Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्मार्टवरून रणकंदन!

$
0
0


करवाढ व एसपीव्ही टाळून प्रस्तावाला महासभेची मंजुरी

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक महापालिकेची महासभा बुधवारी अभूतपूर्व गोंधळ, हमरी-तुमरी, गदारोळ आणि ताण-तणावाने गाजली. पाण्यावरून भाजपा-मनसे आमनेसामने आले. तर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांवरून शिवसेनेचे सुधाकर बडगुजर आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यातील वादाने महासभेला गालबोट लागले. दहा तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर सदस्यांनी स्मार्ट सिटी प्रस्तावाचे समर्थन करीत, प्रस्तावित करवाढीला तीव्र विरोध केला. सभागृहाचा कल लक्षात घेत महापौरांनी करवाढीला ब्रेक लावत स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही)ची अट रद्द करीत स्मार्ट सिटी प्रस्तावाला मंजुरी दिली. करवाढ तसेच एसपीव्हीची अट वगळण्यात आल्याने स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात नाशिकच्या समावेशाला ब्रेक लागू शकतो.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रस्तावाअंतर्गत नाशिक महापालिकेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी बुधवारी विशेष महासभा घेण्यात आली. ३ डिसेंबर रोजी हा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याने त्यावर बुधवारी दहा तास चर्चा करून निर्णय घेण्यात आला. पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी व योजनेत समाविष्ट होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, सन २०१७ मध्ये निवडणुका असल्याने करवाढ जोखमीची असल्याने निवडक सदस्य वगळता सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोध केला. आयुक्तांनी करवाढीचे समर्थन करीत, प्रशासनाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने करवाढीऐवजी मालमत्ता कर व पाणीपट्टी करातील लिकेजेस शोधून त्यातून उत्पन्न वाढवावे अशा बहुसंख्य सदस्यांनी सूचना केल्या. काँग्रेसच्या उद्धव निमसे व डी. जी. सूर्यवंशी या दोघांनी करवाढीला उघडपणे

समर्थन करून आपला स्वतंत्र बाणा दाखविला. करवाढीपाठोपाठ एसपीव्हीवर महापालिकेने फुली मारल्याने स्मार्ट सिटीकडच्या वाटचालीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

पेपर मला लिहायचाय!

महासभेत आयुक्तांनी करवाढीचे जोरदार समर्थन करत करवाढीशिवाय पर्याय नसल्याचा दावा केला. सध्याची करवाढ मान्य नसेल तर मधला मार्ग काढून मी करांची वसुली ९५ टक्के करून दाखवतो. मात्र, ज्यांनी कर भरले नाहीत, त्यांना करवाढ लागू करा अशा सूचना त्यांनी केल्या. भांडवली मूल्यावर करवाढीचे अधिकार द्या, तुमच्या वतीने मला पेपर लिहायचा आहे. परंतु, ५० गुणात पास होवू शकत नाही. मधला मार्ग काढल्यास ७५ गुणातही पेपरमध्ये पास होवू शकतो, असा दावा त्यांनी केला. मात्र, तरीही नगरसेवकांचा कल करवाढीला विरोध करणारा असल्याने अखेरीस आयुक्त हतबल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युनेस्कोच्या यादीत कुंभच्या समावेशास तत्वतः मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

युनेस्कोच्या यादीत सिंहस्थ कुंभमेळ्याचा समावेश करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने तत्वतः मान्यता दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

खासदार गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांची २९ आक्टोबरला भेट घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्याचा समावेश करण्याची मागणी केली होती. या मंत्रालयाने ती मान्य करतानाच युनेस्कोच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव तयार करुन सोबत कुंभमेळ्याची चित्रफित व छायाचित्रे जोडण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत. अलाहाबाद, उज्जैन, हरिव्दार व नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. विश्वातून करोडो भाविक सहभागी होतात. एखाद्या देशाच्या लोकसंख्येएव्हढी ही संख्या असते. भारताची संस्कृती, संस्कार, भावनांची जागतिक स्तरावर दखल घ्यावी म्हणून कुंभमेळ्याचा समावेश युनेस्कोच्या यादीत करणे गरजेचे असल्याचे गोडसे यांनी शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनीही ही मागणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक निबंधकास सक्तमजुरीची ‌शिक्षा

$
0
0

नाशिक : पतसंस्था दिवाळखोरीत निघाल्याने जुना धनादेश रद्द करून नवीन धनादेश देण्यासाठी १५ हजारांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी सहायक निबंधकाला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये ३ वर्ष सक्तमजूरी आणि १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

प्रकाश हिरालाल भामरे असे आरोपीचे नाव आहे. २५ जानेवारी २०१० रोजी नाशिक येथील ठक्कर बाजार बसस्थानकातील एका हॉटेलात त्यांनी ही लाच स्वीकारली. विशेष न्यायाधीश यु. एस. जोशी फलके यांनी याबाबतचा निकाला दिला आहे. भामरे याला लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ नुसार ३ वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांचा बहिष्कार; बडगुजरांची दिलगिरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी आयोजित केलेली बुधवारची विशेषसभा महापौर, आयुक्त आणि नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यातील वादाने गाजली. बडगुजरांनी थेट प‌िठासनावरील महापौरांकडे कागदे फिरकावत आयुक्त आणि महापौर एकमेकांना सांभाळून घेत असल्याचा आरोप केल्याने सभागृहात महाभारतच घडले. बडगुजरांच्या शेरेबाजी व वैयक्तिक चिथावणीखोर वक्तव्यांमुळे चिडलेल्या आयुक्तांसह महापौरांनी बडगुजरांवर हल्लाबोल करत दादागिरीवर गोष्ट आली. वैयक्तीक आरोपांनी व्यथ‌ित झालेल्या आयुक्त डॉ. गेडाम यांनी थेट सभागृहाच सोडल्याने अर्धा तास कामकाज थांबले. अखेरीस सदस्यांनी मध्यस्थता केल्यानंतर व बडगुजरांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कामकाज सुरळीत सुरू झाले.

