Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

टीडीआर, वीज बैठक निष्फळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नवीन विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) धोरण आणि औद्योगिक वीज दराच्या प्रश्नावर मुंबईत बैठक होऊनही त्यात राज्य सरकारकडून कुठलाही दिलासा मिळाला नसल्याने नाशिकच्या माथी अन्यायच आला आहे. टीडीआरप्रश्नी हायकोर्टात जाण्याचा पवित्रा बांधकाम उद्योगातील संघटनांनी घेतला आहे तर वीज प्रश्नामुळे नाशिकचे उद्योग स्थलांतर होण्याची मोठी भीती आहे.

राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले टीडीआर धोरण बांधकाम क्षेत्रासाठी आणि सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांसाठी जाचक असल्याचे समोर येत आहे. त्याबाबत नाशिकच्या विविध संस्था-संघटनांनी असंतोष व्यक्त केला आहे. त्याशिवाय नाशिकच्या बांधकाम उद्योगाचे अनेक प्रश्न आहेत. तसेच, मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना अल्पदरात वीज उपलब्ध करुन देण्याचे राज्य सरकारने घोषित केले आहे. याचा नाशिकच्या उद्योग जगताला मोठा फटका बसणार आहे. या दोन्हींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी दोन स्वतंत्र बैठका झाल्या.

नाशिकच्या दोन शिष्टमंडळांनी भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले पण त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळू शकलेला नाही. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे, बांधकाम व्यावसायिक अविनाश शिरोडे, नरेश कारडा, विजय सानप, उद्योजक मंगेश पाटणकर, मिलिंद राजपूत, राजेंद्र अहिरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

टीडीआर धोरणाने नाशिकच्या बांधकाम व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे. ६ आणि ७.५ मीटर रस्त्यालगत असलेल्या छोट्या प्लॉटधारकांना कुठल्याही प्रकारचा टीडीआर यापुढे मिळणार नाही. यापुढे छोट्या रस्त्यांलगत छोटी घरेच बांधली जावीत, अशी सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जुन्या बिल्ड‌िंगचे नुतनीकरण करण्यास कुठलीही अडचण येणार नाही, पूर्वलक्षी प्रभावाने धोरण लागू होणार असल्याने त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करा, बांधकाम उद्योगातील अडचणींच्या संदर्भात योग्य आणि व्यावहारिक प्रस्ताव सादर करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. दोन्ही बैठकांमधून नाशिकच्या हिताचा कुठलाही निर्णय न झाल्याने दोन्ही शिष्टमंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

रात्री वीज सवलतीत घ्या

विजेच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट निष्फळ ठरली आहे. मराठवाडा आणि विदर्भावरील अनुशेष भरुन काढण्यासाठीच ही सवलत असून, राज्यातील अन्य भागाला आजवर अनेक सवलती मिळाले असल्याची टिपण्णी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांनी केली आहे. मात्र, रात्रीच्यावेळी नाशिकच्या उद्योगांना सवलत देण्याची तयारी ऊर्जामंत्र्यांनी दर्शविली आहे. सवलत न मिळाल्याने नाशकातून मोठ्या प्रमाणात उद्योग बाहेर जाण्याची भीती आहे.

कंपाऊंडची चौकशी

टीडीआर धोरणात मोकळ्या भूखंडांना कंपाऊंड करण्याची अट घालण्यात आली आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी ही अट गांभिर्याने घेतली आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

कपाटाबाबत लवकरच निर्णय

कपाटाच्या प्रश्नाबाबत येत्या काही दिवसातच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र हा निर्णय काय असेल याबाबत त्यांनी काहीही माहिती दिली नाही. त्यामुळे कपाटाचा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टुमदार कंक्राळा

