Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रूप सौंदर्य !

$
0
0

प्रा. संध्या केळकर

चित्रातील भावपूर्ण रेषा जेंव्हा आकार म्हणजेच रूप धारण करतात तेंव्हा त्यात एक आशय निर्माण होतो. निर्गुण निराकार असलेल्या संकल्पनेला व भावनेला या आकाराच्या आधाराने वाट करून देऊन सगुण साकार केलेले असते. आशयाला अनुरूप आकार व माध्यम यांच्या आधारे चित्राच्या आकृतीबंधाची रचना होत असते. त्यातील आकाराचे एकमेकांशी असलेले नाते फार महत्वाचे असते.

आकारांची चित्रातील रचना किंवा शिल्पातील घनाकाराची मांडणी जर डोळ्यांना रुचणारी असेल तरच त्यात आस्था निर्माण होते. चित्र बघत असताना आपले लक्ष काही ठराविक आकारांकडे वेधले जाते. आणि नंतर त्या आकारांसोबत आलेले इतर आकार आपल्याला दिसतात. त्यात कलाकाराने आकारांची मांडणी एका विशिष्ठ विषयानुसार केलेली असते. त्यासाठी एखादा आकार मोठा दाखवून किंवा पोत (Texture) निर्माण करून हे साध्य केलेले असते. या साठी आपण अजिंठ्याचे यशोधरा,राहूल आणि गौतम बुद्ध या चित्राचे उदाहरण घेऊ. ह्या चित्रात अश्या प्रकारचे आकृतिबंध तयार केले आहेत. गौतमबुद्धाची प्रतिमा यशोधरा व राहुल यांच्या प्रतिमेपेक्षा खूपच मोठी दाखविली आहे. त्यात बुद्धाची अध्यात्मिक उंची दाखविण्यासाठी बुद्धाचा आकार खूप मोठा दाखविला आहे.

कोणताही आकार आपल्याला नुसत्या डोळ्यांनी त्रिमिती रुपात किंवा घनाकारात (लांबी, रुंदी, उंची) दिसतो. पण त्याच आकाराला कागदावर किंवा कॅन्व्हासवर उतरविताना चित्रकाराला त्या घनतेचा (Volume) म्हणजेच खोलीचा (Depth) आभास निर्माण करावा लागतो. तेंव्हा मूळ आकाराचे व्दिमितीय रूप तयार होते. चित्रात हे त्रिमिती रूपाचे व्दिमितीय रूप छायाभेदाने साध्य करता येते. म्हणूनच या त्रिमितीय आभासाला चित्रात खूपच महत्वाचे स्थान आहे.

चित्रामध्ये अनेक आकार असले तरी त्यांच्या एकमेकांशी असलेल्या नात्यातून चित्रविषय स्पष्ट होत असतो. चित्रामध्ये काही भाग उजळ आणि काही भाग गडद असतो. घन आकार दाखवण्यासाठी गडद रंगांचा वापर केला जातो आणि ॠण आकार दाखविण्यासाठी उजळ रंग वापरले जातात. काही वेळेला याच्या उलट म्हणजे घन आकार उजळ तर ॠण आकार गडद असू शकतात. चित्रकाराने त्या आकारांचा तोल इतका सुंदर साध्य केलेला असतो. त्यामुळे चित्राला एकात्मता प्राप्त होते. बघणारा त्या चित्राचा आनंद घेऊ शकतो.

इथे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आकार मांडणीत एखाद्या आकाराला महत्वाचे स्थान देणे. त्या स्थानाला अवधान बिंदू असे म्हणतात. तो चित्रचौकटीत फार महत्वाची भूमिका बजावतो. साधारणत: कोणत्याही चित्रात चित्र विषयाचा प्रमुख आकार अगदी मधोमध सहसा असत नाही. मध्यापासून थोडा दूर पण अगदी चित्रचौकटीच्या कोपऱ्यातहि नाही अशी रचना असते. त्या आकाराला अनुसरून इतर आकारांची रचना व रंगसंगती असते की जेणेकरून मुख्य आकाराला प्राधान्य मिळेल.

चित्र प्रदर्शनात अनेक प्रकारची चित्रे लावलेली असतात. त्यातील चित्रातून आपल्याला प्रत्येक चित्राची मांडणी म्हणजेच आकार मांडणीचे वैशिष्ट्य दिसून येते. त्यात खूपच विविधता असते. काही कलाकार निसर्गात जसे दिसून येते तसेच्या तसे चित्रात आभासमान करतात. त्या आकारांना नैसर्गिक आकार मांडणी म्हणतात. तर काही कलाकार निसर्गातील आकारांना त्याच्या आवडीनुसार वेगळे रूप देतात. त्यामध्ये अलंकारिक आकार, भौमितिक आकार येतात. यामध्ये आकार मांडणीत बदल असला तरी मूळ आकारांचे वैशिष्ट व त्याच्या गुणांची जपणूक केलेली असते. त्याप्रकारच्या चित्रांना अलंकारिक आकार मांडणी म्हणतात.

काही कलाकार पूर्णत: कल्पित आकारांची मांडणी करताना दिसतात. त्यात निसर्गात दिसणाऱ्या आकारांशी काहीही साधर्म्य नसते. चित्रांची मांडणी केवळ रंगांच्या माध्यमातून होत असते. बघणाऱ्याने त्यात काय दिसते ते शोधायचे असते. अश्या प्रकारच्या चित्रांना केवलाकारी (Abstract) चित्र म्हणतात. तर काही चित्रे त्रिकोण, चौकोन, गोल या सारख्या भौमितिक आकारांच्या मांडणीतून निर्माण झालेली असतात. त्यांना वस्तू सापेक्ष नसलेले आकार ( Non Objective Form) म्हणतात. तरीदेखील त्यात चित्रकाराचे विचार लक्षात येऊ शकतात.

ही आकारांची विविधता लक्षात घेतली तरच कोणतेही चित्र पाहताना त्या चित्राला आपण संपूर्ण न्याय देऊ शकतो. त्यातील आकार सौंदर्य लक्षात घेऊन चित्रकाराला काय सांगावयाचे आहे हे समजू शकतो. त्या चित्राचा भाव समजू शकतो. जो आकार निसर्गात दिसतो त्याला अतिशय सुंदर रीतीने चित्रकाराने चित्रात मांडलेला असतो. काहीवेळेला अगदी 'प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर' असेही घडताना दिसते. चित्रकाराला मिळालेली दैवी देणगीच हे करू जाणे. आकार सादृश्यतेतून निर्माण होणारा हा चित्रविषयक भाव म्हणजेच रूपसौंदर्य होय.

