केंद्र चालवला जात असला तरी तेथे वारस म्हणून आपल्या परिवारातील व्यक्तिची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

YCMOU कडून फसव्या पदव्यांची खैरात

$
0
0

प्रशांत भरवीरकर, नाशिक

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाच्या कृषी विस्तार पीएच. डी. व एम. एस्सी. या नामसदृष्य पदव्यांची अनधिकृत खैरात वाटण्याचा अट्टहास यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषीविद्या शाखेकडून सुरू असून, यूजीसीचे कृषी शिक्षणक्रमाबाबत निकष डावलून तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची मान्यता नसताना दिलेल्या नामसदृष्य कृषीविस्तार पीएच. डी, एम. एस्सीच्या पदव्यांतून विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक होणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने कृषीशिक्षण व शिक्षक नेमणुकीचे नियम करण्याचे अधिकार कृषी अनुसंधान परिषदेला दिले आहे. त्यानुसार कृषी विद्यापीठातील शिक्षणक्रम राबविले जातात. मुक्त विद्यापीठाने मात्र कृषीविस्तार पीएच.डी, एम.एस्स‌ी. शिक्षणक्रम सुरू करण्याचा घाट घालताना चक्क अशैक्षणिक पदावरील गाईड व शिक्षक म्हणून नेमले आहेत. कृषी अनुसंधान परिषदेच्या मान्यतेशिवाय मुक्त विद्यापीठातून होणारे हे विद्यार्थी कोणत्याही शैक्षणिक पदावर डायरेक्ट काम करू शकणार नाहीत, असे मुक्त विद्यापीठानेच आपल्या वेबसाईटवर नमूद केलेले आहे असे असतानाही मुक्त विद्यापीठातून कृषीविस्तार विषयात पीएच.डी. पदवी घेतलेल्या एकाला आता त्याच विषयासाठी शिक्षक व गाईड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ते यूजीसीच्या नियमानुसार अशैक्षणिक पदावर आहेत. त्यांनी मुक्त विद्यापीठातून प्राप्त केलेल्या कृषीविस्तार पदवीला विद्यापीठ अनुदान आयोग व कृषी अनुसंधान परिषद या दोन्ही शिखर संस्थांची मान्यता नाही. मुक्त विद्यापीठाने २००९ नंतरच्या सर्व पीएच.डी. पदवी यूजीसीने अमान्य ठरविल्या आहेत.

मुक्त विद्यापीठातील कृषी विद्याशाखेचे संचालक हे मायक्रोबायोलॉजी विषयातील एम.एस्सी. व पीएच.डी. आहेत. ते कृषीविस्तार न शिकताच कृषीविस्तार विषयात विद्यार्थ्यांना गाईड करणार आहेत. याबाबी यूजीसी आणि कृषी अनुसंधान परिषदेच्या नियमात बसत नाहीत. हा प्रकार पीएच.डी. इतिहासाच्या प्राध्यापकाने पीएच.डी. फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना संशोधन शिकवण्यासारखे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृत्रिम पाऊसही रुसला

$
0
0

प्रवीण बिडवे, येवला

दोन वर्षांपासून पाण्यासाठी आसुसलेले येवला तालुक्याच्या पूर्वेकडील शिवार आजही कोरडेच राह‌लिे. कृत्र‌मि पावसासाठी यंत्रणा सज्ज झाली; परंतु उनाड वाऱ्याने ढग पिटाळून लावत बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले. आता पुन्हा सोमवारी यंत्रणा या सायगावमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणार आहे.

दोन वर्षांपासून पाऊस हूलकावणी देत असल्याने आता या भागातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणीही आटू लागले आहे. मृगापाठोपाठ काही नक्षत्रे वाकुल्या दाखवित कोरडीच गेली. आता अश्लेषा नक्षत्र आले. पण पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. म्हणून कृत्र‌मि पाऊस पाडण्याचा विचार पुढे आला आणि त्यासाठी सायगाव पंचक्रोषीची निवडही झाली. आज हमखास पाऊस पडेल, कोरडठाक शिवार ओलं होईल, अशी आस डोळ्यात घेऊन शेकडो शेतकरी सायगाव फाट्यावरील बांदावर येऊन बसले. वाऱ्याच्या प्रवाहामुळे ढग वाहून जात होते, तर शेतकरी उजाड शिवारात हताशपणे येरझऱ्या घालत होते. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमाराला प्रथम प्रांताधिकारी वासंती माळी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांसह दाखल झाल्या. पाठोपाठ इंटरनॅशनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज (आयएसपीएस) तसेच हिंद फाऊंडेशन रॉकेट फायरिंगचा ताफा ताफा शिवारात पोहोचला. वातावरणाचा अंदाज घेत अधिकाऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेत आपसात चर्चा केली. त्यावेळी शेतकऱ्यांचे चित्त या चर्चेकडे लागले होते. अधिकारी आल्याचे कळताच शेकडो शेतकऱ्यांनी आशेने येथे गर्दी केली. या गर्दीने अधिकाऱ्यांना शांतपणे काम करू द्यावे, यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली.