$
0
0





सुदर्शन कुलथे

मालेगावच्या उत्तरेकडच्या भागात गाळणा टेकड्या पसरलेल्या आहेत. थेट धुळ्यापर्यंत पसरलेल्या या टेकड्यांवरच या परिसरातले काही मोजके किल्ले बांधलेले दिसून येतात. ऐतिहासिक वास्तूंनी सजलेल्या गाळणा किल्ल्याच्या नैऋत्येला कंक्राळा किल्ला उभा आहे. मालेगावच्या या माळमाथा भागातल्या भटकंती दरम्यान गाळण्याच्या किल्ल्यासोबतच कंक्राळ्याची भेट अनोखी ठरते.
00000000000
गिरिभ्रमण म्हणजे नुसती सहल अथवा पर्यटन नाही, तर गड-किल्ल्यांचं स्थान, भौगोलिक रचना, मार्ग, इतिहास यांचा सखोल अभ्यास आणि त्याचबरोबर शारीरिक फिटनेस, मौजमजा आणि आनंद देणारी एक परिपूर्ण भटकंती होय. या गिरिभ्रमण-गिर्यारोहणाचा छंद एकदा लागलं की सुटणं कठीण. मग प्रमुख गड-किल्ल्यांसोबत दुर्लक्षित, अप्रकाशित ठिकाणांचीही स्वच्छंदपणे मुशाफिरी सुरू राहते. आजच्या या धावपळीच्या युगात आपल्या कामातून वेळ काढत, सुटीचा दिवस सत्कारणी लावत, नियोजनबद्ध रितीने केलेली मुशाफिरी तर आपल्याला आगळाच आनंद देते.
अशाच एखाद्या मोकळ्या दिवशी मालेगावच्या डोंगराळ माळमाथ्याच्या भागात धुमश्चक्रीला निघायचं. मालेगावच्या उत्तरेला गाळणा टेकड्या पसरलेल्या आहेत. त्यातच कंक्राळा हा छोटेखानी पण टुमदार असा किल्ला वसलेला आहे. या कंक्राळ्याला पोहोचण्यासाठी आपलं खाजगी वाहन घेऊन गेलेलं बरं. कारण या भागात वाहतूकीची तशी थोडी गैरसोय होऊ शकते. मालेगावहून करंजगव्हाण हे साधारण १५ कि.मी. तर करंजगव्हाणहून कंक्राळा गाव हे पाच-सात किमीचं अंतर.
रस्ते तसे चांगले असले तरी या भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्याचं जाणवतं. उजाड वाटणाऱ्या या प्रदेशात लहानशा कंक्राळा गावाची स्थिती मात्र थोडी बरी आहे. कांदा, कापूस, डाळिंब अशी पीकं इथे घेतली जातात. इनमिन तीन हजार लोकसंख्या असलेल्या कंक्राळा भागातला शेतकरी हा काबाडकष्ट करून जगणारा, फारसा सधन नसलेला, सर्वसामान्य असा दिसून येतो. इकडे आल्यावर फार वेगळ्याच ठिकाणी एखाद्या वाळवंटी खडकाळ भागात आल्यासारखं वाटतं. इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली माती. ही माती बांधकामासाठी अतिशय उत्तम असल्याचं समजतं. अगदी सिमेंटसारखी सुबक आणि मजबूत अशी ही माती आहे. गावातली काही जूनी घरं शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची असली तरी आजही अगदी भक्कम स्थितीत उभी असलेली दिसतात.
सर्व गाव बघताबघता किल्ल्याचा मार्ग विचारायचा. गावातली मंडळी किल्ल्याकडे बोट करून रस्ता दाखवतात. गावाच्या पाठीशी किल्ला उभा आहे. डोंगरमाथ्याकडे उभ्या कातळावर पांढरा चूना फासलेला दिसतो, त्या दिशेने किल्ल्याकडे मोर्चा वळवायचा. किल्ल्यापर्यंतचा रस्ता ठळक नसला तरी चुकत नाही. या उजाड मैदानातून कंक्राळा दुर्गाच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. चालता चालताच किल्ल्याचं निरीक्षण करायचं. कंक्राळ्याच्या माथ्यावर असलेल्या दोन टेकड्यांमधून खाली उतरलेली एक घळ दिसते. त्या घळीतूनच किल्ल्यावर चढायचा मार्ग आहे. या घळीच्या दिशेने कुच करत वर चढायला लागायचं. या घळीतून पडलेल्या दगडांमधून नागमोडी वळणं घेत वर चढायचं. घळीत भरपूर झाडं आहेत. सिताफळ, डाळिंब आणि काही काटेरी झुडूपं. या झाडांवर आपण फळं शोधण्याच्या आधीच उथल्या माकडांनी ती कधीच फस्त केलेली असतात. इथं काळ्या आणि लाल तोंडाच्या माकडांचे टोळके दिसतात. वीस-पंचवीस मिनिटांतच आपण दोन टेकड्यांच्या खिंडीत येऊन पोहोचतो. खिंडीत पोहोचताच एक दगडी तटबंदी असलेली भिंत आपल्या समोर येते. ही तटबंदी डावीकडच्या टेकडीवर सलग जाऊन त्याबाजूला एक गोलाकार मोठा बुरूजही दिसतो. ही तटबंदी खिंडीतून आपलं लक्ष वेधून घेते. उजवीडच्या उभ्या कातळकड्यात काही गुंफा कोरलेल्या दिसून येतात. ही पाण्याची टाकी असून त्यात बारमाही पाणी आढळतं. काहीतर वरच्या भागात अशी कोरलेली आहेत की या टाक्यांपर्यंत जाण्यासाठी कातळातच मार्गही खोदलेला आहे. इथंच एक खुरटं असं चिंचेचं झाड दिसतं. त्याच्या जवळच कातळाला पांढरा रंग फासलेला आहे. या ठिकाणी पीरबाबाचं ठिकाण असल्याचं गावकरी मानतात. त्याला नवस बोलून कंदूरी करण्याची प्रथाही इथे आहे. कंदुरी म्हणजे बोकडबळी देऊन फेडलेला नवस. ही कंदूरीची प्रथा सटाण्याच्या अंतापूरला दर्ग्यात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. असो. आपणही पीराला नमस्कार करून नाही बोकड, तर निदान आपल्या डब्यातली चटणी-भाकरी, पोळी भाजी चवीनं खायची आणि टाक्यातलं थंडगार पाणी पिऊन पुन्हा खिंडीत यायचं अन् गडमाथ्यावर चक्कर मारायची.
किल्ल्याच्या उजवीकडील व डावीकडील भाग थोडा उंचावलेला असल्यानं त्यामध्ये खोलगट भाग तयार झालेला आहे. इथंच दगडी तटबंदी बांधलेली आहे. इथून थोडं पुढे सरकलं, की तटबंदी असलेल्या प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. किती सुंदर प्रवेशद्वार असेल याचा अंदाज ढासळलेल्या कोरीव दगडांवरून लावता येतो. थोडं निरखून बघत राहीलं तर भूतकाळातला भव्य चिरेबंदी दरवाजा आपल्यासमोर उभा राहतो. 'बा अदब... बा मुलाहिजा..' अशी हाक जरी कुणी दिली नाही तरी या प्रवेशद्वारातून अदबीने प्रवेश करायचा. इथं उजव्या रांगेत काही पाण्याचे टाके आढळतात. काही कोरडी तर काही मातीने भरलेली. त्यानंतर एक घराचं जोतं आणि त्याच्या वरच्या बाजूला म्हणजे उजवीकडील उंचवट्यावर एका घराचे अवशेष दिसतात. घराचे अवशेष पाहून गडाच्या पूर्व बाजूने निघत गोल फिरायचं. पूर्व बाजूकडे खाली उतरून दरीच्या काठावर यायचं. इथं. पाण्याच्या पाच टाक्या खोदलेल्या आहेत. त्यापैकी काही टाक्यांतलं पाणी पिण्यायोग्य आहे. इकडून आजबाजूचे ठेंगणे ठुसके डोंगर न्याहाळायचे. सपाट मैदानावर उठावलेल्या छोट्याछोट्या टेकड्यांमध्ये गाळणा किल्ला शोधून काढायचा. गडफेरी तशीच चालू ठेवत पुन्हा खोलगट भागाकडे म्हणजे खिंडीत परतायचं. आता डावीकडील उंचवट्याच्या भोवतालची तटबंदी बघत प्रदक्षिणा मारायची. याच्या वरच्या भागात काही जोती आढळतात. बाकी तटबंदीशिवाय काही नाही. इकडून लांबवर नजर भिरकवली तर आपल्या ओळखीचे डोंगर-किल्ले भेटतात का ते शोधायचं.
कंक्राळा दुर्गावरची तटबंदी, बुरूज, पाण्याच्या टाक्यांची रांग, घरांचे अवशेष, विखूरलेली जोती असा सर्व पसारा बघून इथं पूर्वी नक्कीच चांगला राबता असणार यात शंका नाही. पण इतिहासात मात्र कंक्राळ्याची पानं सापडत नाहीत. पण लळींग, गाळणा या परगण्यांप्रमाणे असणाऱ्या किल्ल्यांमध्ये 'कंक्राळा' असं बुलंद नाव घेऊन हा किल्ला मानाने उभा असलेला दिसतो.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्वत्थाची सळसळ

