Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कवी विष्णू थोरेंचा ‘धुळपेरा उसवता’ बंगालीत

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

नव्या पिढीचे कवी सध्या अत्यंत वास्तववादी कविता लिहून जगण्याचे नवे तत्वज्ञान मांडत आहेत. ग्रामीण भागातून येणारे कवी तर शेती-मातीच्या कवितेतून आपला ठसा ठळकपणे उमटवत आहेत. या नव्या पिढीचेच प्रतिनिधीत्व करणारा चांदवडचा कवी व चित्रकार विष्णू थोरे यांचा 'धुळपेरा उसवता' हा शेतीमातीच्या कवितांचा पहिलाच काव्यसंग्रह बंगालीत अनुवादीत होणार आहे. त्याबाबतची सर्व औपचारिकता पूर्ण झालेली असून कवितांचा अनुवाद देखील झालेला आहे.

ग्रामीण कवितेच्या क्षेत्रात सध्याच्या नव्या पिढीमध्ये दमदार लिखाण करणाऱ्यांमध्ये विष्णू थोरे यांचे चांगले नाव आहे. त्यांनी 'धूळपेरा उसवता' या कवितासंग्रहात आपल्या कवितेत, ग्रामीण अनुभवाशी संलग्न असे अनुभव रेखाटले आहेत.

फेसबूकच्या माध्यमातून बंगाली कवयित्री दीपांजली कलिका यांच्याशी झालेली मैत्री विष्णुच्या कवितांना बंगालीत घेऊन गेली. या कवयित्रीची एक कविता फेसबूकवर गाजत असताना विष्णूने त्याचे अक्षरचित्र बनवले होते व त्याच्या कवितांशीही ओळख करून दिली. त्यातूनच आसाम प्रांतात, दीपांजली यांच्या काव्यमेळ्यामध्ये 'धुळपेरा उसवता' या काव्यसंग्रहाचे वाचन करण्यात आले व त्यांच्या ग्रुपने हा संग्रह बंगाली भाषेत करण्याचे ठरवले. या काव्यसंग्रहातील कविता बंगालीत अनुवादीत करण्यात आल्या असून लवकरच काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. शेतकरी कुटुंबातून घेतलेल्या अनुभवातून विष्णूने ग्रामीण बोलीतील शब्दकळा, शहरातील जनजीवनाचे दुख, हर्ष, दारिद्र्य, चालीरिती, रूढी, परंपरा व संस्कृती इत्यादींचा अंतर्भाव आपल्या कवितेत आविष्कृत केला आहे. शेतीसाठी लागणारे अवजारे, शेतीच्या मशागती संबंधीचे शब्द उदा. गोवऱ्या, शेत, पाऊस, आभाळ, नांगर, ढग, भुई, पांभर, बांधमेर, गुरे-ढोरे, घरदार, गाडी, चाकं, अशी शब्दकळा अतिशय वास्तवपूर्णरित्या त्यांच्या कवितेतून येते. कवितेतील याच शब्दांची प्रतिमा बंगाली भाषेत उभी करताना दमछाक होत आहे.

सोशल मीडियामुळे जग खिडकीसारखे झाले आहे. माझ्या कविता बंगालीत जाणे ही या खिडकीतीलच देवाणघेवाण आहे असे मला वाटते. आपले अनुभव वेगळ्या भाषेशी, त्यांच्या संस्कृतीशी रिलेट होताना पाहून आनंद होतोय.

विष्णू थोरे, कवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परत मिळालेल्या फीचा वाचनासाठी विनियोग

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

टीव्ही, मोबाइल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे मुले पुस्तकांपासून दुरावत आहेत. वाचनसंस्कृतीचा ऱ्हास होत आहे. अशी ओरड नेहमीच ऐकावायस मिळते. मात्र, विद्यार्थ्यांतील चांगल्या विचारांना योग्य दिशा मिळाली, तर त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करून त्यांना पुन्हा पुस्तकांकडे नेता येऊ शकते. हा एक अनोखा प्रयोग मालेगाव तालुक्यातील झोडगेच्या जनता विद्यालयातील शिक्षकांनी खरा करून दाखवला.

दुष्काळी परि‌स्थितीमुळे शासनाने यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. यामुळे दुष्काळी झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पाल्यांना दिलासा मिळाला. परीक्षा फी सध्या विद्यालयातून परत केली जात आहे. झोडगे येथील जनता विद्यालयाने देखील तिचे वाटप केले जात आहे.

या परत केलेल्या फीचा विनियोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक प्रगतीसाठीच व्हावा या विचारातून मुख्याध्यापक बी. आर. देसाई आणि मराठी विषय शिक्षक के. ए. देसले यांनी विद्यार्थ्यापुढे एक अभिनव प्रस्ताव ठेवला. फी परत देताना याच फी मधून नाममात्र शुल्क भरून गावातील वाचनालयाचे सभासद झालात तर? अशी कल्पना मांडली. परीक्षा फी परत मिळते आहे ही चांगली गोष्ट असली तरी परत मिळालेली फी अन्य करणांसाठी खर्च होण्याऐवजी विद्यार्थी वाचनालयाचे सभासद झाल्यास ते कायमस्वरूपी पुस्तकांशी जोडले जातील. वाचनाचे वेड त्यांना लागल्यास वाचनसंस्कृती देखील जोपासली जाईल, असा हेतू शिक्षकांनी त्यांच्यापुढे स्पष्ट केला. कोणालाही सक्ती करण्यात आली नाही. चांगुलपणाला आणि विचारांना योग्य वळणावर नेता येते हे या छोट्याशा प्रयोगातून येथील जनता विद्यालयाच्या शिक्षकांनी सिद्ध केले.

दहावीची परीक्षा फी परत मिळाली याचे आम्हाला समाधान आहेच. शिक्षकांनी वाचनालयाचे सभासद व्हावे असे सुचवले. या प्रस्तावचे आम्ही स्वागत केले. परत मिळालेल्या फीचा अन्यत्र खर्च न करता त्याचा योग्य विनियोग केला याचा आनंद आहे.