पण, ढग जमलेच नाहीत..

कृत्र‌मि पावसाचा चमत्कार पहिल्यांदाच अनुभवता येणार असल्याने सर्वांचे चित्त त्याकडे लागले होते. यंत्रणेने शेतांमध्ये रॉकेट लाँचर्स रोवले. आकाशात अपेक्षित ढगांची गर्दी झाल्यानंतर या लाँचर्सच्या माध्यमातून ढगांचा वेध घेतला जाणार होता. त्यासाठी सुरूवातीला सकाळी ११ ची त्यानंतर दुपारी एकची वेळ ठरविण्यात आली. घड्याळ्याचा काटा पाच-पाच मिन‌टिांनी पुढे सरकताना बळीराच्या ह्रदयाचा ठोकाही चुकत होता. तब्बल तीन तासांच्या प्रतिक्षेनंतरही अपेक्षित ढग जमा न झाल्याने रॉकेट लाँचर्स जागेवरच राह‌लिे. ढगच न जमल्याने बळीराजाच्या डोळ्यात दाटलेल्या अपेक्षांचे पाणी पाणी झाले.

आज वाऱ्याचा जोर खूप होता. त्यामुळे ढग एका ठिकाणी जमा न होता विखुरले जात होते. किमान एक किलोमीटर परिघापर्यंत ढग जमा होणे अपेक्षित होते. तसे झाले असते तर आम्हाला रॉकेटद्वारे त्याचा वेध घेता आला असता. अपेक्षित ढग अन् आर्द्रतेअभावी आम्ही हा प्रयोग चोवीस तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

अब्दुल रेहमान वान्नु, आयएसपीएसचे ट्रस्टी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरंदरे हेच खरे जेम्स लेन: आव्हाड

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

राष्ट्रमाता जिजाऊंचे चारित्र्यहनन करणारे बाबासाहेब पुरंदरे हेच खरे जेम्स लेन आहेत असा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा पुरंदरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध करण्यासाठी राज्यभर सध्या शिवसन्मान जागर परिषदा घेतल्या जात आहेत. या मालिकेतील अकरावी परिषद नाशिकमध्ये पार पडली. पंधरवड्यापूर्वीच सांगलीत झालेल्या परिषदेत आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळेच या परिषदेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या गराड्यातच ही परिषद पार पडली. यावेळी बोलताना आव्हाड यांनी पुरंदरे यांच्यावर नव्याने टीकास्त्र सोडले. पुरंदरे यांच्या साहित्यात विकृती भरलेली आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचं त्यांनी केलेलं चारित्र्यहनन म्हणजे आधुनिक मनुस्मृतीच आहे. स्वत:ला शिवशाहीर म्हणवणाऱ्या या व्यक्तीने इतिहासाचा खून केला आहे. त्यामुळेच आता जीव गेला तरी बेहत्तर पण मागे हटणार नाही', असा इशारा आव्हाड यांनी दिला.

शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाबाबत चाललेल्या घोळास पुरंदरेच जबाबदार असल्याचा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला. पुरंदरेंच्या साहित्यात सत्य कसे लपवण्यात आले, याचाही दाखला आव्हाड यांनी दिला. 'शिवरायांवर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने वार केला होता. मात्र पुरंदरेनी कुलकर्णी हा उल्लेख टाळला. पण दुसरीकडे अफजल खानाच्या वधाचे प्रदर्शन करून हिंदू-मुस्लिम वाद शालेय जीवनातही धगधगत राहिल, याची काळजी घेतली. देशात जातीयवाद पेटण्यामागचे हेच खरे कारण आहे' असे आव्हाड म्हणाले.

