Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अलोट गर्दीत हरवले 'साधू'

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : साधुग्राममध्ये जमलेल्या लाखो भाविकांना शाही मिरवणुकीत सहभागी होता आले. भाविकांचा लोंढा एवढा प्रचंड होता की यात साधू, आखाडे आणि खालसे यांची उपस्थिती काही वेळ नगण्य ठरली. साधुग्राम, शाहीमार्ग रामकुंड याठिकाणी मिळेल त्या जागेवर भाविक रात्रभर थांबले. सकाळी शाही मिरवणूक गौरी पटागंणावर आली असता शेकडोंच्या संख्येने भाविक यात सहभागी झाले. भाविकांच्या प्रचंड गर्दीत काही हजार साधू हरवल्याचे दिसून आले.

पहिल्या शाही मिरवणुकीत साधूंची उपस्थिती फारच कमी होती. त्यामुळे साधुग्रामवर झालेला खर्च आणि त्या अनुषंगाने उदभवणारे अनेक प्रश्न निर्माण झाले. दुसऱ्या पर्वणीदरम्यान साधूंची संख्या वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्या पर्वणीप्रमाणे यावेळेस सुद्धा अंदाजे ४० ते ५० हजार साधू महंतांनी हजेरी लावली. नाशिकचे कुंभमेळ्यात साधूंची संख्या घटण्याचे नेमके कारण मात्र मिळू शकलेले नाही. तिसऱ्या पर्वणीला साधूंची संख्या यापेक्षा कमी होऊ शकते.

दरम्यान, शनिवारी सकाळपासून साधुग्रामसह, रामकुंड, गौरी पटांगण, शाहीमार्ग आदी ठिकाणी भाविकांची रीघ लागली होती. शनिवारी रात्री सुमारे ४ ते ५ लाख भाविक या परिसरात बसले होते. रात्री दोन वाजेपर्यंत भाविक रामकुंडावर तळ ठोकून होते. मात्र, यानंतर पोलिस प्रशासाने भाविकांना रामकुंडासह गौरी पटांगणावरून बाहेर काढण्यास सुरुवात केली. बहुसंख्य भाविकांनी मग गणेशवाडी भाजी बाजारात आसरा घेतला. साधुग्राममधून आलेले भाविक मात्र मिरवणुकीसोबत थेट रामकुंडापर्यंत पोहचले.

प्रेशर पॉईंट ठरला त्रासदायक

साधुग्राममधून येणारे लाखो भाविक शाहीमार्गाने किंवा नवीन शाहीमार्गाने गौरी पटागंणावर पोहचत होते. या भाविकांना पोलिस शाही मार्गावरून गौरी पटागंणावर काढत होते. मात्र, सकाळी ८ वाजेच्या सुमारास श्री पंच मोही निर्मोही आखाड्याची मिरवणूक येथे पोहोचल्याबरोबर एकच धांदल उडाली. साधूबरोबर मोठ्या संख्येनी भाविक सुद्धा शाहीमार्गावर घुसू लागले. या ठिकाणी बोटावर मोजता येईल इतके पोलिस असल्याने गर्दी आवरणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे शाही मिरवणुकीत साधूपेक्षा भाविकांची संख्या मोठी झाली. दुसऱ्या शाही मिरवणुकीचा सोहळा भाविकांना पहाता यावा यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात बदल केला होता. त्याचा चांगला परिणाम यावेळेस जाणवला. रामकुंड ते गौरी पटागंण या भागात रस्त्याच्याकडेला भाविक बसले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाविकांची लगबग अन् गोंधळही!

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com

नाशिक : शहरातील डोंगरे वसतिगृहावरून अंतर्गत पार्किंगमधून शहरात अन्यत्र व विशेष करुन त्र्यंबकेश्वर येथे जाण्याची सोय केली असल्याने येथे दिवसभर भाविकांची लगबग दिसून आली. येथे भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागले.

देशातील विविध राज्यांमधून कुटुंबियांसमवेत आलेल्या भाविकांना थेट त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या पर्वणीत दर्शनही दुर्मिळ झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस येथे दिसून आल्याने भाविकांची सोय झाली. मात्र बसेसची संख्या तुरळकच असल्याने बराच वेळ भाविकांना रांगेत ताटकाळत उभे राहण्याची वेळ आल्याचे चित्र येथे होते. शिवाय, या बसेस कुठे जातात, कधी जातात याविषयीची चौकशी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चौकशी केंद्रातही कोणी नसल्याने भाविकांचा गोंधळ उडाल्याचे चित्र येथे दिसून आले.

चौकशी केंद्र ओस

शहरातील बसेसचे मार्ग, वेळ यांची माहिती भाविकांना मिळावी, यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या 'सिंहस्थ कुंभमेळा चौकशी केंद्रा'त एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे भाविकांना माहिती मिळविण्यास अडचणींना सामोरे जावे लागत होते. भाविकांपर्यंत बसेसची माहिती पोहोचविण्यासाठी अॅम्प्लिफायरचीही कोणतीही व्यवस्था प्रशासनामार्फत पुरविण्यात आली नसल्याने ओरडून ओरडून घसा कोरडा पडण्याची वेळ आल्याचे एका कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यातच या केंद्रासमोरही मोठं होर्डिंग लावून ठेवल्याने याची एक बाजू पूर्णतः झाकोळली गेली होती. त्यामुळे केंद्रही या नजरेस पडण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. एकूणच दुर्दशेत सापडलेल्या या केंद्राचा कोणताही लाभ भाविकांना झाला नाही.

दवाखान्यांना प्रतिसाद

शहरातील वातावरण, ऊन-पावसातील अनियमितता यामुळे शरीराच्या लहान-मोठ्या तक्रारींवर येथील दवाखान्यात उपचार करण्यात आले. डोंगरे वसतिगृहावर तयार करण्यात आलेल्या डिस्पेन्सरीमध्ये दिवसभरात सुमारे दीडशे भाविकांनी सर्दी, खोकला, अंगदुखीवर तपासणी करून घेत उपचार करुन घेतल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

रिक्षाचालकांची मुजोरी

डोंगरे वसतिगृहात वाहने पार्क करण्यासाठी दोन प्रवेशद्वारांची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रवेशद्वारांजवळ रिक्षाचालकांनी ठाण मांडल्याने पार्किंगच्या कर्मचार्यांना व्यवस्था करता करता मोठी गैरसोय झाली. भाविकांच्या गाड्या प्रवेशद्वारापासून आत जाण्यासही मोठी अडचण त्यामुळे येत होती. भाविक आपल्या गाड्यांमधून येथे उतरले की, रिक्षाचालक त्यांना घेराव घालून 'कुठे जायचे?' विचारुन भंडावून सोडत होते.

मैदान भरलेच नाही

एसटी बसेसशिवाय दुपारी २ वाजेपर्यंत २२५ दुचाकी, ६२ चारचाकी व ६ टेम्पो येथे पार्क करण्यात आल्या होत्या. दुचाकीसाठी १० रुपये, चारचाकीसाठी २० रुपये तर टेम्पोसाठी ५० रुपये शुल्क येथे घेण्यात येत होता. रात्रीपर्यंत वाहनांची संख्या दुपटीवर जाईल, अशी शक्यता येथील कर्मचाऱ्यांनी वर्तविली होती. पहिल्या पर्वणीच्या तुलनेत यंदा ही संख्या तिपटीने वाढली असली तरी डोंगरे वसतिगृहाच्या प्रशस्त मैदानाचा २५ टक्केच भाग भरला असल्याचे प्रत्यक्ष चित्र बघता लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी धावली अहोरात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

भाविक व पर्यटकांची दुसरी शाही पर्वणी आनंदाची व सुकर व्हावी यासाठी पोलिस प्रशासन व एस. टी महामंडळाने आपल्या नियोजनात आमूलाग्र बदल केला होता. एसटीने थेट त्र्यंबक बसस्थानक तसेच जव्हार फाट्यापर्यंत बस सोडल्याने भाविकांची पायपीट वाचली. नाशिकहून त्र्यंबकसाठी बसच्या सुमारे दोन हजार फेऱ्या झाल्या.