- तनय पाठक, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिलिव्हरी बॉयकडून होणारी लूट थांबणार

$
0
0

pravin.bidve@

timesgroup.com

नाशिक : दारापर्यंत सिलिंडर घेऊन येणाऱ्या गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याकडे तुम्ही १० ते २० रुपये अधिक मोजत असाल तर आता तसे करण्याची आवश्यकता नाही. वितरक कंपनीच्या वेबसाइटवरच सिलिंडरची मागणी नोंदविण्यास सुरूवात झाली आहे. ऑनलाइन पैसेही स्वीकारले जात आहेत.

जिल्ह्यात ही ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित झाल्याची माहिती गॅस कंपनीतील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वितरण प्रणालीत पारदर्शकता आली असून, ग्राहकांची लूट थांबण्यासही मदत होत आहे. मोबाईलवर मागणी नोंदविल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांतच संबंधित वितरकाचा डिलिव्हरी बॉय सिलेंडर घेऊन आपल्या घरी येतो. अनेकदा तो पावतीवरील किमतीपेक्षाही १० ते २० रुपये अधिक मागतो. त्यावरून अनेकदा वादही होतात. काही ग्राहक पावतीवर नमूद रक्कमच देतात. परंतु, अनेक ग्राहक डिलिव्हरी बॉयने केलेल्या मागणीनुसार सिलिंडरसाठी अधिक पैसेही मोजतात. पावतीवर नमूद रकमेपेक्षा अधिक पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. अशा तक्रारींची दखल घेऊन ग्राहकांसमोर ऑनलाइन पैसे अदा करण्याचा पर्याय खुला करण्यात आला आहे.

अशी आहे कार्यपध्दती

वितरक कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लॉगीन आयडी तयार करून ग्राहक क्रमांक व तत्सम महत्वपूर्ण माहितीची नोंद करावी. वेबसाईटच्या होम पेजवर बुक दि रिफील असा पर्याय उपलब्ध होतो. त्यावर क्लीक केल्यानंतर आपल्यासमोर पे इट ऑनलाइन किंवा कॅश ऑन डिलिव्हरी असे दोन पर्याय उपलब्ध होतात. आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे अदा करू शकतो. बुकिंगनंतर चार दिवसांच्या आत सिलिंडर घरपोच करणे बंधनकारक आहे. त्यावेळी डिलिव्हरी बॉयला पैसे अदा करण्याची गरज नाही. त्याने पैशांची मागणी केलीच तर वितरकाशी संपर्क साधून ग्राहकाला विचारणा करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात नवरदेवाची आजी ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नातवाचा विवाह समारंभ आटोपून घराकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या आजीचा कारच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. नवरदेवाच्या काकांसह अन्य वृद्ध महिला गंभीर जखमी झाले आहेत. या हदयद्रावक घटनेने शहरावर शोककळा पसरली.

येथील बांधकाम ठेकेदार प्रवीण बळीराम सोनवणे यांचा मुलगा सतीश याचा रविवारी (दि. २७) मालेगाव येथे दुपारी विवाह समारंभ होता. विवाह आटोपून सायंकाळी सटाणा येथे परतीच्या प्रवासाला निघालेल्या वऱ्हाडी मंडळीसोबत कारला (एम. एच ४१ डब्ल्यू २३२३) रावळगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने हूल दिली. यामुळे कारचालक सुनील बळीराम सोनवणे (नवरदेवाचे काका) यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात नवरदेवाची आजी व कारचालक सुनील सोनवणे यांच्या आई यशोदाबाई बळीराम सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारमधील महिला सुलोचना प्रभाकर पाटील, वत्सलाबाई परशराम ठाकरे व बिजली पंडित जगताप तसेच कारचालक सुनील बळीराम सोनवणे हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उकळत्या दुधात पडलेल्या बालिकेचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहरानजीक असलेल्या वडगाव गावातील अडीच वर्षीय चिमुरडीचा नाशिक येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

वडगाव येथील रहिवासी राजेंद्र तुकाराम खैरनार यांची अवघे अडीच वर्षाची कन्या गेल्या १५ दिवसापूर्वी आपल्या आजोळी ताहाराबाद येथे आईसोबत गेली होती. हॉटेलमध्ये चहासाठी घेतलेले दूध बाबांनी तापवण्यासाठी गॅस शेगडीवर ठेवले होते. त्याचवेळी अंगणात खेळत असलेली ती चिमुरडी दूध उकळत असलेल्या भांड्यानजीक जाऊन डोकावत असताना पडली. चिमुरडीच्या किंचाळल्याने तिचे बाबा आणि अन्य कुटुंबीयांनी धाव घेत तिला बाहेर काढले. गरम असलेल्या दुधात ती पडल्याने अंग भाजले होते. तिला तत्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. गेल्या १५ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. याबाबत नाशिक येथील पोलिस स्थानकात नोंद झालेली असली तरी या घटनेला वडगावचे उपसरपंच शशिकांत राजकोर यांनी दुजोरा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्तांवर पालिका आणणार जप्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेने उत्पन्न वाढविण्यासाठी अधिक आक्रमक होत वसुलीसाठी थेट मालमत्ता जप्तीची धडक मोहीम सुरू केली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून शहरातील सहाशे मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. एक लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर कारवाई केली जाणार आहे. शहरातील मालमत्ता धारकांच्या सर्व्हेक्षणाचाही प्रश्न दोन आठवड्यात निकाली निघणार आहे.

राष्ट्रीय जनगणना अभिलेखात विविध कर विभागाचे कर्मचारी अडकल्याने आतापर्यंत या वसुलीकडे दुर्लक्ष झाले होते. ही मोहिम आता संपल्याने एक जानेवारीपासून वसुलीवर अधिक भर दिला जाणार आहे. जप्तीच्या कारवाईसाठी महापालिकेने पथके तयार केली असून, जप्तीची कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त दोरकुळकर यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंगऱ्या देव उत्सवाची धामधूम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नाना प्रकारची आदिवासी लोकगीते, लोकांच्या हातात असलेली घुंगरू काठीबांबूचा खराटा, पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज अन् तोंडातून भूररर..! असा आवाज आदिवासी भागातील रानात, डोंगर दऱ्यांच्या कपारीत घुमत आहे. निमित्त आहे आदिवासींच्या डोंगऱ्या देव उत्सवाची. या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

आदिवासी आम्ही डोंगरवासी, चंद्र सूर्यापासून आदिवासी यासारखी विविध गीते पावरीच्या तालावर म्हटली जात आहेत. पावरीचे सुरेल सूर व आदिवासी गीत कानावर पडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचे संपूर्ण चित्रच डोंगऱ्या देव उत्सवाच्या निमित्ताने उभे राहते. या उत्सवाला मोठी परंपरा आहे. हा उत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. याच उत्सवाला भाया असेही म्हणतात. कळवण तालुक्यातील कुंडाणे, नांदुरी, वंजारी, सुकापूर, दळवट आदी गावातील भाया उत्सव प्रसिद्ध असून, हा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असतात.

आदिवासी बांधवांची निसर्गावर अपार श्रद्धा असल्याने जंगलातील पशूपक्षी, वाघ देव, नागदेव, मोर, चंद्र-सूर्य हेच त्यांचे दैवत असल्याने गावाच्या वेशीवर किंवा रस्त्यावरील बारीत वाघदेवाची मूर्ती दिसून येते. काही देवांना ठराविक नावाने ओळखले जाते. यात हिरवा, कंसरामाता, लक्ष्मी, रानवा आदी देवतांची अखंड दीप लावून सलग पाच दिवस पूजा केली जाते.

गावातील हनुमानाच्या मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत पाच माऊलींच्या हातून देवतांडा उभा केला जातो. या जागेवर मुळासकट उपटून आणलेले झेंडूचे रोपटे लावतात. या देवतांडाजवळ मोराच्या पिसांचा गुच्छ, काकडी, नागलीचे दाणे, उडदाचे दाणे ठेऊन दिवा ठेवला जातो. कार्यक्रमाच्या ठरविलेल्या मुदतीप्रमाणे पाच, सहा किंवा बारा दिवस या थोम्बाजवळ माऊल्या फेर धरून नाचतात. या उत्सवादरम्यान या टापराला उपवास करून नियम पाळावे लागतात. या माऊल्या सकाळी अनवाणी फिरून शेजारील गावामध्ये जातात. गाणे म्हणून फेर धरून पावरीवर नृत्य करतात. घरोघरी जाऊन धान्य जमा करतात.

उत्सवाची समाप्ती करण्यासाठी सर्व माऊल्या व उत्साही नागरिक गावाजवळील डोंगरावर गड जिंकण्यासाठी जातात. त्या ठिकाणी डोंगराची म्हणजेच डोंगऱ्या देवाची विधिवत पूजा केली जाते. रात्रीच्या वेळी डोंगरावर कार्यक्रम घेतला जातो. अनेक गावांमध्ये दत्त जयंतीनिमित्त या उत्सवाची सांगता होते. त्यानंतर महाप्रसादाचा (गावभंडारा) कार्यक्रम होतो.

भाया उत्सव

आपल्या गावात सुख शांती लाभो, शेतात काम करताना निसर्गाचा कोप होऊ नये, शेतात पेरलेले पीक चांगले यावे व घर संसाराची भरभराट व्हावी आदी कारणासाठी भाया उत्सव साजरा करून सांगतेच्या वेळी कोंबड्या व बोकडाचा बळी दिला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये शिवसेना पडली तोंडघशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतील आठ नगरसेवकांचा थाटामाटात शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश उरकून घेणारे स्थानिक पदाधिकारी आठ दिवसांतच तोंडघशी पडले आहेत. पक्षातील एका बड्या पदाधिकाऱ्याची फितुरी शिवसेनेला महागात पडली असून, त्र्यंबकेश्वरमध्ये भगवा फडकवण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नाला सुरूंग लागला आहे. भाजपचे नगरसेवक पळवणाऱ्या सेनेला सत्तेत सहभागी होण्यासाठी शेवटी भाजपशीच चर्चा करण्याची वेळ आली.

शिवसेनेचे नगरसेवक संतोष कदम यांना भाजपच्या तंबूत पाठवणाऱ्या या पदाधिकाऱ्याची उद्धव यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्र्यंबकमध्ये सोमवारी शिवसेनेला भाजपच्या मदतीने उपनगराध्यक्षद राखता आले असले तरी शिवसेनेची पत या प्रकाराने धुळीस मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मद्य वापरासाठी परवाना घ्यावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परवान्याशिवाय मद्य किंवा मद्यार्काची आयात, वाहतूक, वापर किंवा साठा केल्यास दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा नोंद होतो. मद्यार्काचा वापर अनेक प्रयोगशाळेत देखील होतो. त्यामुळे मद्याची आयात किंवा इतर कोणत्याही कामासाठी त्याचा वापर करणाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवाना घ्यावा, असे आवाहन नाशिकचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आर. जी. आवळे यांनी केले आहे.

सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, संशोधनात्मक कार्यासाठी मद्यार्क वापर करणाऱ्या संस्था, खासगी कंपन्या यांना मद्यार्काचा बोनाफाईड वापर तथा उपयोगासाठी परवाना प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. संबंधित जिल्हाधिकारी असे परवाने देण्यास सक्षम प्राधिकारी आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा (१९४९ चा मुंबई २५) अंतर्गत मुंबई रेक्टिफाईड स्पिरीटचा (इथेनॉलसह) किंवा मद्यार्क बाळगून त्याचा वापर करावयाचा असेल तर परवाना घेणे बंधनकारक आहे. मद्यार्काची वाहतूक अथवा वापर मद्यार्काची आयात केल्यास दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरतो. त्याकरिता किमान तीन वर्ष व कमाल पाच वर्ष करावास अशी शिक्षेची तरतूद आहे. तसेच किमान २५ हजार ते कमाल ५० हजार रुपयापर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद आहे. सर्व संबंधित आयातदार तसेच मद्यार्काचा अंतिमत: वापर करणाऱ्या संस्था, औद्योगिक घटक यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी सर्व प्रशासकीय मंजुरी घेतल्यानंतरच मद्यार्काचे सर्व व्यवहार करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ हजार ग्राहक रडारवर

$
0
0

दोन दिवसांत सेट टॉप बॉक्स न बसविल्यास प्रक्षेपण बंद होणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील २८ नागरी वस्त्यांमध्ये केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनसाठी जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर ही 'डेडलाइन' दिली असली तरी अजूनही हजारो केबलधारकांनी सेट टॉप बॉक्स बसविलेले नाहीत. येत्या दोन दिवसात सेट टॉप बसविले नाही, तर जिल्ह्यातील सुमारे २७ हजार ग्राहकांचे केबलचे प्रक्षेपण बंद होणार आहे. विशेष म्हणजे त्यापैकी सर्वाधिक ४६८३ केबलधारक एकट्या सिन्नरमधील आहेत.