परिषदेला इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रतिमा परदेशी, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, सुरेश देसले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतीपदासाठी रस्सीखेच

$
0
0

पाच ऑगस्टला महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेतील सत्तारुढ तिसरी आघाडी व काँग्रेस यांच्यात स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांकडे समसमान सदस्यसंख्या असल्याने कोण बाजी मारते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

स्थायी समिती सभापतीपदाची मुदत ३१ जुलै रोजी संपली असून, आता नव्या सभापतीपदाच्या निवडणुकीचे राजकारण सुरू झाले आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नाशिक महसूल विभागाचे अप्पर आयुक्त आर. जी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बोलविलेल्या विशेष सभेत स्थायी समिती सभापती कोण हे निश्चित होणार आहे. सभापतीपदासाठी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसकडून ताहेरा शेख व तिसरी आघाडीकडून यास्मीन बानो एजाज बेग यांनी अर्ज दाखल केले असल्याने त्यांच्यात सरळ लढत होणार आहे.

कुठल्याही पक्षास स्पष्ट बहुमत नसल्याने कोण कोणासोबत जाते यावरच स्थायी समिती सभापतीपदावर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होते हे निश्चित होईल. सत्तारूढ तिसऱ्या आघाडीकडून यावेळी माजी सभापती एजाज बेग यांच्या पत्नी यास्मिन एजाज बेग यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे सभापतीपदी महिलाराज येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, यावेळी तिसरा आघाडीच्या गोटात नाराजीचा सूर असल्याने त्याचा फटका त्यांना बसू शकतो. कारण यास्मीन बेग यांना उमेदवारी दिल्याने उपमहापौर हाजी मो. युनूस नाराज असल्याचे समजते.

तसेच महाजचे माजी गटनेते एजाज उमर हे देखील नाराज असून, ते काँग्रेसच्या पदरात आपले मत टाकतील, अशी शक्यता आहे. तिकडे महापौरपदाच्या निवडणुकीत तिसऱ्या आघाडीसोबत चांगले संबंध असलेले शिवसेना, ज. द. व मालेगाव विकास आघाडी यांचे काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध देखील काँग्रेसच्या कामी येऊ शकतात. त्यामुळे महापौरपद आपल्याकडे राखण्यात महाजला यश आले असले तरी स्थायी सभापतीपद देखील आपल्याकडे राखण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

महिला व बालकल्याणसाठीही निवड

५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्थायी समिती सभापती निवडीबरोबरच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड देखील होणार आहे. नुकतीच या समितीच्या ९ सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात काँग्रेस ३, शिवसेना १, शहर विकास आघाडी १, तिसरी आघाडी ३, जनता दल १, असे बलाबल आहे. सभापतिपदाकरिता शहर विकास आघाडीच्या संगीता सुरेश गवळी यांचे चार अर्ज तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या रेखा कैलास येशीकार यांचे दोन अर्ज दखल झाल्याने या दोघांची निवड निश्चित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी किती बळी जाणार?

$
0
0

इंगळेनगर चौक ठरतोय मृत्यूचा सापळा

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोड येथील इंगळेनगर चौकात ट्रकने धडक दिल्यामुळे मध्यवर्ती कारागृहाचा कर्मचार सोमवारी ठार झाला. बेशिस्त वाहतूक, प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे या चौकात दोन वर्षात आठ बळी गेले आहेत. आठवडाभरात योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

नाशिक-पुणे, नाशिक-औरंगाबाद आणि आग्रा-मुंबई मार्गाला जोडणाऱ्या जेलरोडवर वाहतूक बेसुमार वाढली आहे. अवजड वाहतुकीस बंदी असल्याचा बोर्ड बिटको चौकात केवळ नावालाच आहे. जेलरोडवर अवजड वाहनांमुळे आतापर्यंत असंख्य बळी गेले आहेत. गेल्या वर्षी बिटको चौकात शालेय विद्यार्थी ट्रकखाली ठार झाला होता. या मार्गावर नाशिक व नाशिकरोडला जाणारे हजारो लोक, राज्य-परराज्यातील ट्रक, डझनभर शाळांचे हजोरा विद्यार्थी ये-जा करतात.

सिग्नलची आवश्यकता

इंगळेनगरच्या पाण्याच्या टाकीवरील चौक अत्यंक घातक झाला आहे. येथे महापालिकेच्या तीन शाळा, नाशिकरोड प्रेस, भाजीबाजार, मटनमार्केट आहे. या चौकातून उपनगर, पवारवाडी, नांदूरनाका आणि बिटकोकडे जाणाऱ्यांची चढाओढ असते. सहा महिन्यांपूर्वी या चौकात महिलेला ट्रकने चिरडल्यानंतर नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर एक ट्यूब व पिवळे दोन सिग्नल नावाला लावण्यात आले. ते आता बंद आहेत. ग‌तिरोधक नसल्याने वाहने सुसाट जातात. त्यामुळे रस्ता ओंलाडणे जिकरीचे झाले आहे.