त्र्यंबकला जाण्यासाठी शनिवारपासून भाविकांचा ओघ वाढला. दर पंधरा मिनिटाला बस सोडण्यात येत होती. भाविकांची संख्या पाहून फेऱ्यांमध्येही वाढही करण्यात आली होती. पायपीट करावी लागू नये म्हणून नाशिकहून बसने जाणाऱ्या भाविकांना थेट त्र्यंबक आऊटर बसस्थानक व जव्हारकडून येणाऱ्या भाविकांना जव्हार फाट्यापर्यंत सोडण्यात आले. प‌हिल्या पर्वणीला नाशिककडे येणाऱ्या भाविक व पर्यटकांना ब्रह्मा व्हॅली स्कूलपर्यंत पायपीट करावी लागली होती. यंदा मात्र 'देर आए दुरुस्त आए' म्हणत एसटी प्रवाशांसाठी धावली.

दुसऱ्या पर्वणीत प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची एसटी महामंडळाने खबरदारी घेतली. नाशिकहून दर पाच मिनिटाला एक बस त्र्यंबककडे धावली. खंबाळे पार्किंग येथे न थांबता थेट त्र्यंबकच्या द्वारी भाविकांना सोडले जात होते. सकाळी गर्दी वाढल्याने बसथांब्यात बदल करण्यात आला.

खंबाळेत थांबल्या १२५ बसेस

'होल्ड अॅण्ड रिलीज' पध्दतीनुसार गर्दी पाहूनच बसेस त्र्यंबकच्या दिशेने सोडल्या जात होत्या. त्र्यंबकमध्ये गर्दी वाढल्यानंतर खंबाळे पार्किंगजवळ प्रवाशांनी भरलेल्या सुमारे १२५ बसेस रोखून धरल्या होत्या. यामुळे गर्दी व वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे सोपे गेले. खासगी वाहनांना प्रवेश असूनही भाविकांनी एसटी बसने प्रवास करणे पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसेस दुरुस्तीसाठी महामंडळाचे पथक तैनात

$
0
0

नामदेव पवार, सातपूर

एसटी महामंडळाकडून ठेवण्यात आलेल्या दुसऱ्या शाही स्नानात बिघाड झालेल्या बसेससाठी महामंडळाने खास पथक तैनात केले होते. यामध्ये २४ तास तीन शिफ्टमध्ये एसटी महामंडळाच्या कार्यशाळेचे शंभरच्यावर कर्मचारी नेमण्यात आले होते. या पथकाचा ना‌शिकसह त्र्यंबकसाठी धावणाऱ्या बसेसलाही झाला.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुठेही बसमध्ये बिघाड झाल्यास अथवा ब्रेक डाऊन झाल्यास तत्काळ पथक बसला रिपेअर करण्यासाठी दाखल होतांना दिसून आले. तसेच काही बसेसची चाके पंक्चर झाल्यावर जागेवर बदल्यासाठी देखील कार्यशाळेचे कर्मचारी तत्पर चाक बदलत बस चालकाच उपलब्ध करून देत होते. त्यातच कुंभमेळ्याच्या अगोदरच जवळपास सर्वच बसेसची तपासणी केली असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बिघाड झालेल्या बसेससाठी खास पथक तैनात करण्यात आल्याने रस्त्यावर कुठेही बस उभी दिसली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटांत वाहिले सांडपाण्याचे पाट

$
0
0

anil.pawar@timesgroup.com

त्र्यंबकेश्वर : पहिल्या शाही पर्वणीपासून प्रशासन धडा घेऊन दुसऱ्या शाही पर्वणीत घाटांवरील स्नानांचे नियोजन करेल, ही अपेक्षा फोल ठरली. गटारगंगा बनलेल्या नाथघाटावर भाविकांनी पायही बुडवला नाही तर अहिल्या घाटावर बोटावर मोजण्या इतक्या भाविकांनी स्नान केले. श्री चंद्र घाटावर भाविकांना नाइलाजास्तव स्नान करावे लागले. कोट्यवधी रुपये खर्च करून घाटांचा घाट घातलाच कशाला असा प्रश्न भाविक व स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला.

कुशावर्तावरील भाविकांच्या गर्दीचा भार कमी करण्यासाठी प्रशासनाने अहल्या घाट, नवनाथ घाट व श्री चंद्र घाट व बांधले. यामुळे नाशिककडून येणाऱ्या भाविकांना श्री चंद्र घाटावर तर मुंबई व जव्हारकडून येणाऱ्या भाविकांसाठी नाथघाट व अहल्या घाट बांधण्यात आले. मात्र, दोन्ही शाही पर्वणीत घाटांकडे भाविकांनी पाठ फिरवली. अनेक भाविकांना घाटाचे मार्ग व घाटच माहीत नसल्याने घाटापर्यंत भाविक पोहोचू शकले नाहीत. घाटांची ब्रॅण्डिंग करण्यात प्रशासन अपयशी ठरले.

अहल्या घाटाकडेही दुर्लक्ष

कुशावर्तापेक्षाही स्वच्छ पाणी अहल्या घाटावर होते. मात्र, भाविकांनी कुशावर्ताकडेच धावा केल्याने अहल्या घाट भाविकांनी फुललाच नाही. बोटावर मोजण्या इतक्या भाविकांनी अहल्या घाटावर स्नान केले. अहल्या धरणातून थेट घाटात पाणी सोडण्यात येत होते. तरीही घाटाकडे भाविकांनी पाठ फिरवली.

श्री चंद्र घाट

नाशिककडून येणाऱ्या भाविकांसाठी श्री चंद्र घाट बांधण्यात आला. बाहेरून येणाऱ्या भाविकांनी येथे स्नान केले. मात्र राज्यातील तसेच जिल्ह्यातील भाविकांनी कुशावर्तालाच पसंती दिली. सकाळी नऊ वाजेपर्यंत दोन पाच हजार भाविकांनी येथे स्नान केले. कोट्यवधी रुपयेm खर्च करूनही घाटांचा उपयोग होऊ शकला नाही.

घाट नव्हे गटार

श्री निरंजनी आखाड्या शेजारी भव्य असा श्री नाथघाट बांधण्यात आला आहे. हा घाट बांधण्यामागील प्रशासनाचा उद्देश चांगला असला तरी घाटाच्या पावित्र्याकडे प्रशासनाला लक्ष देता आले नाही. या घाटात त्र्यंबक शहरातील गटारींचे पाणी सोडण्यात आले. घाटाच्या पाण्यावर डास तसेच किडे तरंगताना दिसत होते. त्यांना मारण्यासाठी रसायनाचा वापर करण्यात येत होता. हे सर्व चित्र बघून भाविकांनी या घाटात स्नान करण्याचे टाळले. तेथे नेमलेले कर्मचारीही भाविकांना नाथघाटापेक्षा अहल्या घाटावर स्नान करण्याचा सल्ला देत होते. या घाटाविषयी माहिती असूनही प्रशासनाकडे स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे एकाही भाविकाने स्नान केले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘होल्ड अॅण्ड रिलीज’ने भाविकांचा प्रवेश सुकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

पहिल्या शाही पर्वणीदरम्यान पोलिसांनी भाविक व पर्यटकांना त्र्यंबक शहराबाहेरच रोखून धरले होते. तसेच स्थानिक नागरिकांनाही घराबाहेर पडणे मुश्किल केले होते. दुसऱ्या शाही पर्वणीत मात्र 'होल्ड अॅण्ड रिलीज'चा योग्य समन्वय साधल्याने किरकोळ वादावादीच्या घटना वगळता भाविकांना त्र्यंबक तसेच कुशावर्त गाठणे सोपे गेले. पोलिसांच्या या नियोजनावर साधू-महंतांसह भाविक व पर्यटकांनीही समाधान व्यक्त केले.

पहिल्या शाही पर्वणीवेळी पोलिसांनी बंदोबस्ताचा अतिरेक केला होता. याचा फटका भाविकांच्या संख्येवर झाला होता. साधू-महंत तसेच स्थानिकांनीही पोलिसांच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांनी गेल्या पर्वणीपासून धडा घेत बंदोबस्त शिथिल केला होता. रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांना थेट कुशावर्तात स्नान करण्याची पर्वणी उपलब्ध करून दिली. यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविणे सोपे गेले. स्थानिक तसेच बाहेरून आलेल्या भाविकांना आपले वाहनही जव्हार फाट्यापर्यंत तसेच शहरात नेणे शक्य झाल्याने अबालवृध्दांची पायपीट वाचली.

