म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पहिल्या पर्वणीच्या अपयशानंतर टीकेचे धनी बनलेले पालकमंत्री गिरीश महाजन तसेच सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दुसऱ्या पर्वणीत आपला व्हीआयपी बडेजाव बाजूला ठेवत स्वयंसेवकांची भूमिका निभावली. साधूमहंतांच्या समोर नतमस्तक होत असतानाच भाविकांना स्नान करण्यापासून ते त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यापर्यंतचे कार्य त्यांनी पार पाडले. सर्वच पक्षाचे पदाधिकारी मचानावर बसून शाहीस्नानाचे पुण्य डोळ्यांत साठवत असतांना, दोघेही मंत्री कुठे त्रुटी राहू नयेत आणि गालबोट लागू नयेत, याची काळजी घेत होते. मंत्री महोदयांनी आखाड्यांच्या स्नानानंतर रामकुंडात डुबकी मारत दुसऱ्या पर्वणीला मिळालेल्या विजयाचा जल्लोष साजरा केला.
पोलिसांच्या अतिरेकामुळे पहिल्या पर्वणीत आलेले अपयश पालकमंत्री महाजन यांना अंगावर घ्यावे लागले होते. भाविकांनी पाठ फिरवल्याने पर्वणीचाच फियास्को झाला होता. तर मंत्र्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी आखाड्यांअगोदरच स्नान केल्याने टीका सहन करावी लागली होती. त्यामुळे दुसऱ्या पर्वणीत प्रशासनासह राज्य सरकारचेही हसे होऊ नये, यासाठी महाजन यांच्यासह राज्यमंत्री भुसे यांनी दुसऱ्या पर्वणीत काळजी घेतल्याचे दिसले. पहिल्या पर्वणीतील अपयशानंतर केलेले फेरनियोजन यशस्वी होण्यासाठीची पुरेपुर काळजी दोघेही मंत्रीमहोदयांनी खांद्यांवर घेतली होती. पर्वणीच्या दिवशी गिरीश महाजन रात्रीपासूनच त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले. त्यांनी येथील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेत साधू-महंतांशी चर्चा केली. त्यानंतर सर्वांत मोठे गर्दीचे ठिकाण असलेल्या नाशिकच्या रामकुंडावर धाव घेतली. महाजन येण्यापूर्वीच रामकुंडाचा गड भुसेंनी ताब्यात घेतला होता. रामकुंडावरील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासह शाहीस्नानात अडचणी येवू नयेत यासाठी भुसे कार्यकर्त्याच्या रुपात सुरक्षेविनाच फिरत होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेलाही दिलासा मिळाला होता.
महाजन यांनी शाहीस्नानापूर्वी रामकुंडाचा ताबा घेऊन सुरक्षारक्षकांसह पोलिसांचा वेढा काहीसा कमी केला. त्यांनी व्हीआयपी बडेजाव बाजूला सारत, गर्दी नियंत्रकाची भूमिका बजावली. निर्मोही, दिंगबर आणि निर्वाणी या तीनही आखाड्यांच्या स्नानावेळी महाजन यांनी स्वयंसेवकाच्या भूमिकेत येवून साधू-महंतांचे स्नान करून देण्यासह त्यांना हाताने बाहेर काढण्याची भूमिका बजावत होते. महाजन आणि भुसे स्वयंसेवकाच्या भूमिकेत असतांना महापौर, उपमहापौर, शिवसेना व भाजपचे पदाधिकारी मात्र मचानावरून गंमत बघत होते. पालकमंत्र्यांचा उत्साह पाहून पोलिस, अधिकाऱ्यांसह भाविकही आश्चर्यचकीत झाले.
चौथा राजकीय आखाडा
शाहीस्नान सोहळा आटोपल्यानंतर पालकमंत्र्यांसह, खासदार हेमंत गोडसे, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनी रामकुंडात डुबकी मारून पर्वणीच्या यशस्वीतेचा विजयोत्सव साजरा केला. महाजन व मुर्तडक यांनी रामकुंडात सूर मारला. पालकमंत्री महाजन हे सपत्नीक होते. छगन भुजबळ यांनीही उशिराने भेट देत, नियोजनाचे कौतुक केले. आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, सलीम शेख, अनिल मटाले, राहुल ढिकले, यशवंत निकुळे, शिवाजी चुंभळे, डॉ. हेमलता पाटील, वत्सलाताई खैरे, विनायक पांडे, विजय साने, लक्ष्मण सावजी यांच्यासह सर्व पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी पापमुक्ती करून घेतली. तीन आखाड्यांनतर झालेला राजकीय आखाड्याचे स्नानही चर्चेचे केंद्र बनले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट