Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

झळकेंच्या जादूने चिमुकले मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

आजवर आपल्या जादूच्या कार्यक्रमांनी अनेकांची मने रिझवणाऱ्या प्रभाकर झळके यांनी रविवारी येवला तालुक्यातील अनकुटे येथील शनिमंदिरात आयोजित कार्यक्रमात बच्चे कंपनीला वेगवेगळे जादू दाखवून मंत्रमुग्ध केले.

झळके यांनी विद्यार्थ्यांना जादूचे विविध प्रयोग दाखवून मनोरंजन केले. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनातील अंधश्रध्दाही दूर केली. श्रद्धा बाळगताना अंधश्रद्धेला दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. जादू ही एक हातचलाखी असणारी कला असून, विद्यार्थी सुध्दा ती शिकू शकतात, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा अनकुटे, मोठा मळा व आर्यनिकेतन येवला या शाळेतील विद्यार्थी तसेच माध्यमिक विद्यालय व शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी दीपक बोंबले व किशोर गायकवाड यांनी झळके यांचा यथोचित सत्कार केला. अनिल महाजन यांनी झळके यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण बोंदरे, रत्नाबाई सोनवणे, भानुदास देसले, सोनाली कळसकर, सविता कर्डिले यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकचा नगराध्यक्ष सोमवारी होणार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निर्धारित कार्यकाळ संपल्याने त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनघा फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने येथे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. २२) नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. त्याच दिवशी मंगळवारी दुपारी २ ते ४ या वेळेत नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. सायंकाळी ४ नंतर अवैध नामनिर्देशन पत्रांची यादी नगरपरिषद सभागृहात प्रसिध्द होईल. वैध नामनिर्देशन पत्राची यादी सोमवारी, दि. २८ डिसेंबर राजी प्रसिध्द करून लगेचच माघार घेतली जाणार आहे. दुपारी २ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून निकाल घोषित केला जाणार आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या आठ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तमंदिरात जयंती महोत्सवाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी नाशिक

गोदाकाठावरील एकमुखी दत्त मंदिरात जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला सुरुवात झाली असून, २४ डिसेंबर रोजी दत्त जन्माचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.

दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे व अखंड नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला १८ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून, २ जानेवारीपर्यंत कार्यक्रम होणार आहेत. या कालावधीत रोज दुपारी १ ते ४ या कालावधीत गुरुचरित्र पारायण, सायंकाळी ५ ते ७ दत्त भक्त भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी ७ ते ८.३० पर्यत ह.भ.प. सुनीलबुवा कुलकर्णी यांचे कीर्तन व प्रवचन होणार आहे. २२ तारखेला श्रीराम महीला मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होणार असून, २४ तारखेला सायंकाळी ६.१५ वा. दत्त जन्मसोहळा होणार आहे. २७ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजता रुद्राभिषेक व महापूजा आयोजित केली असून, सकाळी ९ ते १२ या वेळेत चतुर्वेद, शांतीपाठ प्रायश्चित विधी, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, पंचांग विधी, मंडप प्रवेश होणार आहे. याच दिवशी द्वितीय सत्रात श्री वास्तू मंडल स्थापना श्री योगिनी मंडल स्थापना, श्री क्षेत्रपाल मंडल स्थापना, श्री प्रधान मंडल, व सदगुरू मंडल स्थापना, देवताभिषेक सायंपूजन महाआरती व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. २८ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजता श्रींचा रुद्राभिषेक व महापूजा होणार असून, सकाळी ९ ते १२ या वेळेत चतुर्वेद शांतीपाठ स्थापित देवता पूजन व अभिषेक, अग्निस्थापन, नवग्रह हवन, प्रधान हवन होणार आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत प्रधान हवन व मंगलारती होणार आहे.

२९ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजता रुद्राभिषेक महापूजा सकाळी ९ ते १२ या वेळेत चतुर्वेद शांतीपाठ स्थापित देवता पूजन व अभिषेक, अग्नी स्थापन, स्थापित देवता उत्तरांग हवन, प्रधान हवन, देवता हवन, उत्तरांग हवन, महाबली पूजन, द्वितीय सत्रात महाबली पूजन यज्ञाची पूर्णाहुती होणार असून, १ जानेवारीला महाप्रसादाचे वाटप होणार आहे. २ जानेवारीला सत्यदेव महापूजा होणार आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे अवाहन मंदिराचे मुख्य पुजारी मयुर बर्वे यांनी केले आहे.

औदुंबर भक्त मंडळ व चिदानंद परिवार यांच्यावतीने देखील दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सामूहिक गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत साखलाज मॉल कालिकामंदिराजवळ होणार आहे. २२ ते २४ दरम्यान सकाळी ४ ते ८ याकालावधीत गुरुचरित्र पारायण होणार आहे. २४ तारखेला दुपारी ३ वाजता दत्तचरण पादुकांची मिरवणूक काढण्यात येणार असून, ६ वाजता देवता आवाहन, ६.३० वाजता दत्त जन्म, ७.३० वाजता महाआरती, सायं. ८.३० वा. अविराज तायडे यांचा अभंगवाणी हईल. २५ तारखेला दुपारी ३ ते ५ यावेळेत सत्यदत्त पूजा व सायंकाळी ८ ते १० यावेळेत अजित कडकडे यांचे गायन होईल. २६ तारखेला सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत दत्तयाग होणार आहे. सायंकाळी ८ ते १० पुष्कराज भागवत यांचा भक्तीसंगीत कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजाराच्या नोटेतून स्वच्छतेचा धडा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदाकाठ, सिटी सेंटर मॉल, कॉलेजरोड, महामार्ग बसस्थानक यासारख्या गर्दीच्या ठिकाणी शंभर किंवा हजार रुपयाची नोट सापडते. काही लोक त्या नोटा उचलतात, खिशात टाकतात आणि थोड्या वेळाने हिच खोटी नोट उचलणाऱ्यांना खरा धडा शिकवून जाते. तो धडा असतो 'स्वच्छ नाशिक, हरित नाशिक'चा.