$
0
0

धनंजय गोवर्धने

वडिलांना आयसीयूमध्ये अॅडमिट केलं होतं. वेटिंग रुममधील नातेवाईकांच्या चेहऱ्यावर एक सुन्नता. महिलांची संख्या वाढली की, चिवचिवाट वाढत जातो. एरवी माणसं शांतपणे बसलेली किंवा मोबाइलवर कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करणारी, फोन लागत नाही. लागला तर उचलत नाही, मध्येच रेंज जातेय हे सारं न बोलताही त्यांच्या देहबोलीवरून दिसतंय. कोणी देवाचा धावा करतंय, पोथी वाचतंय. माणूस मृत्युसमोर हतबल होतो. विचारांचा गुंता वाढतच जातो. निसर्ग त्याचं काम करत असतो. पोटात दोन घास गेले की, एक शांतता जाणवते. रात्री वेटिंग रुम जागत असते. कूस बदलतांना जाग यावी तसं हॉस्पिटल मधूनच खडबडून जाग होतं. पहाटे समोरच्या झाडांच्या किलबिलाट लवकर जाग यायची अर्थात दवाखान्यात पहाट जरा जास्त लवकर होते.

वेटिंग रुमच्या समोरच्या प्रशस्त मोकळ्या खिडकीतून समोरचा पिंपळ दिसतो. काच लावलेली असली की मूक चित्रपटातील दृष्यासारखा तो फक्त पानातून हलत असतो. उनसावल्यांचे खेळ खेळत असतो. खिडकी उघडली की पिंपळ आपल्याशी बोलायला लागतो. फक्त तुम्हास त्याची भाषा समजून घेता आली पाहिजे. समोरचा पिंपळ अंदाजे शंभर सव्वाशे वर्षाचा असावा हे त्याच्या उंच जाडजूड फांद्यांवरुन दिसतं. वृद्धापकाळाने त्वचेवर सुरुकुत्या पडाव्यात तशा त्याच्या बुंध्यावरच्या सालीत दिसतायत. पायथ्याला नातवंडांसारखी बारीकसारीक रोपटी पायाशी वाढलेली. नातवाने लाडात येऊन गळ्याला मिठी मारावी तशी वेल लपेटून आहे. पायाशी साठलेल्या वाळलेल्या पानांची हालचाल होऊन आवाज होताच लक्ष जाई. तोपर्यंत एखादा सरडा किंवा खारुताई तुरूतुरू झाडावर निघून जाई. एखादं निवांत बसलेले कुत्रं जिवाच्या आकांताने जमीन उकरतंय, त्याचा उकरण्याचा आवाज आणि वाळलेल्या पानावर माती पडतेय त्याचा आवाज जाणवतो.

सकाळी सूर्याची कोवळी उन्हं पिंपळाच्या शेंड्यावरच्या कोवळ्या पानांवर पडून पाने सोनेरी दिसत. वाऱ्याने डोलणाऱ्या त्याच्या नाजुक पानांच्या हालचाली खांद्यावर असलेल्या अवखळ मुलासारखी. त्या फांदीवर बसू पाहणारा कावळा पुन्हा हवेत उडे. एकाच ठिकाणी पंख हवेत फडफडत ठेवून हेलिकॉप्टरसारखा तो स्थिर राही आणि फांदी स्थिर होण्याची वाट पाही. फांदी स्थिर होताच तो फांदीवर बसे. एखाद्या मित्राच्या खांद्यावर हात टाकावा असा फांदीवर मित्रत्वाने थरथरत राही. उन्हाने चकाकणाऱ्या हिरव्यागार पानातून आवाज करत दोनचार पोपट उडून जात तेव्हा ते दिसे. एरवी पानांच्या रंगात ते रंगून जात. एखादी जीर्ण वाळलेली फांदी काव‍ळा बसायला आणि फांदी मोडायला निमित्त होऊन खाली पडे. वाळलेल्या पानांवर त्याचा धापकन आवाज होई. एक धावपळ वाळल्या पानात होई. किड्या मुंग्यांची धावपळ होई. थोडीशी धूळ उडून शांत बसे. सकाळी सळसळणारा पिंपळ दुपारी शांत दिसे. थोडा थकलेला आणि त्याची पानेही वाळलेली दिसत. सावलीही थकून त्याच्या पायाशी विसावे.