(लेखिका कला अभ्यासिका आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जामिनासाठी बनावट कागदपत्रांचा वापर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संशयिताच्या जामिनासाठी बनावट कागदपत्र सादर करून कोर्टाची फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजेश मुलसंजीवन तिवारी आणि कृष्णा भाऊ जाधव अशी या दोघा संशयितांची नावे आहेत. तिवारी चेतनानगर येथील तर जाधव इगतपुरी येथील रहिवाशी आहे. १७ डिसेंबर २०१४ पासून संगनमत करून दोघा संशयितांनी न्यायालयाची फसवणूक केली. तिवारी याच्या जामिनासाठी जाधव याने बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून जामीनदार झाला होता. मात्र, कागदपत्रांच्या छाननीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खुटवडनगर येथील दिलीप गोविंदा जाधव (वय ५५) यांनी दोघांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ट्रकसह दुचाकीची चोरी

शहरातील वेगवेगळ्या भागांमधून ट्रकसह तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. हनुमानवाडी परिसरातील श्रद्धा लॉन्स समोरून रविवारी पहाटेच्या सुमारास एमएच १५ सीके ९२९९ क्रमांकाची ट्रक चोरीला गेला. या प्रकरणी राजीव गांधी भवनमागे राहणाऱ्या नीलेश मंगलचंद्र जैन यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. बोरगड म्हसरूळ येथे राहणाऱ्या शिवाजी पांडूरंग भोये यांची एमएच १५ डीआर ६३१९ क्रमाकांची दुचाकी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेली. तर, देवळाली गावात राहणाऱ्या तुषार आनंद सांगोरे यांची एमएच १५ सीएच ६६२३ क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. आणखी एका घटनेत नाशिकरोड परिसरातील परवेज सैयद यांची एमएच सीझेड ७६७२ क्रमांकाची दुचाकी रेजीमेंटल थिएटर येथून चोरीला गेल्याची नोंद उपनगर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

विवाहितेची आत्महत्या येवला तालुक्यातील मांजरवाडा येथील २२ वर्षीय विवाहितेने विषारी औषध सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला. सोनाली गणेश पवार, असे या विवाहितेचे नाव आहे. सोनाली यांनी बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याने त्यांना येवल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. तेथून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वडाळा शिवारात घरफोडी घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने वडाळा शिवारातील शिवाई बंगल्याचा कडी कोयंड तोडून घरातील विविध गृहपयोगी वस्तू आणि बंगल्याच्या आवारात पार्क केलेली सॅन्‍ट्रो कार चोरून नेली. या प्रकरणी रमेश गोविंदराव भोईटे (वय ६६) यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातील गॅस शेगडी, अॅक्वागार्ड, केनस्टार मिक्सर आणि घराबाहेरील एमएच १५ बीएन १८४ क्रमांकाची सॅन्ट्रो कार चोरून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगभूमीला पडतोय चावट नाटकांचा वेढा

$
0
0

नाशिक रंगभूमीवरही आता 'फक्त प्रौढांसाठी'

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून एका 'तसल्या' नाटकाची बरीचशी चर्चा नाशिकच्या रंगकर्मींमध्ये जोर धरत होती. ही चावट नाटके येतात कशी व पाहिली जातातच कशी ही चर्चा असण्याबरोबरच नाशिकच्या रंगभूमीला ही नाटके नवीन नाहीत, रंगभूमीने काही बदल आत्मसात केले पाहिजे तरच प्रेक्षकांचा विकास होईल, अशी चर्चाही झडत आहे. 'एक चावट मधुचंद्र' या नाटकाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही चर्चा नाटकाचा हाऊसफुल्ल शो पाहून मात्र फिकी पडल्याचे चित्र होते.

खासगी आयुष्य आणि सार्वजनिक ठिकाणचे वर्तन यांच्यातला उरलासुरला भेद संपवण्याचे काम सध्याची बरीचशी नाटके करताना दिसत आहेत. आपण आपल्या आयुष्यात जे काही अत्यंत खासगीत अनुभवतो किंवा आपल्या चंचल मनोभूमीवर काही वेळा मनुष्य जे स्वैर उच्छृंखल खेळ खेळत असतो, ते आता वास्तवाला सामोरे जाण्याचा बेधडकपणा, भावनांचा निचरा म्हणून प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करण्याला प्रेक्षकांनी मान्यता दिली आहे, असा समज करून लेखक नाटके लिहू लागली आहेत. दिग्दर्शकही बिनधास्तपणे ती करण्यात धन्यता मानत आहेत. सध्या अशी अनेक नाटके येत आहेत. नाशिकच्या रंगभूमीवरही 'त्या' प्रकारची नाटके आता येऊ लागल्याने अनेक रसिक, प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 'एक चावट मधुचंद्र' हे नाटक त्यापैकीच एक आहे. परंतु, नाशिकला प्रौढांसाठी नाटक दाखविण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या नाटकांचा प्रवास 'गोलपिठा' पासून सुरू होतो. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' काव्यसंग्रहावर बेतलेले हे नाटक वारांगणा व्यवसायावर प्रकाश टाकणारे आहे. त्याची भाषा शिवराळ आहे. मला तुमची म्हणा, भोगसम्राट, अवध्य, जंगली कबुतर, योनीच्या मनीच्या गुजगोष्टी, एक चावट संध्याकाळ, सिनेतारका बेगम शबाब, एक चावट मधुचंद्र अशी काही नाटके यापूर्वी नाशिकच्या रंगभूमीवर येऊन गेली आहेत. त्यांनी एक काळ गाजवलाही आहे. त्यामुळे प्रदीर्घ चर्चा झडल्याही आहेत. 'भडका' हे देखील नाटक यापैकीच एक होते. त्यात टब बाथमध्ये अंघोळ करणारी अभिनेत्री दाखविण्यात आली होती. खास या दृश्यासाठी नाटकाला जाणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. 'अवध्य' नाटकाची जाहिरातच मुळात 'वयात आलेल्या तरुणांसाठी वयात आलेले नाटक' अशी करण्यात येत होती. 'अहो मी

तुमची' या नाटकात तर १४ बलात्काराची दृश्ये काहीअंशी दाखवली होती.

सेन्सॉरकडून परवानगी मिळते कशी?

चावट नाटकांना सेन्सॉरची परवानगी मिळते कशी हा मोठा प्रश्न आहे. परंतु, सेन्सॉरला सादर केलेली स्क्रिप्ट व प्रत्यक्षात दाखविण्यात येणारे नाटक यात जमीन आसमानचा फरक अनेक नाटकांमध्ये दिसतो. अनेक लेखक, दिग्दर्शक नाटकात बरीचशी तफावत ठेवतात. 'तसल्या' काही नाटकांना मात्र सेन्सॉर 'ए' ग्रेडचाच दर्जा देत‌े. आता सादर होणारे 'एक चावट मधुचंद्र' नाटक 'ए' ग्रेडच आहे. परंतु, आबंटशौकीन प्रेक्षकाला या सर्वांशी काही देणेघेणे नसते तर त्याला काही पहायला मिळणार म्हटल्यावर तो नाटकांना आवर्जुन येतो.