रस्त्यावर पडलेली नवी कोरी नोट उचलण्यासाठी जितका वेळ आपण देतो तितकाच वेळ नाशिक स्वच्छ ठेवण्यासाठी आपण देऊ शकतो, असा संदेश 'युथ युनायटेड' या संस्थेतर्फे ध्वनीचित्रफितीतून देण्यात आला. 'स्वतःमध्येच बदल घडवा जो तुम्हाला जगामध्ये बघावासा वाटतो' हा महात्मा गांधी यांचा विचार यात उदधृत करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर आजपर्यंत ५० हजाराहून अधिक लोकांनी बघितला आहे. नाशिकमध्ये तीन लाख नव्वद हजार घरे असून नाशिक महापालिकेच्या १९२ घंटागाड्या आहेत. 'आपले नाशिक स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे' हा संदेश नाशिककरांपर्यंत पोहोचवण्यासाठी युथ युनायटेडमध्ये सहभागी असलेल्या युवकांनी पुढाकार घेतला असून त्यात ते यशस्वी ठरले आहेत. विवेकराज ठाकूर, पायल शाह, शिवम आहेर, राकेश सरवर, हिमानी पुरी, विपीन खानकरी या युवकांनी स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून कृतीशील पाऊल उचलले व त्यात ते यशस्वी ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ख्रिसमसनिमित्त सजली बाजारपेठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ख्रिस्ती बांधवांबरोबरच सर्व धर्मियांचा आवडता सण ख्रिसमस अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असल्याने तयारीला वेग आला आहे. या सणाचे आकर्षण असणाऱ्या सांता क्लॉजच्या लाल चुटूक टोप्या, हिरवेगार ख्रिसमस ट्री, चॉकलेटचे बॉक्स यांची गर्दी बाजारात दिसू लागली आहे.

जसजसा ख्रिसमस सण जवळ येऊ लागतो, तसतशी दुकाने, शॉपिंग मॉल्स सजू लागतात. शहरातील चर्चची रंगरंगोटी पूर्ण झाली असून, रोषणाईची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. या सणानिमित्त येशू ख्रिस्तांच्या जन्माचा देखावा साकारला जात असतो. त्यामुळे हा देखावा बनविण्यात अनेक कारागिर कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आकर्षक चॉकलेट्स, सांता क्लॉजचे टॉईज, ग्रिटींग कार्ड्स या वस्तू बाजारात दिसतात.

ख्रिसमसची सायंकाळ हॉटेलमध्ये जाऊन साजरा करण्यावर अनेकांचा भर असतो. त्यामुळे हॉटेल्सलाही ख्रिसमसचा स्पेशल लूक देण्यासाठी तयारी सुरू असून, काही हॉटेल्समध्ये ती पूर्णही झाली आहे. सोनेरी रंगाची घंट्या, कापूस, रेनडिअर्स आदी साहित्याचा वापर करून हॉटेल्स सजली आहेत.

लाँग विकेंड

ख्रिसमस शुक्रवारी येत असल्याने एकामागे एक याप्रमाणे सुट्यांचा आनंद म्हणजेच लाँग विकेंड अनुभवता येणार आहे. त्यामुळे पिकनिक प्लॅन्सच्या तयारीलाही जोर आला असल्याचे ट्रॅव्हल एजन्सीजकडून समजते.

शाळांमध्ये तयारी

लहान मुलांमध्ये ख्रिसमस या सणाचे विशेष आकर्षण असते. गिफ्ट घेऊन येणारा सांता हा प्रत्येक विद्यार्थ्याचाच आवडता असतो. यादिवशी शाळांना सुटी असल्याने अनेक शाळा आतापासूनच ख्रिसमस साजरा करण्यास प्राधान्य देत आहेत. सांताच्या कपड्यांमध्ये, लाल टोपीमध्ये विद्यार्थी 'जिंगलबेल, जिंगलबेल' गाणे सादर करताना दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदर्शनांमुळे मैदान धोक्यात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील खेळाडू-क्रीडाप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण असलेल्या इदगाह मैदान वारंवार होणाऱ्या प्रदर्शन, सर्कस आदी विविध कार्यक्रमांमुळे संकटात सापडले आहे. अशाच एका हातमाग वस्तू प्रदर्शनामुळे क्रिडाप्रेमी आणि प्रशासन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इदगाह मैदानावर खेळाडूंना प्रदर्शनातील वस्तुंसाठी आलेले ट्रक रिकामे होताना दिसले. खेळाडूंनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या घरी धाव घेतली.

आयुक्तांच्या घरी शंभर-दोनशे खेळाडूंची गर्दी झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आयुक्तांनी खेळाडूंच्या नाराजीची दखल घेत त्यांना कार्यालयात भेटावयास बोलाविले. सदर प्रदर्शनासाठी जुलै महिन्यात मंजुरी दिली होती. प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला नाही म्हणता येणार नाही, अशी माहिती त्यांनी खेळाडूंना दिली. मात्र, क्रिडाप्रेमींना दिलासा देत मैदानाच्या अर्ध्याच भागावर प्रदर्शन भरले आणि अर्धे मैदान खेळण्यासाठी राखीव असेल असे आश्वासन त्यांनी खेळाडूंना दिले.

यापूर्वी अनेकदा महापालिका अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासने खेळाडूंना दिली होती. तरी देखील पुन्हा नव्या प्रदर्शनाला अथवा कार्यक्रमाला मान्यता महापालिकेकडून दिली जात असल्याने क्रिडाप्रेमी नाराज होते. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने मैदान सर्कससाठी दिले होते. त्यावेळी नाराज खेळाडूंनी सर्कशीचे तंबू उखडले होते. तेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा शेवटचा कार्यक्रम राहील अशी तोंडी ग्वाही दिली होती. पण आता क्रीडाप्रेमींना लेखी आश्वासन हवे आहे.

खेळायला जायचे तरी कुठे?