हप्ते आणि अतिक्रमण

इंगळेनगर चौकात मटन बाजार, मच्छीबाजार आहे. दारुचे दुकाने आहेत. खाद्यपदार्थ विक्रेते, फळ, भाजी व फुलविक्रेते बसतात. दुकानेही आहेत. या सर्वांचे पार्किंग रस्त्यावर येते. या सर्व कारणामुळे येथे अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेचे पथक गेले की हप्ते घेणारे नेते त्यांना आडवतात. मटन विक्रेत्यांनी फेकलेले तुकडे खाण्यासाठी कुत्र्यांच्या टोळ्या जमा होतात. रात्री उशिरापर्यंत मार्केट सुरूच असते.



या हव्यात उपाययोजना

> चौकात हायमास्ट अत्यंत आवश्यक आहे

> गतिरोधकाची अधिक गरज आहे

> अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत

> रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई करावी

> वाहतूक पोलिस उपस्थित असावेत

> चौकातील पोलिस चौकी नियमित उघडी ठेवावी

> वेगाने जाणाऱ्या व बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी

> अवजड वाहनांवर तातडीने कारवाई करावी



जेलरोडवर प्रशासनाची बेपर्वाई आणखी किती बळी घेणार आहे? इंगळेनगर चौकातील वाहतुकीचा प्रश्न आठ दिवसात सुटला नाही तर सिग्नल, गतिरोधक आणि हायमास्ट बसवला नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल. - विक्रम खरोटे, शिवसेना विभागप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांची वाट खडतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनाचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या सोमेश्वर महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता खड्ड्यांनी व्यापला गेला आहे. यामुळे रस्त्यावरून जातांना भाविकांना खडतर रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे. सोमेश्वर मंदिराकडे जाणारा रस्त्याची नवनिर्मिती करण्याची मागणी भाविकांनी केली आहे.

गंगापूररोडवरील सोमेश्वर मंदिर नाशिककरांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. अनेक शाळांच्या सहली देखील तेथे येतात. परंतु, बारा वर्षांपासून सातपूर एमआयडीसी, सोमेश्वर कॉलनी तसेच ‌शेतीशिवारातून सोमेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ताच खड्ड्यात गेला आहे. एकीकडे सिहंस्थ कुंभमेळ्यात महापालिकेने मुख्य रस्त्यांची कामे हाती घेत पूर्ण करण्याचा धडाका लावला आहे. मात्र, भाविकांची नेहमीच रहदारीचा असलेला सोमेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुर्लक्षित राहिला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे.

सोमेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पूर्वीपासून सातपूर एमआयडीसीतून जाणाऱ्या मार्गाचा भाविक वापर करतात. यात बारा वर्षांपूर्वी महापालिकेने डांबरी रस्ता तयार केला होता. परंतु, सद्यस्थितीत मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची गरज आहे. - तुषार भावले, भाविक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेची खड्ड्यांशीच थेटभेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

महापालिकेकडून नाशिकचा स्मार्ट सिटीत समावेश होण्यासाठी प्रयत्न सुरू असतांनाच प्रशासनाच्या उदासीन आणि नियोजनशून्य कारभारामुळे वाहनचालकांसह पायी चालणाऱ्यांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. चालकांना रस्ता शोधतांना नागरिकांची पुरती दमछाक होत असून खड्ड्यांशी पावलोपावली होत असलेल्या थेट भेटीमुळे अपघातांचीही संख्या वाढली आहे.

महापालिकेच्या पूर्व विभागात भर पावसात कामे सुरू आहेत. यासाठी ‌ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. परिसरातील विविध भागांमध्ये मुख्य रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. दररोज छोटेमोठे अपघात घडून नागरिक आणि वाहनचालक गंभीर जखमी होत आहेत. या पार्श्वभूमिवर बांधकाम विभागातील उपअभियंता रवींद्र धारणकर तत्काळ ठोस उपाययोजना करीत नसल्याची त्रस्त नागरिकांची तक्रार आहे.

जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न

मुख्य रस्त्यांवरील खड्डे जिवघेणे ठरत असून पाऊस पडला की यात पावसाचे पाणी साचते. यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. नागजी चौकातील काही दिवसांपूर्वी अशाच पाण्याने भरलेल्या खड्ड्यामुळे पडलेल्या २५ वर्षीय तरुणाचा अपघात झाला. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो कोमात गेला आहे. खड्डे केव्हा बुजविणार याविषयी पूर्व विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ यांना विचारले असता त्यांनी थेट उप अभियंता रवींद्र धारणकरांकडे बोट दाखविले. तर धारणकर यांच्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले असता त्यांनी याविषयी काहीही भाष्य करण्यास नकार दिला. त्यामुळे प्रस्तावित स्मार्ट सिटीत सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीत खड्डे पार करीत भाविकांना रामकुंडापर्यंत जाण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. त्याच्या सोयीसाठी तरी खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

रोगापेक्षा इलाज भयंकर

पूर्व विभागातील विशेषत: जुने नाशिक परिसरात ठिकठिकाणी निर्माण झालेले खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नुकतीच मिरवणूक काढण्यात आली. मात्र, या मिरवणुकीलाही खड्ड्यांचे अडथळ्यांचा सामना करावा लागला. निकृष्ट दर्जाचे मुरूम टाकून काही खड्डे बुजविण्याचा प्रयत्न बांधकाम विभागाने केला आहे. मात्र, त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असेच म्हणण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे.

जुने नाशिकमध्ये मुख्य रस्त्यांवरील खड्डे जिवघेणे ठरत आहे. सिंहस्थात लाखो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी तरी खड्डे त्वरित बुजविण्याची गरज आहे. - संजय पवार

अपघाताला कारणीभूत ठरणारे खड्डे त्वरित बुजविण्याची गरज आहे. महापालिका पूर्व विभागातील सुस्त बांधकाम विभागामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे. - मंदाकिनी पगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चंद्राई’वर बीजारोपण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने किल्ले चंद्राईवर २६ वी श्रमदान मोहीम नुकतीच झाली. या दुर्गसंवर्धन मोहिमेत चंद्राई किल्ल्यावर जलाशयांच्या लगतच्या भागात कमी पाण्यावर जगणारी वड, पिंपळ, उंबर, सीता अशोक, करंजी, इलायती चिंच अशी ३०० हून अधिक रोपे लावण्यात आली. या रोपांना जवळच्याच जलाशयांतून पाणीही टाकण्यात आले.

चंद्राई गडाला पश्चिमेच्या बाजूने गोलाकार वळसा घालून जात असताना वाटेच्या दुतर्फा बीजारोपण करण्यात आले. चंद्राई किल्ल्यावरील यादवांच्या काळातील तसेच होळकरांच्या काळातील मंदिरे, गुप्त भुयारे, जलाशय आणि वाड्यांचे भग्न अवशेष आहे. ऐतिहासिक होळकर टांकसाळही पूर्ण जमीनदोस्त आणि पूर्ण दुर्लक्षित आहे.

पुढील महिन्यात नाशकात होणाऱ्या अखिल भारतीय दुर्गसंवर्धक समिती व राज्य शासनाच्या दुर्गसंवर्धन समितीच्या संयुक्त बैठकीत नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची दयनीय अवस्था मांडण्यात येणार आहे. किल्ल्यावर भल्या सकाळी गेल्यावर दुर्गसंवर्धकानी मोहिमेत चांद्रेश्वराच्या दक्षिणेपासून किल्ला चढाई सुरु केली. जलाशयांच्या बाजूला जंगली रोपांचे रोपण आणि बीजारोपण प्रथम करण्यात आले. नाशिकच्या द्वारका भागातील जेष्ठ नागरिक विश्वनाथ पाटील यांनी या मोहिमेसाठी सीता, अशोकाची १०० हून अधिक रोपे दिली. त्यांच्या निवासात त्यांनी अनेक वृक्षांची लागवड केली असून उपनगर येथील जेष्ठ नागरिक यशवंत धांडे यांनी पिंपळ, वड, उंबराची १५० रोपे आणि बीजारोपणासाठी बिया दिल्या. नाशिकच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दिलेली रोपे व बीज शिवकार्य गडकोट मोहिमेच्या दुर्गसंवर्धकांनी चंद्राईवर लावले. नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचा हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी नाशिकच्या शिवकार्य गडकोट मोहिमेच्या दुर्गप्रेमींनी गेल्या ३ वर्षांहून अधिक काळापासून श्रमदानाच्या सतत मोहिमा राबविल्या आहेत. किल्ले वाचवा आंदोलनाच्या माध्यमातून सतत शासनाला पत्रव्यवहार केला जात आहे आणि गावोगावी उत्सवात, शाळाशाळांत 'जेव्हा गड बोलू लागला' हा एकपात्री प्रयोग, किल्ल्यांचे पोस्टर प्रदर्शन, व्याख्याने, दुर्ग गाणी सादर करून किल्ले वाचवण्याचे आवाहन केले जात आहे. किल्ले चंद्राईवर कलाकार संकेत नेवकर याने एकपात्री प्रयोग सादर केला. प्रभाकर वायचळे यांनी वाद्य वाजवून सामाजिक गाणी गायली. किल्ले चंद्राई श्रमदान मोहिमेत शिवकार्य गडकोट मोहिमेचे संस्थापक राम खुर्दळ, मुख्य संयोजक योगेश कापसे ,जेष्ठ दुर्गसंवर्धक यशवंत धांडे, पक्षीमित्र भीमराव राजोळे, वनौषधी अभ्यासक डॉ शाम ओझरकर, डॉ अजय पाटील, बळ दुर्गसंवर्धक सलीम इत्यादी दुर्गसंवर्धक मोहिमेत सहभागी होते.