मराठी नाटकात तरी ब्लॅकआऊट करून काही दृश्ये दाखविण्यात येतात मात्र इंग्रजी रंगभूमी तर यापेक्षा पुढारलेली असून, तेथे अशा सीनला अजिबातही धरबंध नसतो. आता आपल्या रंगभूमीमध्ये तशीच नाटके येऊ घातली आहेत. 'सखाराम बाईंडर' आल्यावर ते पाहणे चूक नाही व अशी नाटके आल्यावर ती पाहणेही गैर नाही. प्रेक्षकांनी आता काही बदल स्वीकारलेच पाहिजे.

- एक ज्येष्ठ रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाखा स्थलांतरावरून पिंगळे-चुंभळे भिडले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हसरूळ शाखा स्थलांतरावरून माजी खासदार देवीदास पिंगळे आणि संचालक शिवाजी चुंभळे यांच्यात पुन्हा शीतयुद्ध पेटले आहे. संबंधित शाखा ही देविदास पिंगळेंच्या नातेवाईकांच्या जागेवर असल्यानेच ती हलविली जात असल्याचा आरोप केला जात आहे. तर स्थानिकांनी विरोध केल्यानंतर म्हसरूळ विविध कार्यकारी सोसायटीने मात्र या स्थलांतरास पाठिंबा दर्शविला आहे. सोसायटीच्या वतीने जिल्हा बँकेला शाखा स्थलांतर करण्याचे पत्र दिले असून स्थलांतर आता अटळ आहे.

म्हसरुळ शाखा स्थलांतर करण्याचा प्रयत्न जिल्हा बँकेकडून सुरू आहे. मात्र संबंधित जागेवरून ही शाखा स्थलांतर करण्यास म्हसरुळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या शेतकरी व सभासदांनी विरोध दर्शविला होता. जिल्हा बँकेची म्हसरुळ शाखा आजमितीस ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी ठेवणे शेतकऱ्यांसाठी हितावह आहे. तसेच नवीन ठिकाणी शाखा स्थलांतरित केल्यास अंदाजे ५० लाख खर्च येणार असल्याचा दावा केला होता. बँकेचे स्थलांतर करावयाचे असेलच तर म्हसरुळ गावांतील म्हसरुळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या जागेमध्ये बँकेचे स्थलांतर करावे जेणेकरून शेतकरी बांधवांना बँकेत असलेला कष्टाचा पैसा असा वायफळ जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करून बँकेची म्हसरुळ शाखा आहे त्याच ठिकाणी किंवा वि. का. सोसायटीच्या जागेत स्थलांतर करावी अन्यथा शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून बँकेत उपोषणास बसतील, असा इशारा दिला आहे.

याच सोसायटीचे चेअरमन साहेबराव मोराडे, व्हा. चेअरमन भागावत पगारे यांच्यासह काही सभासदांनी गुरूवारी जिल्हा बँकेला पत्र देवून स्थलांतराला आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. म्हसरूळ सोसायटीत जागा नसल्याने आम्ही जागा देवू शकत नाही असे सांगून सध्याची जागा ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीची नसल्याने स्थलांतर करण्यात यावी, असेही त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच यापूर्वी सोसायटीच्या नावाने दिलेल्या तक्रार अर्जाशी सोसायटीचा संबंध नसल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे.
पिंगळे-चुंबळे वाद कारणीभूत

सध्या देविदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे यांच्यात विस्तवही जात नाही. एकमेकांना शहकाटशह दिला जात आहे. आता यातून ही शाखाही सुटली नाही. संबंधित शाखा देविदास पिंगळेंच्या नातेवाईकांच्या जागेवर असल्याचा आरोप शिवाजी चुंबळे यांनी केला आहे. त्यामुळे ही जागा सोडून शाखा नव्या जागेत स्थलातंरीत करण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा बँक वर्तुळात आहे. एकमेकांना शह देण्याच्या नादात मात्र शाखेचा बळी जायला नको अशी चर्चा सध्या सुरू आहे.

..कोट..

बँकेच्या अगोदरची शाखेची जागा शेतकऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीची होती. तसेच त्या जागेसाठी जादा भाडे द्यावे लागत होते. शेतकऱ्यांच्या सूचना आल्यानंतर संबंधित शाखा मुख्य रस्त्यावर आणि कमी भाडे देऊन आणली आहे.

- शिवाजी चुंबळे, संचालक, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेची बैठक सकारात्मक

$
0
0

नाशिक : ओझर विमानतळाच्या ठिकाणाहून विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) गुरुवारी बैठक झाली. पर्यायी आणि इमर्जन्सी लँडिंगसेवा सुरू करण्याचा गो-एअर या विमान कंपनीचे विचाराधीन आहे. तसा प्रस्ताव कंपनीने एचएएल प्रशासनाला काही महिन्यांपूर्वीच दिला आहे. त्यावर एचएएलने अंतिम निर्णय न घेतल्याने गुरुवारी बैठक झाली. त्यास खासदार हेमंत गोडसे यांच्यासह गो-एअर कंपनी आणि एचएएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. धावपट्टी उपलब्ध नसल्याच्या कारणाने मुंबई विमानतळावर बहुतांशवेळा विमानांना लँडिंगसाठी सिग्नल मिळत नाही. त्यामुळे ही विमाने अरबी समुद्र परिसरात घिरट्या घालतात. ही परिस्थिती लक्षात घेता मुंबई विमानतळापासून नजिक असलेल्या ओझर विमानतळाची उपलब्धता पर्यायी म्हणून झाल्यास अधिक प्रभावी होणार आहे. म्हणून मुंबईला पर्यायी आणि इमर्जन्सी लँडिंगसाठी ओझर येथे परवानगी मिळावी, अशी गो-एअरची मागणी आहे. सद्यस्थितीत ओझर विमानतळ आणि पॅसेंजर टर्मिनल सज्ज असले तरी त्याचा वापर नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहम्मद पैगंबरांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोडला अन्नदान, चित्ररथांची मिरवणूक आदी कार्यक्रम उत्साहात झाले. मोहम्मदिया सोशल ग्रुपतर्फे अन्नदान करण्यात आले.

मिरवणुकीत अंजुमन ए मोहम्मदिया मदरशाच्या विद्यार्थ्यांनी फलकाद्वारे दहशतवाद आणि स्त्री भ्रूण हत्याविरोधी तसेच 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' असा संदेश दिला. मिरवणुकीत हिंद सोशल ग्रुप, रहेबर सोशल ग्रुप, मदिना सोशल ग्रुप, आयएसपी-सीएनपी प्रेस, मसजिद ए हनफिया नौजवान मुस्लिम कमिटी, गुलाम ए नबी ग्रुप, संजेरी सरकार फ्रेण्ड सर्कल, अंजुमन ए अशरफिया सोशल ग्रुप, रजा फ्रेण्डस सर्कल, गरीब नवाज ग्रुप, मीरा दातार संस्था, नाशिकरोड जुलूस कमिटी, केजीएन ग्रुप, दोम दोम शांदवलशाह सोशल संस्था आदी मंडळाचा सहभाग घेतला.