गोल्फ क्लब मैदान आणि महात्मा नगरचे मैदान क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात असल्याने ही मैदाने सामान्यांसाठी खुली नाहीत. ही मैदाने त्यांच्या सभासदांना खेळण्यासाठी राखीव असल्याचे गाऱ्हाणे खेळाडूंनी मांडले. तसेच एका सामन्यासाठी तब्बल दहा ते पंधरा हजार फी आकारली जाते. मोफत खेळणे शक्य होईल, असे हे इदगाह मैदान एकमेव आहे. ते सुद्धा वारंवार प्रदर्शन भरविण्यासाठी व्यावसायिक तत्वावर महापालिकेकडून दिले जात असल्याने खेळायचे कुठे अशी व्यथा क्रीडा रसिकांनी मांडली.


मैदानांवर वस्तू प्रदर्शन भरविल्याने खेळायचे कुठे? प्रदर्शनांचा कालावधी मोठा असतो. तसेच ही प्रदर्शने मैदानांची वाईट अवस्था करतात. महापालिकेने मैदाने व्यावसायिक कामासाठी देऊ नये. मैदाने खेळण्यासाठी राखीव ठेवावीत.

- मनीष मोदी, खेळाडू व व्यावसायिक

हातमाग प्रदर्शनासाठी जुलैमध्ये मान्यता दिली होती. प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला ऐनवेळी नाही म्हणता येणार नाही. निम्म्या मैदानावर प्रदर्शन भरले आणि अर्धे मैदान खेळण्यासाठी राखीव असेल.

- डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक बाजार समितीचा महिनाभरात फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत देविदास पिंगळे यांच्या सभापतीपदाच्या कारकिर्दीदरम्यान झालेल्या तब्बल ६४ कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीला सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी ग्रीन सिग्नल दिला. या घोटाळ्यासंदर्भातील चौकशीवरील स्थगिती उठवितानाच, ३० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत.

पिंगळे यांच्या सभापतीपदाच्या कारकिर्दीत ६३ कोटी ५४ लाख रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका सहकार विभागाने ठेवला होता. यानंतर सहकार विभागाने चौकशीचे आदेश काढल्यानंतर शासनाने या चौकशीला स्थगिती दिली होती. यानंतरही बाजार समितीमधील अनागोंदी कारभाराबाबत शेतकरी व व्यापारी वर्गानेही मोठ्या प्रमाणावर ‌तक्रारी केल्या होत्या.

नाशिक व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी व धान्य वितरक संघाचे पदाधिकारी यांच्यासमवेत नागपूर येथे चंद्रकांत पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सोमवारी विविध समस्या मांडण्यात आल्या. या तक्रारी ऐकल्यानंतर पाटील यांनी स्थगितीवरील चौकशी उठवली. या बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांसह आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बूब, विशेष लेखा परीक्षक चांगदेव पिंगळे, जिल्हा उपनिबंधक बनसोडे, भन्साळी, मनोज वडेरा, मनोज लोढा आदी उपस्थित होते.

काय आहे प्रकरण?

बाजार समितीवर राज्य सहकारी बँकेचे सुमारे १२१ कोटींचे कर्ज होते. दीड दशक या कर्जावर समितीचा कारभार मनमानी पध्दतीने चालविल्यानंतर समितीने कशीबशी ४४ कोटींची कर्जमाफी मिळविली. यानंतरही ७६ कोटी रूपयांची परतफेड करताना समितीच्या नाकी नऊ आले होते. ७ कोटींची परतफेड खात्यात रक्कम असूनही करण्यात आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५० बांधकामांची मंजुरी रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागील महिन्यापासून तब्बल ३५० बांधकाम मंजुरीचे प्रस्ताव महापालिकेकडे पडून आहेत. पाथर्डी शिवारातील कचरा डेपातील कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावली जात नाही, तोपर्यंत कोणत्याही बांधकामांना मंजुरी देऊ नका, असा सक्त आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने दिल्याने मंजुरीची कामे रखडली आहेत. कपाट क्षेत्राच्या वादामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखल मिळत नसलेले बांधकाम व्यावसायिक आता बांधकामांना मंजुरी मिळत नसल्याने मेटाकुटीला आले आहे.

पाथर्डी फाटा येथील कचरा प्रकल्पामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत असल्याची तक्रार बाकेराव डेमसे यांनी करीत हायकोर्टात धाव घेतली. खत प्रकल्प सुरळीत नसल्याने कचरा डेपोचा प्रश्न ​मोठा झाल्याचे महापालिकेनेच मान्य केल्यानंतर संबंधित खतप्रकल्प सुरळीत ठेवण्यासाठी हायकोर्टाने काही सूचना केल्या. या सुचनांचे पालन महापालिकेने करणे अपेक्षित होते. मात्र, दिलेल्या कालावधीत त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. महापालिका सुस्त राहिल्याने डेमसे यांनी लवादाकडे धाव घेतली. यावर सुनावणी घेताना लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक महामंडळाचे मत विचारत घेतले. संबंधित खत प्रकल्पाचे नियोजन योग्य नसल्याने कचऱ्याची समस्या कायम असल्याने महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लवादासमोर स्पष्ट केले. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे प्रदुषणात भर पडत असून जनतेला त्रासाला सामोरे जावे लागते आहे. यामुळे कचरा प्रकल्पातील दोन तृतांश कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावावी आणि सहा महिने खत प्रकल्प सुरळीत चालू ठेवावा, असे आदेश न्यायमूर्ती व्ही. आर. किंगगावकर व तज्ज्ञ सदस्य डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने दिले.

प्रशासनामध्ये खलबत

लवादाच्या आदेशाचे पालन होईपर्यंत महापालिकेने कोणत्याही बांधकामास मंजुरी देण्यास प्रतिबंध घालण्यात आला. खत प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी महापालिकेने तात्पुरते कर्मचारी घ्यावेत किंवा ठेकेदाराची नियुक्ती करावी अशा सुचनांही करण्यात आल्या आहेत. या निर्णयाविरोधात हायकोर्टात जायचे की खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करायचा यावर प्रशासनामध्ये खलबत झाली. खतप्रकल्प सुरळीत चालवण्यासाठी खासगी ठेकेदार नेमण्याची मुभा महापालिकेला असून त्यादृष्टीने प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.