ठेवा दुर्लक्षित...

चंद्राईवर मल्हारराव होळकरांची टांकसाळ अत्यंत भग्न अवस्थेत आहे. शासनाच्या कुठल्याही खात्याने या किल्ल्याची माहिती देणारा फलक येथे उभारलेला नाही आणि संवर्धनासाठी साधा कुठलाही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या स्थितीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बारमालक बनला महामंडलेश्वर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अलाहाबाद आखाडा परिषदेने चक्का एका बिअरबाल मालकास 'महामंडलेश्वर' ही पदवी​ प्रदान केली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमास एक केंद्रीय मंत्री तसेच अखिल भारतीय आखडा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा सांगणारे नरेंद्रगिरी महाराज हजर होते. याच मुद्यावरून अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी नरेंद्रगिरीसह अलाहाबादा आखाडा परिषदेचा समाचार घेतला आहे. सरकारने अशा खोट्या पदव्या घेणाऱ्या आणि देणाऱ्यांना रोखण्याची मागणी केली आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषद हीच एकमेव संस्था असून अलाहाबाद आखाडा परिषद खोट्या मार्गाने पदव्यांचे वाटप करीत असल्याचा दावा त्यांनी केला. अलाहाबाद आखाडा परिषदेने बिल्डर तसेच बिअरबार मालक असलेल्या सचिन दत्ता उर्फ सच्चिदानंद गिरी यांना महामंडलेश्वर ही पदवी बहाल केल्याचे ग्यानदास महाराजांनी सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात नरेंद्रगिरी यांनी अभिषेक केला तर उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री शिवपाल यादव उपस्थित होते. त्यांच्याच हेलिकॉप्टरमधून महामंडलेश्वरांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. याबाबत, महंत ग्यानदास यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी नरेंद्रगिरीसह अलहाबाद आखाडा परिषदेवर टीकेची झोड उठवली. खोटी संस्था आणि खोट्या व्यक्ती पदव्या देण्याचे काम करीत असून या पदव्या घेणारेही खोटे असल्याचा दावा त्यांनी केला.

धर्माच्या आड व्यवसाय!

आमच्याकडे पदवी देताना पार्श्वभूमी बघितली जाते. धर्मासाठी काय काम केले? त्याचा धर्माचा अभ्यास किती? असे तपासून मगच एखादी पदवी​ दिली जाते. मात्र, काही व्यक्तींनी धर्माच्या आड व्यवसाय मांडला असून त्यास नरेंद्रगिरींचा पाठिंबा असणे यातच सारे काही आले, असे ग्यानदास महाराजांनी स्पष्ट केले. खोट्या व्यक्तींना शासन करण्याचे काम सरकारचे आहे. नकली साधूंना कुंभमेळ्यापासून दूर रोखण्याची जबाबदारी सरकारने पार पाडावी, अशीही मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थासाठी ५५ कोटींचे कर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यांच्या कामांसाठी महापालिकेन मंजूर कर्जापैकी ५५ कोटी रुपयांची उचल बँकेतून घेतली आहे. तर शासनाकडून प्राप्त झालेल्या ४८७ कोटीपैकी तब्बल ५३ कोटींचा निधी महापालिकेकडून आहे. दरम्यान, स्थायी समितीने भूसंपदासाठी ५० कोटीचे कर्ज घेण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे नियमित निधीतूनच भूसंपादनाचे पैसे दिले जाणार असल्याने त्याचा विकासकामांवर परिणाम होणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी चारशे कोटीचे कर्ज घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. सिंहस्थाच्या विकासकामांसाठी २६० कोटी कर्ज घेतले जाणार आहे. तर ९० कोटी हुडको योजनेसाठी वापरले जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा निधीसाठी महापालिकेने आतापर्यंत आपल्या वाट्यातील ४८७ कोटी रुपये दिले आहेत. त्यापैकी ५३ कोटी अद्यापही महापालिकेकडे पडून आहे. त्यामुळे महापालिकेचा निधी अद्याप खर्च झालेला नाही. महापालिकाने मंजूर कर्जापैकी आतापर्यंत ५५ कोटींचे कर्ज उचलले आहे. तर अद्यापही २०५ कोटींचे कर्ज उचलणे बाकी आहे. दरम्यान स्थायी समितीने भूसंपादनासाठी लागणारे ५० कोटीचे कर्ज घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी लागणारा निधी आता नियमित खर्चातून केला जाणार आहे. अगोदरच विकासकामांसाठी महापालिकेकडे निधी नाही. त्यामुळे भूसंपादनाचे पैसे कुठून देणार? असा प्रश्न लेखा विभागाला पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाद टाळण्यासाठी धावपळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या महिन्यात १४ तारखेला पुरोहित संघाच्या झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यासारखा वाद साधुग्रामच्या १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यात टाळण्यासाठी महापालिकेन धावपळ सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना या सोहळ्यासाठी आमत्रंण दिले जाणार असून भाजपतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर नगरसेवकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उभे केले जाणार आहे. सोबतच सिंहस्थाचे प्रवेशद्वार मुदतीत पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू आहे.