कोणीतरी वेटिंग रुममध्ये थर्मासमधून चहा ओतल्याचा वास येई. वेटिंग रुम आळस झटकून सरसावून बसे. डबे घेऊन परत कुणीतरी चाललाय, रात्री काय आणू विचारतोय. फोन जरा विसावले. व्हॉट्स अॅपवाले मात्र सारखे टुंगटुंग वाजले की बोटं फिरवायला लागले. मेसेज पोस्ट पाहून गालातल्या गालात हसताय. डॉक्टरांचा राऊंड असला की वेटिंग रुम शांत, शिस्तप्रिय होते. डॉक्टरांना शंका विचारताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता. आपल्या पेशंटची मध्येच आयसीयूमधून हाक येते अन् सर्वांचे डोळे तिकडे. औषधाच्या चिठ्ठ्या, औषधाची खोकी खालून वर घेऊन येताना मनातल्या मनात चाललेला पैशाचा हिशेब. आज किती दिवस झालेत तब्येत कशी आहे, सुधारली आहे म्हटलं की बरं वाटतं. दुसऱ्यापेक्षा आपल्याला कमी दिवस थांबायला लागलंय याचंही समाधान नकळत चेहऱ्यावर दिसतच.

जसं पैशाची अडचण चेहऱ्यावर दिसते तसंच संध्याकाळी भेटायला येणारे पोरंटोरं, नटूनथटून आलेली माणसं काही काळ वेटिंग रुममधील वातावरण सुगंधित करुन जातात. एरवी फिनाइलचा वास नाकात बसलेला असतो. फरशी पुसणाऱ्या मावशी त्यांच्या तंद्रीत ओल्यावरुन जाणाऱ्यांना मनातल्या मनात शिव्या देत आपले काम करीत असतात. नवीनच जॉईन झालेला डॉक्टर ओळखू येतो. बनचुके डॉक्टर त्याच्या चालण्या बोलण्यावरुन ओळखू येतात. आजूबाजूचा परिसर हा अदृश्य पडद्याने झाकल्याच्या थाटात ते चालतात. चालतांना ज्याच्यामागे चारपाच डॉक्टर नर्सेस, वॉर्डबॉय असतात ते सर्वात मोठे डॉक्टर. त्यांच्या इशाऱ्यावर सारं हॉस्पिटल हालत असतं. पिंपळाच्या पानासारखं सळसळत असत. सिक्युरिटीवाले कडक होतात अन् कुणालाच आत सोडत नाही. भेटण्याच्या वेळेची आठवण करुन देतात. सिग्नलवरच्या हवालदारापेक्षा त्याची भीती जास्त वाटते. गावाकडच्या माणसांना तर ते जुमानत नाही. पण इंग्रजी बोलणारा आला की येस सर येस सर करतात. हे डॉक्टर गेले की, औषधवाल्यांच्या रांगा लागतात. लिफ्ट फुल असते. टीव्ही चालू होतात. नर्सेसचे आवाज योऊ लागतात. वारा नसताना पिंपळ जसा दिसतो तसं हॉस्पिटल वाटू लागते. माणसं कामावरुन घरी परतल्यानंतर कॉलनी जशी गजबजून जाते तसाच पिंपळ गजबजून जातो. अंधार होण्याच्या आधी पाखरं परत आलेली असतात. दिवसभराच्या गप्पा माराव्यात तसा साळुंक्यांचा कलकलाट सुरू होतो. अंधारात पिंपळ दिसेनासा होतो. आयसीयूच्या वेटिंग रुमचे सीनिअर लोक आपले पांघरुण काढून ठेवतात. बायका एकत्र येऊन कोपऱ्यातील आडोशाला सुरक्षित वाटणाऱ्या जागेचा ताबा घेतात. वॉचमन त्याची जागा आधीच आरक्षित करतो अन् जाताना दिवे बंद करुन नाईट लॅम्प लावून जातो. पिंपळाच्या अंधारात एखाद्या वाहनाच्या उजेडासारखा पारावरचा आवाज ओरखडा उमटवून जातो. पिंपळ आपल्याच नादात तटस्थ डोलत असतो. मध्यरात्री अचानक नर्स बोलवायला येते कुठेतरी वेटिंग रुम हलत, कूस बदलते. वेटिंग रुम तशी जागीच असते. चोवीस तास, रात्री फक्त पाठ टेकायला मिळते हाच आनंदाचा भाग. डोक्यात कायम विचार चालू असतात. पापण्या थकून डोळ्यावर विसावलेल्या असतात. पण कान मात्र जागे असतात. कुठूनतरी पावलांचा आवाज ऐकू येतो. रात्रीच्या वेळी पिंपळाच्या पानांचा सळसळ आवाज येतो. दिवसभराची दुखणी कानाजवळ कुजबुजावी तशी पिंपळाची पानं आपापसात कुजबुजत असतात. कधी धुसफुस करतात. रात्रीच्या निरव शांततेत पिंपळाच्या पानांचा आवाज अस्वस्थ करणारा असतो पिंपळाला अश्वत्थही त्यामुळेच म्हणत असावेत का पिंपळ सतत अस्वस्थ असतो. मनातलं वादळ व्यक्त करु पाहाणाऱ्या एखाद्या अस्वस्थ कातकारासारखा. पिंपळाच्या पानांचा आकार हृदयासारखा अशी धडधडणारी असंख्य हृदयं या झाडाला लटकलेली असतात तो पिंपळ शांत कसा राहू शकेल. वेद पुराणात पिंपळाचे महत्त्व सांगितलंय. त्याची मूळं, सालपान, फळ सर्व काही माणसांच्या जीवनासाठी उपयुक्त आहे. पिंपळ सर्वात जास्त प्राणवायू देतो. पिंपळाला बघितलं तरी मनाला बरं वाटतं. पिंपळाला हात लावला तर त्याच्या हृदयाची धडघड ऐकू येईल असं मला नेहमी वाटतं.