प्रस्ताव थंड बस्त्यात

लवादाच्या निर्णयामुळे महापालिकेने नव्या बांधकामांना मंजुरी देण्याचे प्रस्ताव थंड बस्त्यात गुंडाळले आहेत. आजवर ३५० प्रस्ताव मंजुरीविना पडून असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे कपाट क्षेत्राच्या वादामुळे अडकून पडलेले पूर्णत्वाचे दाखले तर तर दुसरीकडे बांधकामास मंजुरी देण्याची प्रक्रिया ठप्प झाल्याने बांधकाम व्यावसायिक हतबल झाल्याचे मत व्यक्त केले जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘दैनंदिन काम करतानाच खेळाकडे वळायला हवे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवनात दैनंदिन काम करतानाच खेळाकडे वळायला हवे. तणावमुक्तीसाठी आणि मनाची एकाग्रता साधण्यासाठी संगीत महत्त्वाचे आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने संख्यात्मक नाही तर विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास साधण्यावर भर दिला, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी केले.

डॉ. अरुण जामकर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल संपल्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते डॉ. जामकर यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वित्त अधिकारी पंडित गवळी उपस्थित होते.

मुक्त विद्यापीठाकडे अत्यंत कमी मनुष्यबळ असताना देखील राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचे यशस्वी आयोजन केले. विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे संचालक, सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या मेहनतीमुळेच सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडता आल्याची भावना डॉ. जामकर यांनी व्यक्त केली. मुक्त विद्यापीठ समाजातील तळागाळातील माणसासाठी काम करीत असल्याने आपल्याला नेहमीच हेवा वाटल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच आरोग्य विद्यापीठापेक्षा मुक्त विद्यापीठाबद्दल मला कायम आदर वाटतो असे ते म्हणाले.

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी डॉ. जामकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. मनोज किल्लेदार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांची कुचेष्टा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला असल्याने रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. रेल्वेने १८२ क्रमांकाची सेवाही सुरू केलेली आहे. आता ८१२१२८१२१२ हा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर फिरत आहे. या नंबरची सुविधा खोटी आहे की, खरी आहे याबाबत रेल्वेच्या सूत्रांकडून दुजोरा मिळालेला नाही. या क्रमांकावर सातत्याने संपर्क साधला असता रिंग जाते मात्र प्रतिसाद मिळत नाही. हा प्रकार म्हणजे प्रवाशांची चेष्टाच आहे.

या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास प्रवाशांना विविध उपाययोजना मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. रेल्वेबोगीत आणीबाणीवेळी सुरक्षा हवी असल्यास किंवा प्रवासात कोणी आजारी पडल्यास त्याने या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याला त्वरित मदत मिळेल. एव्हढेच नव्हे तर बोगीत तांत्रिक खराबी आली किंवा पिण्याचे पाणी हवे असेल तरीही संपर्क साधावा. सर्व समस्यांचे समाधान आगामी स्थानकात होईल, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. हा मेसेज फॉरवर्ड करण्याचे आवाहनही मेसेजमध्ये केले आहे. रेल्वेस्टेशनमास्तरपासून सुरक्षा व्यवसायाच्या अधिकाऱ्यापर्यंत अनेकांशी संपर्क साधून वरील मोबाईल सेवेबाबत विचारणा केली. तथापि, अशी सेवा सुरू झाल्याचा किंवा हेड ऑफिसकडून तसे पत्र आल्याचा दुजोरा कोणीही देऊ शकले नाही.

१८२ क्रमांकाची सेवा
रेल्वे सुरक्षा अधिकारी, रेल्वे स्थानक प्रमुख यांच्या उपस्थितीत तीन महिन्यांपूर्वी १८२ क्रमांकाची दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली होती. या क्रमांकावर प्रवाशांनी संपर्क साधल्यास सुरक्षेपासून विविध सुविधा उपलब्ध होतील, अशी ग्वाही देण्यात आली होती. सुरवातीला या क्रमांकावर प्रवाशांनी संपर्क साधून पाहिला तेव्हा तो बंद होता. मात्र, आता ही सेवा सुरु आहे. भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाचे कंट्रोलरुम त्वरित प्रतिसाद देते. मात्र, त्यांना वरील मोबाईल क्रमांकाची सेवा सुरू झाली का, असे विचारले असता कल्पना नसल्याचे सांगण्यात आले. नवा मोबाईल क्रमांक जो व्हॉटसअॅपवर व्हायरल झाला आहे. त्याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती सध्या तरी आमच्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे १८२ या क्रमांकावरच प्रवाशांना संपर्क साधावा.

- बी. डी. इप्पर,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक,आरपीएफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेजवळ कचऱ्याचे ढीग

$
0
0

गोसावीवाडी ही गरिबांची वस्ती आहे. हातावर पोट असलेल्यांचे प्रमाण येथे जास्त आहे. येथे स्वच्छतेची गरज जास्त असताना कचरा साचत आहे. नागरिकही बऱ्याच प्रमाणात याला जबाबदार आहेत. हॉटेलचालक व अन्य व्यावसायिकही शाळेजवळच कचरा टाकत आहेत.

घंटागाडीही टाकते कचरा शाळेजवळील भिंतीजवळ कचरा, प्लॅस्टिक, खरकटे, खराब फळे टाकले जातात. ते सडून दुर्गंधी सुटते. शेळ्या व अन्य जनावरे ते खाण्यासाठी येतात. कचरा टाकण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून काही जागरुक नागरिकांनी दगडाला शेंदूर फासून देवाचे मंदिर केले. परंतु, त्यालाही जुमानले नाही. कचरा टाकणे वाढतच आहे. घंटागाडीही कधीकधी येथे कचरा टाकते असे नागरिकांचे म्हणणे आहे. घुशी, उंदरांची संख्या वाढली आहे.