स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावरून शिवसेनेने महासभेत सत्ताधाऱ्यांसह प्रशासनालाही घेण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट सिटीला समर्थन देत, करवाढीला विरोध केला. तर पर्यायी स्रोत निर्माण करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या. सभा शांततामय मार्गाने सुरू असताना सुधाकर बडगुजर यांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची चिरफाड सुरू केली. त्रुटी दाखवून कारवाई केली जात नसल्याने त्यांनी आयुक्तांवर शरसंधान साधले. प्रशासन गेंड्याच्या कातडीचे असल्याचा आरोप करत, गाळ्यांच्या दरवाढीवरून त्यांनी कागदपत्र महापौरांसह आयुक्तांच्या अंगावर ‌भिरकावली. त्यामुळे तणावाचे वातावरण बनले. आयुक्तांना आपण सांग‌ितलेली एकही गाोष्ट ते करत नसल्याचा आरोप करत, सदस्यांना टारगेट केले जात असल्याचे म्हटले. मात्र आयुक्तांनी आपण एक नव्हे; तर दोन कामे सांग‌ितल्याचे बडगुजरांना लक्षात आणून दिले. दुसरे काम निव‌िदा प्रक्रिया थांबवायचे असल्याचे सांग‌ितल्याने बडगुजर अधिकच संतापले. त्यामुळे, आयुक्त व महापौर एकमेकांना साभांळून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून आयुक्तांनी मॅनेज शब्दाला आक्षेप घेत 'वैयक्तीक आरोप नको' असे सांगून सभागृहाचा त्याग केला. त्यामुळे महापौर आयुक्तांमध्येच खडाजंगी सुरू झाली. बडगुजरांचा तोल सुटल्याने असे आरोप करत असल्याचे महापौरांनी सांगीतले. तुमची दादागिरी खपवून घेतले जाणार नाही. तुम्हालाच बोलता येते काय असे सुनावले. महापौर व बडगुजर यांच्यात तु-तु,मैं-मैं होऊन सभागृहात गोंधळ व तणावाची स्थिती निर्माण झाली.

आयुक्तांनी महापौरांची आज्ञा न घेताच सभागृह सोडले, तर आयुक्तांच्या खुर्चीवर कोणीही अधिकारी बसायला तयार नव्हता. त्यामुळे प्रशासनाची खुर्ची रिकामी झाल्याने कामकाज थांबले. सभाहगृहात प्रथमच अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झाली.

त्यामुळे काही सदस्यांनी आयुक्तांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्तांनी न ऐकल्याने अखेरीस महापौर अशोक मुर्तडक यांनीच आयुक्तांची मनधरणी सुरू केली. बडगुजर वैयक्त‌िक आरोप करून टारगेट करत असल्याचा आरोप आयुक्तांनी केला. तर जेष्ठ सदस्यांनी, गटनेत्यांनी व महापौरांनी तब्बल २० मिन‌िटे आयुक्तांची मनधरणी केली. अखेरीस बडगुजरांनी दिलगिरी व्यक्त करण्यावर तोडगा काढण्यात आला. बडगुजरांनी सभागृहात महापौरांसह आयुक्तांची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर तणाव निवळून सभेच्या कामकाजाला सुरूवात झाली.
पाणीप्रश्नावर सभागृहात सुरू झालेला गोंधळ उपमहापौर गुरूमीत बग्गा शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र भाजपच्या सदस्यांनी तुम्हाला बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगत, शेरेबाजी केली. त्यामुळे बग्गा सतंप्त होत थेट पिठासनावरून खाली उतरून भाजप सदस्यांवर धावून गेले. 'आता मी खाली आलो आहे काय बोलायचे ते बोला' असे सांगत भाजपच्या सदस्यांना आव्हान दिले. त्यामुळे सभागृहातील तणाव अधिकच वाढला.
खेरीस वरिष्ठ सदस्यांनी मध्यस्तता करत बग्गांना आवरले. त्यानंतर तणाव निवळला.


... अन् संयम सुटला
सुधाकर बडगुजर आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यात अनेक दिवसापासून वाद सुरू असून, दोघांमधील वादाचा संयम बुधवारी सुटला. मुकणे प्रकरणावरून सुरू झालेल्या वादाला महासभेत तोंड फुटले. 'प्रशासन गेड्यांच्या कातडीचे असून, कारवाई करता येत नसेल तर राजीनामा द्या' असे त्यांनी आयुक्तांना सुनावले. तर एकमेकांना साभांळण्याची भाषा बडगुजरांनी केल्याने महापौरांसह आयुक्तांचा तोल गेला. येथूनच वादाला सुरूवात झाली. अखेरीस बडगुजरावर दिलग‌‌िरी व्यक्त करण्याची वेळ आली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२२ दिवसांच्या बालिकेची विक्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मुलगी दत्तक द्यायची असल्याचे सांगून एका महिलेच्या २२ दिवसांच्या स्त्री अर्भकाची विक्री करणाऱ्या पाच जणांना मनमाड पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून, हे सर्व नगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यात आली. राज्यभरात मुलींची विक्री करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

लोणी बुद्रुक (ता. राहता) येथील सुनीता अमोल पवार, या २५ वर्षीय महिलेने तीन आठवड्यांपूर्वी मुलीला जन्म दिला. तिचे नाव ज्युली असे ठेवण्यात आले. सुनीताचा पती घर सोडून गेला असल्याने ती लोणी बुद्रुक येथे आईसोबत राहते. संशयित भाऊसाहेब मारुती गोडसे (रा. लोणी बुद्रुक), कुसुम लक्ष्मण खरात (रा. नांदूर खंडाळा) तेरीजा सुनील कठारनवरे (रा. सोनई), सुनील पाराजी झावरे (रा. सोनई) यांनी सुनीताकडे मनमाड येथील अश्विनी सुनील खैरनार या महिलेला मुलगी दत्तक देण्यासाठी आग्रह धरला. खराब आर्थिक परिस्थितीमुळे तुला मुलीचे पालनपोषण जमणार, असे सुनीताला सांगण्यात आले. त्यानंतर सुनीता व बा‍ळाला जबरदस्तीने मनमाड येथे आणण्यात आले. तेथे बाळाला साठ हजार रुपयांना विकले जात असल्याचे सुनीताच्या लक्षात आले. बाळाला देण्यास नकार दिल्यानंतर संशयितांनी सुनीताकडून बाळाला हिसकावून घेतले. पुण्याच्या पार्टीबरोबर अश्विनी खैरनार हीने बाळाचा व्यवहार केला असल्याचे सांगण्यात फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी शांतीनगर परिसरातून संशयितांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धडक मोर्चाबाबत आज आढावा बैठक

$
0
0

नाशिक : आश्वासनांची पूर्तता करण्यात भाजप सरकारला अपयश आले आहे. याचा निषेध करण्यासाठी ८ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासाठी सहप्रभारी आमदार सुधीर तांबे आणि विनायकराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी

(दि. ३) डिसेंबर रोजी दुपारी तीनला एमजी रोडवरील काँग्रेस भवनात बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिटको’च्या ‘उन्मेष’चा पर्यावरण अंक

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्यास चालना मिळावी, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने हा अंक प्रसिध्द करण्यात येतो. यामध्ये सेंद्रिय शेती, पर्यावरण, ओरबाडलेलं काही, एक आठवण आनंदवनाची, निसर्गाची किमया, सिमेंटच्या जंगलात, मानवाचा अट्टहास, पर्यावरण, घोषवाक्य, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे..., जाणीव, श्रावण, फूलों का क्या कहना, अवर नेचर सेज, क्लीन ड्राईव इंडिया अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले आहेत. या अंकात मराठी, हिंदी व इंग्लिश या तीन भाषांतील पर्यावरणपूरक कविता, निबंध, लेख, विनोद, चारोळ्या अशा विविध साहित्यप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या लेखांसोबतच कॉलेजमध्ये राबविण्यात आलेल्या वर्षभरातील प्रमुख उपक्रमांची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे. विद्यार्थी सभा, जिमखाना विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, आर्मी विंग व एअर विंग, विद्यार्थीनी मंच, मराठी व विज्ञान विभाग, ग्रंथालय विभाग अशा विविध विभागांचा अहवालही यात सादर करण्यात आला आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षा, खेळ, यामधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या फोटोंनाही यात प्रसिद्धी देण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा वार्षिक अंक प्रसिध्द करण्यात आला. डॉ. राम कुलकर्णी हे या अंकाचे मुख्य संपादक व प्रकाशक आहेत तर कार्यकारी संपादक म्हणून प्रा. डॉ. विद्युल्लता हांडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूल कॅम्पसला हजारावर विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक



या पूल कॅम्पसमध्ये एकूण २१ नामवंत कंपन्यांचा सहभाग होता. पॅरलल - एच.आर., आय-टेक सोल्युशन, यूएमएस टेक्नॉलॉजी, डब्ल्यूएनएस, डेसिमल-पॉईंट, विजय वेब सोल्युशन, एन्जल ब्रोकिंग, नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर, डाटा व्हिजन यासारख्या नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. टेक्निकल इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, अॅप्टीट्यूड टेस्ट या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
कॅम्पसच्या अखेरच्या टप्प्यात जिव्हिओ टेक्नॉलॉजी, बोनान्झा पोर्टफोलिओ, आयसीआयसीआय बँक, रेलिगेअर, आयएनजी करुर वैश्य, कोटक महिंद्र, फॉक्स इंडिया, ग्रामविद्या, वीनफोस्टर व ब्रेन व्हिजन अश्या नामवंत कंपनी सहभागी होणार आहेत. या पूल कॅम्पसच्या यशस्वीतेसाठी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नारायण दीक्षित, संचालक डॉ. अशोक अग्रवाल यांच्या नेतृत्त्वाखाली ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजन केले होते. संस्थेचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी व विभाग कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांनी यांच्या सहकार्याने हे पूल कॅम्पस पार पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाल कांद्याच्या दरात घसरण

$
0
0

लाल कांद्याची आवक वाढली; सरासरी दर १६५० रुपये



म. टा. वृत्तसेवा, लासलगाव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत दिवसेंदिवस वाढ होत असून, बाजारभाव घसरत आहेत. बुधवारी लाल कांद्याच्या दरात सरासरी २९० रुपयांची घसरण होऊन सरासरी बाजारभाव १ हजार ६५० रुपयांपर्यंत घसरले. या भाव घसरणीमुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लासलगाव व परिसरात सध्या लाल कांद्याच्या काढणीला वेग आला असून, परिणामी कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी दिसून येत आहे. येथील बाजार समितीत दररोज सुमारे बारा ते पंधरा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होत आहे. गेल्या २ नोव्हेंबर रोजी लाल कांदा सरासरी ३ हजार ५०० रुपयांपर्यंत विकला गेला होता. मात्र, जसजशी लाल कांद्याची आवक वाढत गेली तशी बाजारभावात घसरण पहावयास मिळाली आहे. लाल कांदा उन्हाळ कांद्याप्रमाणे साठवता येत नसल्याने मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना तो विकावा लागतो. अवघ्या महिनाभरातच कांद्याच्या सरासरी दरात सुमारे १ हजार ८०० रुपयांची घसरण झाली आहे. येत्या काळात मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यास कांद्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, कांद्याची भाव घसरण रोखण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या किमान निर्यातमूल्यात कपात करावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. लाल कांद्याला सध्या बांगलादेश, दुबई, सिंगापूर, मलेशिया आदी देशांमध्ये मागणी आहे. भारतातून ७०० डॉलर प्रती मेट्रिक टन या दरात कांद्याची निर्यात करणे निर्यातदारांना परवडत नसल्याने त्यांनी खरेदीमध्ये निरुत्साह दाखविला आहे. परिणामी देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणीपेक्षा पुरवठा अधिक होऊन बाजारभाव आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची सुमारे साडेबारा हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान १ हजार ४००, कमाल २ हजार ३३० तर सरासरी बाजारभाव १ हजार ६५० रुपये प्रती क्विंटल राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकाने साजरा केला रिक्षाचा बर्थ डे