मागच्या महिन्यात माझ्या बहिणीला आयसीयूत अॅडमिट केलं होतं. तेव्हा बघतो तर पिंपळाच्या पुढची जुनी साल पडलेली. पिंपळाच्या मुळासापासून पुढे मोठ्ठं बांधकाम केलेलं. त्यामुळे पिंपळ आता दिसेनासा झालाय. कंपाऊंडच्या पत्र्यावर पाटी लावलेली बांधकाम चालू वाहने आपल्या जबाबदारीवर लावावीत हानी झाल्यास जबाबदार नाही. वडील अॅडमिट असताना टाईमपास म्हणून मी काढलेली स्केचेस मला आठवली. आठवला तो पिंपळ, त्याच्याशी झालेल्या मूक गप्पा, पिंपळाची सळसळणारी हिरवी पानं आणि मला आठवली ओ हेन्रीची जगप्रसिध्द कथा 'द लास्ट लिफ'.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र शिक्षण अर्थसंकल्पाची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेभरवशाच्या शेती व्यवसायामुळे शेतकरी आर्थिक खाईत लोटला जाऊन आत्महत्या करीत आहे. तसेच गेल्या १५-२० वर्षांपासून बिनपगारी शिक्षकही नैराश्येतून आत्महत्या करत आहे. शेती आणि शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करावा, अशी मागणी अध्यापक भारतीचे शरद शेजवळ यांनी पत्रकाद्वारे संबंधितांकडे केली आहे.

भारताच्या अर्थव्यस्थेचा पाया शेती हाच असून आजतागायत शेतीसाठी केवळ पॅकेज आणि शिक्षणात केवळ प्रयोग केले जात आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात ठोस कृती अर्थ नियोजन अपेक्षित असते. परंतु गेल्या १५ ते २० वर्षांपासून शेतकरी अपुऱ्या योजना, बंद करण्यात आलेल्या सबसिडी, बी-बियाणे, कीटनाशके, खते यांच्या वाढलेल्या किंमती आणि कोणत्याही पिकाला नसलेला हमी भाव, नापिकी, दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्या करतो आहे. तर शासनाच्या कायम विना अनुदानित धोरणामुळे (१९९८) गेल्या १६ ते १७ वर्षांपासून बिनपगारी-वेठबिगारी करणारा शिक्षक शासन आणि संस्थाचालकांच्या घातकी धोरणामुळे उद्ध्वस्त झाला आणि अनेक शिक्षकही आत्महत्या करत आहेत.

एका बाजूला ५ व्या वेतन आयोगाचे पगार घेणारे शिक्षक-शिक्षकेतर तर तितकेच काम करुन विनापगारी राबणारे शिक्षक हे वास्तव शासनासमोर असूनही अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी राबतच आहेत. शेती व शिक्षण क्षेत्रातील ही भयावह स्थिती सुधारण्यासाठी शेती व शिक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारने आगामी अर्थसंकल्प हा शेतीच्या सर्वांगीण विकासासह विनाअनुदानित धोरण पूर्णपणे बंद करुन शिक्षणक्षेत्रावरील गुंतवणुकीच्या बाजूने करावा असे आवाहन अध्यापक भारती, बालक, पालक, शिक्षक प्रशिक्षण संस्थाचे संस्थापक शरद शेजवळ यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी द्या फोनवर निमंत्रण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या स्वच्छतेसाठी जननायक विचार मंच आणि संघर्ष समितीच्या वतीने रहिवाशांकडून फोनवर माहिती घेऊन स्वच्छता करण्याचे अभियान हाती घेतले आहे.

डिव्हायडरमध्ये साचलेला कचरा, फुटपाथच्या झालेल्या कचराकुंड्या आणि याकडे लोकप्रतिनिधींनी केलेला कानाडोळा यावर तोंडसुख घेण्यापलीकडे कोणी काही करीत नाही. मात्र, प्रत्येकाने शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला, तर प्रशासनावर अवलंबून राहण्याची वेळच येणार नाही. शहराचे आरोग्यही सुदृढ राहील. या विचाराने प्रेरीत होऊन प्रभाग क्रमांक तीनमध्ये जननायक विचार मंच आणि संघर्ष समितीच्या वतीने घंटागाडी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अनोखे अभियान राबविले जात आहे. नंबर डायल करा व स्वच्छतेसाठी निमंत्रण द्या, असे या अभियानाचे स्वरुप आहे.

प्रभाग क्रमांक तीन हा परिसर अनेक वर्षांपासून अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त असल्याचे या मंचाला आढळून आले. या स्थितीमुळे डेंग्यू, स्वाईन फ्लूसारख्या गंभीर आजारांनी या परिसरात डोके वर काढले आहे. मात्र, प्रशासनाकडून साफसफाई कर्मचारी, धूर, औषध फवारणी याकडे दूर्लक्ष करण्यात आले. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या परिस्थितीकडे कानाडोळा केल्याने परिसरातील नागरिक हतबल झाले होते. यासाठीच जननायक मंचच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. मंचाचे अध्यक्ष सचिन अहिरे यांच्या संकल्पनेतून हे अभियान साकारले आहे.