गल्लीतच शौचालय शाळेशेजारून गल्ली जाते. त्यामध्ये लहान मुले दिवसा व रात्री शौचाला बसतात. त्यामुळे त्याची दुर्गंधी पसरून विद्यार्थी आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साथीच्या आजाराचा धोका निर्माण झाला आहे. शाळेला भिंत नव्हती तेव्हा काही नागरिक शाळेतच शौचास जात असत. शाळेने पोलिसांकडे तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही. शाळेसमोर व अन्य ठिकाणी ढापे उघडे पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुद्देमाल ठरतोय डोकेदुखी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुरावा म्हणून जमा करण्यात येणाऱ्या मुद्देमालाचा भार पोलिसांवर पडतो आहे. नव्याने दाखल होणाऱ्या केससची संख्या पाहता मुद्देमालाचे ओझे सध्यातरी डोक्यावरून खांद्यावर येण्याची शक्यता कमीच दिसते.

वाहनांपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत सर्वच मुद्देमालाचे जतन करणे पोलिसांना अवघड बनले आहे. डोकेदुखी ठरलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी शहर पोलिसांनी २०१३ पासून सुरूवात केली. मात्र, कोर्ट ऑर्डर शोधण्यापासून पोलिसांना कसरत करावी लागली. त्यामुळे त्यास गती मिळू शकली नाही. कोर्टाकडून आवश्यक ती कागदपत्रे मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली आहे. याबाबत सहायक पोलिस आयुक्त राजु भुजबळ यांनी सांगितले, की इतर पोलिस स्टेशनप्रमाणे भद्रकाली, सरकारवाडा तसेच गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये मुद्देमाल जमा असून मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेतल्यापासून २० टक्के काम हातावेगळे करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत अशा साहित्याचे प्रमाण प्रंचड वाढल्याने पोलिस अधिकारी चक्रावून गेले आहेत. खरेतर पोलिस स्टेशनपातळीवर कोर्ट पेंडीग केसेस रजिस्टर असते. त्या रजिस्टरवर कोर्टातील पेंडिंग केसेसबद्दल माहिती नोंदवून ठेवण्याचे काम केले जाते. कोर्टाचा निकाल लागला की संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने त्यात नोंद करून कोर्टाच्या निकाल प्रमाणे मुद्देमाल परत करणे किंवा नष्ट करणे अपेक्षित आहे. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूलभूत सुविधांसाठी संघर्ष

$
0
0

शहरात सर्वत्र प्रशासनाच्या वतीने स्मार्ट सिटीसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी नाशिक सर्वच बाबतीत कसे उत्तम आहे याचे दाखलेही देण्यात येत आहेत. परंतु, याच शहरातील म्हसरुळ भागात समाविष्ट असलेल्या केतकी नगरला मूलभूत समस्यांनी ग्रासले आहे. या भाग चार वर्षापासून विकसित झाला असून त्यात विविध इमारती व रो हाऊसेस आहेत. या सर्व घरांना घरपट्टी व पाणीपट्टी नियमितपणे दिली जाते व परिसरातील नागरिक ती प्रामाणिकपणे भरतात देखील. मात्र, असे असताना महापालिका आपले कर्तव्य या परिसरात बजावत नसल्याचे दिसते. या भागामध्ये आजवर पक्के रस्ते तयार करण्यात आलेले नाहीत. तसेच पथदीप लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत चोरट्यांचाही सुळसुळाट वाढला आहे. परिसरातील मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढलेले आहे. हे गवत कापण्याची दक्षता घेतली जात नसल्याने सापांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांना नेहमीच भीतीच्या छायेत रहावे लागते. त्यात केरकचऱ्याचीही भर पडत आहे. हा केरकचरा कुजत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढलेली आहे. परिसरातील समस्यांविषयी गाऱ्हाणे मांडण्यासाठी नागरिकांनी आमदार बाळासाहेब सानप, परिसरातील नगरसेविका रंजना भानसी, शालिनी पवार यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर भरत भोये, पंढरीनाथ भांगरे, भास्कर महाले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगभरातील संहितांमध्ये ‘दो बजनिए’ प्रथम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई थिएटर गाईड आणि अस्तित्व या संस्थेतर्फे जगभरातील भारतीय लेखकांसाठी आयोजित ई नाट्य संहिता स्पर्धेत ९१ संहितामधून निवडलेल्या २५ भाषांतील दर्जेदार संहितेत महाविजेते निवडण्यात आले आहेत. त्यात मराठी विभागात नाशिकच्या प्राजक्त देशमुखची 'दो बजनिए' या संहितेची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली आहे. जगभरातून सहभाग असलेल्या या स्पर्धेत नाशिकच्या लेखकाची संहिता प्रथम येणे ही शहरासाठी निश्चित अभिमानाची बाब आहे.

नाट्यक्षेत्राला वाहून घेतलेल्या मुंबई थिएटर गाईड आणि अस्तित्व या संस्था रंगभूमीसाठी नेहमी विविध उपक्रम घेऊन येत असतात. जगभरातील भारतीय लेखकांसाठी 'ई नाट्य संहिता' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नव्या सामाजिक, राजकीय विषयाच्या नावीन्यपूर्ण मांडणी असलेल्या संहितांची आणि सकस लेखकांचा शोध घेणाऱ्या या स्पर्धेसाठी यंदा जगभरातून ९१ संहिता आल्या. या संहिता मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्लिश भाषेत होत्या. त्यातून अंतिम २५ दर्जेदार संहिता निवडण्यात आल्या. या २५ मधून प्रत्येक भाषेतील एक असे महाविजेते निवडण्यात आले. यात यंदा मराठी विभागात ' दो बजनिए' या प्राजक्त देशमुख लिखीत संहितेची निवड करण्यात आली.

'दो बजनिए' हे नाटक बँडवाल्या दोन घनिष्ठ मित्रांबद्दल आहे. लग्नाची इच्छा असून, लग्नाचं वय सरलेल्या दोन बँडवाल्याना रोज त्याच वातावरणाला कसे सामोरे जावे लागते याबद्दल हे नाटक भाष्य करते. त्याला भारत-पाकिस्तान फाळणी, लाहोर-दिल्ली, सूड-वैर भावना, असे अनेक पदर उलगडले गेले आहे. हरिवंशराय बच्चन यांच्या 'दो बजनिए' या कवितेवरून प्रेरणा घेऊन लिहिलेले हे नाटक, त्याची पार्श्वभूमी आणि सकस संवादामुळे एक स्वतंत्र कलाकृती म्हणून उभी राहून स्वतंत्र प्रभावी भाष्य करते.