रामकुंडावर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरून थेट महासभेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. महापालिकेने कार्यक्रम घेणे अपेक्षित असतांना पुरोहित संघाने हा कार्यक्रम घेतल्याने वाद वाढला होता. पुरोहित संघापाठोपाठ येत्या १९ ऑगस्टला साधुग्राममध्ये आखाड्यांचे ध्वजारोहण होणार आहे. त्याची तयारी आता महापालिकेकडूनच केली जात असून त्यासाठी भव्य व्यासपीठाची निर्मिती केली जात आहे. सोबतच सिंहस्थाचे प्रवेशद्वार या ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

सोहळ्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनाही निमंत्रण दिली जाणार आहे. सोबतच पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठावरही स्थान दिले जाणार आहे. आखाडा परिषदेच्या वतीने या सोहळ्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे अमित शाह या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, शिवसेना या पक्षाच्या राज्यस्तरावरील नेत्यांनाही स्वतंत्रपणे निमंत्रणे दिली जाणार आहे. सर्व नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने सर्व खर्चाचा भार उचलण्यात येणार आहे. कोणताही वाद निर्माण होवू नये सर्वांनाच मानापमानाचे स्थान दिले जाणार आहे.

उद्धव, राज यांना साकडे

ध्वजारोहण सोहळ्यासाठी विशेषता भाजपचे अध्यक्ष अमित शाह, शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आखाडा परिषदेतर्फे स्वतंत्र निमंत्रण दिले जाणार आहे. या तीन नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी आखाडा परिषदेतर्फेत प्रयत्न केले जात आहेत. मात्र, उद्धव आणि राज या कार्यक्रमाला येण्याची शक्यता कमी असल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंनाही या कार्यक्रमासाठी बोलवले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईबाबांवरून रणकंदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चराचरात ईश्वर असल्याची जाणिव करून देणाऱ्या संस्कृतीचा साईबाबांनी लौकीक वाढवला. मनुष्याच्या रुपात साईबाबा साक्षात ईश्वरचे रुप होते. माणुसकीची शिकवण देणाऱ्या संताचा यापुढे कोणताही अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी देत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्यावर निशाणा साधाला.

द्वारकापीठाधीश्वर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबा हे संत किंवा देव नसल्याचा दावा केला आहे. यावरून बरेच वाद उद्भवले असून नाशिकमध्ये आल्यानतंर शंकराचार्यांनी पुन्हा तीच री ओढली. साईबाबा आणि धर्माचा कोणाताही संबंध नसून साईबाबांची मूर्ती हटवण्याची मागणी शंकराचार्य सरस्वती यांनी केली आहे. मागील वर्षापासून सरस्वती या मुद्यावर भांडत असून त्यांनी एक पुस्तकही प्रकाशित केले आहे. या पार्श्वभूमीवर महंत ग्यानदास यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना साईबाबांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. साईबाबा सिध्द पुरूष होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार ठरू शकतो. साईबाबांवर टीका केली जात असल्यापासून शिर्डीतील भाविकांची संख्याही वाढली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. द्वैत-अद्वैतच्या लढाईत संताच्या संतपणावर शंका घेणे उचित नसून इतरही शंकराचार्य आहेत. मात्र, ते असे वाद उभे करीत नाही. साईबाबांच्या देवत्वाच्या मुद्यावरून शंकराचार्यांनी हिंमत असेल तर चर्चेसाठी पुढे यावे, असे आव्हान ग्यानदास महाराजांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैचारिक दृष्टिकोन बदला

$
0
0

महिलांना मंदिरांमध्ये असलेली प्रवेशबंदी रद्द करायला हवी. यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा. मात्र महिलांनी स्वतः पुढे येणे गरजेचे आहे, असे मत गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी व्यक्त केले आहे.