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे केबल डीजिटायझेशनची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी समन्वयक म्हणून काम पहात आहेत. डीजिटायझेशनच्या प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक केबल जोडणीधारकाला सेटटॉप बॉक्स बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. मुदतीत सेटटॉप बॉक्स बसविले नाहीत तर त्या भागातील अ‍ॅनलॉग सिग्नल बंद केले जाणार आहेत. त्यामुळे केबलद्वारे होणाऱ्या प्रक्षेपणाला ग्राहकांना मुकावे लागणार आहे. गेले वर्षभर जिल्ह्यात सेट टॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही सुरू होती. शहर तसेच आसपासच्या नागरी भागात डिसेंबर २०१५ पर्यंत तर ग्रामीण भागात डिसेंबर २०१६ पर्यंत केबलचे डीजिटायझेशन पूर्ण करण्यात येणार आहे. केबल चालकांनी ग्राहकांना तत्काळ सेटटॉप बॉक्स उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश करमणूक कर विभागाने दिले असतानाही ते उपलब्ध न झाल्याने अनेक केबल जोडणीधारकांवर केबलच्या प्रक्षेपणापासून वंचित होण्याची वेळ येणार आहे.

जिल्ह्यातील नाशिक तालुका वगळता अन्य १४ तालुके आणि याखेरीज लासलगाव, मनमाड, ओझर, पिंपळगाव बसवंत, भगूर, घोटी, संसारी यांसारख्या एकूण २८ ठिकाणी ३१ डिसेंबरच्या आत सेटटॉप बॉक्स बसविणे आवश्यक आहे. तेथील एकूण १६० केबल चालकांच्या माध्यमातून ३५ हजार ७७६ ठिकाणी सेट टॉप बॉक्स बसविणे आवश्यक असताना प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ८ हजार ९७० ठिकाणीच असे बॉक्स बसविण्यात आले आहेत. अजूनही २६ हजार ८०६ ठिकाणी हे बॉक्स बसविले नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली.

केबलचालक प्रशासनाला जुमानेनात

केबलचालकांनी लवकरात लवकर जोडणीधारकांना सेटटॉप बॉक्स उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले असताना त्यांना जुमानले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. ३१ डिसेंबरनंतर प्रक्षेपण बंद झाले की ग्राहकांकडून अशा बॉक्सेसच्या मागणीसाठी आग्रह धरला जाईल. बॉक्ससाठी अधिक पैसे आकारून ते दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरात यापूर्वी असे प्रकार घडले असून, ग्रामीण भागातील नागरी वसाहतींमध्ये ते घडू नयेत, यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९० वाहनचालकांना ‘नो एंट्री’चा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील वाहनांची गर्दी हटवत पोलिसांनी हा रस्ता वाहनचालकांसाठी खुला करून दिला. मात्र, अनेक वर्षांपासून वळण असलेले वाहनचालक नो एंट्रीचा पर्याय वापरत राहिले. त्यामुळे पोलिसांनी रविवारी दिवसभरात ९० वाहनचालकांवर कारवाई करीत कायद्याचा बडगा उचलला.

पंचवटी पोलिस स्टेशनसमोर असलेल्या बाजार समितीत दररोज खेड्यापाड्यातून हजारो शेतकरी शेतीमाल घेऊन येतात. त्याचा थेट परिणाम येथील वाहतुकीवर होतो. रस्त्यावरच शेकडो वाहने उभी असल्याने हा रस्ता अनेक वर्षांपासून सर्वसामान्य वाहनचालकांना वापरणे शक्य होत नव्हते. नाईलाजाने का होईना वाहनचालकांना दिंडोरीरोडकडून येणाऱ्या वाहनांच्या लेनमधून प्रवास करावा लागत असे. अत्यंत धोकादायक बनलेल्या या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत गेले. याबाबत बोलताना पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी सांगितले की, चुकीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्यास संबंधित वाहनचालकावरच गुन्हा दाखल होतो. रस्ता उपलब्ध असताना अशा प्रकारे वाहनचालकांनी चुकीचा पर्याय निवडणे धोकादायक असल्याने तीन दिवसांपासून आम्ही बाजार समितीसमोरील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीत येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्याची जबाबदारी समितीची आहे. त्यासाठी सर्वसामान्य वाहनचालकांना वेठीस धरणे चुकीचे असल्याने सतत तीन दिवस कारवाई करीत हा रस्ता मोकळा करण्यात आल्याचे सपकाळे यांनी सांगितले. सध्या दिंडोरीकडे जाणारा बाजार समितीसमोरील रस्ता पूर्णतः मोकळा आहे. मात्र, वाहनचालकांना अनेक वर्षांपासून चुकीच्या मार्गाने जाण्याची सवय लागली आहे. त्यांना आवाहन करूनही उपयोग होत नसल्याने रविवारी दिवसभरात ९० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याचे सपकाळे यांनी स्पष्ट केले. वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी ही मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे सपकाळे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञान प्रदर्शनातून सकारात्मक दृष्टी

$
0
0



बी. डी. भालेकर शाळेत सोमवारी दोनदिवसीय प्रदर्शनाचे उदघाटन महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते करण्यात आले. 'समावेशक विकासासाठी विज्ञान व गणित' या थीमवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. सहावी ते आठवी, नववी ते बारावी व शिक्षक या तीन गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वैज्ञानिक प्रतिकृती, शैक्षणिक साहित्य, लोकसंख्या शिक्षण, प्रयोगशाळा परिचर हे विषय प्रदर्शनासाठी देण्यात आले होते. त्यानुसार ११४ वैज्ञानिक प्रकल्पांचे सादरीकरण या प्रदर्शनात करण्यात आले आहे.

चंद्रकांत गायकवाड यांनी उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. केंद्रप्रमुख राजश्री गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. तर महापालिका शिक्षणमंडळ प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी आभार मानले. प्रदर्शनातील विजेत्यांना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २९) दुपारी ३ वाजता गौरविण्यात येणार आहे.