प्राजक्तच्या एकांकिकांचा महोत्सव

प्राजक्तच्या बहुचर्चित 'रेनमेकर' एकांकिकेने अनेक राज्यस्तरीय बहुमान मिळवून नाशिकचे नाव उंचावले आहे. चंद्रपूर येथील मनोवेध ही संस्था प्राजक्तच्या 'रेनमेकर' आणि 'मून विदाऊट स्काय' या दोन एकांकिकांचा नाट्य महोत्सव जानेवारीमध्ये करणार आहे. नुकत्याच झालेल्या पुणे येथील संगीत एकांकिका स्पर्धेत त्यांची 'संगीत अफू' ही एकांकिका वेगळ्या विषय आणि मांडणीमुळे स्पर्धेत प्रचंड चर्चेत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन गुन्हेगारांची वाढती संख्या

$
0
0

२० सज्ञानांमागे एक अल्पवयीन गुन्हेगार

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराला सोडून देण्याचा निर्णय न्यायव्यवस्थेने घेताच सर्वत्र संतापाची लाट उसळली. अल्पवयीन गुन्हेगारांचे वय, त्यांच्याकडून होणारे गुन्हे यावर पुन्हा चर्चा झडल्यात. नाशिक शहरात सुध्दा अल्पवयीन गुन्हेगारांची समस्या गंभीर असून घरफोडी, वाहनचोरी आणि चेन स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यात सरासरी २० सज्ञान आरोपींमागे एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे दिसून येते.

अल्पवयीन गुन्हेगारांकडून होणारे कृत्य आणि त्यानंतर त्याला मिळणारी अल्पशी शिक्षा हा मुद्दा निर्भया प्रकरणानंतर चर्चेत आला. मात्र, अल्पवयीन मुलांबाबत असलेल्या कायद्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. शहरीकरणांसोबत अल्पवयीन गुन्हेगारांची वाढती संख्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असून, झटपट पैसे मिळवून देणाऱ्या गुन्ह्यांकडे कोवळी मुले आकर्षित होत आहेत. आजमितीस घरफोडीसारख्या गुन्ह्यात एकूण ५८६ सराईत गुन्हेगार सहभागी असल्याची नोंद शहर पोलिसांकडे आहे. मोटार वाहनचोरीमध्ये ६१४ तर चेन स्नॅचिंगमध्ये २४१ गुन्हेगारांना अटक झाली आहे. या तीन गुन्ह्यात एकूण एक हजार ४४१ गुन्हेगार असून, त्यात ११ ते १७ या वयोगटातील ७६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. साधारणतः २० सज्ञान आरोपींमागे एका अल्पवयीन मुलास अटक झाल्याचे यातून निष्पन्न होते. हत्या, हाणामारी, मोबाइल चोरी, पाकीटमारी, वाहनांचे पार्ट काढून घेणे, उघड्या खिडकीतून मुद्देमाल लंपास करणे आदी गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक असल्याचे मत पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी व्यक्त केले. अल्पवयीन मुलांना गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे तसेच वारंवार छोट्या-मोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभाग घेत असलेल्या अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. हे कर्मचारी संबंधित मुलांच्या संपर्कात असतात. याबरोबर, वेगवेगवळ्या झोपडपट्टीतील शाळाबाह्य मुलांशी संवाद साधला जातो. त्यांना शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करताना गुन्हेगारी व कायद्यांचे मार्गदर्शन दिले जाते. पोलिस स्टेशनपातळीवर हा उपक्रम सुरू असून, त्याचा चांगला परिणाम होत असल्याचे पोलिस आयुक्त जगन्नाथन यांनी स्पष्ट केले.



अल्पवयीन गुन्हेगारांकडून गुन्हा घडणे, यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. विशेष म्हणजे सुशिक्षीत समजल्या जाणाऱ्या घरातील मुलेही गंभीर गुन्ह्यांमध्ये सापडली आहेत. अल्पवयीन गुन्हेगारीची समस्या सोडवण्यासाठी सामाजिक पातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

- एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकची सलोनी `बाजीराव मस्तानी`ची आर्ट डिरेक्टर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
बाजीराव मस्तानीचे भव्य सेट्स पाहताना ही भव्यता मनात भरते ना! हे सर्व सेट्स नाशिकच्या मुलीने तयार केले आहेत, असे सांगितले तर विश्वास बसेल? नाशिकमध्ये लहानाची मोठी झालेल्या सलोनी अंकुश धात्रक या तरुणीने बाजीराव मस्तानीचे सर्व सेट्स तयार केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेल्या ऐतिहासिक चित्रपटाच्या सेटची मोठी जबाबदारी तिने यशस्वीपणे सांभाळून दाखवलीय. उद्योग, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रांसोबतच चित्रपटसृष्टीतही आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नाशिकमध्ये वाढलेल्या सलोनीने आर. वाय. के. महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईत बॅचलर इन आर्किटेक्चर केले. सुरुवातीपासूनच या क्षेत्राची आवड असली तरीही, पारंपरिक वास्तूशास्त्राऐवजी व्यापक स्तरावर या क्षेत्रात काम करण्याची तिची मनस्वी इच्छा होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमएमआरडीएमध्ये ज्युनिअर टाउन प्लॅनर म्हणून काही महिने तिने नोकरीही केली. पैसा चांगला असला तरीही, कामातून आनंद मिळत नव्हता. मनाची ओढ स्वतःच्या एका निर्मितीविश्वाकडे होती. म्हणूनच प्रसिद्ध दिग्दर्शक समीर चंदा यांच्याकडे काही काळ तिने काम केले.