गोसावीवाडीतून सुरू झालेली मिरवणूक आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, बिटको, दुर्गा उद्यान, विहीतगावमार्गे देवळालीगावातील गाडेकर मळा येथे आली. तेथे मार्गदर्शनपर सभा झाली. देवळालीगाव मशिदीचे इमाम हजरत आमीर मिसबाह यांचे प्रवचन झाले. मौलाना हारुन रशिद, मौलाना अख्तर, मौलाना जफर अली यांची प्रमुख उपस्थिती होती. नाशिकरोडच्या मशिदीतील मौलानांचा सत्कार करण्यात आला. मोहम्मदिया सोशल ग्रुपचे अध्यक्ष आसिफ शेख, उपाध्यक्ष इमरान खान, सचिव इम्तियाज सैय्यद, शेर खान, इमरान शेख, अमजद शेख, मोसिन शेख आदींनी संयोजन केले.

देवळाली कॅम्पला रोषणाई

देवळाली कॅम्पमधील चौकाचौकात मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त रोषणाई व आकर्षक देखावे करण्यात आले. जुन्या बसस्थानक आवारात उभारलेला देखावा मुख्य आकर्षण बिंदू होता. मुख्य मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. दुपारी तीनला शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

हिंदुस्तान झिंदाबादचा नारा

जुने नाशिक : 'हिंदुस्तान झिंदाबाद, आतंकवाद मुर्दाबाद'च्या घोषणा देत गुरुवारी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त जुलूस-ए-मेहम्मदिया काढण्यात आला. तत्पुर्वी, मुस्लिम धर्मगुरुंनी देशाच्या प्रगतीसाठी विशेष दुवा करत देशावरील सर्व संकटे नष्ट होऊन देशातील विविधता, एकता व अखंडता कायम रहावी अशी प्रार्थना केली.

जहाँगीर मशिद चौकातून हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतीब अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुलूस काढण्यात आला. तत्पूर्वी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, उपायुक्त एन. अंबिका यांनी पोलिस प्रशासनातर्फे मुस्लिम धर्मगुरुंचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला. ठिकठिकाणी जुलूसचे गुलाबपाणी शिंपडून स्वागत झाले. जुलुसच्या अग्रभागी हातात इस्लामी ध्वज घेतलेले अरबी वेशातील घोडेस्वार, सजावट केलेली वाहने होती.



सर्वधर्म समभावाचे दर्शन

देवळाली कॅम्प : जुन्या बस स्थानकावर नाशिकच्या प्रसिध्द हजरत सादिक शाह (हुसैन) यांच्या दरगाहची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली तर छावा संघटनेच्या ब्लॅक बॉईज मंडळाने मलेशियातील जहीर अलोर मस्जिदची प्रतिकृती साकारण्यात आली. देवळालीत सायंकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यात अनेक चित्र रथ सहभागी झाले. उपाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक भगवान कटारिया, भाऊसाहेब धिवरे यांनी मुस्लिम बांधवांचे गुलाब पुष्प देत स्वागत केले. मिरवणुकीत मशीद कमिटीचे ट्रस्टी अफजलखान जुम्माखान, इम्रान शेख, वासिम कुरेशी, नसीर सैय्यद, शमशुद्दीन पीरजादा, निसार खान, फारुख खान, आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर थंडीने गारठले

$
0
0

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील निच्चांकी तपमानाची नोंद नाशकात होत असतानाच गुरुवारी आर्द्रता कमी झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिकमध्ये किमान तपमान ६.४ तर निफाडमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे ५.६ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली.

नाशिकचे बुधवारी (दि. २६) तपमान ६ अंश सेल्सिअस इतके होते. त्यात गुरुवारी वाढ झाली असली तरी आर्द्रता कमी झाल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना चांगलाच जाणवत आहे. बुधवारी ३० टक्के असलेले हवेतील आर्द्रतेचे प्रमाण गुरुवारी २४ टक्क्यांवर गेल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळेच दिवसाही नाशिककरांना उबदार कपडे घालणे अत्यावश्यक झाले होते. पाच दिवसांपासून सातत्याने किमान तपमानात घसरण होत आहे. त्यामुळे पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर शहर परिसरात लपेटल्याचे दिसून येत आहे. येते काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे नाशिककरांना थंडीचा सामना करावा लागणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निच्चांकी ६.१ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयडीआय, फॉरेन ट्रेड सेंटर द्या

$
0
0

खासदार हेमंत गोडसे यांचे केंद्र सरकारला साकडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने नाशिकमध्ये आयडीआय (इंटरपेनरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट) सुरू करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री कलराज मिश्र यांच्याकडे केली आहे. तसेच नाशिकमध्येच फॉरेन ट्रेडचे काऊंटर सुरू करण्याची मागणी गोडसे यांनी केंद्राकडे केली आहे.

नाशिककमध्ये आयडीआय सुरू करण्यासाठी खा. गोडसे आणि उद्योजकांनी मिश्र यांची भेट घेतली. नाशिकमध्ये सुमारे पाच हजारहून अधिक छोटे-मोठे उद्योग आहेत. मात्र, या उद्योगांसाठी कुशल कामगार मिळत नाहीत. नाशिकमध्येच आयडीआयचे केंद्र सुरू झाल्यास या उद्योगांना कुशल कामगार मिळणार आहे. 'आयडीआय'च्या माध्यमातून या इंडस्ट्रिजमध्ये उद्योगांच्या मागणीनुसार कामगारांना ट्रेनिंग दिले जाईल. त्यामुळे या कामगारांना संबंधित कामांचा योग्य अनुभव असणार आहे. तसेच इंडस्ट्रिजचेही उत्पादन वाढणार असून इंडस्ट्रिजला मोठा बुस्ट मिळेल अशी अपेक्षा आहे. मिश्र यांनीही सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले.

खा. गोडसे व उद्योजकांनी फॉरेन ट्रेडचे डायरेक्टर जनरल अनुप वाधवन यांची भेट घेवून फॉरेन ट्रेडचे सेंटर नाशिकला सुरू करण्याची मागणी केली आहे. नाशिकमधून दर महिन्याला इंडस्ट्रिजचे १५०० व अॅग्रीकल्चरचे १००० कन्टेनर निर्यात होतात. त्यासाठी दरवेळी पुण्याला लायसन्स परवानगी व क्लेम करण्यासाठी जावे लागते. त्यामध्ये अनेक चकरा माराव्या लागतात. त्यामध्ये वेळ, श्रम वाया जावून पैसाही खर्च होतो. त्यामुळे शेतकरीही निर्यात संदर्भात विचार करत नाही. फॉरेन ट्रेडचे कार्यालय सुरू झाल्यास बऱ्याच उद्योजक तसेच शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे. त्याचा उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनाही लाभ होणार असल्याचा दावा गोडसे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धात्रकफाटा थांबा झाला जीवघेणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा येथील शहर बसथांबा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. पूर्वीपासून तेथील प्रवाशांचे केंद्र असलेला हा थांबा महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर अडचणीचा ठरत असून, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.