सायन्स हॉलची मागणी शिक्षणसमिती सभापती संजय चव्हाण यांनी नाशिकमध्ये सायन्स हॉल उपलब्ध करुन देण्याची मागणी महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडे प्रदर्शनात केली. नाशिकमधील विद्यार्थ्यांनाही जागतिक स्तरावर वैज्ञानिक क्षेत्रात वाटचाल करता यावी, यासाठी हा हॉल उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गोदा प्रदूषण व्यवस्थापन गोदावरी नदीत कपडे, भांडी, गाड्या धुणाऱ्यांचे प्रमाण मोठे असते. यामुळे पाण्याचे प्रदूषण होतेच, शिवाय शहराच्या सौंदर्यही बाधित होते, यावर उपाय म्हणून गोदावरी प्रदूषण व्यवस्थापनाचा प्रकल्प मनपा शाळा क्रमांक ८ च्या वतीने साकारण्यात आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापक शोभना दंडगव्हाळ यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यासाठी लाभले आहे. व्हील वॉटर कॅरियर ग्रामीण भागात पाणी वाहून नेणे सोपे व्हावे, या उद्देशाने गुरू गोविंद सिंग शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी 'व्हील वॉटर कॅरियर' हा प्रकल्प प्रदर्शनात सादर केला आहे. फायबरचे टीप एका साच्यात बसवून त्याला एका हातानेही सहजरित्या ढकलता येईल, अशी व्यवस्था त्यांनी केली आहे. पाणी भरण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शाळा बुडवण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच जड भांड्यांमुळे जडणाऱ्या शारीरिक व्याधी टाळण्यासाठी प्रकल्प फायदेशीर ठरेल, असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक फेरीतून होणार क्रिकेट संघाची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे १९ वर्षांखालील मुलांचा जिल्हा संघ निवड चाचणीची प्राथमिक फेरी नुकतीच झाली असून, यातून ६२ जणांची निवड करण्यात आली आहे. या फेरीतून नाशिक जिल्ह्याचा अंतिम २२ जणांचा संघ जाहीर करण्यात येणार आहे. निवड चाचणीस पावणेदोनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

निवड चाचणीत फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व यष्टिरक्षणातील कौशल्याबरोबरच फिटनेसलाही महत्त्व देण्यात आले आहे. प्राथमिक फेरीतून निवडलेल्या पहिल्या यादीत ६२ जण असून, प्रत्येकाला कमीत कमी चार सामने खेळायला मिळतील. या सामन्यातील कामगिरीनुसार ३५ खेळाडूंची निवड होईल. त्यानंतर २० जणांचा अंतिम संघ जाहीर करण्यात येईल.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक व निवड समिती सदस्य के. व्ही. जोशी यांच्यासह नीलेश कस्तुरे, बाळू मंडलिक, संदीप सेनभक्त, राजू आहेर, तसेच संकेत बोरसे व रतन कुयटे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मविप्र स्पर्धेचा सूरमयी समारोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पार्श्वगायिका सायली पंकज यांच्या आवाजातील 'टिक टिक वाजते डोक्यात', 'दिल है छोटासा', 'छम छम करता है', या गीतांच्या श्रवणाने मविप्रच्या चारदिवसीय जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचा सूरमयी समारोप झाला. रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. महोत्सवात झालेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे देऊन यावेळी गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळावे व त्यांचा आत्मविश्वास यामार्फत बळकट व्हावा, यासाठी मविप्र संस्थेतर्फे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. 'लोककला' या थीमवर आधारित नृत्यप्रकार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सादर केले. त्याचप्रमाणे नाटक, गीतगायन यांचेही सादरीकरण या चार दिवसीय सोहळ्यात झाले. यातील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांनी सादरीकरण केले. यातील विजेत्यांना या सोहळ्यात गौरविण्यात आले.

नीलिमा पवार यांनी यावेळी 'विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्यातील कलेलाही न्याय द्यावा', असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे यांनी केले. संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत, मुरलीधर पाटील, भाऊसाहेब खातळे, नाना महाले, शिक्षणाधिकारी डॉ काजळे, प्रा. एस. के. शिंदे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. के. मुंगसे यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकात पदर अडकल्याने विवाहिता ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकून झालेल्या अपघातात २४ वर्षीय विवाहिता जागीच ठार झाली. ही दुर्दैवी घटना चांदशी शिवारातील अशोका इंटरनॅशनल स्कूलजवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. स्वाती विठ्ठल भोर, असे या मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेच नाव आहे.

मुंगसरे येथील रहिवाशी असलेले भोर दाम्पत्य आपल्या मुलासोबत घराकडे परतत असताना हा अपघात घडला. स्वातीच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात आल्याने ती रस्त्यावर पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शॉक बसून युवतीचा मृत्यू

घरात इलेक्ट्रीक मोटारीच्या विजेचा शॉक बसून पंचवटी परिसरातील २० वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. रेणुका तुकाराम गावित असे या युवतीचे नाव आहे. वेदनगर परिसरात राहणाऱ्या रेणुका हिस सोमवारी सकाळच्या सुमारास राहत्या घरात विजेचा शॉक बसल्याने गंभीर जखमी झाली होती. मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जखमी युवकाचा मृत्यू

कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दीपक संजय शिंदे (वय २८) या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान सोमवारी पहाटे मृत्यू झाला. औरंगाबादरोडवरील शिंदे मळा येथे राहणाऱ्या शिंदे यांच्या दुचाकीस २२ डिसेंबर रोजी तपोवन परिसरातील हनुमान मंदिराजवळ एमएच १५ डीएफ १००८ क्रमांकाच्या फोर्ड व्हिस्टा कारने धडक दिली होती. या धडकेत संजय रामदास शिंदे (वय ४५) आणि त्यांचा मुलगा दीपक गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये कारचालक राकेश सुमतीलाल भंडारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पाच तोळ्याची पोत लंपास

बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोन्याची पोत ओरबाडून चोरून नेल्याची घटना ठक्कर बाजार बसस्थानकात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरावाडीरोडवर राहणाऱ्या मनोरमा बाळासाहेब भाग्यवंत (वय ५५) या रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या नातीसोबत पुण्याला जाण्यासाठी निघाल्या होत्या. ठक्कर बाजार येथे बसमध्ये घुसत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत ७५ हजार रुपये किमतीची पोत ओरबाडून नेली.