सरकार बदलते आणि घोषणा देण्यापलीकडे ठोस पावले उचलली जात नाही. तेव्हा आपणच समाजासाठी पुढाकार घेऊन हे कार्य हाती घेण्याचे ठरवले, असे या मंचाच्या वतीने सांगण्यात आले. घंटागाडी कर्मचारी उमेश डिंगरे, उत्तम खेडाम, अनिल पगारे, सचिन अहिरे आदी या उपक्रमात कार्यरत आहेत.



संपूर्ण शहरात राबवणार अभियान

या अभियानाची सुरुवात प्रभाग क्रमांक तीन या परिसरापासून करण्यात आली असली, तरी तिथपर्यंतच मर्यादित राहणार नसल्याचे जननायक मंचातर्फे घोषित करण्यात आले आहे. जेथे कचऱ्याचे साम्राज्य असेल, तेथे जाऊन स्वच्छता अभियान राबविण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी ९८२२०९४४३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुंचाळेकरांना हवेत पक्के रस्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

नाशिक शहरापासून जवळ असलेल्या चुंचाळे शिवारातही अनेक विकसित वस्त्या झाल्या असून, या वस्त्यांमध्ये डांबरी रस्ते नसल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. महापाल‌िकेने प्रभाग ५० व ५१ या दोन भागांत असलेल्या रस्त्यांची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींचे जाळे पसरल्याने बाहेरील लोक कामानिमित्ताने शहर व जिल्ह्यात आले आहेत. यात सातपूर व सिडको एमआयडीसीतदेखील कामगारांची मोठी संख्या आहे. त्यातच अंबड एमआयडीसीला लागून असलेल्या चुंचाळे शिवारातील मारूती संकूल, दत्तनगर, वरचे चुंचाळे, दातीर नगर, महालक्ष्मीनगर आदी भागांत लोकवस्तीचे जाळे पसरले आहे. परंतु विकसीत होत असलेल्या चुंचाळे शिवारातील लोकवस्तीला रस्तेच नसल्याने रहिवाशांचा रस्त्यावरील प्रवास खडतर झाला आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यांवर साधे खडीकरणदेखील करण्यात आलेले नसल्याने पावसाळ्यात चिखलमय रस्त्यांवरून चालावे लागते. प्रभाग ५० व ५१ मधील भागात हा परिसर येत असल्याने नगरसेवकांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. शहर वाहतूक बससेवाही नसल्याने विद्यार्थी व चाकरमान्यांना मुख्य रस्त्यावर पायपीट करूनच जावे लागते. स्थानिक नगरसेवक व महापाल‌िकेने विकसीत होत असलेल्या लोकवस्तीला डांबरी रस्ते करावेत, अशी मागणी चुंचाळे शिवारातील विस्तारलेल्या लोकवस्तीतील रहिवाशांनी केली आहे.



अंबड एमआयडीसीला लागून असलेल्या चुंचाळे शिवारातील मारूती संकूल, दत्तनगर, दातीर मळा आदी भागात सर्वाधिक कामगार राहतात. परंतु रस्तेच नसल्याने कामगारांना कामावर जाण्यासाठी रस्त्यांवरून मोठी कसरत करुनच जावे लागते. महापाल‌िकेने रस्त्यांची उभारणी करण्याची आमची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

-पुंजाराम आव्हाड, रहिवाशी, मारूती संकूल

चुंचाळे शिवारातील वेगाने विकसीत होणाऱ्या मारूती संकूल व त्याला लागून असलेल्या रहिवाशी भागाकरीता रस्त्यांची सातत्याने मागणी महापाल‌िकेकडे केली आहे. लवकरच डांबरीकरणासाठी निधी मंजूर होणार असून चुंचाळे शिवारात रस्त्यांची कामे होणार आहेत.

-उत्तम दोंदे, नगरसेवक, प्रभाग क्रमांक ५१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी वाढीव पाणी येणार कुठून?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी दिल्यानंतर पाण्यावरून सुरू झालेल्या राजकारणाने कळस गाठला आहे. वाढीव पाणीकपातीवरून मनसे, भाजपमध्ये टोलवाटोलवी कायम आहे. शहराला ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्यासाठी आणखीन २५ दिवस पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी आणखीन ३०० दशलक्ष घनफूट पाण्याची गरज आहे. मात्र, धरणात जादा पाणी उपलब्ध नसतांनाही भाजप आमदारांनी वाढीव पाणीकपातीला विरोध करत आणखीन पाणी देवू, अशी भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे हे ३०० दशलक्ष घनफूट पाणी येणार कुठून? असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर अतिरिक्त पाण्यावरून भाजपची पुन्हा कोंडी होणार आहे.

शहरातील वाढीव पाणीकपातीचा निर्णय घेण्यासाठी गुरूवारी महापौर अशोक मुर्तडक यांनी आमदारांसह गटनेत्यांची बैठक बोलावली होती. यात उपमहापौर गुरूमीत बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे, स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी चुंभळे, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, सभागृह नेते सलिम शेख, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, मनसे गटनेते अनिल मटाले, माकप गटनेते तानाजी जायभावे, आरपीय गटनेते प्रकाश लोंढे, दिनकर पाटील उपस्थित होते.