$
0
0

सुनील यांनी २५ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या रिक्षाच्या व्यवसायातून घेतलेले स्वतःचे घर, मुलांचे उच्चशिक्षण तसेच पत्नीच्या दुर्धर आजारात औषधोपचार करण्यासाठी पैसा जमविला. याची त्यांना आजही जाणीव आहे. त्यामुळेच त्यांनी 'लक्ष्मी'ला गुलाब पुष्पांनी व हारतुरे घालित नटवून मिरविले. सव्वा पाच किलोचा केक कापून वाढदिवस साजरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनी ताब्यात घेण्याचा घाट

$
0
0

नाशिक-पुणे महामार्ग भूसंपादन बैठकीत शेतकऱ्यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाशिक - सिन्नर रस्ता चौपदरीकरणासाठी जिल्हा प्रशासन सरकारी जमिनी वगळून जाणीवपूर्वक खासगी जमिनी संपादीत करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी रस्त्यांबाबतच्या कागदपत्रांची तपासणी करून त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करा, असे आदेश भूसंपादन अधिकाऱ्यांना दिले आहेत. नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणाचा प्रश्न रेंगाळला असून, तो मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांसह जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. नाशिक ते सिन्नर या मार्गाचे रुंदीकरण सध्या रखडले आहे. शिंदेगाव येथे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. विशेष म्हणजे रस्त्यासमोरील बाजूस सरकारी जमीन असतानाही ग्रामस्थांची अडवणूक केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यासंदर्भात अलीकडेच मुंबई येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांना अंधारात ठेवून भूसंपादन सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने बैठक बोलावून निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. दळणवळणाची साधने वाढायला हवीत याबाबत शेतकऱ्यांनी सहमती द‌ाखवली. मात्र, नाशिक-सिन्नर मार्गावरील केवळ रस्त्याच्या एकाच बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी का संपादित केल्या जात आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनेही जमीन संपादित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी प्रत्येक गावात जमिनीचा मोबदला वेगवेगळ्या दराने मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तर, आपली घरे या प्रकल्पात बाधित होत असल्याने रस्त्याच्या आराखड्यात बदल करावा, अशी मागणी शिंदे पळसे येथील ग्रामस्थांनी केली. सरकारी जागा असताना खासगी जमीन संपादित केली जात असल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तातडीने कागदपत्रे तपासावीत आणि दोन दिवसांनी पुन्हा याच विषयावर बैठक घ्यावी, असे ठरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅलीतून उमेदीचा संदेश !

$
0
0

नाशिक : 'आम्हाला सहानुभूती नको, मदत नको, शिक्षण हवे' असा संवेदनशील संदेश जागतिक अपंग दिनानिमित्त शारीरिक, मानसिक व्यंगत्वाला सामोरे जात असलेल्या व्यक्तींनी दिला. कोणाच्या डोळ्यासमोर अंधार, तर कोणाचा पाय जायबंदी... काठीचा आधार घेत जीवन जगणाऱ्या या व्यक्तींनी रॅलीमार्फत शिक्षणाबद्दलची ओढ समाजाच्या लक्षात आणून दिली. निमित्त होते, सामाजिक न्याय विभाग नाशिक यांच्यातर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त रॅलीचे. जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे व सभापती उषा बच्छाव यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली. कालिदास, मेनरोड, शिवाजी स्टेड‌ियम या मार्गावरुन रॅली नेण्यात आली. अंध, अपंगांच्या शहरातील २३ शाळा या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ८१४ विद्यार्थी व २४६ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. समाजकल्याणचे सतीश वळवी यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्ली ते मुंबई सायकल रॅली