पादचाऱ्याची लूट

रात्रीच्या सुमारास होस्टेलवर जाणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यास अडवून त्याच्याकडील मोबाइल, महत्त्वाची कागदपत्रे, रोकड असा ऐवज चोरून नेल्याची घटना तारवालानगर परिसरात घडली. मूळ लासलगाव येथील आणि सध्या औदुंबरनगर, एस.आर. वाघ बॉईज होस्टले येथे राहत असलेला अनिकेत बाळकृष्ण निकम (वय २१) हा विद्यार्थी रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तारवालानगर परिसरातील मेरी कपांउंडजवळून जात होता. त्याचवेळी पल्सरवरून तिघे संशयित त्याच्याजवळ आले व त्यांनी अनिकेतला अडवून पैसे, मोबाइल हिसकावून घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकत्रित क्रीडा विकास महत्त्वाचा

$
0
0

पूजा धारणकर
​२०१५ या सरत्या वर्षात नाशिककर खेळाडूंनी अांतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारत पदकांची कमाई केली अाहे. यापुढे देखील नाशिकचे खेळाडू अांतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करत शहराचे जिल्ह्याचे नाव जगाच्या इतिहासात कोरणार अाहे. परंतू क्रीडा विकासाकरिता नाशिक महानगर पालिका व जिल्हा क्रीडा विभागाने एकत्रित काम केल्यास घडणारा इतिहास अधिक ठळकपणे कोरला जाऊ शकतो.

प्रज्ञा गद्रे, कविता राऊत, श्रेया गावंडे, विदित गुजराथी, मोनिका अाथरे, संजीवनी जाधव, दुर्गा देवरे, किसन तडवी, विक्रांत मेहता, जिताशा शास्त्री अशी कितीतरी मोठी अांतरराष्ट्रीय खेळाडूंची फौज शहरातून उभी राहिली अाहे. या खेळाडूंना मनपाचे व राज्यशासनाचे एकत्रित साह्य मिळाल्यास क्रीडा विकास अधिक जलद होऊ शकतो यात काही शंकाच नाही.

विभागीय क्रीडा संकुलामुळे शहरात चांगल्या क्रीडा सुविधा निर्माण झाल्या अाहे. परंतू खेळाडूंना त्याचा पूर्ण फायदा करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याची अावश्यकता अाहे. विभागीय क्रीडा संकुलात चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध अाहे. पण त्या सोयी सुविधा टिकविण्यासाठी मेंटेनन्सचा खर्च अधिक असतो. त्यामुळे संकुलाच्या वापरासाठी भाडे अाकारले जाते. पण प्रत्येकच खेळाडूला हे भाडे परवडणारे नाही. जिल्ह्यातील अनेक खेळाडू अादिवासी भागातील, अार्थिक परिस्थितीशी झगडत अांतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले अाहे. अशातच सरावासाठी खर्च त्यांच्या खिशाला परवडणारा नाही. त्यामुळे नाशिक महानगरपालिका व राज्यशासनाच्या क्रीडा विभाग, खेळाडू, पालक, प्रशिक्षक, संघटक यांनी एकत्रित चर्चा करून यावर तोडगा काढावा. याचा फायदा महापालिका, क्रीडा विभाग, खेळाडू असा सर्वांनाच होणार अाहे.

शहराच्या क्रीडा विकासाकरिता महापालिका व क्रीडा खात्याने एकत्रित क्रीडा धोरण अाखले पाहिजे. यामध्ये महापालिकेच्या शाळेतून खेळाडू तयार करण्यासाठी बॅटरी टेस्टद्वारे चाचणी घेऊन क्रीडा प्रबोधिनीला खेळाडू द्यावेत. खेळासाठी मुलांना शहराच्या बाहेर पाठविण्यासाठी पालक तयार नसल्याने मनपाच्या माध्यमातून अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची तयार करण्यात यावी. प्रबोधिनीतल्या खेळाडूंकरिता अाहार, स्पर्धा खर्च, प्रवासभाडे, प्रशिक्षण खर्च व मैदान देखभाल खर्च या सोयी उपलब्ध करुन देताना मनपा व क्रीडा खात्याने एकत्रित ठराविक पैसे खर्च करावेत. क्रीडा नर्सरी ही शासनस्तरावर चालू करण्यात अालेली योजना महापालिकेच्या वसाहती, अंगणवाडी, शाळा, उद्याने येथे राबवली जावी. अंगणवाडी शिक्षकाप्रमाणे मानधनावर प्रशिक्षक नेमण्यात यावे.

मनपाचे अारक्षित मैदाने क्रीडा खात्याने विकसित करुन खेळाडूंना खुली करुन द्यावित. खासगी पंजीकृत क्रीडा संस्था, संघटना या क्रीडा विकासाकरिता कार्य करणाऱ्या संस्थांना क्रीडा साहित्य, मैदान देखभाल खर्च व प्रशिक्षक नेमण्यासाठी मदत करावी. गरजवंतांना क्रीडा साहित्य अनुदान देण्यात यावे. राज्यशासनाने शालेय क्रीडा स्पर्धेत महापालिकेच्या शाळांचा सहभाग बंधनकारक करावा. मनपा स्तरावर क्रीडा स्पर्धा घेण्यात याव्यात. क्रीडा शिक्षकांची भरती मनपाच्या शाळेत होणे गरजेचे अाहे. क्रीडा प्रशिक्षकांचे शिबिर, क्रीडा दिन, क्रीडा सप्ताह, स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे, खेळाडूंना वैद्यकीय सुविधा यासारखे खेळांना पोषक उपक्रम क्रीडा खात्याने व मनपाने एकत्रित राबविणे गरजेचे अाहे. गरजू खेळाडूंना स्पर्धा, सरावाकरिता आर्थिक मदत करावी. क्रीडा वस्तूसंग्रहालय व क्रीडा ग्रंथालय एकत्रित उभारण्यात यावी.