महिलांना मंदिरांमध्ये असलेल्या प्रवेशबंदीबद्दल तुमचे मत काय?

- मुळात महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्याचा कुणालाही अधिकार नाही. पुरुषप्रधान संस्कृती, धार्मिक गोष्टींचा पगडा आणि या सगळ्यांबाबत महिलांची मवाळ भूमिका यामुळे महिला अशा ठिकाणांपासून दूरच राहतात.स्त्री-पुरुष समानतेबद्दल आपल्याकडे खूप चर्चा होतात. मात्र त्यावर प्रत्यक्षात पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे यासाठी आपली व्यवस्था बळकट व्हायला हवी. यामागे असलेल्या भावना, रुढी परंपरा यांची पूर्ण माहिती कुणालाच नाही.

महिलांचा यातील सहभाग कशाप्रकारे असावा?

- एखाद्या मुलीने मला प्रश्न केला की, मला मंदिरात का जाऊ दिले नाही? तर यावर माझ्याकडे उत्तर नसते. खरे तर, महिलांनी यासाठी एकजुटीने उभे राहणे आवश्यक आहे. समाज आणि घडणाऱ्या घटना या दोन गोष्टींचा वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असतो. आज महिलांनी सर्व क्षेत्रात प्रगती केली, पण तरीही एका ठराविक टप्प्यावर त्यांना शोभेची वस्तू म्हणूनच ग्राह्य धरले जाते. त्यांचे विचार प्रगल्भ व्हावेत, त्यांना व्यक्त होता यावे, यासाठी कोठेही ठाम भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे महिलाही मनात भीती धरून हे सर्व नियम पाळत असतात. हा भेदाभेद दूर करायचा असेल, तर त्यासाठी महिलांनी वैचारिक दृष्टीकोनातून या विषयाकडे पाहायला हवे.

पुरुषांच्या मानसिकतेबद्दल काय?

- इतिहासात डोकावले, तर महिलांच्या विकासामध्ये पुरुषांचा सहभाग खूप मोलाचा होता. महात्मा फुले, राजा राममोहन रॉय यांसारख्या पुरुषांनी महिलांना बंधनामधून मुक्त केले. आज पुरुषांची तशी भूमिका दिसत नाही. पुरुषांचा यासाठी आग्रह आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी स्त्रियांच्या पाठिशी उभे राहणारे पुरुष आपल्याला दिसतात. मात्र याबाबतीत घरामधून कोणी पुढाकार घेत नाही. त्यामुळे पुरुषांनी मानसिकता बदलून खंबीर भूमिका घ्यायला हवी.

सामाजिक संस्थांची भूमिका किती महत्त्वाची?

- सामाजिक संस्थांनी हा विषय पुढे आणणे गरजेचे आहे. त्याविषयी पूर्ण अभ्यास करून समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचे काम प्रसारमाध्यमे उत्तमपणे करू शकतात. सकारात्मक दृष्ट‌किोन देण्याचे काम सामाजिक संस्था करतात. त्यामुळे या विषयाला हात घालून, यावर संशोधन करून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचे काम सामजिक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल.

प्रशासनाने काय दखल घ्यावी?

- सामाजिक संस्था असोत वा प्रशासन, येथील लोक समाजाचे घटकच आहेत. मुळात यासाठी योग्य काम करणारी व्यवस्था निर्माण व्हायला हवी. राज्यघटनेमध्ये स्त्री-पुरुष हा भेदाभेद न करता एक व्यक्ती म्हणून सर्वांचा विचार केला गेला आहे. त्याचप्रमाणे मंदिरातील प्रवेशाबाबतीत स्त्री किंवा पुरुष हा भेद न करता एक व्यक्ती म्हणून तिला तिचा अधिकार देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करायला हवा. यासाठी मोठ्या पातळीवर चळवळ आवश्यक आहे. त्यामध्ये स्त्रियांनी स्वतः पुढे येणे अधिक महत्त्वाचे आहे.

(शब्दांकन- अश्विनी पाटील)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>