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत प्रत्यक्षात यावा, यासाठी नाशिकच्या सहा सायकलपटूंनी दिल्ली ते मुंबई अशा सायकल प्रवासाला सुरुवात केली. या रॅलीचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे सडक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून यात्रेला प्रारंभ झाला. स्वच्छ भारत स्वस्थ भारत या अभियानाला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. या वर्षात काही प्रमाणात का होईना भारत स्वच्छ झाला. हे अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्याचा प्रसार, प्रचार व्हावा यासाठी ही सायकल यात्रा आयोजित केली आहे. या अभियानाला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून, १३ डिसेंबर रोजी हे अभियान पूर्ण होणार आहे. दिल्ली ते मुंबई असे १६५० किलो मीटरचे अंतर सहा सायकलपटू पंधरा दिवसांत पूर्ण करणार आहेत. या रॅलीत अॅड. दिलीप राठी, डॉ. राजेश पाटील, अॅड. वैभव शेटे, तुकाराम नवले, राजेंद्र फड, विलास वाळके हे सहा सायकलपटू सहभागी झाले आहेत. प्रीतम पगार, रुचित सणांसे, मितेश सोमवंशी हे क्रु मेबर म्हणून काम पहात आहेत. ही यात्रा दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या चार जिल्ह्यांतून मार्गस्थ होणार आहे. या रॅलीच्या अगोदर या चमुने मागील वर्षी १६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत नाशिक ते पणजी सायकल यात्रा पूर्ण केली होती. विविध सामाजिक संदेश घेऊन हा चमू भारताच्या विविध कानाकोपऱ्यात नेहमी फिरत असतो. सायकलवर फक्त न फिरता ज्या गावांना भेटी देणार आहेत, तेथे सामाजिक उपक्रम देखील यांच्यावतीने राबविले जातात. दिल्ली येथून सुरुवात झाल्यानंतर राजस्थान येथील निमराना येथे ११६ किलोमीटर वर पहिला थांबा झाला. त्यानंतर जयपूर, नसिराबाद, भिलवारा, निमुच, मंडसूर, शिरपूर, मालेगाव, नाशिक, ठाणे, मुंबई असा या संघाचा प्रवास असणार आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या संघाचा गेल्या महिन्यापासून सराव सुरू असून रोज १५० ते २०० किलोमीटर सायकल प्रवास हा चमू करीत असतो. या रॅलीसाठी महाजन बंधू, कॅ. नीलेश गायकवाड, वैभव महाले, अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण विभागाचा पदभार काढण्याचा ठराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण चाळीसगावच्या गणवेश घोटाळ्यातील प्रमुख आणि बागलाण पंचायत समितीत वादग्रस्त ठरलेले गटशिक्षण अधिकारी बी. टी. पाटील यांची बदली करण्याच्या मागणीसाठी बागलाण पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी मागणी लावून धरलेली आहे. आता अशा मस्तवाल आणि वादग्रस्त गटशिक्षणाधिकार्‍यांकडे कळवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा पदभार देऊन जिल्हा परिषद प्रशासनाने कळवण तालुक्यातील आदिवासी जनतेची थट्टा केली आहे. त्यांच्याकडून तत्काळ पदभार काढून घ्यावा, असा ठराव कळवण पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला आहे.

गणवेश घोटाळ्यातील घोटाळेबाज आणि वादग्रस्त, मस्तवाल गटशिक्षणाधिकार्‍यांकडे दिलेला पदभार काढून घ्यावा नाहीतर शिक्षण विभागाला कुलूप ठोकण्याचा इशारा कळवण पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव यांनी दिला आहे. बागलाण पंचायत समितीच्या सभेत गटशिक्षण अधिकारी पाटील यांची बदली व्हावी, असा ठराव करण्यात आला आहे.

पाटील चाळीसगाव तालुक्यात गटशिक्षण अधिकारी असताना ५५ लाख रुपयांच्या गणवेश घोटाळ्यात त्यांची चौकशी झाली होती. त्यात ते दोषी आढळल्याने त्यांची बदली करण्यात आली. चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी ते दीड वर्ष गैरहजर होते. अधिकार नसताना त्यांनी बागलाण तालुक्यातील शिक्षकांच्या बदल्या केल्या असून, आर्थिक लूट केली आहे त्या बदल्याही चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. सदर बदल्या करताना आमदार, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या लेटरहेडचा सर्रास गैरवापर करुन आर्थिक लूट केल्याचा आरोप बागलाण पंचायत समितीच्या सदस्यांनी केला आहे. अशा एक ना अनेक कामगिरीने वादग्रस्त ठरलेल्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडे कळवणचा पदभार देऊन जिल्हा परिषद प्रशासन व शिक्षण विभाग चुकीचा पायंडा पाडत असल्याचा आरोप कळवण पंचायत समितीचे उपसभापती अॅड संजय पवार यांनी केला आहे.

बागलाण पंचायत समितीचे वादग्रस्त गटशिक्षणाधिकार्‍यांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार व ढिसाळ प्रशासनामुळे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे असे असताना त्याच्याकडे कळवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आल्याने कळवण तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कळवणचा अतिरिक्त पदभार तत्काळ काढून घ्यावा, असा ठराव कळवण पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पसा’मध्ये बालनाट्यस्पर्धा

$
0
0

सोमवार, ७ डिसेंबर : 'नवे गोकुळ', स्वामीनारायण स्कूल, नाशिक, सकाळी १० वा., 'रानमेवा पक्ष्यांना ठेवा', सुनंदा केले विद्यामंदिर, नाशिक, सकाळी. ११.१५ वा., 'सुटका', प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, नाशिक, दु. १२.३० वा., 'चिंगी', वनिता बहुउद्देशीय संस्था, जळगाव, दु. १. ४५ वा., 'एका खुनाचा शोध', उत्कर्ष कलाविष्कार संस्था, भुसावळ, दु. ३ वा., 'जॉकी आणि तो', ब. गो. शानभाग विद्यालय, जळगाव, दु. ४.१५

मंगळवार, ८ डिसेंबर : 'पंखातील आभाळ', पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालय, नाशिक स. १० वा., 'शहाणपण देगा देवा', प्रबोधिनी विद्यामंदिर, नाशिक, स. ११. ४५ वा., 'सर तुम्ही गुरुजी व्हा', सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर, दु. १२. ३० वा., 'फुलपाखराची गोष्ट', अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ, दु. १. ४५. वा. 'अवताराची गोष्ट', बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव, दु. ३

बुधवार, ९ डिसेंबर : 'सूर्याची लेकरे', नूतन मराठी शाळा, इगतपुरी, स. १० वा., 'होळी', ओम गुरुदेव गुरुकुल, कोकमठाण, स. ११.१५ वा., 'उडाणटप्पू', पी. एम. मुंदडे विद्यालय, जळगाव, दु. १२.३० वा., 'शाळा वाट पहाते', नटेश्वर मंडळ, राहुरी, दु. १. ४५ वा., 'दुष्काळ', मानवता शिक्षण मंडळ, जळगाव, दु. वा. 'गणपती बाप्पा मोरया', मंगलमूर्ती संस्था, जळगाव, दु. ४.१५