आखाड्यांच्या शाहीस्नानामुळे रात्री बारानंतर बॅरिकेडिंगला सुरुवात करण्यात आली. मात्र, त्यातही थोडी शिथिलता ठेवली होती. सुमारे लाखभर भाविकांना शहरात रात्रीच प्रवेश दिल्यामुळे त्र्यंबकचे रस्ते गजबजले होते. यामुळे पोलिसांना शहरातील व शहराबाहेरील गर्दीवर नियंत्रण करणे सोपे गेले. भाविकांना आखाड्यांचे शाहीस्नान पाहण्याची जवळून संधी मिळाली. तसेच काही भाविकांनी पहाटेच आखाड्यांबरोबरच शाहीस्नानाचा मुहूर्त साधला. कुशावर्तावरही पोलिसांनी बंदोबस्ताचा बाऊ न केल्याने शाहीस्नान आनंदात पार पडले.

दर्शनबारीवरून तू-तू मैं-मैं

सकाळी सहा वाजेपासून भाविक व वाहनांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली. श्रीचंद्र घाटाजवळ बॅरिकेडिंग करून भाविकांना थांबविण्यात आले. त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांची अधिक ओढ होती. मात्र, शहरातच किमान दीड ते दोन किलोमीटरची दर्शनासाठी रांग लागल्याने पोलिसांनी भाविकांना शहराबाहेरच रोखून धरले. यामुळे पोलिस व भाविकांमध्ये तू-तू मैं-मैं च्या घटना घडल्या.

प्रशासनाने खूपच चांगले नियोजन केले. आखाड्यांचे साधू तसेच भाविकांना नाहक त्रास झाला नाही. पोलिस प्रशासनाने बंदोबस्तात थोडी शिथिलता दिल्याने भाविकांनाही शाही पर्वणी जवळून पाहता आली. प्रशासनाच्या नियोजनावर आखाडे समाधानी आहेत.

- नरेंद्रगिरी महाराज, आखाडा परिषद अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुशावर्तावर अवतरले चैतन्य!

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक : साधू महंतांच्या मिरवणुकांमधून ओसंडणारा विदेशी भाविकांचा उत्साह, आखाडे आणि त्यांच्याशी संलग्न खालशांकडून घडलेले श्रीमंती आणि संपन्नतेचे दर्शन अन श्रध्दास्थान असलेल्या साधू महंतांसमवेत कुशावर्तावर प्रवेश मिळाल्याने गगनाला भिडलेला भाविकांचा आनंद अशा चैतन्यदायी वातावरणाने त्र्यंबकेश्वर मोहरून गेले. निमित्त होते दुसऱ्या शाही पर्वणीचे. खऱ्या अर्थाने 'शाही' ठरलेला हा सोहळा भाविकांच्या नेत्रांचे पारणे न फेडेल तरच नवल. दुसरी प र्वणी निर्विघ्न पार पडल्याने प्रशासनाने सुस्कारा सोडला.

अमावस्येला आलेली ही दुसरी शाही पर्वणी शैव साधू अधिक महत्त्वाची मानतात. या पर्वणीलाच भाविकांची अधिक गर्दी होत असल्याचा आजवरच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचा अनुभव आहे. म्हणूनच पर्वणी जसजशी जवळ येत होती, तशी तशी प्रशासनातील अधिकाऱ्यांची झोप उडाली. पहिल्या पर्वणीचा अनुभव आणि भाविकांसह विविध क्षेत्रातील लोकांनी त्याबद्दल उघडपणे व्यक्त केलेली नाराजी यामुळे प्रशासनानेही दुसऱ्या पर्वणीत नरमाईचे धोरण स्वीकारून नियोजनात बदल केले. शनिवारी रात्री बारापर्यंत भाविक कुशावर्तावर स्नान करीत होते. त्यानंतर जीवरक्षक दलाच्या जवानांनी साधू महंतांसाठी कुशावर्त मोकळे केले. मध्यरात्री दोन वाजून ४० मिनिटांनी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी कुशावर्तावर स्नान केले. पहाटे चारच्या सुमारास हरहर महादेवचा जयजयकार करीत आलेल्या निरंजनी आखाड्याच्या साधूंनी भाविकांचे लक्ष वेधले. इष्ट देवतेची पूजा केल्यानंतर साधूंनी शाहीस्नानाचा आनंद लुटला. पाठोपाठ आनंद आखाड्याचे जल्लोषात आगमन झाले. जुना आखाडा, पंचअग्नी आखाडा, आवाहन आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा, बडा उदासीन आखाडा, नया उदासीन आखाडा आणि निर्मल आखाडा या क्रमाने शाही मिरवणूकीसह आलेल्या साधूंनी शाही स्नानाचा आनंद लुटला. चांदीच्या देव्हाऱ्यांमधून इष्टदेवतांचे वाजतगाजत आगमन झाले. आखाड्यांसमवेत येणाऱ्या भाविकांच्या श्रध्देचा आदर राखत पोलिसांनी त्यांना कुशावर्तावर प्रवेश खुला करून दिला.

गंगा मंदिराबाहेर गोंधळ

साधू-महंतांची वाहने कोठून माघारी पाठवायची याचे नियोजन या पर्वणीत बदलण्यात आले. यंदा पाटील लेनपर्यंतच साधू महंतांच्या वाहनांना प्रवेश देण्यात आला. तेथून पुढे ते कुशावर्तावर चालत आले. साधू-महंत आणि त्यांच्या समवेतच्या भाविकांना कुशावर्ताच्या प्रांगणातील गंगा गोदावरी मंदिरापासून प्रवेश दिला. साधू तसेच भाविकांची गर्दी आणि अरुंद मार्ग यामुळे दाटावाटी झाली होती. ती रोखण्यासाठी कुशावर्ताच्या पायऱ्यांजवळ बॅरिकेडींग करण्यात आले. गर्दीचा ओघ आणि पोलिसांकडून बॅरिकेडींगसाठी लावला जाणारा फोर्स यामुळे येथे प्रत्येक वेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

चित्त अडकले पादत्राणात

कुशावर्तावर येणारे लोक स्नानासाठी उतरण्यापूर्वी जागा दिसेल तेथे चपला काढत. स्नान करून बाहेर पडले की त्या चपलांचा शोध घेण्यासाठी धावपळ करत. मात्र, चोख पोलिस बंदोबस्त आणि बॅरिकेडींग असल्याने त्यांना परतीचा मार्ग सोडून अन्यत्र जाऊ दिले जात नसे. पादत्राणे मिळवितांना भाविकांचा गोंधळ होतांना दिसून आला.

पोलिसांची दबंगगिरी

बडा उदासिन आखाड्याची मिरवणूक तसेच त्यांच्यासमवेत येणारा भक्त परिवारही मोठा असल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी अधिकच धास्ती घेतल्याचे दिसून आले. या आखाड्याची मिरवणूक कुशावर्ताजवळ येताच भाविकांना हटविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.

परदेशी भाविकांची गर्दी

सिंहस्थ अनुभवण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्यांत परदेशी भाविकांचा ओघ अधिक होता. हा सोहळा चित्रबध्द करण्यासाठी परदेशी फोटोग्राफर्सची धावपळ सुरू असल्याचे पहावयास मिळाले. स्वामी नित्यानंदजी महाराज यांच्या यात्रेत परदेशी भाविकांची संख्या लक्षणीय होती. शरिरावर मोठ्या प्रमाणावर सोने बाळगणाऱ्या नित्यानंद महाराज, गोल्डन बाबांनी परदेशी नागरिकांचे लक्ष वेधले.

रांगोळ्यांनी नटला शाहीमार्ग

त्र्यंबकमधील भाविकांनी शाही मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या रेखाटून तपस्वी साधू-महंतांचे स्वागत केले. त्यावर मनमोहक फुलांची सजावट करण्यात आली. हा सोहळा पुन्हा १२ वर्षांनीच होणार असल्याने स्थानिकांनी रात्रभर जागून या सोहळ्याचा आनंद लुटला. मिरवणूक मार्गाच्या बाजूचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला.