धात्रक फाटा बसथांबा हा पूर्वी महामार्गावर होता. रस्ता रुंदीकरनानंतर सहा पदरी झालेल्या या रस्त्यावर तीन दुभाजक टाकले आहेत. हे दुभाजक टाकताना दोन्ही स‌र्व्हिस रस्त्यांच्या बाजूने हनुमाननगरपासून जत्रा हॉटेलपर्यंत लोखंडी जाळ्या टाकल्या आहेत. शहर वाहतुकीच्या बसेस या महामार्गावरून धावत असल्याने प्रवाशांना बस पकडण्यासाठी या जाळ्यांवरून उडी मारून बस गाठावी लागते. तसेच स्त्रियांना जाळी ओलांडणे शक्य होत नाही. त्यामूळे बस हुकून मनस्ताप सहन करावा लागतो. या थांब्यावर स्थानिक नागरिक, एच.ए.एल.चे कर्मचारी, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी यांची सदैव वर्दळ असते. बस आल्यानंतर ती गाठण्यासाठी एकच झुंबड उडत असल्याने अनेक जण जाळ्यानवरून पडून जखमी होतात. तसेच स‌र्व्हिस रस्त्यावरील वाहनांना या गर्दीमुळे अडथला येऊन अपघातही होतात. पालकांना यामुळे आपल्या शालेय पाल्यांना सोडण्यासाठी हनुमाननगर किंवा जत्रा थांबा येथे जावे लागते. यामुळे अंतर तर वाढतेच पण, या दोन्ही थांब्यांवर वाहतुकीची गर्दी होते. दुभाजाकांमुळे दुखापती होण्याची व मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. अशीच परिस्थिती महामार्गावरील इतर थांब्यांवरही असून, महामार्गावरील शहर बस सेवा सध्या अडचणीची ठरत आहे. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी शहर वाहतुकीच्या बसेस या स‌र्व्हिस रस्त्यावरून वळवाव्यात, तसेच पूर्वीप्रमाणे थांब्यावर प्रवासी निवारा शेड उभारावेत, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रात्री अपरात्री नागरिकांना अडवून त्यांची लुटणाऱ्या दोघांना पंचवटी पोलिसांनी गुरूवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास निमाणी येथे अटक केली. पंकज पुरूषोत्तम मोरे (२०) आणि पंकज आघव (२७) अशी या संशयितांची नावे आहे.

फिर्यादी किशोर पाटील एका नातेवाईकाच्या मदतीसाठी रात्री खासगी हॉस्पिटलमध्ये गेले होते. रात्री अडीच्या सुमारास ते आपल्या मुलासोबत परतत असताना, काट्या मारूती चौकीजवळ त्यांना पाटील अशी हाक मारत दोघा भामट्यांनी थांबवले. त्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटवर 'पाटील' असे लिहिल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. यानंतर, कुमावतनगर येथे राहणाऱ्या संशयितांनी एक मोबाइल कॉल करायचा बहाण करीत पाटील यांच्याकडून मोबाइल घेतला. तसेच त्यांच्या खिशातील अडीच हजार रुपये काढून घेतले. दोघा चोरट्यांनी लागलीच लाल रंगाच्या पल्सरवर धूम ठोकली. पाटील यांनी ही माहिती पोलिसांना कळवताच गस्तीवर असलेल्या गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी निमाणीजवळ दोघांना जेरबंद केले. घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप प्रवेशकर्त्ये रोडावले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.२७) होणाऱ्या नाशिकमधील कथीत भव्य प्रवेश सोहळा हा स्थानिक भाजप नेत्यांच्या आतातायी भूमिकेमुळे आता फुसका बार ठरण्याची शक्यता आहे. या प्रवेश सोहळ्याने मनसेसह इतर पक्ष हैराण झाले तरी त्यांनी वेळीच सावध होत, डॅमेजकंट्रोल सुरू केल्याने निम्मे नगरसेवकांनी माघार घेतली आहे. तर काही संभ्रमावस्थेत सापडले असून, नुकत्याच भाजपवाशी झालेल्या एका नेत्याच्या मर्जीखातर केवळ पाच ते सात नगरसेवक प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय भुकंप कागदावरच राहणार असून, या सोहळ्याची हवा काढण्याचे प्रयत्न भाजपच्याच एका गटाकडून केले जात आहेत.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली ताकद वाढवण्यासाठी इतर पक्षातील नाराजांना पक्षात घेण्याची मोहीम उघडली आहे. त्याच मोहिमेचा पुढचा भाग हा येत्या रविवारी मनसेसह इतर पक्षातील १५ ते २० नगरसेवक व काही बडे पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची चर्चा भाजपचे नेते करत आहेत. भाजप नेत्यांच्या या दाव्यांमुळे मात्र मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष गटाची डोकेदुखी वाढली आहे. भाजपमध्ये कोणते नगरसेवक जाणार याची चाचपणी करण्यातच इतर पक्षांचे पदाधिकारी गुंतले असून, त्यांनी आकडेमोड सुरू केली आहे. तर मनसेने हा प्रवेश सोहळा उधळून लावण्यासाठी रणनिती तयार केली असून, नगरसेवकांना माघारी फिरवण्यासाठी डॅमेजकंट्रोल केले जात आहे. निवडणुकांना अजून सव्वा वर्ष असल्याने काही नगरसेवक प्रवेशाबाबत संभ्रमात आहेत. तर काही नगरसेवकांनी नकार कळविल्याने या प्रवेश सोहळ्याची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपवाशी झालेल्या या नेत्याची ताकद वाढू नये म्हणून काही भाजपचेच नेते प्रयत्न करत असल्याने फक्त पाच ते सहाच नगरसेवक प्रवेश करतील अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्यावरील निर्यातमूल्य हटविले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक सत्ताधारी भाजप व शिवसेना खासदारांच्या दबाव व शेतकऱ्यांच्या रेटयापुढे केंद्र सरकार झुकले असून, वाण‌‌ज्यि मंत्रालयाने कांद्यावरील निर्यातमूल्य चारशे डॉलरवरून थेट शुन्यावर आणले आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याला जागतिक बाजारपेठ मिळणार असून, कांद्याची थेट निर्यात करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे कांद्याचे घसरलेले दरही वाढणार असून, या निर्णयाचा सर्वाधिक फायदा नाशिकला होणार आहे.