खेळाडूंच्या मागणीनुसार त्यांना प्रशिक्षण व इतर सुविधा निर्माण कराव्यात. खेळाडू दत्तक योजना, खेळाडूंच्या कामगिरीनुसार शिष्यवृत्ती, मनपामध्ये खेळाडू भरती तसेच क्रीडा शिक्षकांची कामगिरीनुसार उच्चपदावर नेमणूक असे उपक्रम महानगरपालिका व जिल्हा क्रीडा खात्याने एकत्रित हाती घेतले पाहिजे. महापौर चषकसारख्या स्पर्धा घेऊन खेळाडूंचा हुरुप वाढविण्यासाठी प्रयत्न असावेत. महापालिकेने व राज्यशासनाच्या क्रीडा खात्याने असे एकत्रित क्रीडा धोरण करुन ते नेटाने राबविण्याची गरज अाहे. शहराचा क्रीडा विकास या माध्यमातून नक्कीच साधला जाईल. क्रीडा विकासासाठी एकत्रित काम करतांना क्रीडा प्रशिक्षक तयार करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारल्यास असा उपक्रम राबविणारी नाशिक महानगरपालिका एकमेव महापालिका असेल.

(लेखिका राष्ट्रीय खेळाडू आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमांची भूमिका समतोल असावी

$
0
0

एचपीटी कॉलेजमध्ये आयोजित स्मार्ट कट्टा उपक्रमात ते बोलत होते. 'राजकारण आणि माध्यमे यांतील विश्वासार्हता' या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारितेसह विविध विद्याशाखांमधील विद्यार्थी उपस्थित होते.

अकोलकर म्हणाले, की राजकीय बातम्यांचा मोठा वाचकवर्ग अस्तित्वात आहे. अनेकदा राजकारणी आणि पत्रकार यांच्यात सरमिसळ होण्याचा धोका जास्त असतो. या दोन्हीही भूमिकांच्या मधील सूक्ष्म भेद आणि वेगळ्या जबाबदाऱ्या समजावून घ्यायला हव्यात.

अनेकदा निवडणुकीच्या कालावधीत पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील सख्य वाढीला लागत असले तरीही ते प्रासंगिक असते. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण साधण्याचे उद्दिष्ट्य गाठताना अनेकदा राजकारण्यांची गल्लत होते. अनेकदा स्वार्थापोटी समाजकारण विसरून वैयक्तिक स्वार्थ व वैयक्तिक हेवेदावेच वाढीला लागल्याचे चित्र दिसते. अशावेळी माध्यमांनी राजकीय क्षेत्रावर 'वॉच डॉग'ची भूमिका ठेवून समाजहिताचे रक्षण करायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी राजकारण आणि माध्यमे या विषयांच्या संदर्भाने प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना अकोलकर यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाला प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, जर्नालिझम विभाग प्रमुख प्रा. डॉ. वृंदा भार्गवे उपस्थित होते. कॉलेज विद्यापीठ प्रतिनिधी सुरेश नखाते, भक्ती आठवले, पुष्कर तिवारी, आकाश गायकवाड यांसह विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस वेबसाईट सुरळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांची वेबसाईट सुरू होण्यातील तांत्रिक अडथळा अखेर सोमवारी दूर करण्यात आला. तीन दिवसापासून ही वेबसाईट सुरू केल्यानंतर फेसबुक पेज समोर येत होते.

नाशिक शहर पोलिसांनी नागरिकाभिमुख केल्यानंतर nashikpolice.com ही वेबसाईट तांत्रिक कारणामुळे फेसबुकच्या कचाट्यात सापडली होती. तब्बल तीन दिवस ही वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न केला की त्याठिकाणी फेसबुकचे पेज सुरू व्हायचे. याबाबत 'मटा'ने सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसारीत केले. यानंतर प्रशासकीय पातळीवर रखडलेले मेन्टनेन्सचे काम पूर्णत्वाला पोहचले. सोमवार दुपारनंतर ही वेबसाईट सुरळीत झाली. सदर वेबसाईटवर पोलिस दलाने केलेल्या चांगल्या कामांना प्राधन्य दिले असून, नागरिकांना सोयीची ठरणारी रचना करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धिबळ स्पर्धेत ऋतुजा बक्षी विजेती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुका बुद्धिबळ संघटना व अशोकराव बनकर पतसंस्थेतर्फे पिंपळगाव बसवंत येथे नुकत्याच झालेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत ऋतुजा बक्षीने प्रथम क्रमांक मिळविला. सौरभ लोखंडेने द्वितीय, तर मयूर पाटीलने तृतीय क्रमांक मिळविला.

स्पर्धेत राज्यभरातून आंतरराष्ट्रीय मानंकनप्राप्त ५७ स्पर्धकांसह २०७ खेळाडूंनी सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, पतसंस्थेचे दिलीप बनकर, गणेश बनकर, ओंकार जाधव आदींच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. अनिल राठी, भरत वानखेडे, जयदीप राका, किरण प्रजापती यांनी सहकार्य केले. शोभराज खोंडे, मंगेश गंभिरे पंच होते.

स्पर्धेतील विजेते (कंसात गुण)

१. ऋतुजा बक्षी (८), २. सौरभ लोखंडे (७), ३. मयूर पाटील (७), ४. अवधूत लेंढे (७), ५. मोहित लढे (६.५), ६. विवेक चव्हाण (६.५), ८. गोपाल राठोड (६.५), ९. मयूर शेळके (६.५), १०. गणेश ताजणे (६), ११. कार्तिक शिंघ (६), १२. मंदार साने (६), १३. पुज्जम बनसोड (६), १४. सत्यम वारुडे (६), १५. यशवंत तेलंग (६).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथपालांवर शासनाचा अन्यायच!

$
0
0

विलास सोनार

सरकारने भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून राज्यभर साजरा केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही 'रिड इंडिया' ही मोहीम हाती घेतली ती वाचन संस्कृती वाढण्यासाठीच! राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर आता महत्त्व दिला जाणाऱ्या या विषयाची पाळेमुळे मात्र सरकार हेतुपूरस्सरच कमकुवत ठेवते आहे काय? या प्रश्नाचे उत्तर घेण्याची ही वेळ आहे.

ग्रंथालयाचा पाया असणारे ग्रंथपाल हे पद केवळ महाराष्ट्रातच अर्धवेळ ठेवण्यात आले आहे. इतर राज्यांमध्ये अशी स्थिती नाही. परिणामी पूर्णवेळ सेवा करूनही अर्धवट अन् तटपुंजा मोबदला पदरी पडत असल्याचे वास्तव ग्रंथालयाचा पाया डळमळीत ठेवतो.