गुरुवार, १० डिसेंबर : 'सपान', कृपा संस्था, नाशिक, स. १० वा., 'अंधार फुले', लोकहितवादी मंडळ, स. ११. १५ वा., 'बुळबुळे', दूध उत्पादन संस्था, जळगाव, दु. १२. ३० वा., 'भूत, भविष्य, भुतावळ', नाशिक शिक्षण मंडळ, दु. १. ४५ वा., 'हे तुम्हीही करू शकता', प्रताप विद्यालय, भुसावळ, दु. ३ वा., 'थेंबांचे टपाल', लोकमान्य मंडळ, जामखेड, दु. ४. १५

शुक्रवार, दि. ११ डिसेंबर : 'आई', जनस्थान सेवा मंडळ, नाशिक, स. १० वा., 'पुन्हा नको रे बाबा', दीपक मंडळ, नाशिक स. ११. १५ वा., 'थेंबांचे टपाल', कल्पित मंच, जळगाव दु. १२. ३० वा., 'बालपण', कलारंग प्रॉडक्शन, जळगाव, दु. १. ४५ वा., 'मु. पो. कळमसरा', यादव विद्यालय, जळगाव, दु. ३ वा., 'इस्कोट', रावसाहेब विद्यालय, जळगाव दु. ४. १५ वाजता. प्रवेश विनामूल्य असून अधिकाधिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समन्वयक राजेश जाधव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्षतोडीवर तोडगा निघावा

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com नाशिक : पर्यावणाचा ऱ्हास आणि त्यामुळे बदललले निर्सगाचे चक्र याचे दुष्परिणाम सध्या सर्वचजण भोगत आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट आणि आता दुष्काळ ही पर्यावरणाच्या हानीचीच फळे आहेत. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेमुळे माणूस मेटाकुटीला आला असताना आता हायकोर्टानेच वृक्षतोडीला मज्जाव केला आहे. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने ही बाब स्वागतार्ह असली तरी शहरात रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या झाडांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून, अनेकांना जीव गमवावा लागतो आहे, तर कित्येकजण जायबंदी देखील झाले आहेत. अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या झाडांबद्दल वेगवेगळी विचारसरणी असणारे दोन मतप्रवाह समोर आले आहेत. ही झाडे तोडली जाऊ नयेत, यासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे कार्यकर्ते आग्रही आहेत. तर, ही झाडे जीवघेणी ठरू लागल्याने ती हटवावीत, असा आग्रह काही लोकांकडून धरला जात आहे. झाडे तोडावीत की तोडू नयेत, यावरून सध्या दोन वैचारीक प्रवाहांमध्ये खल सुरू असला तरी त्यातून साध्य काही होत नाही याचे दु:ख अधिक आहे. काहींनी वृक्षतोडीला न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन कारवाई करण्यास धजावत नाही. तर, दुसरीकडे अपघातवाढ रोखण्यासाठी शहरात रस्त्याच्या मधोमध असणारी झाडे तोडावीत यासाठी आतापर्यंत मानवी साखळी, स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवून झाली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून, त्यातून काय निष्कर्ष निघणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गंगापूर रोड, अशोका मार्ग, सीटी सेंटर मॉल ते गोविंदनगर रोड, द्वारका ते नाशिकरोड महामार्ग, के. के. वाघ कॉलेज ते विदर्भ कॉलनी, अमृतधाम चौफुली ते तारवालानगर, लामखेडे मळा ते वज्रेश्वरी झोपडपट्टी, पेठरोडवर आरटीओ कॉर्नर ते जकातनाका, म्हसरूळ गाव ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पपया नर्सरी ते पिंपळगाव बहुला याखेरीज दिंडोरी रोड आणि अन्य अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असणारी झाडे अपघातांना कारणीभूत ठरू लागली आहेत. अर्थात अपघातांना केवळ ही झाडेच कारणीभूत नाहीत. मानवी चुका हे देखील अशा अपघातांमागील प्रमुख कारण असल्याचे नाकारून चालणार नाही. अनोळखी मार्गावर रात्रीच्यावेळी बेदरकारपणे वाहन चालविणे, नेहमीच्या मार्गावरही अति आत्मविश्वासाने वेगात वाहन चालविणे, मार्गावर पथदीप बंद असणे अशी कारणेही अशा अपघातांना तेवढीच कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध असणारी झाडे तोडावीत, अशी मागणी होत असली तरी वाहनचालकांचे प्रबोधनही तेवढेच आवश्यक आहे. एक झाड तोडले तर किमान १० झाडे लावावीत, असा निकष आहे. परंतु, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. कोणती झाडे तोडावीत आणि त्याबदल्यात कोणती झाडे लावायला हवीत याचेही निकष ठरले आहेत. मात्र, हे निकष दुर्लक्षिले जातात. पर्यावरणासाठी अधिक फायदेशीर ठरू शकणाऱ्या झाडाऐवजी अन्यच झाडे लावली जात असल्याचेही यापूर्वी अनेकदा निदर्शनास आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पर्यावरणाच्या संवधर्नाप्रती कोर्ट अधिकच आग्रही झाले आहे. वृक्षतोडीला मज्जाव हा त्याचाच भाग आहे. गेल्या काही दिवसांत शहरात अशा झाडांना धडकून अनेक जण जखमी झाले आहेत. काहींनी जीवही गमावला आहे. ही झाडे तोडणे शक्य नसेल तर त्यावर पर्याय सुचविले जाणे अपेक्षित आहे. या सर्व विषयासंदर्भात स्थानिक पातळीवर एखादे पथक नेमून लवकरात लवकर तोडगा काढता येईल का हे देखील पाहणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्थ सेवा मार्गातर्फे जानेवारीत कृषी महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाअंतर्गत शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने २२ ते २६ जानेवारीदरम्यान डोंगरे वसतीगृह मैदानावर कृषी महोत्सव होणार आहे.