स्वाईन फ्लूची धास्ती कायम

सिंहस्थ पर्वणीचा लाभ घेण्यासाठी त्र्यंबकनगरीत दाखल झालेल्या भाविकांनी तसेच बंदोबस्त आणि अन्य कर्तव्यात असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्वाईन फ्ल्यूची धास्ती घेतल्याचे दिसून आले. पोलिसांसह अनेकजण मास्कचा किंवा रुमालाचा वापर करताना आढळून आले.

...अन्यथा रोषाला सामोरे जा!

'आम्ही हवे तेवढे भाविक कुशावर्तावर घेऊन येऊ, तुम्ही त्यांना रोखू नका; अन्यथा आमच्या रोषाला सामोरे जावे लागेल', असा इशारा आखाड्यांमधील साधू महंतांनी प्रशासनाला दिला होता. त्यामुळे पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने आखाड्यांच्या मिरवणुकांसमवेत येणाऱ्या भाविकांना शाहीस्नानासाठी सोडण्याचा निर्णय घेतला. परिणामी कुशावर्तावर साधूंपेक्षा भाविकांची गर्दी अधिक असल्याचे पहावयास मिळाले. स्वच्छता दूतांची नित्यसेवा दिसून आली. सिंहस्थ काळात अस्वच्छता डोके वर काढणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली. क्लोरीन पावडर फवारून ठिकठिकाणी स्वच्छता केली जात होती. त्याबद्दल भाविकांनीही समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् टळला भीषण संघर्ष

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : संतप्त साधू... उगारलेल्या नंग्या तलवारी, काठ्या, भाले... प्रचंड तणाव...पोलिसांची मध्यस्थी... साधूंचा नकार... भाविकांवर कुठल्याही क्षणात साधूंकडून हल्ला... अखेर वारकरी संप्रदायाने घेतलेली सामंजस्याची भूमिका अन् निवळलेले वातावरण... शाही मिरवणूक मार्गावर लक्ष्मी नारायण मंदिर चौकात आठ वाजेच्या सुमारास असा संभाव्य भीषण संघर्ष टळला.

निर्मोही आखाड्याचा शाही मिरवणुकीत पहिले स्थान होते. तर, दिगंबर आखाड्याला दुसरे. निर्मोही आखाड्यानंतर दिगंबर आखाड्यांचे रथ शाही मार्गावरून जात होते. मात्र, लक्ष्मी नारायण मंदिराच्या चौकात अचानक दिगंबर आखाडा आणि वारकरी संप्रदाय खालसा यांच्यात वाद उदभवला. वारकरी खालसा हा निर्मोही आखाड्याचाच एक भाग समजला जातो. त्यामुळे सहाजिकच ते शाही मिरवणुकीतून रामकुंडाकडे जात होते. परंतु, दिगंबर आखाड्याची शाही मिरवणुकीची पूर्वनियोजित वेळ टळून गेल्याने दिगंबर आखाड्याच्या साधू, महंतांना उशिर सहन होत नव्हता. यातूनच वारकरी खालसा आणि दिगंबर आखाडा यांच्यात वाद निर्माण झाला. क्षणार्धात दिगंबर आखाड्यातील साधूंनी हातातील नंग्या तलवारी, भाले, काठ्या आणि इतर हत्यारे वारकरी खालशांच्या दिशेने रोखल्या. मोठा संघर्ष निर्माण होत असल्याच पाहून पोलिसांनी मध्यस्थी केली. दोन्ही बाजूची समजूत घालतानाच साधूंचा राग शमविण्याचा प्रयत्न पोलिस करीत होते. मात्र, साधू ऐकण्यास तयार नसल्याने चौकातच विपरीत काही घडते काय, अशी शंका निर्माण झाली. स्थानिक पोलिसांनी वायरलेस आणि फोनच्या माध्यमातून वरिष्ठ तसेच नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्याचद्वारे वरिष्ठ पोलिसांनीही साधूंना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर वारकरी संप्रदाय खालशाने सामंजस्याची भूमिका घेत रथ बाजूला घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खालशाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रथावरूनच वारकरी भाविकांना बाजूला होण्याचे आवाहन केले. वारकरी संप्रदायाच्या या मोठेपणामुळे अखेर भीषण संघर्ष टळला.

स्थानिक विरुद्ध परप्रांतीय

साधुग्राममध्ये काही दिवसांपूर्वी जंगलीदास महाराजांच्या मिरवणुकीत उदभवलेल्या वादात साधूंनी तलवारी उपसल्याने बाका प्रसंग निर्माण झाला होता. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. रविवारी पर्वणीच्या दिवशीही वारकरी खालशाच्या भाविकांवर दिगंबर आखाड्याच्या साधूंनी शस्त्रे उगारल्याने तणाव निर्माण झाला. या दोन्ही प्रसंगात स्थानिक विरुद्ध परप्रांतीय साधू तसेच भाविक असा वाद निर्माण झाला होता. परप्रांतीय साधू हे स्थानिकांवर अशा प्रकारे शस्त्रांद्वारे आक्रमक होणे कितपत योग्य असल्याचा सवाल करीत साधूंविषयीचा आदर कमी होत असल्याचे अनेक भाविकांनी रविवारी बोलून दाखविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शस्त्रप्रदर्शनात निर्मोहींचे शाहीस्नान

$
0
0

fanidra.mandalik@timesgroup.com

नाशिक : 'सियावर रामचंद्र की जय', 'पवनपुत्र हनमान की जय' असा जयघोष करीत निर्मोही आखाड्याच्या साधू-महंतानी दुसरे शाहीस्नान केले. शनिवारी शहरात पाऊस झाल्याने भाविकांच्या उपस्थितीवर परिणाम होईल अशी शंका होती; मात्र ती फोल ठरली.

रविवारी सकाळपासूनच साधुग्राममध्ये भाविकांचा ओघ सुरू झाला. सकाळी सहा वाजता साधुग्राम नागरिकांनी खच्चून भरले. एकीकडे ढोलचा गजर, दुसरीकडे पारंपारिक शस्त्रांचे प्रदर्शन अशा वातावरणात निर्मोही आखाड्याच्या मिरवणुकीने शाहीस्नान मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. सुरुवातीला श्री पंच निर्मोही अनी आखाड्याचे श्री महंत राजेंद्र दासजी यांच्या हस्ते आखाड्याच्या कुलदेवतेचे पूजन करण्यात येऊन निशाणांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर निर्मोही अनी आखाड्याच्या महंतांना बग्गीमध्ये विराजमान करण्यात येऊन 'सियावर रामचंद्र की जय'चा घोष करण्यात आला. त्यानंतर महापौर अशोक मुर्तडक व पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते साधुसंतांचा सत्कार झाला. शाही मिरवणुकीचे आकर्षण होते ते साहसी शस्त्र प्रदर्शनाचे. तलवारबाजी, लाठीकाठी, बॅनेट, दाणपट्टा, बाणा, जंबिया, चक्रकाठी आदी शिवकालीन खेळांचे सादरीकरण करण्यात आले. निर्मोही आखाड्या तलवारींची संख्या बाराशे होती, दाणपट्टे १००, काठ्या ५०, बाणा १०, कुऱ्हाडी १०, भाले ४० त्याच प्रमाणे चक्री इत्यादी प्रकार खेळले जात होते. या प्रकारांसाठी आखाड्यातर्फे विशेष प्रशिक्षकांची नेमणूक केली. मिरवणूकीत भक्तीमार्ग संस्थांचे १२९ भाविक सहभागी झाले होते. यात मॉरेशियस, साउथ रशिया, जर्मनी, यूके, युरोप, केनिया, स्वित्झलँड येथील भाविक सहभागी झाले होते. त्यांनीही 'हरे रामा हरे कृष्णा'चा जयघोष सुरू केला.