महाराष्ट्रात पदवीधर ग्रंथपालांना बी.एड. समकक्ष वेतनश्रेणीचा लाभ मिळावा, ही ग्रंथपालांची प्रमुख मागणी आहे. यासाठी उच्च न्यायालयाच्या तीनही खंडपीठात सुमारे २६० पेक्षा अधिक ग्रंथापालांनी याचिका दाखल केल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे या सर्व याचिकांचा निकाल याचिकाकर्त्या ग्रंथपालांच्या बाजूने लागला आहे. तिसऱ्या वेतन आयोगाप्रमाणे पदवीधर शिक्षक व पदवीधर ग्रंथपाल यांची वेतनश्रेणी (३६५-७६०) ही सारखीच होती. चौथ्या वेतन आयोगात शिक्षकांसाठी ३६५-७६० या वेतनश्रेणीचे रुपांतर १४००-२६०० या वेतनश्रेणीत करण्यात आले. मात्र ग्रंथपालांसाठी १४००-२३०० ही वेतनश्रेणी लागू करून ग्रंथपालांच्या वेतनाचे अवमूल्यनास सुरुवात झाली. त्यानुसार पाचवा व सहाव्या वेतनात हा अन्याय सुरुच राहिल्याने ग्रंथपालांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.

एस. एस. कोडनुसार व भारतीय राज्यघटनेनुसार एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन हे त्याला सुरू असलेल्या वेतनापेक्षा कमी करता येत नाही. मात्र याबाबत ग्रंथपाल अपवाद कसे ठरले? ही सरकारची भूमिकाच समजेनाशी आहे. परिणामी ग्रंथपालांना कोर्टाकडे दाद मागावी लागली.

ग्रंथपालांच्या प्रश्नावर नजर टाकताना या विषयाचा घटनाक्रमही समजून घ्यायला हवा.

सोलापूरच्या पदवीधर ग्रंथपालांना बी.एड. वेतनश्रेणीचा लाभ मिळण्यासाठी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेनुसार शोभू शंकर चव्हाण यांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ न मिळाल्याने त्यांनी पुन्हा मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली. हिचा निकाल याचिकाकर्त्याच्या बाजूने लागला. या निकालानुसार शासनाने याचिकाकर्त्यास मुदतीत लाभ दिलाच नाही. परिणामी ग्रंथपालाने शासनाविरोधात अवमान याचिका दाखल केली. यावर शासनाने या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात एसपीएल दाखल केली. ही एसपीएल फेटाळली गेल्यानंतर शासनाने नागपूर अधिवेशनात ५ जानेवारी २००६ रोजी याचिकाकर्त्याच्या नावाने बी.एड. वेतनश्रेणीनुसार स्वतंत्र शासन निर्णय पारित केला. विशेष म्हणजे हा शासन निर्णय शासनाने शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित केला नाही. परिणामी इतर पदवीधर ग्रंथपाल याबाबत अनभिज्ञच राहीले.

काही कालावधीनंतर ग्रंथपालांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी हाय कोर्टाच्या तीनही खंडपीठात याचिका दाखल करण्यास सुरुवात केली. त्यानुसार सचिन शंकर दिवकर यांच्या याचिकेचा निकाल २८ एप्रिल २०११ रोजी याचिकाकर्त्यांच्या बाजूने लागला. त्यानंतर दिवाकर यांनी सिव्हील अॅप्लिकेशन दाखल केले. याच्या निकालानुसार याचिकाकर्त्यास चौथ्या वेतन आयोगानुसार १४००-२६०० ही वेतनश्रेणी देय ठरली. तसे निकालानंतर न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या रिटमध्ये वेतनश्रेणी नमूद आहे. त्यामुळे या निकालाच्या विरोधात शासनाने सुप्रीम कोर्टात एक एसपीएल दाखल केली. ही एसपीएल सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात मेरिटच्या आधारावर दिलेल्या निकालानुसार फेटाळून लावली.

शासनाने या सुप्रीम कोर्टाच्या एसपीएलच्या निकाल लागल्यावर वेतनश्रेणी देण्यात येईल, असे शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी यांचे पत्र प्राप्त झाले. त्यामुळे शासनाची सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळल्यानंतर याचिकाकर्त्या ग्रंथापालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू होणे आवश्यक होते. परंतु शासनाने तसे न करता ८ मार्च २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयातील निकालाच्या विरोधात पुनर्विलोकन याचिका दाखल केली. ही याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने २६ फेब्रुवारी २०१५ रोजी फेटाळून लावली. शासनाने मुदतीत निकालाचे पालन न केल्यामुळे शासनाच्या विरोधात अवमान याचिका खंडपीठात दाखल होत गेल्या. या अवमान याचिकांची संख्या सुमारे १४० पर्यंत गेली तर रिट याचिकांच्या निकालांची संख्या सुमारे २६० इतकी झाली म्हणजे एकाच निकालाच्या संदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणात निकाल लागलेल्या याचिका व या निकालानुसार कार्यवाही न झाल्यामुळे शासनाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांचा विचार करता ग्रंथपालांचे निकाल विक्रमाकडे वाटचाल केली आहे. शासनाने १ एप्रिल २०१४, ३ जुलै २०१४, ३ जून २०१५ व ३० नोव्हेंबर २०१५ रोजी काढलेल्या शासन निर्णयात चुकीची माहिती नमूद करुन कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करुन पदवीधर ग्रंथापालांना मान्य नसलेली १४००-२३०० ही वेतनश्रेणी देण्याचा घाट घातला जात आहे.

ग्रंथपालांच्या संघर्षावर प्रकाश टाकणारी ही प्राथमिक उदाहरणे बोलकी आहेत. या घटकाच्या पदरात अन्यायाचाच कौल टाकण्याचा सरकारचा छुपा विचार या घडामोडींमधून नजरेला पडतो. ज्ञानासारख्या क्षेत्रासाठी ही बाब मारक आहे. नव्या सरकारने तरी ग्रंथपालांच्या मागण्यांचा सकारात्मक मनोभूमिकेतून विचार करायला हवा. (क्रमशः)

(लेखक महाराष्ट्र राज्य ग्रंथालय शिक्षक परिषद प्रमुख आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images