भाजप व शिवसेना खासदारांच्या दबावानंतर केंद्र सरकारने १० डिसेंबरला कांद्याचे निर्यातमूल्य ७०० डॉलरवरून ४०० डॉलर आणले होते. मात्र पाकिस्तानमध्ये कांद्याचे निर्यातमूल्य शुन्य असल्याने भारतीय कांद्याला बाजारपेठ मिळत नव्हती. तर निर्यात मूल्य घटविल्यानंतरही जिल्ह्यातील कांद्याचे दर वाढले नसल्याने शेतकरी संतप्त होऊन केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले होते. त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना साकडे घालत पंतप्रधान नरेंद्र मोदींना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. चव्हाण आणि गडकरींच्या प्रयत्नांना यश आले असून, केंद्र सरकारने गुरूवारी कांद्यावरील निर्यात मूल्य हटविण्याची अध‌किृत घोषणा केली. कांद्याचे निर्यातमूल्य थेट ४०० डॉलरवरून शुन्यावर आल्याने कांद्याच्या निर्यातीवर आता केंद्राचे कोणतेही बंधन राहणार नाही. कांदावरील एमईपी हटवल्याने कांद्याची निर्यात वाढून देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे दर वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. सध्या कांद्याची आवक बाजारपेठेत वाढल्याने दर अधिक कोसळ्याची शक्यता होती. मात्र निर्यातमूल्य हटव‌ल्यिाने आता सरासरी दर वाढणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघाडी नदीवर नवीन पूल उभारावा

$
0
0

लामखडे मळा कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे अजुनही अपूर्ण अस्वस्थेत असल्याबद्दल रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात १० वर्षात लोकवस्ती वेगाने वाढली आहे. परंतु, त्या तुलनेत मूलभूत सुविधा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. जलवाहिनी अजुनही जुनीच आहे. त्यामुळे अतिशय कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे स्थानिक हैराण झाले आहेत. स्थानिकांनी आपल्या तक्रारींचे गाऱ्हाणे महापालिकेच्या पंचवटी विभागाच्या सभापती सुनीता शिंदे यांच्याकडे मानले. यावेळी महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी सी. बी. आहेर यांनी रस्त्याची व इतर कामे तातडीने मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिले. यावेळी विजय पवार, विश्वनाथ पंडित, एस. एन. सातपुते, रितेश वाघेला, एस. एन. भगत, अरविंद पटेल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाच्या डोळ्यात अंजन

$
0
0



शिवाजी चौकातील मंडईच्या बाजूलाच महापालिकेचे मैदान आहे. मैदानाच्या बाजूला महापालिकेच्या पुढाकाराने व्यायमशाळा आणि लोकमान्य वाचनालय उभारण्यात आले आहे. व्यायमशाळा अद्याप सुरू करण्यात न आल्याने त्यासाठी असलेला भला मोठा हॉल सध्या धुळखात पडून आहे. वाचनालयात दररोज वृत्तपत्र, नियतकालिके आणि पुस्तक वाचनासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी येतात. मात्र, मैदानावरील अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचा त्रास वाचनालयात येणाऱ्यांना सहन करावा लागतो. याबाबत 'मटा'ने मैदानाच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध करताच शिवाजी चौकातील रहिवाशांनी सामाजिक प्रबोधनपर बॅनर मंडईच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आला आहे.

या पुरस्कारांची घोषणा मैदानाची योग्य निगा राखणाऱ्यांसाठी विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात लावण्यात आलेल्या बॅनरवर सन २०१४-२०१५ चे आगळेवेगळे पुरस्कार असे म्हटले आहे. भाजी मार्केट शेजारील मैदान स्वच्छ व सर्वांगसुंदर करणे, मैदानात ज्येष्ठांसाठी वृक्षारोपण, सर्वांसाठी ग्रीन जिम करण्यासाठी धडपडणाऱ्या नागरिकांच्या वतीने अभिनव पुरस्कार असे म्हटले आहे. प्राणवायू, सिडको भूषण, स्वच्छता सम्राट, नशामुक्ती, जनहितैषी सेवक देवारत्न अशा विविध पुरस्कारांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बॅनरवर लावलेल्या विविध पुरस्कारांच्या घोषणेमुळे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. बॅनर कोणी लावला याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

प्रशासन होणार का जागे? स्थानिकांच्या पुढाकराने बोलके बॅनर भाजी मंडईच्या प्रवेशद्वारावरच लावण्यात आले असून ते येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे आता तरी महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी मैदानाच्या दुरवस्थेकडे लक्ष घालावे, अशी मागणी शिवाजी चौकातील रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांनी गजबजले नाशिक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिध्दी पावलेले नाशिक सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले आहे. थंडीच्या दिवसांचा चांगलाच फायदा नाशिकला होत असून, येथील गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक नाशिकच्या दिशेने येत आहे. येथूनच काही अंतरावर असलेले त्र्यंबकेश्वर, वणी-सापुतारा तसेच शिर्डी या पर्यटन व धार्मिक स्थळांच्या ओढीमुळे पर्यटक नाशिकला वळत आहेत.

रेंगाळलेल्या थंडीमुळे थोडा उशिरा सुरू झालेला पर्यटकांना आवडणारा थंडीचा मोसम आता चांगलाच बहरला आहे. नाशिक परिसरातील मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी फुल्ल गर्दी केली असल्यामुळे पर्यटकांनी शहर बहरले आहे; मात्र पार्किंग व रस्ते यांची योग्य सोय नसल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सध्या डोके वर काढत आहे. प्रत्येक ठिकाणी अर्धा ते एक तास रांगेत उभे रहावे लागत असल्यामुळे पर्यटकांची नाराजीही पसरली आहे. शहरातील पांडवलेणी, चामरलेणी, रामसेज, अंजनेरी, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर परिसर, दिंडोरी, चांदवड परिसरातील ऐतिहसिक किल्ले पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत अाहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी फिरण्यासाठीही पर्यटक राजीखुशीने तयार होत असून, नांदूरमध्यमेश्वरला भेट देण्यासाठी पसंती देत आहेत. निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या व विविध वन्य प्राण्यांचा, पक्ष्यांचा वास्तव्य असलेले नांदूरमध्यमेश्वर नेहमीच पर्यटक, वनस्पतिशास्त्रज्ञ व गिरिभ्रमंतीकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय.

द्राक्षबागांनी बहरलेल्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर म्हणजे हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे हक्काचे ठिकाण. वन विभागाच्या माहितीनुसार १५० जातींचे परदेशी व स्थानिक पक्षी येथे पाहायला मिळतात. फ्लेमिंगो, स्पुनबिन, ग्रे व परपल हेरॉन, पेंटेड स्कॉर्क, आयबीस, टिल्ट यांचा प्रामुख्याने त्यात समावेश आहे. पक्षीनिरीक्षणासाठी वन विभागाने येथे निरीक्षण मनोरे उभारले आहेत.

विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्यापेक्षा या निसर्गरम्य ठिकाणांकडे पर्यटक अधिकांश वळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरी पर्यटकांची संख्याही वाढली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर जिल्ह्याबरोबर परराज्यातील पर्यटकांनी हजेरी लावून येथील निर्सगाच्या अनोख्या आविष्काराचा आस्वाद घ्यायला सुरूवात केली आहे.



जिल्हा परिसरातही होते भ्रमंती

निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या इगतपुरीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विपश्यना केंद्र, जवळच असणारे भंडारदरा धरण, धुक्यांच्या दुलईत हरवणारा कसारा घाट, कावनई व टाकेद यासारखी ऐतिहासिक धार्मिक स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. महाराष्ट्रातील 'चेरापुंजी' म्हणून इगतपुरी तालुक्याची खरी ओळख असली तरी अवघा नाशिक जिल्हा गड-किल्ल्यांसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. रतनगड, साल्हेर-मुल्हेर, ओंधा-पट्टा, धोडप, कौळाणे, मार्कंडेय, रामशेज व अनकाई असे सह्याद्रीच्या रांगेतील अनेक गड-किल्ले पर्यटकांना खुणावत आहेत.





धार्मिक पर्यटनालाही प्रचंड वाव

नाशिक हे नैसर्गिक पर्यटनापेक्षाही धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून अधिक नावारूपाला येण्याची आज गरज आहे. त्र्यंबकेश्वर तसेच रामकुंड या दोन ठिकाणी पर्यटनाला वाव असला तरीही आणखी अनेक धार्मिक ठिकाणे नाशकात आहेत; मात्र त्याकडे कुणाचे अधिक लक्ष जात नसून त्याची जाहीरात करण्याची गरज आहे. हनुमानाचे जन्मस्थान असलेले अंजनेरी, समर्थ रामदासांनी वास्तव्य केलेले आगर टाकळी, इच्छामणी गणपती (उपनगर ), एकमुखी दत्तमंदिर, कालिका मंदिर, देवळाली कँपजवळ असलेले खंडोबाची टेकडी, चामर लेणी, नवश्या गणपती, भक्तिधाम (पेठ नाका), मुक्तिधाम (नाशिक रोड) या देखील धार्मिक पर्यटनस्थळांमध्ये मोडणाऱ्या ठिकाणांची माहिती पर्यटकांना मिळाल्यास येथेही भेटी देण्यास ते उत्सुक असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुड मॉर्निंग; हे बरं आहे का?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दररोज सकाळी उठताच डबा, बादली घेऊन लोटापरेड करताना गावच्या बाहेर वेशीनजीक तर कधी नदीकाठी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची आता चांगलीच तारांबळ उडत आहे. यासाठी येवला पंचायत समितीने आगळी वेगळी मोहीम हाती घेतली आहे. ती म्हणजे 'गुड मॉर्निंग'. या मोहिमेंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके भल्या पहाटे विविध गावात अचानक जाऊन गावाजवळ उघड्यावर लोटापरेड करणाऱ्यांना गाठत आहेत. नुसतेच गाठत नसून त्यांना गांधीगिरी पद्धतीने गुलाबपुष्प देताना समज देत आहेत.

येवला तालुक्यातील एरंडगाव येथे असेच एक पथक भल्या पहाटे पोहचताना पथकातील अधिकाऱ्यांनी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाबपुष्प दिले तेंव्हा हाती लोटा घेऊन निघालेले चांगलेच खजिल झाल्याचे दृश्य नजरेत पडले. निर्मल भारत अभियानांतर्गत स्वच्छता, शौचालयाचा वापर वाढवणे यासाठी प्रबोधन करण्याबरोबरच वचक बसावा यासाठी पंचायत समितीच्या पथकाने गांधीगिरी करून ग्रामस्थांचे प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. गांव शंभर टक्के हागणदारीमुक्त झालेले असताना व घरी शौचालय बांधलेले असतानाही उघड्यावर लोटापरेडसाठी जाणाऱ्यांची अजूनही संख्या कमी नाही.

अशाच पद्धतीने गावाच्या आसपास उघड्यावर शौचास निघालेल्या येवला तालुक्यातील एरंडगाव येथील जवळपास तीस जणांना भल्या पहाटे येवला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी गाठताना त्यांना गुलाबपुष्प दिले. 'गुड मॉर्निंग' असे म्हणतानाच हे बरं आहे का? असा सवाल यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी लोटापरेड करणाऱ्यांना करत त्यांचे डबे देखील जप्त केले. गुलाबपुष्प हाती पडताना मात्र लोटापरेड करणारे चांगलेच खजिल झाल्याचे चित्र दिसले.

येवला तालुक्यातील एरंडगाव येथे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, माजी सरपंच, दोन विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे गुड मॉर्निंग पथक भल्या पहाटे ५.३० वाजता गावात फिरले. तेव्हा उघड्यावर लोटापरेड करणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. उघड्यावर प्रातर्विधीसाठी जाणाऱ्या प्रत्येकाचे छायाचित्र देखील यावेळी कॅमेऱ्यातही कैद करण्यात आले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीने कंबर कसली आहे. गावोगावी पथके पाठवून स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पंचायत समिती प्रशासनाने केले आहे.

गावे हागणदारी मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले जात असून, पथकाद्वारे प्रबोधन केले जात आहे. बाहेर प्रातर्विधीस जाणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली जाताना समजही देण्यात आली. उघड्यावर प्रातर्विधीस जाणाऱ्यांची संख्या कमी न झाल्यास यापुढे अशांची नावे ग्रामपंचायतीच्या फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत. ज्यांनी शौचालयासाठी अनुदान घेतले आहे, त्यांचे अनुदान परत मागितले जाईल. इतरांना रुपये १२०० पर्यंत दंडही भरावा लागू शकतो.

- आनंद यादव, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), येवला पंचायत समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सटाणा बायपासचा प्रश्न मार्गी लावणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराचा पूर्वेकडील बायपासचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील सप्ताहात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या दालनात शिष्टमंडळासह मान्यवरांची बैठक घेण्यात येऊन ठाम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहावर डॉ. विलास बच्छाव यांच्यासह शिष्टमंडळाने सटाणा शहरातील प्रलंबित पूर्वेकडील बायपास व केळझर पाणीप्रश्नावर खासदार डॉ. भामरे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पूर्वेकडील व प्रस्तावित पश्चिमेकडील बायपास संदर्भात शेतकऱ्यांसह विविध मान्यवरांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी डॉ. विलास बच्छाव यांनी पूर्वेकडील बायपास शहरासाठी कसा योग्य आहे या बाबत माहिती सादर केली. खासदार डॉ. भामरे यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पुढील सप्ताहात मुंबई येथे मंत्रालयात त्यांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे सुचित केले. तसेच, कोणत्याही परिस्थितीत पूर्वेकडील बायपास रस्ता मंजुरीचे संकेत दिले.