शेतकऱ्यांना विशेषत: दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना बळ देणारा ठरावा यासाठी राज्यभरातील महिला पुरूष सेवेकऱ्यांनी नियोजन करून संबंधित शेतकरी व त्यांचे कुटुंबीय यांचा कृषी महोत्सवातील सहभाग वाढविण्यासाठी आतापासूनच परिश्रम घ्यावेत, असे आवाहन समर्थ केंद्राचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांनी केले. कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यासाठी नुकतीच देशभरातील प्रमुख समर्थ सेवेकऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी कृषी महोत्सव व २०१६ मध्य काशीसह महाराष्ट्राबाहेर होणाऱ्या सेवामार्गाच्या कार्यक्रमांबाबत विचार विनिमय व चर्चा झाली. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेवर मोरे म्हणाले, 'आज सेवामार्गाच्या माध्यमातून बालसंस्कार, विनाहुंडा विवाह, व्यसनमुक्ती, स्वयंरोजगार, वास्तुशास्त्र, याज्ञिकी, आरोग्य-आयुर्वेद, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, पर्यावरण रक्षण व संवर्धन अशा विविध विभागांतर्गत समाजोपयोगी कार्य चालू असले तरी शेती आणि शेतकरी या कार्याचा आत्मा आहे. म्हणूनच कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे, औजारे, आर्थिक मदत करायला हवी.' देश-परदेशातील कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक या महोत्सवात येणार असल्याने विद्यार्थी व शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन सेवामार्गातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकधारा कार्यक्रमाने प्रेक्षक चिंब

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक वासुदेवाचे नृत्य, पारध्यांच्या नृत्यशैलीचे वैशिष्ट्य, खंडोबाचा जागरण, गोंधळ.. काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या कलांची अनुभूती रसिकप्रेक्षकाला आली आणि 'लोकधारे'त प्रेक्षकवर्ग चिंब झाला. निमित्त होते, के. के. वाघ कला अकादमी प्रस्तुत 'कर्मवीर कला महोत्सव २०१५'चे. या कार्यक्रमाचे दुसरे पुष्प 'लोकधारा' कार्यक्रमातून बुधवारी गुंफण्यात आले. महाराष्ट्रातील कला, लोकसंगीत, लोकनृत्य रसिक प्रेक्षकांच्या नित्यस्मरणात रहावे, यासाठी या महोत्सवांतर्गत या विशेष कलाकृतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात झाली ती गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी या वासुदेवाच्या नृत्याने. पूर्वी ग्रामीण भागात नित्याने होत असलेली पहाट, गृहिणींची लगबगीचे चित्र या नृत्यप्रकारातून सादर करण्यात आले. यानंतर पारधी नृत्य हा शहरातील नागरिकांसाठी दुर्मीळ असा नृत्यप्रकार सादर करण्यात आला. शंकराची उपासना करतानाचे चित्र या माध्यमातून उभारण्यात आले. राम वाणी व गणेश वाणी या द्वयींनी सादर केलेला खंडोबाचा जागरण, गोंधळ व देवीचा गोंधळने प्रेक्षकांची मोठी दाद मिळवली. ऋतुजा चव्हाणके व मोहिनी भुसे या बालकलाकारांनी संबळवादन सादर केले. तसेच शुभांगी साळवे आणि सहकार्यांनी नृत्याचे सादरीकरण केले. प्रकाश साबळे, मोहन ठाकरे यांनी कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन केले होते. पार्श्वगायक दीपक लोखंडे यांचे तर पुष्कराज साळवी (ढोलकी), पारख सिरजादे (ढोल), अमित तांबे (सिंथेसाइजर) यांची संगीतसाथ कार्यक्रमाला लाभली. आशिष रानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राचार्य मकरंद हिंगणे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांना पालिकेचे आव्हान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे महापालिकेचे पाणी आरक्षण कमी करायचे आणि दुसरीकडे पाणीकपात रद्द करण्याची भूमिका घेवून पालिकेवर कडी करणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरच महापालिकेने पुन्हा कडी केली आहे. आरक्षित पाण्यात जुलै अखेर पाणी कसे पुरवायचे, ते तुम्ही इथे येवून समजावून सांगा, मग कपात रद्द करतो, असे सरळ आव्हानचे महापौर अशोक मुर्तडक यांनी पालकमंत्र्यांना दिले आहे.

वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतरच संभाव्य भीषण टंचाई टाळण्यासाठीच पाणीकपात केल्याचा दावाही महापौरांनी केला आहे. कपात रद्द करायची तर गंगापूर धरणातील इंडिया बुल्सचे आरक्षित ३०० दशलक्ष घनफूट पाणी पालिकेला देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आठवड्यातून एक दिवस पाणीकपात रद्द करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावरून सध्या मनसे विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. महासभेने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्र पाठवून ही पाणीकपात रद्द करण्याची सूचना केली. पालिकेचा

पाणीपुरवठा २९९३ दशलक्ष घनफूटमध्ये पूर्ण होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे वाद अधिक वाढला असून, त्याला पालिकेनेही प्रत्युत्तर दिले आहे. सध्याचा साठा जुलैअखेरपर्यंत पुरवायचा असेल तर कपातीशिवाय पर्याय नसल्याचा दावा मुर्तडक यांनी केला असून, पालकमंत्र्यांच्या सूचना चुकीच्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोबतच पालकमंत्र्यांचे सूचना पत्र आपल्याला मिळाले नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