असा होता मिरवणूक मार्ग

मिरवणूक साधुग्राम, लक्ष्मीनारायण मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, गणेशवाडी, गोरी पटांगण, म्हसोबा पटांगण रामकुंडावर पोहचली तेथून मालेगाव स्टॅँड, पंचवटी कारंजी मार्ग पुन्हा साधुग्राममध्ये पोहचली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात तीन भाविकांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, दिंडोरी

सिहंस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीच्या पूर्वसंध्येला देवदर्शन करीत स्नान आटोपून दादरा हवेली (सिल्वास) येथे परतणाऱ्या भाविकांच्या सँट्रो कारला अपघात होऊन एकाच कुटुंबातील तीन भाविक ठार झाले. सँट्रो कार, आयशर टेम्पो व दुचाकी यांचा तिहेरी अपघात झाला. मृतांमध्ये वडील, मुलगी आणि दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. अपघातात दुचाकीस्वारासह चार जण जखमी झाले. जखमींवर नाशिमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दादरा हवेली (सिल्वास) येथील पारीख कुटुंबात हे सँट्रो कारने सिंहस्थाच्या दुसऱ्या पर्वणीसाठी त्र्यंबकेश्वर नाशिकला आले होते. देवदर्शन व स्नान आटोपून हे कुटुंब पेठ बलसाड रोड मार्गे दादरा हवेलीला गावी परतण्यासाठी रविवारी सकाळी आठ वाजता निघाले. परतीच्या प्रवासात रासेगाव शिवारात समोरून वापीहून नाशिककडे येणाऱ्या आयशर टेम्पो व नाशिकहून उमराळेकडे जाणाऱ्या दुचाकी यांच्यात तिहेरी अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की सँट्रो कारचा पुढील भाग पूर्ण चेपला गेला. कारमधील गोविंद राम पारीख (३०), श्रावण पारीख (३२) या भावांसह विकी पारीख ही १० वर्षांची मुलगी ठार झाली. तर रामदेव हरिभाऊ पारीख, मंजुबाई श्रवणकुमार पारीख यांच्यासह एक चिमकुला जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरे आज नाशकात

$
0
0

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवारपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी सकाळी ते रामकुंडासह साधुग्रामध्ये दौरा करणार असून, दुपारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासह महापालिकेच्या कामकाजाचा ते आढावा घेतली. मंगळवारी सकाळी कालिदास कला मंदिरात नाशिक अॅपचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या नियुक्त्या त्यांच्या नाशिक दौऱ्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आओ हमारे शहर, कुंभमेला में...

$
0
0

prashant.desale‍@timesgroup.com

नाशिकः 'कुंभमेला तो हमारे यहाँ भी लगता है, वहाँ गंगा बहती है और यहाँ गोदावरी. लेकीन यहाँ की बात अलग है, यहाँ ब‌िच शहर में उत्सव होता है तो अच्छा लगता है, अभी हमारे यहाँ भी कुंभमेला लगनेवाला है, नासिक ने बहुतही बडिया खातीरदारी की, अभी हमें मोका दो... आओ हमारे शहर, कुंभमेलामें', अलाहाबादहून आलेले अनिलकुमार शर्मा मोठ्या आपुलकीने आमंत्रण देत होते.

कुंभमेळ्यात अमावसेला येणारी पर्वणी ही अध्यात्मिकदृष्ट्या अधिक महत्त्वाची असल्याने देशभरातून लाखो भाविक दोन दिवस आधीपासूनच नाशिकमध्ये दाखल झाले होते. आधी त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेवून पर्वणीच्या दिवशी नाशिकला यायचे, अनेकांनी जवळपास असे नियोजन केले होते. अलाहाबादहून आलेल्या अनिलकुमार शर्मा आणि कुटुंबियही त्यातलेच एक. मात्र त्यांना त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाआधी जो अनुभव आला तो खूपच बोलका होता.

रेल्वेने नाशिकला आठ दिवस आधीच आलेल्या या अलाहाबादी पाहुण्यांनी शिखरेवाडी भागात एक खोलीच भाडेकराराने घेतली होती. त्र्यंबकला कुशावर्तात स्नान करणे शक्य नाही हे समजल्यानंतर अनिलकुमार शर्मा, निलू शर्मा, बबली शर्मा, रुबी शर्मा यांनी आपले नियोजन ऐनवेळी बदलले. शुक्रवारी दुपारी त्यांनी त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी जाण्याची तयारी केली. मात्र, दर्शनाची रांगच दोन किलोमिटरपर्यंत लांब असल्याने त्यांचे चांगलेच हाल झाले. पायपीट करत रात्रीच्या साडनऊपर्यंत ते मंदिरापर्यंत पोहोचले. मात्र, वाढलेल्या गर्दीमुळे पोलिसांनी, 'अब किसीका दर्शन नही होगा, पोलिस जाँच के लिए मंदिर बंद हो रहा है' अशी अनाऊंसमेंट केली आणि शर्मा कुटुंबियांच्या पोटातच गोळा आला. अनिलकुमार यांच्यासमोर काही भाविकांना पोलिस दर्शनासाठी सोडत होते. त्यांनी जवळच उभ्या असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याला सांगितले, 'सर, हम बहुत दूरसे आये है, कृपा करकें हमें दर्शन के लिए जाने दो।' त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्या पोलिस अधिकाऱ्याने अनिलकुमार यांना परिवारासह मंदिरात जाण्याची परवानगी दिली. तब्बल दोन किलोमिटर पायी चालूनही जर दर्शन झाले नाही तर आपला इतक्या दूर येवून काय फायदा असा विचार मनात येत असतांनाच अतिशय शांततेत दर्शन झाल्याने सगळ्यांनी त्या पोलिस अधिकाऱ्याचे आभार मानले.

अलाहाबाद आणि नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत विचारले असता, निलू शर्मा म्हणाल्या, की हमारे यहा तो शहरसे पाच किलोमिटर दूर कुंभमेला होता है, उसलिए इतनी भगदोड नही होती, पर आपके यहाँ तो सीटी के बिचोबीच मेला लगता है, फिर भी अच्छा इंतजाम है, ना ट्रॅव्हलिंग की दिक्कत, ना ठहरनेकी।' तोच धागा पकडत अनिलकुमारे म्हणाले, 'हमे तो जो भी नासिक के लोग मिल रहै है, जिनके साथ जानपहचान हो रही है, उनको यही कह रह है, अब आप आओ हमारे शहर, कुंभमे' नाशिककरांना असं गोड आमंत्रण देत पाहुणे अलाहाबादकडे रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दीने राखली लाज!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पहिल्या पर्वणीतील अपयशानंतर दुसऱ्या पर्वणीत केलेले फेरनियोजन यशस्वी झाले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ६० लाख भाविकांनी पर्वणीचा लाभ घेतल्याचा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

पर्वणीतल्या शाहीस्नानानंतर महाजन यांनी रामकुंडावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की वरूणराजा प्रसन्न झाल्याने गर्दी वाढली असून, सर्वच घाट भाविकांच्या गर्दीने फुल्ल झाले आहेत. देशभरातून भाविक स्नानासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले असून, भाविकांचा आकडा ६० लाखापर्यंत गेला आहे. पोलिस आणि प्रशासनाने दुसऱ्या पर्वणीचे उत्तम फेरनियोजन केले आहे. भाविकांना कुठेही अडवण्यात येत नसून, थेट रामकुंडावर आणि अन्य घाटावर त्यांना येऊ दिले जात आहे. सर्वस्थिती नियंत्रणात असून, दुसरी पर्वणी शंभर टक्के यशस्वी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यात चांगला पाऊस येऊ दे आणि राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकरी सुखी होऊ दे, अशी साद आपण गोदावरी मातेला घातल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पाऊस व अमावस्या पावली

दुसऱ्या शाहीस्नानाची आजची पर्वणी अत्यंत दुर्मिळ मानली जाते. सूर्य आणि गुरुने सिंह राशीत प्रवेश केल्यावर कालपासून चंद्रानेही त्यांना स्पर्श केल्याने आज सिंहस्थाचा पूर्ण मुहूर्त होता. या पिठोरी अमावस्येचा ७२ तासांचा दुर्मिळ योग असल्याने पर्वणीत स्नानासाठी भाविकांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल झाले होते. रामकुंडावर आखाड्यांचे शाहीस्नानापूर्वीच प्रशासनाने भाविकांना अन्य घाट खुला करून दिल्याने भक्तांना पर्वणीचाही आनंद घेता आला. रात्री बारापासूनच भाविकांची घाटांवर गर्दी उसळली होती. घाटापर्यंत पोहचण्यासाठी आडकाठी नसल्याने भाविकांनी स्नानाला गर्दी केली होती. तर तीनही आखाड्यांचे स्नान आटोपल्यानंतर भाविकांसाठी रामकुंड खुले करून देण्यात आल्याने गर्दी वाढली होती. सोबतच पावसानेही पर्वणीच्या दोन दिवस हजेरी लावल्याने भाविकांना दिलासा मिळल्याने त्यांची पावले पर्वणीच्या दिशेने वळाली होती. त्यामुळे पाऊस व अमावस्या प्रशासनाला पावल्याचे दिसून आले.