तसेच, सटाणा शहरासाठी आवश्यक असलेल्या ठेंगोडा येथील गायरान जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असून, लवकरच या संदर्भात प्रश्न निकाली निघेल, अशी ग्वाहीही खासदार डॉ. भामरे यांनी दिली. हरणबारी, केळझर व चणकापूर धरणातील पाणी शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी धरणक्षेत्रातील लाभार्थी व शेतकऱ्यांनाच देण्यात यावे. अन्यत्र ते वळविण्यात येवू नये, अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी मांडत खासदार डॉ. भामरे यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी बैठकीस डॉ. विलास बच्छाव, डॉ. प्रशांत पाटील, नगरसेवक साहेबराव सोनवणे, भाऊसाहेब राजे, शिवाजी सोनवणे, दगा सोनवणे, जगदीश मुंडावरे, पंकज ततार, पंकज सोनवणे, रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, आण्णा अहिरे, शामकांत मराठे, डॉ. शेषराव पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तत्पर सेवेसाठी कटिबद्ध व्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

लोकांना उत्तम आणि तत्पर सेवेसाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नेहमी कटिबद्ध असले पाहिजे, तेव्हा सुशासन दिन साजरा करण्याचे धाडस आपण करू शकतो, असे प्रतिपादन उपविभागीय प्रांताधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डी. गंगाथरण यांनी केले.

उपविभागीय अधिकारी कार्यालय कळवण, तहसील कार्यालय व पंचायत समिती कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुशासन दिनी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, आपण लोकसेवक आहोत याचा आपल्याला कधीही विसर पडता कामा नये. जे काम आपल्या वाट्याला आले आहे, ते प्रामाणिक आणि निष्ठेने केले तरच एक नव्या भारताची सुरुवात आपण करू शकू. कळवणचे तहसीलदार अनिल पुरे यांनी महसूल विभागाच्या योजना व तणावमुक्त काम याबाबत मार्गदर्शन केले.

गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांनी स्वच्छ भारत अभियान, कृषी विभाग, सेवा हमी कायदा याबाबत माहिती दिली. सुशासन दिनाचे औचित्त्य साधून तालुक्यात गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती करून जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. रवींद्र सपकाळे, विस्तार अधिकारी आर. एम. सूर्यवंशी यांनीही अनुक्रमे आरोग्य सुविधा व माहिती अधिकाराबाबत मार्गदर्शन केले.

सुशासनाचे दिले धडे

सटाणा : बागलाण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील टिळकरोडवर भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला.

सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील, भाजपाचे नेते व मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव, महेश देवरे, साहेबराव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी भाजपाचे शामकांत मराठे, जगदीश मुंडावरे, पंकज ततार, श्रीधर कोठावदे, रमेश देवरे, आण्णा अहिरे, पंकज सोनवणे, दिलीप खैरनार, संजय छाजेड, साहेबराव सोनवणे, बिंदुशेठ शर्मा, यशवंत येवला, शरद ततार, राजेंद्र पुरकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुष्काळ निर्मूलन निश्चितच शक्य’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाणीटंचाई शासननिर्मित असून, शासनाचे दिशाहीन धोरण, जलनियोजनाचा अभाव, भ्रष्टाचार आणि अनास्था हेच या भीषण परिस्थितीचे कारण आहे. कोणतेही सरकार आले तरी यात काही फरक पडत नाही, असे परखड मत जलसंधारणतज्ञ सुरेश खानापुरकर यांनी व्यक्त केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र अजय शाह होते. शिरपूर पॅटर्न या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जलसंधारण मॉडलचे जनक म्हणून सुरेश खानापुरकर ओळखले जातात. अत्यंत कमी पाऊस पडणाऱ्या शिरपूर तालुक्यात ही अभिनव योजना राबवून सुमारे ऐंशी टक्के शेती बागायती करण्यात त्यांना यश मिळाले. त्यामुळे त्यांच्या प्रयोगाकडे सर्वांचे लक्ष्य वेधले गेले.

महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शिरपूर पॅटर्न या विषयावरील व्याख्यानात त्यांनी महाराष्ट्रातील पर्जन्यमान, जमिनीची पोत, आतापर्यंत शासनाने राबविलेल्या योजनांचे अपयश आणि दुष्काळ यांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील पाणीपुरवठा व जलसंधारण योजनांमुळे फक्त राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि कंत्राटदार श्रीमंत झाले. योग्य धोरणे राबवून एका वर्षात राज्य टँकरमुक्त करणे शक्य आहे. परंतु, हितसंबंधाच्या प्रभावामुळे आणि भ्रष्टाचारासाठी गावोगावी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सिंचनाबाबत शासनाची आकडेवारी दिशाभूल करणारी असून, प्रत्यक्षात चौदा टक्के जमीनही अद्याप सिंचनाखाली आलेली नाही. उगमापासून संगमापर्यंत जास्तीत जास्त पाणी अडविणे, पाणी मुरविणे, मृदासंधारण करणे आणि उपलब्ध पाण्याचा शहाणपणाने वापर करणे त्यास वनीकरणाची जोड देणे हे योग्यप्रकारे केल्यास दुष्काळ अत्यंत कमी खर्चात व कमी कालावधीत कायमस्वरूपी हटविणे शक्य आहे, हेच आम्ही शिरपूर पॅटर्नद्वारे दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.

सुरुवातीला वाचनालयाचे सहकार्यवाह रविराज सोनार यांनी प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय करून दिला. अध्यक्ष अजय शाह यांच्या हस्ते खानापुरकर यांचा ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. जिज्ञासु श्रोत्यांच्या प्रश्नांना खानापुरकर यांनी तांत्रिक माहिती आणि आकडेवारीसह उत्तरे देऊन त्यांचे शंका समाधान केले. हे व्याख्यान राधाकिसन कल्याणमल अॅण्ड कंपनीने स्व. राधाकिसन रामविलास बडाळे यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड कृउबासाठी १७६ अर्ज दाखल

$
0
0

मनमाड : मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ जागांसाठी निवडणूक होत असून, शेवटच्या दिवशी १७६ अर्ज दाखल झाले आहेत. आता १३ जानेवारी रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून, त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

बाजार समितीतील १८ जागांपैकी सोसायटीच्या ११ जागांपैकी सात सर्वसाधारण जागांसाठी ६४, महिला राखीव दोन जागांसाठी ११, इतर मागासवर्गीय एका जागेसाठी १३ व भटक्या विमुक्त जागेसाठी १४ तर ग्रामपंचायत सर्वसाधारण दोन जागांसाठी २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आर्थिक दुर्बल घटक गट आठ, अनुसूचित जाती गटासाठी सात, व्यापारी गट दोन जागांसाठी २२, हमाल मापारी गटाच्या एका जागेसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दि. २८ डिसेंबरला छाननी व १३ जानेवारीला होणाऱ्या माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. पॅनल निर्मितीसाठी हालचालींना वेग आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images