दशकभरापासून या क्षेत्रात सलोनी एकाहून एक दर्जेदार चित्रपटांसाठी काम करतेय. प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासोबत २००५ ते २००७ या वर्षांमध्ये काम करणाऱ्या सलोनीने जोधा अकबर, यारीया, ट्रॅफिक सिग्नल, सनम रे, उला गड्डी यांसारख्या कलात्मक, ऐतिहासिक आणि बिगबजेट चित्रपटांसह काही लघुपटांसाठीही काम केले आहे. दीड वर्षापासून ती प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करत आहे.

नाशिकमधून मुंबई आणि त्यानंतर एमएमआरडीएसारखी सरकारी नोकरी सोडून बॉलिवूडसारखं थेट आव्हानात्मक क्षेत्र निवडताना सलोनीच्या पाठीशी तिचे कुटुंब होते आणि तिची जिद्दही होती. याच बळावर तिने गेल्या दशकभरात बिग बॅनर चित्रपट, काही लघुपटही यशस्वीपणे केले. कौटुंबिक पाठबळावर तिने ही यशाची वाट शोधली. सर्वसामान्यांच्या मनात बॉलिवूडविषयी अनेक गैरसमज आहेत. परिस्थिती तशी नाही. सेट डिझायनिंग क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध असून, नाशिककर तरुण, तरुणींनी यासाठी पुढे यावे, असे आवाहनही सलोनीने केले.

रणवीरसह-दीपिका कडूनही कौतुक
बाजीराव मस्तानीचं शूटिंग सुरू असताना, रणबीर, दीपिकासह प्रियंका चोप्रानेही कामाचे खूप कौतुक केले. रणबीर तर त्याच्या मल्हारी गाण्यासाठी अप्रतिम सेट बांधावा यासाठी आग्रही होता, असेही सलोनी सांगते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायलॉन मांजा बंदीचे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात नायलॉन मांजामुळे निसर्गसाखळी असंतुलित होत असून, पर्यावरणातील महत्त्वाचा घटक समजल्या जाणाऱ्या पक्ष्यांवर संक्रांत आली आहे. मांजावर टाकलेली बंदी स्वागतार्ह असल्याने नेचर क्लबतर्फे या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

मांजा लवकर कुजत नसल्याने तो वर्षभर झाडांवर लटकत राहतो व त्यात पक्षी अडकून मृत्युमुखी पडतात. आतापर्यंत मांजाने हजारो पक्ष्यांचा बळी घेतला आहे. तसेच, अनेक नागरिकही जखमी झाले असून, अनेकांना कायमचे अपंगत्व देखील आले आहे. नेचर क्लबने गेल्या पाच वर्षांपासून नायलॉन मांजा जप्त करावा, यासाठी निवेदने दिलेली आहेत. विविध पक्षी संमेलनामध्ये देखील ही मागणी करण्यात आली. गेल्या दोन वर्षात नेचर क्लबने तब्बल दीड हजार पक्षी नायलॉन मांजापासून वाचविले. यामध्ये देशी विदेशी पक्ष्यांचा समावेश असून गिधाड, घुबड, धनेश, मोर, गरुड, घार, शराटी आदी पक्ष्यांचा यात समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, पक्षीमित्र चंद्रकांत दुसाने, भीमराव राजोळे, प्रमिला पाटील आदींनी या बंदीचे स्वागत केले.

पोलिस प्रशासनाने वीस जानेवारीपर्यंत नायालॉन मांजावर बंदी घातली आहे. नायलॉन मांजा वापरणा-यांना दंड तसेच कैदेचही शिक्षा करण्याची तरतूद आहे. वि‌क्रेत्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फॅन्सी नंबर प्लेट व रस्त्याला अडथळा होईल, अशा पध्दतीने वाहने पार्क केलेल्या वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कारवाईला धार देण्यात आली असून फॅन्सी नंबर प्लेट, सिग्नल जम्पिंग, ट्रिपल सिट तसेच नो पार्किंग नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

सिटी सेंटर मॉलसमोर पार्क होणारी अस्ताव्यस्त वाहने आणि तेथीलच सिग्नलवर वाहनचालकांकडून होणारे नियमांचे सर्रास उल्लंघन याबाबत पोलिसांकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. वाहनांना जॅमर लावण्यासह दंडात्मक कारवाई करण्यात आली. फॅन्सी नंबर प्लेट, सिग्नल ​जम्पिंग, ट्रिपल सिट याबाबत दररोज कारवाई सुरूच असते. आज त्यात काही वाढ करण्यात आली. तसेच, वाहतूक नियमांबाबत रिक्षाचालकांसह इतर वाहनचालकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक एम. एम. बागवान यांनी सांगितले. सकाळपासून सुरू झालेली कारवाई संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे नेमकी किती वाहनांवर कारवाई झाली हे समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘थर्टी फर्स्ट’ला ‌थंड प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

थर्डी फर्स्ट अवघ्या १० दिवसांवर येऊनही आतापर्यंत केवळ सुला विनियार्ड आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजना रिसॉर्टनेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कार्यक्रमासाठीची रितसर परवानगी घेतली आहे. थर्टी फर्स्टला अशा कार्यक्रमांदरम्यान घडणारे अनूचित प्रकार अन् त्यामुळे आयोजकांना सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे असे कार्यक्रम आयोजनाबाबत उदासीनता दिसून येत आहे.