साधू झाले कमी, भाविक आले कामी!

दुसऱ्या पर्वणीतही साधू-महंतांची वानवा आखाड्यांसह शाही मिरवणुकीत जाणवली. ही उणीव भरून काढण्यासाठी आखाडे व खालशांनी शक्कल लढवत थेट भाविकांनाच भगवी वस्रे व उपरणे देत त्यांना आदल्या रात्रीच खालशांचे सदस्यत्व देण्यात आले. त्यामुळे रामकुंडावर साधू कमी आणि भाविकच अधिक दिसत होते. सोबतच महिलांची संख्याही लक्षणीय होती. स्नानाच्या वेळी आखाड्यांमध्ये साधू-महंतांपेक्षा भाविकच जास्त असल्याने पोलिसांनी रामकुंडावर भाविकांना वेचून वेचून बाहेर काढले. तरीही अनेकांनी घुसखोरी केली.

मराठी भाविक दूरच

मराठी भाविकांची उपस्थिती दुसऱ्या पर्वणीलाही तुरळक होती. राज्यातील दुष्काळ आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याची मानसिकता असल्याने मराठी भाविक रामकुंडासह त्र्यंबकेश्वरकडे फिरकलेच नाहीत. तर त्या तुलनेन उत्तर भारतीय भाविकांनी लाखोंच्या संख्येन हजेरी लावून धार्मिकतेचे दर्शन घडवले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, झारखंडसह काही प्रमाणात तामिळनाडू, ओडिशा आणि तेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील भाविकांनी तळ ठोकला होता. त्यामुळे पहिल्या पर्वणीपेक्षा दुसऱ्या पर्वणीला शहरासह सर्व घाट गर्दीने भरले होते.

देर आए दुरूस्त आए. आपण पहिल्या पर्वणीतल्या अपयशानंतर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतरच फेरनियोजन करण्यात आले. सर्वांनी आवाज उठवल्यानंतर सुधारणा झाली आहे. बॅरिकेड्स कमी करण्यात आले. भाविकांना रस्त्यावर येऊ दिले. त्यामुळे गर्दी वाढली असून, दुसरी पर्वणी यशस्वी झाली.

- छगन भुजबळ, माजी मंत्री

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे कुंभमेळ्याची दुसरी पर्वणी यशस्वी झाली. महापालिकेने कोणालाही कोणत्याच गोष्टीची कमतरता राहू नये, यासाठी प्रयत्न केले आहेत.

- अशोक मुर्तडक, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांच्या महापुरात शाही पर्वणी चिंब

$
0
0

prashant.bharvirkar@timesgroup.com

नाशिक : निशाण्यांना स्नानात देण्यात येणारे प्राधान्य, खालशांच्या साथीने येत मुख्य आखाड्यांची निघालेली पेशवाई, वाहनांचे ताफेच्या ताफे, दांडपट्टा, तलवारी, चंद्रभान व कट्यारींच्या साहाय्याने केले जाणारे थरारक प्रदर्शन व मुख्य आखाड्यांचे गोदेत डुबकी मारणे असा माहोल र‌विवारी दुसऱ्या शाही पर्वणीला लाखो भाविकांच्या साक्षीने रंगला. निर्मोही आखाड्याच्या स्नानाच्या वेळी मध्येच शंकराचार्य वल्लभाचार्य महाराज व त्यांचे शिष्यगण घुसल्याने काही काळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला. निर्मोही आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदास महाराज स्नान न करताच माघारी फिरले. यामुळे दुसऱ्या पर्वणीच्या पहिल्या शाही स्नानाला गालबोट लागले. मात्र भाविकांच्या महापुरात दुसरी शाही पर्वणी चिंब झाली.

निर्मोही आखाड्याला प्रथम शाहीस्नानासाठी वेळ देण्यात आलेली होती. त्यानुसार या आखाड्याने सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी रामकुंडावर येत स्नान केले. निर्मोही आखाड्याच्या खालशांना काही काळासाठी अहिल्याबाई व्यायामशाळेजवळ थांबविण्यात आले होते. त्यामुळे बराच वेळ गोंधळाचे वातावरण पसरले होते. निर्मोही आखाड्याची जागोजागी अडवणूक झाल्याने व त्यांच्या स्नानाच्या वेळी वल्लभाचार्य महाराज व त्यांचे शिष्यमध्ये घुसल्याने गोंधळ उडाला. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतिश शुक्ल यांनी वल्लाभाचार्य महाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातून काहीच निष्पण्ण झाले नाही. दोन्ही आखाड्यांच्या साधूंनी एकत्रच स्नान करीत असल्याने काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी आपल्या आखाड्यातील महामंडलेश्वरांना स्नान घालून श्री महंत राजेंद्रदास यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर बराच वेळ आखाड्यांच्या साधूंबरोबर आलेल्या भाविकांना स्नानाचा मनमुराद आनंद लुटला. निर्मोही आखाड्याच्या स्नानानंतर एक तासाने ८ वाजून ४० मिनिटांनी दिगंबर आखाड्याचे रामुंडावर आगमन झाले. आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास महाराज व भक्तीचरणदास महाराज यांना भक्तांनी रामकुंडावर वाजत गाजत आणले व निशाण्यांच्या स्नानानंतर त्यांनाही स्नान घालण्यात आले. दिगंबर आखाड्याच्या श्री महंतांना स्नान घालण्यासाठी दुधाच्या किटल्या आणण्यात आल्या होत्या. तेथे गोदावरीतच या महंतांना दुधाने अभिषेक घालण्यात आला. दिगंबर आखाड्याचे अनेक खालसे स्नानासाठी मागून आल्याने काही काळ रामकुंड त्यांच्याच ताब्यात राह‌िले. त्यानंतर ९ वाजून १५ मिनिटांनी निर्वाणी आखाडा स्नानासाठी आला. महंत श्री ग्यानदास महाराज व महंत श्री धर्मादास महाराज, संजयदास महाराज, हेमराजदास महाराज यांना सन्मानाने कुंडात नेण्यात येऊन स्नान घालण्यात आले. निर्वाणी आखाड्याच्या स्नानाच्या वेळी अभूतपूर्व आनंदाचे वातावरण भक्तगणांमध्ये पसरले होते. पालकमंत्री गिरीश महाजन स्वत: ग्यानदास महाराज यांना घेऊन कुंडापर्यंत आले. त्यानंतर शिष्यांनी महाराजांना उचलून घेत फोटोसेशन करवून घेतले.

पिठोरी अमावास्येच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या पर्वणीला चाैदा ते पंधरा लाख भाविकांनी रामकुंडात स्नान केले. देश विदेशातून आलेल्या भाविकांनीही गोदावरीत डुबकी मारत पवित्र स्नानाचा आनंद घेतला. पोलिस प्रशासनाने स्नानाची जय्यत तयारी ठेवलेली असल्याने आखाड्यांनी त्याबरहुकूम जाणेच पसंत केले. शाहीमार्गावरून रामकुंडापर्यंत येत प्रत्येक आखाड्याने शिस्तीचा आदर्श घालून देत स्नान केले. गुलालवाडी जीवरक्षक व पोलिस खुद्द पाण्यात उतरून मानवी साखळी करून उभे होते. त्यामुळे कोणताही अघटीत घटना न घडता दुसरे शाहीस्नान निर्धोकपणे पार पडले.