बैठकीत अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी पाण्याची वस्तुस्थिती सादर केली. गंगापूर धरणात आता महापालिकेसाठी १३८३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. तर १७१ दिवस पाणी पुरवायचे आहे. सध्याच्या १२.३५ क्यूसेक प्रमाणे पाणी पुरवायचे झाल्यास २५ दिवसांचा गॅप कायम आहे. त्यावर आमदार सानप यांनी महापालिकेच्या पाणीगळतीवर बोट ठेवत, काटकसरीने पाणी वापरण्याचा सल्ला दिला. शहरात पाण्याचा अपव्यव होत असल्याचा आरोप त्यांनी महापालिकेने सुरुवातीलाच जास्त पाणी का मागितले नाही, असा प्रश्न केला. आम्हीही २० वर्षांपासून सभागृहात काम करतो. मात्र, अशा प्रकारचे राजकारण आम्ही केले नाही. सत्ताधारी पक्ष जनतेला घाबरवित आहे. ते तातडीने थांबले पाहिजे, असे सांगत त्यांनी पाणीकपातीला विरोध केला. गरज वाटल्यास अजून पाणी उपलब्ध करून देवू असा दावा त्यांनी केला. सानपांच्या या आक्रमकतेमुळे बैठकीचा रंग बदलला. मनसे नगरसेवकांनी भाजपला टार्गेट करत जुने विषय उकरून काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे बैठक निर्णयाविना संपली.

सानपांची 'दबंगगिरी'

भाजप शहराध्यक्ष असलेल्या आमदार बाळासाहेब सानप यांनी एकहाती किल्ला लढवीत सत्ताधारी मनसे, शिवसेना, काँग्रेस सदस्यांना तोंड दिले. तसेच बैठकीत त्यांनी थेट अधिकाऱ्यांना दमबाजी केली. माहिती देण्याच्या प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनाही बोलू न देता खाली बसण्यास आमदार सानप यांनी भाग पाडले. त्यांच्या या दबंगशाहीमुळेच नगरसेवक आणि सानप यांच्यात वादावादी झाली. शेवटपर्यंत त्यांनी मनसेच्या पाणीकपातीचा प्रयत्न उधळून लावला.

मनसे पदाधिकाऱ्यांचा उथळपणा

महापौरांनी सामंजस्य भूमिका दाखवत सर्व गटनेते आणि आमदारांची वाढीव पाणीकपातीसंदर्भात बैठक बोलावली. मात्र, या बैठकीत मनसेच्याच पदाधिकाऱ्यांचा उथळपणा महापौरांच्या अंगलट आला. मनसेचे जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे यांनी जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करून भाजप आमदारांना आयते कोलीत दिले. आमदार सानप यांच्यासमोर मागील कुरापती काढल्याने बैठकीत सानप आणि कोंबडे यांच्यातच तू-तू, मंै-मंै सुरू झाली. तर अनिल मटाले यांनीही भाजप आमदारांमुळे लोक घाबरायला लागल्याचे वक्तव्य केल्याने भाजप आमदार संतप्त झाले. महापौरांनी दोघांनाही शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र, गटनेते आणि नगरसेवक महापौरांचेही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे महापौरही हतबल झाले. या संधीचा फायदा घेवून आमदारांनी बैठकीतून पाय काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मनसेचेच पदाधिकारी महापौरांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवण्याचा प्रयत्न करत होते.



जलसंपदाचा यू-टर्न

जलसंपदा विभागाचे उपअभियंता एन. डी. महाजन यांनी प्रथम ३०० क्यूसेक पाणी महापालिकेला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खुलासा केला. त्यामुळे पहिले ३०० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले नसल्याची बाबसमोर आली. त्यामुळे भाजप आमदारांची फसगत झाली. मात्र, आमदारांनी तातडीने सुत्रे फिरवत, जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र आल्याचे सांगितले. दुसरीकडे महाजन यांची कानउघाडणी केली. त्यामुळे बैठक संपण्यापूर्वी त्यांनी ३०० दशलक्ष पाणी महापालिकेला दिल्याचा खुलासा केला.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तोडगा

बैठकीत वादावादी, एकमेकांवर आरोप करण्याच्या राजकारणामुळे या बैठकीत तोडगा निघालाच नाही. त्यामुळे आता पुन्हा वाढीव ३०० दशलक्ष पाणीकपातीचा निर्णयाचा विषय पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे टोलवण्यात आला आहे. येत्या बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून सर्वपक्षीय तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही बैठक लांबली तर महापालिका आपल्या स्तरावर निर्णय घेईल, असा इशाराच महापौरांनी आमदारांना दिला. त्यामुळे कपातीची टोलवाटोलवी सुरूच आहे.

बोरस्ते-सानप यांच्यात तू-तू,मैं-मैं

बैठकीत मनसे विरुद्ध भाजप असा वाद रंगला. आमदार बाळासाहेब सानप व शिवसेना गटनेते अजय बोरस्ते एकमेकांना चिमटे काढलेत. शिवसेनालाही सत्तेत असल्याची आठवण करून देत, माझ्या घरासमोर आंदोलन केले तेव्हा मला चहा पाजला आला नाही याची खंत वाटते, असा टोला सानप यांनी लावला. तर बोरस्ते यांनीही आम्ही सत्तेत असलो तरी जनतेसोबत असल्याचे सांगत जनतेची चेष्टा होवू देणार नाहीत असे प्रत्युत्तर दिले. पूर्ण बैठकीत शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तू-तू, मैं-मैं सुरूच होती.

पाणीकपाती बैठक निष्फळ ठरली. सध्याच्या साठ्यात २५ दिवसांचा तुटवडा आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत बैठक घेवून पालकमंत्र्यांनी निर्णय द्यावा. अन्यथा महापालिका आपल्या अधिकारात कपातीसंदर्भात निर्णय घेईल.