थर्टी फर्स्ट साजरा करणारा शहरात मोठा वर्ग आहे. किंबहूना दरवर्षी त्यामध्ये वाढच होत आहे. आयुष्यातून निसटणारे हे क्षण अलगद हृदयाच्या कुपीत जपून ठेवता यावेत यासाठी कुटुंबीय, मित्रमंडळींसमवेत साजरे करण्यास पसंती दिली जाते. नववर्षाच्या स्वागताला धम्माल करता यावी, यासाठी घरी सेलिब्रेशन करण्याऐवजी शहरात किंवा शहराबाहेरील हॉटेल्समध्ये जाऊन एन्जॉय करणारा वर्ग वाढत आहे. अशा नागरिकांना थर्डी फर्स्ट सेलिब्रेशनचे विविध पर्याय उपलब्ध असतात. शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील हॉटेल्सच्या वतीने त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आर्केस्ट्रा, फास्टफूड, डिनरची व्यवस्था केली जात असल्याने लोकही त्याचा आनंद लुटण्यास पसंती देतात. या कार्यक्रमांचे आयोजन करताना संबंधित हॉटेलमालकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखेत करमणूक कर जमा करावा लागतो. या कार्यक्रमात प्रवेशासाठी प्रतिव्यक्ती किती शुल्क आकारणार, कपल पासेससाठी किती शुल्क घेतले जाणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किती लोकांना तेथे प्रवेश दिला जाणार याची माहिती सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन शहरात केले जाणार असेल तर २० टक्के आणि ग्रामीण भागात असेल तर १५ टक्के कर वसूल केले जाणार आहे. त्यासाठी अर्ज भरतानाच संबंधितांकडून धनादेश घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यंदा मात्र आतापर्यंत सुला विनियार्डस आणि अंजना ‌रिसॉर्टस यांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी रिसॉर्ट, खंबाळे येथील ग्रेप काऊंटी आणि गंगावऱ्हे येथील सिओना रिसॉर्टसने परवानगीसाठी अर्ज केला आहे. त्र्यंबकरोडवरील संस्कृती हॉटेल, इगतपुरी तालुक्यातील मानस रिसॉर्टसने मात्र अशा कार्यक्रमांचे आयोजन करणार नसल्याचे कळविले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी नितीन मुंडेवार यांनी दिली.

गतवर्षी जिल्ह्यात १३ हॉटेल्सने अशा स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावर्षी आतापर्यंत केवळ दोन हॉटेल्सने परवानगी घेतली आहे. ख्रिसमसमुळे २४ ते २७ डिसेंबर या कालावधीत सलग चार दिवस सरकारी कार्यालयांना सुटी आहे. ३१ डिसेंबरला दुपारपर्यंत परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धर्मादाय’ची आरोग्य योजना कुचकामी

$
0
0

तांत्रिक त्रुटींमुळे खीळ; रिकाम्या खाटांच्या लाभापासून गरजू वंचित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धर्मादाय आयुक्तालयातर्फे आर्थिक दुर्बल घटकांसाठी गरीब रुग्ण निधी योजना राबविली जाते. मात्र, हॉस्पिटल्समधील उपलब्ध रिकाम्या खाटांचा रोजचा तपशील समजणे शक्य होत नसल्याने गरजू त्यापासून वंचित आहेत. रिकाम्या खाटांचा तपशील ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा 'धर्मादाय'चा प्रयत्न असला तरी तांत्रिक त्रुटींमुळे त्याला खीळ बसली आहे. विशेष म्हणजे अधिकारीच या माहितीपासून अनभिज्ञ असून जनसामान्यांना योजनेचा लाभ मिळणार कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

धर्मादाय आयुक्तालयाच्या गरीब रुग्ण निधी योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत किंवा अत्यंत माफक दरात उपचार सुविधा पुरविली जाते. ५० हजारांपेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या गरजूंना मोफत तर ५० हजार ते १ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या गरजू रुग्णांना 'ना नफा ना तोटा' या तत्वावर संबंधित हॉस्पिटल्समध्ये उपचार दिले जातात. नाशिक जिल्ह्यात धर्मादायच्या या योजनेंतर्गत गरजू रुग्णांना २१ हॉस्पिटल्समध्ये उपचार घेता येतात. या हॉस्टिल्समध्ये १० टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी तर आणखी १० टक्के खाटा माफक दरांत उपचार घेऊ इच्छणाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित हॉस्पिटल्समधील एकूण २१६० पैकी ४३२ खाटा अशा रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती कार्यालयातील सूत्रांनी दिली.

संबंधित हॉस्पिटल्सची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या विभागाकडून प्रयत्न होत असले तरी या प्रयत्नांना अद्याप म्हणावे तसे यश येऊ शकलेले नाही. अनेक गरजू रुग्णांपर्यंत माहितीच पोहोचत नसल्याने ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हॉस्पिटलमध्ये रोजच्या रोज किती खाटा रिकाम्या आहेत याचा तपशील समजू शकेल, अशी कोणतीही यंत्रणा या विभागाकडे कार्यान्वित नाही. त्यामुळे प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाण्याशिवाय रुग्णांनाही ही माहिती मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. विभागाच्या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध व्हावी यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, तांत्रिक त्रुटींमूळे ती आजमितीस उपलब्ध होत नाही. ही माहिती वेबसाइटवर दिसण्यास अजून एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल, अशी माहिती मुंबई कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हॉस्पिटल...........निर्धनांसाठी खाटा.......दुर्बलांसाठी खाटा

आरोग्यशाळा..............१४..............१४

सुजाता बिर्ला..............६..............६

श्री सप्तश्रुंगी आयुर्वेद......१३..............१२

तुलसी आय..............१४..............१४

मामको, मालेगाव.......२.................२

एसएमबीटी इगतपुरी......३०..............३०

श्री मेडीकल रिसर्च.......१..............१

महाराष्ट्र ट्यूबरक्युलॉसिस.......३..............३

मॅग्नम हार्ट..............५..............५

श्री गुरूजी..............५..............५

सामसुखा कॅन्सर.......३..............३

रामकृष्ण मेडिकल सेंटर.......३.......३

रोटरी आय..............२..............२

जी. एम. मोतीवाला.......३.......३

वसंत पवार मेडिकल कॉलेज.......१००..............१००

चोरडिया हॉस्पिटल, चांदवड.......३..............३



पावणे चार हजार रुग्णांना लाभ

गरीब रुग्ण निधी योजनेंतर्गत जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ३ हजार ७८० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ३ हजार ५४४ निर्धन रुग्णांनी तर दुर्बल घटकातील २३६ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये २६०० रुग्णांनी एकट्या तुलसी आय हॉस्पिलमध्ये उपचार घेतले आहेत. श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्यात २८८, श्री गुरूजी रुग्णालयात १३२ जणांनी उपचार घेतले आहेत. डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णालय व संशोधन केंद्रात २०० खाटा राखीव असून तेथे या सहा महिन्यांत केवळ ११२ रुग्णांनी योजनेंतर्गत उपचार सुविधेचा लाभ घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images