एन्ट्री व एक्झिट मार्गाचा गोंधळ

शाहीस्नानासाठी जेथून आखाड्यांना एन्ट्री देण्यात आली होती तेथून शेजारूनच एक्झिट असल्याने आखाड्यांच्या स्नानाच्या वेळी येथे मोठा गोंधळ उडाला. एकाच ठिकाणी गर्दी केल्याने तेथून कुणालाच जाताही येईना व येताही येईना त्यामुळे काही काळासाठी गोदावरी मंदिराच्या मागील बाजूला गर्दीचा उच्चांक झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालक, महिलांची संख्या लक्षणीय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थातील मोठ्या गर्दीची कुठलीही पर्वा न करता रविवारच्या शाहीपर्वणीत महिला आणि बालकांची लक्षणीय गर्दी होती. खासकरुन परप्रांतीय महिला आणि बालकांनी साधुग्रामसह गोदाघाटाचा परिसर गजबजून गेला होता.

दर १२ वर्षांनी होणारा सिंहस्थ हा भाविकांसाठी मोठी पर्वणीच असतो. त्यातच अमावस्येच्या दिवशी असणारे शाहीस्नान हे भाविकांच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. दुसऱ्या शाही पर्वणीला भाविकांची प्रचंड गर्दी झाली असली तरी त्यात महिला आणि बालकांची संख्या मोठी असल्याचे पहायला मिळाले. खासकरुन परप्रांतीय भाविक शुक्रवार, शनिवारपासूनच नाशकात दाखल होत होते. शनिवारी मध्यरात्री साधुग्राममध्ये मुक्कामी असलेल्या भाविकांमध्ये महिलांची संख्या मोठी असल्याचे पहायला मिळाले. तर, शाहीपर्वणीच्या दिवशी दिवसभर महिला आणि बालकांचा वावर नाशकात मोठा असल्याचे दिसून आले. सिंहस्थाच्या गर्दीत काही अनुचित प्रकार घडेल किंवा गर्दीत हरवण्याचे प्रकार घडण्याची संभावना असतानाही एक-दीड वर्षे वय असलेले चिमुकले त्यांच्या आई-वडिलांसह पर्वणीच्या दिवशी ठिकठिकाणी दिसून येत होते. परप्रांतीय भाविकांमध्ये सिंहस्थ, शाहीपर्वणी आणि अमावस्येला नदीत स्नान करण्याची मोठी श्रद्धा आहे. त्यामुळेच लहान मुला-मुलींपासून तरुण व वृद्ध महिलांची गर्दी घाटांवर पहायला मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लंडन युनिर्व्हसिटी व्हाया साधुग्राम

$
0
0

२० वर्षांपूर्वी घेतली दीक्षा

arvind.jadhav@timesgroup.com

दुसऱ्या पर्वणीत सहभागी झालेल्या साधूंमध्ये तीन चेहरे जरा विलक्षण ठरले. हे तिघेही परदेशातून आले. मात्र, त्यांचा भारतीय संस्कृती आणि योगाबाबत झालेला अभ्यास पाहून सारेच अवाक् होत होते. विशेष म्हणजे यातील एका प्राध्यापकास हिंदी भाषा सुद्धा अवगत आहे.

साधुग्राममधील तेरा भाई त्यागी खालशाशी निगडीत असलेल्या बालयोगी रामबालकदास महाराजांच्या पहिल्या परदेशी शिष्याचे नाव जेम्स ऊर्फ जगदीशदास असे आहे. जगदीशदास सध्या लंडन युनिर्व्हसिटीमध्ये 'संस्कृत' आणि 'भारतीय संस्कृती' या विषयावर विद्यार्थ्यांना धडे देतात. तब्बल २० वर्षांपूर्वी जेम्स म्यालिमस ऊर्फ जगदीशदास यांनी बालयोगी रामबालकदास महाराजांची दीक्षा घेतली. तेव्हापासून जगदीश दास वर्षातून एकदा तरी भारतात येतात. जगदीशदासचा नाशिकचा हा दुसरा कुंभमेळा. नाशिकमध्ये गत १२ वर्षांत अनेकदा आल्याचे जगदीशदास यांनी सांगितले. लंडनमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. तसेच, परदेशातील नागरिकांना आता भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाची आवड निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे वर्षागणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थीसंख्या वाढत असल्याचे जगदीशदास यांनी अगदी शुद्ध हिंदी भाषेमध्ये सांगितले. भारत आता परका वाटत नाही. इथेच बघा ना, इतके भाविक आणि साधू आले. मात्र, कोठेही अडचण निर्माण झाली नाही. लंडनला परत जाणार असल्याचे जगदीशदास यांनी स्पष्ट केले.

ज्या महाराजांची परदेशी नागरिकांनी दीक्षा घेतली ते बालयोगी रामबालकदास महाराज सुद्धा हजर होते. त्यांनी आपल्या परदेशी शिष्यांचे तोंडभरून कौतुक केले. जेम्ससोबत अॅलेक्स वॉटसन हेही होते. डोक्यावर शेला परिधान केलेला हा व्यक्ती दिल्लीतील अशोका युनिर्व्हसिटीमध्ये भारतीय तत्वज्ञान हा अवघड मानला जाणारा विषय सोपा करून शिकवत असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले. वॉटसन यांच्या पत्नीही अमेरिकत योगाचे प्रशिक्षण देते. इस्राइल देशातून आणखी एक साधू या चमूत सहभागी झाला होता.

योगाने मन शुद्ध होते!

हट योगातून केला जाणारा योगा शरीरासह मनाला शुद्ध करतो. समाधीअवस्था प्राप्त करून देण्याचे काम योगातून होते. आता फक्त आजारपण दूर करण्यासाठीचे एक साधन म्हणून त्याकडे पाहिले जाते. नेस्ती, धोती, तौली, बस्ती, बाज्रोली असे अनेक प्रकार यात असून, त्यातून खरी योग साधना होते. इतर योग गुरू फक्त कमाई करीत असल्याची टीका बालयोगी रामबालक दास महाराजांनी केली. विशेष म्हणजे परदेशातून आलेले सर्व शिष्य यात पारंगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोहर साठ्ये यांचे निधन

$
0
0

नाशिक : येथील निष्णात दिवाणी वकील मनोहर आर. साठ्ये ऊर्फ एम. आर. साठ्ये (७५) यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा अॅड. मिलिंद साठ्ये व दोन मुली असा परिवार आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून नाशकात दिवाणी वकिली करणारे साठ्ये हे अत्यंत अभ्यासू होते. दोन वर्षांपूर्वी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रतर्फे त्यांचा ज्येष्ठ विधज्ञ म्हणून खास गौरव करण्यात आला होता. साठ्ये यांना श्रद्धांजली देण्यासाठी नाशिक बार कौन्सिलतर्फे सोमवारी (१४ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता कौन्सिलच्या जुन्या लायब्ररीत शोकसभेचे आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्यंगा मय्या की जय..

$
0
0

प्रतिकूल परिस्थितीतही रशियन पर्यटकाचे शाहीस्नान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डोक्यावर, मानेच्याखाली, डोळ्यांखाली जखमेचे, शस्त्रक्रियेचे वण.. प्रवास केल्यामुळे चेहरा सुजलेला अन् थकवा आलेला.... मात्र, गोदावरीची ओढ असलेल्या रशियाच्या दिमित्री याने 'शाहीस्नाना'साठी डुबकी मारली आणि त्याच्यासोबत आलेल्या दिल्लीच्या डॉ. जयकुमारने दोन्ही हात जोडून गोदापात्राच्या असलेल्या दिमित्राला आवाज दिला, 'दिमा, दिमा... गंगा मैय्या की जय' तिकडून दिमित्रीनेही हात जोडून प्रतिसाद दिला 'ग्यंगा मैय्या'चा जयघोष केला.