पत्राबाबत साशंकता

पालकमंत्र्याच्या पाणीकपातीच्या सूचनापत्रावरच आता साशंकता व्यक्त केली जात आहे. या पत्रावर आवक-जावक क्रमांक नाही. तसेच, मजकूर कागदावर टाईप करून रबरी स्टॅम्पद्वारेच सही व शिक्का मारण्यात आला आहे. दरम्यान, भाजपचे गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी संबंधित पत्र हे पालकमंत्र्यांचाच असल्याचा दावा करतानाच, ते विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व आयुक्तांना देण्यात आले आहे, असा दावा त्यांनी केला आहे. पाणीप्रश्नावर आम्हाला राजकारण करायचे नसून सत्ताधाऱ्यांनी ते थांबवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीचे खुले समर्थन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

निवडणूक डोळ्यासमोर ठेवत स्मार्ट सिटी योजनेतून शहराचा विकास झाला नाही तरी चालेल, मात्र करवाढ नको अशी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांना काँग्रेसच्या उद्धव निमसे यांनी खडे बोल सुनावले. विशेष म्हणजे पक्षाची नकारात्मक भूमिका झुगारून त्यांनी स्मार्ट सिटी योजनेला पाठिंबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत करवाढीला खुला पाठिंबा दिला.

नाशिकमध्ये नवनिर्माण हवे असेल तर करवाढ का नको? असा सवाल त्यांनी नगरसेवकांना केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोध करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. दरम्यान त्यांची भूमिका पक्षविरोधी असल्याने त्यांच्या सदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याची माहिती काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी दिली आहे.

स्मार्ट सिटी योजनेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी बुधवारी विशेष महासभा घेण्यात आली. महापालिकेची आर्थिक अवस्था डामाडोल असल्याने व या प्रस्तावात करवाढीवर भर देण्यात आला. सध्याची करवाढ कायम ठेवल्यास पुढील पाच वर्षात महापालिकेचे १२०० कोटीचे नुकसान होणार होते. त्यामुळे आयुक्तांनी प्रस्तावात करवाढ सुचवली होती. परंतु, फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणूक आहे. हा प्रस्ताव मान्य केल्यास निवडणूक हरण्याचा धोका नगरसेवकांपुढे आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात करवाढीला विरोध केला. महापालिकेने करवाढ करण्यापेक्षा त्रुटी शोधण्याचे सल्ले दिले. मात्र, यातील निवडक नगरसेवकांनी करवाढ करण्याला समर्थन देवून आपली हिंमत दाखवली. काँग्रेसचे नगरसेवक उद्धव निमसे यांनी करवाढीला उघड पाठिंबा देत, विकास हवा असेल तर करवाढ आवश्यक असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

दुटप्पीपणाचा भाजपवर आरोप

नाशिकमध्ये सर्वात कमी दर असून माझ्या भागातील शेतकऱ्यांचा करवाढीला पाठिंबा असल्याचे निमसे यांनी सभागृहात जाहीर केले. विकास हवा असेल तर त्यासाठी पैसा कुठून आणणार असा सवाल करत भाजपच्या दुटप्पीपणावरही त्यांनी टीका केली. तर संभ्रमात असलेल्या मनसेला त्यांनी नवनिर्माण करायचे असेल तर करवाढीला समर्थन करण्याचे आवाहन केले. निवडणूका डोळ्या समोर ठेवून चांगल्या योजनेला विरोध करू नका असे खडेबोलही त्यांनी नगरसेवकांना सुनावले.

काँग्रेसकडून कारवाईची शक्यता

सभागृहात रोखठोक भूमिका घेणाऱ्या निमसे यांना पक्षाविरोधात भूमिका घेतली म्हणून कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या बैठकीतील भूमिकेचे मिटींग्ज व सभागृहात सदस्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मिटींग्ज वरिष्ठाकडे सादर केले जाणार आहे. काँग्रेसच्या बैठकीत ठरलेली भूमिका व प्रत्यक्षात महासभेत सदस्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मिटींग्ज वरिष्ठांना पाठविले जाणार आहे. निमसे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली असून त्याची गंभीर दखल पक्षाने घेतली आहे. त्यांच्या संदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविला जाणार पक्षच कारवाईचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यशवंत निकुळे यांना मनसेकडून तंबी

महासभेत बेकायदेशीर कामकाज चालत असल्याचे सांगून शहरात आरोग्य, रस्ते, स्वच्छता व पाणीपुरवठा सारख्या मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे वक्तव्य करणे मनसे नगरसेवक यशवंत निकुळे यांना महागात पडले आहे. शहरात विकासकामे केल्याचा डंका वाजवणाऱ्या मनसेला घरचा आहेर देणाऱ्या निकुळेंना पक्षातर्फे तंबी देण्यात आली असून त्यांना माफीनामा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उद्धव निमसेंपाठोपाठ निकुळेंच्या अडचणीत भर पडली आहे.

महापालिकेच्या बुधवारच्या महासभेत निकुळे यांनी शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे सांगून पक्षाला घरचा आहेर दिला. तसेच त्यांनी बेकायदेशीर कामे होत असल्याचा महासभेत स्वतःच्या महापौरांवर ठपका ठेवला. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षाची अडचण झाली. तरीही महापौर मुर्तडक यांनी त्यांच्याकडून अनवधनाने बोलले गेल्याचे सांगून सभागृहात वेळ मारून घेतली. मात्र, त्यांच्या या पक्षविरोधी भूमिकेमुळे सभागृहात पक्षाची अडचण झाल्याने पक्षाने त्यांची गंभीर दखल घेतली आहे. गटनेते अनिल मटाले यांनी त्यांना तंबी दिली आहे. मटाले यांनी निकुळे यांना समज दिली असून माफीनामा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images