दिमित्री मूळचा रशियाचा. साधारण तीस-बत्तीसच्या घरात असलेला हा तरुण पर्यटक. अंगाकाठीने एखाद्या हॉलिवूडच्या नटासारखा दिसत असल्याने गोदाघाटावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता. दिमा तसा व्यवसायाने अकाउंटंट. त्याचा मित्र डॉ. जयकुमार (मूळचा चेन्नईचा) हा काही वर्ष आधी रशियात नोकरीला होते. तेथे त्याची दिमित्रीशी गट्टी जमली. भारत आणि इथल्या रुढीपरंपरा, सण-उत्सवाबाबत डॉ. जयकुमारने दिमित्रीला सांगितले होते. त्यामुळे त्याला भारतीविषयी नेहमीच आकर्षण राहिले. रशियातली नोकरी सोडल्यानंतर डॉ. जयकुमार दिल्लीत स्थायिक झाला. त्यामुळे त्याने दिमित्रीला कुंभमेळ्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, भारतात येण्याच्या काही महिने आधी दिमित्रीला अपघात झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी शस्त्रक्रिया करावी लागली. दोन्ही कानांच्या मागे मोठमोठे टाके टाकले होते. डोळ्यांखालच्या जखमा अजून भरलेल्या नव्हत्या. अशाही परिस्थितीत तो भारतात आला.

दिमित्री आणि डॉ. जयकुमारवर पोलिसांसह भाविकांच्याही नजरा खिळल्या होत्या. गौरी पटांगणावर आधी डॉ. जयकुमारने स्नान केले. त्यांच्यानंतर दिमाने गोदावरी पात्रात घाबरतच उडी घेतली. थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांने सूर्याला अर्घ्यही वाहिले. बाहेर पडल्यावर जयकुमारने त्याला विचारले, 'हाऊ डू यू फिल, दिमा.' त्यावर थंडीत कुडकूडणाऱ्या दिमा उच्चारला, 'फाईन... नाइस एक्सीरियन्स, ग्यंगा मैय्या की जय, ग्यंगा मैय्या की जय'नागा साधू पाहण्याची इच्छा असलेल्या दिमा आणि डॉ. जयकुमार यांनी काही वेळातच त्र्यंबककडे प्रस्थान केले ते गोदाकाठच्या आठवणी मनामध्ये साठवित!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांनी दुपारनंतर साधली पर्वणी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आखाड्यांचे स्नान, शाही मिरवणुका, देशविदेशातून स्नानासाठी आलेले लोक ही सर्व गर्दी टाळण्यासाठी सकाळी घराबाहेर न पडलेले नाशिककर व दिवसभर रस्ता शोधून शोधून थकलेले भाविक सायंकाळच्या सुमारास रामकुंडावर पोहोचले. त्यामुळे दुपारनंतर रामकुंडावर भाविकांचा प्रचंड ओघ येऊन पोहोचला खऱ्या अर्थाने दुपारनंतर सर्वांची पर्वणी साधली गेली.

द्वारका, मुंबई नाका, औरंगाबाद रोड, तपोवन या ठिकाणी अडून राहिलेले लोक शाही मिरवणुका संपन्न झाल्यानंतर हळूहळू रामकुंडाच्या दिशेने येऊ लागले. येथे आल्यानंतर कोठेही अडवणूक नसल्याचा सुखद धक्का बसल्यानंतर त्यांनी स्नानासाठी एकच गर्दी केली.

रामकुंड तसेच गांधीतलावाची कडेची बाजू, चक्रधर स्वामींचे मंदिर, पालथा मारूती मंदिर या ठिकाणीदेखील भाविकांनी स्नानासाठी प्रचंड गर्दी केली होती.

दुपारनंतर नाशिककरही कुटुंबासह स्नानासाठी रामकुंडाच्या दिशेने निघाले असल्याने सुंदर नारायण मंदिर तसेच रस्त्या-रस्त्यावर भाविकांचा लोंढा दृष्टीस पडत होता. सियावर रामचंद्र की जय, बम बम भोले च्या गजरात भाविकांनी राम, लक्ष्मण तसेच गौरी पटांगणावर हजेरी लावली. पोलिसांनी शेवटपर्यंत सर्वांना सहकार्याचे

धोरण अबाधित ठेवले. 'हरवले सापडले' या विभागाच्या वेळीच अनाऊन्समेंटमुळे अनेक हरवलेले लोक एकमेकांना परत भेटू शकले. विशेष म्हणजे रामकुंडावर स्नान करण्यापासून कुणालाही थांबविण्यात आले नाही. त्यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान झळकत होते.

जिल्हाधिकारी तळ ठोकून...

या पर्वणीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेत होते. जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह त्र्यंबकेश्वरमध्ये तळ ठोकून होते. पोलिसांना न जुमानणाऱ्या तसेच कुशावर्तावरील नियोजनामध्ये बाधा आणू पहाणाऱ्या प्रत्येकाला ते व्यक्तिश: टोकत असल्याचे पहावयास मिळाले. जेथे जेथे गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल तेथे कुशवाह, विशेष पोलिस महानिरीक्षक जयजीत सिंह, पोलिस अधीक्षक संजय मोहीते, उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांसह विविध विभागांचे अधिकारी कुशावर्त परिसरात धावपळ करताना पहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठी रंगला आकड्यांचा खेळ!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुसऱ्या पर्वणीत, फेरनियोजनाचा फियास्को होऊ नये यासाठी प्रशासनासह पोल‌सि व पालकमंत्र्यांमध्ये गर्दीचा आकडा फुगविण्यासाठी जणू स्पर्धाच लागल्याचे दिसून आले. दिवसभरातील गर्दीचा आकडा दहा लाख ते कोटीपर्यंत खेळवल्याने गोदाकाठी जणू भक्तांच्या मेळ्यासह आकड्यांचाही मेळा रंगला. विशेष म्हणजे यात माध्यमांनीही 'मोला'ची भर घातल्याने फुगवलेल्या आकड्यांनी नाशिककरही अवाक् झाले.

पहिल्या पर्वणीत केवळ गर्दी आणि सुरक्षेवरच लक्ष केंद्रीत केल्याची चूक पालकमंत्र्यासह प्रशासन आणि पोल‌सिांच्याही लक्षात आली. 'बुंदसे गई ओ हौदसे नही आती' या उक्तीने पछाडलेल्या पोल‌सिांसह प्रशासनाने दुसऱ्या पर्वणीत आपले प्राधान्यक्रम बदलत, थेट आकड्यांच्याच खेळाला प्राधान्य दिले. भाविकांनीही भरभरून पर्वणीला प्रतिसाद दिल्याने त्यांचा प्रयत्नही यशस्वी झाले. त्यामुळे सकाळपासून पोल‌सि अधिकारी, प्रशासन आणि पालकमंत्र्यांमध्ये आकडा सांगण्याची स्पर्धा झाली. सकाळपासून १० लाखापासून सुरू झालेला आकड्यांचा खेळ सायंकाळपर्यंत एक कोटीपर्यंत पोहोचला. फुगवलेला आकडा सांगताना तास की, दिवस सांगताना प्रशासन व पोल‌सिही गोंधळत होते. मात्र गर्दीने प्रभावीत झालेल्या इलेक्ट्रोनिक माध्यंमानीही हुरळून जाऊन हा आकडा फुगविण्यात हातभार लावला. त्यामुळे 'तुम्हीच बघा, माध्यमेच सांगताहेत' असे सांगायला पालकमंत्रीही मोकळे झाले होते.

कुंभथॉनची आकड्यांची दहीहंडी

दुपारी बारा वाजेपर्यंत २१ लाख भाविकांनी नाशिकमध्ये हजेरी लावण्याची आकड्यांची दहीहंडी कुंभथॉनने फोडली. सायंकाळपर्यंत हा आकडा त्यांनी तब्बल ४४ लाखापर्यंत नेत आकड्यांचे नऊ थर रचले. पोल‌सिांमध्येही एकवाक्यता नव्हती. आयुक्तांनी २५ लाखांचा अंदाज वर्तव‌लिा तर सहायक आयुक्तांनी तोच आकडा ४० लाखांपर्यंत फुगविला. आकड्यांच्या या खेळामुळे नाशिकमध्ये दिवसभर निश्चित किती भाविक येवून गेले याचा उलगडा काही होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images