- अशोक मुर्तडक, महापौर

आमदार पाणी उपलब्ध करून देत असतील तर कपातीची गरज नाही. आम्हाला एकवेळ पूर्ण पाणी मिळावे. यापुढे पाणीकपात सहन करणार नाहीत.

- अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना

महापालिका हद्दीत पाणी अपव्यव होत असून प्रथम गळती थांबवावी. ३०० क्यूसेक पाण्याव्यतिरिक्त आणखीन पाणी उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. मनसेने राजकारण करू नये. - बाळासाहेब सानप, आमदार

शहराला रोज ३५० एमएलडीपेक्षा कमी पाणीपुरवठा करू नये. सध्याच्या कपातीत एक थेंब पाणी कमी केले तरी आम्ही रस्त्यावर येवून आंदोलन करू.

- गुरूमीत बग्गा, उपमहापौर

नाशिकमध्ये पाण्याचे पाट वाहत आहेत. पाणीगळती रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पालकमंत्र्यांसोबत बैठक घेवून वाढीव पाण्यासाठी प्रयत्न करू.

- प्रा. देवयानी फरांदे, आमदार

गळती लगेच थांबवणे अवघड आहे. १८०० किलोमीटरची जलवाहिनी आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करतांना धरणातून किती पाणी उचलले जाते व प्रत्यक्षात किती पाणी पोहचते, त्याचा हिशेब करून पाण्याचे नियोजन केले पाहिजे.

- डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट फ्रान्सिसचा तिढा काही सुटेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या तिडके कॉलनी व राणेनगर या दोन्ही शाखांविरोधात वर्षभरापासून सुरू असलेला शाळा विरोधी पालक हा तंटा अद्यापही मिटलेला नसून पालकांनी शनिवारी (दि. १३) पुन्हा शाळेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याची खंत पालकांमध्ये असून शाळेला वठणीवर आणण्यासाठी पुन्हा बंड पुकारण्याचे ठरवले आहे.

शाळा अवाजवी फीची मागणी करीत असल्याच्या विरोधात पालकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. शाळेने दहावीच्या फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट रोखले असून, त्याविरोधात हे आंदोलन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर फी न भरल्याचे शेरे देणे, शैक्षणिक, बस फी भरण्याबाबत पालकांना वारंवार फोन करणे, निकाल न दाखविणे, विद्यार्थ्यांना वर्गात थांबून ठेवणे, विद्यार्थ्यांना मारणे या कारणांमुळे पालकांनी शाळेविरोधात वर्षभरात इंदिरानगर पोलिस स्टेशन, सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच मनपा शिक्षणमंडळातील सुनावणीतही शाळेला खडसावले असून विद्यार्थ्यांना त्रास न देण्याची सूचना देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला शाळा प्रशासनानी पालकांविरोधात रितसर कायदेशीर नोटीस पाठवून फी न भरल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या परिस्थितीला गंभीर वळण मिळाले आहे. या तक्रारींचा शाळेनी मात्र विरोध केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हातगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सुरगाणा तालुक्यातील हातगड या डोंगरी किल्यावर दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किल्ल्यावरील धान्य शस्र, दारुगोळा साठवणुकीसाठी असणाऱ्या कोठी घराच्या आजूबाजूचा परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी कचरा केला होता. नाशिकमधील विविध कॉलेजमधील विद्यार्थ्यांना घेवून ही मोहीम राबविण्यात आली. तब्बल दोन तास श्रमदान केल्यानंतर परिसर स्वच्छ झाला. यावेळी गडाच्या खाली पुष्पाताई हिरे प्राथमिक शाळेत विविध पाड्यांवरील शिक्षण घेत असलेल्या मुलांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, विजय कुमार घोटे यांनी निसर्गपर्यावरण, पक्षी आणि प्राण्यांविषयी माहिती दिली, गड कोट किल्याविषयी इतिहास सांगितला.

गुजरातच्या सरहद्दीवर हा किल्ला असून किल्यावर जाण्यासाठी कातळ खोदीव पायऱ्या असून, प्रवेशद्वाराजवळील एक दुर्मीळ शिलालेख पुरातन खात्याच्या दुर्लक्षमुळे धूळ खात पडला आहे. या किल्ल्याच्या वरच्या भागात पठाराची तटबंदी मोडकळीस आल्याचे दिसून येते. परिसरात अनेक पाण्याचे बारमाही तळी आहेत. किल्ल्यावर पाच दरवाजे व नऊ बुरुज बघावयास मिळतात. या किल्ल्यावर हस्तमान या ऋषींचे वास्तव्य असल्याची आख्यायिका आहे. शिवरायांचा इतिहास सांगणाऱ्या या किल्याची अवस्था सध्या बिकट आहे. किल्ल्यावर एकही वन कर्मचारी बघावयास मिळाला नाही.

मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, अजित जगताप, पक्षिमित्र भीमराव राजोळे, सागर घोलप, आशिष बनकर, दर्शन घुगे, धनंजय बागड, सलोनी वाघमारे,रेश्मा कोठुळे, अंजली व्यवहारे, कोमल महाले, शहाजादी पटेल,भाग्यश्री तापर, सागर बनकर, आकाश जाधव, पप्पू जगताप आदींसह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारसाठी झाला विवाहितेचा छळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कार विकत घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना म्हसरुळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे पती वारंवार मानसिक छळ करून चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ व मारहाण करतात. बुधवारी रात्री ८ वाजता मारहाण करून अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून दिले असल्याचे फिर्यादी महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. म्हसरुळ पोलिसस्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पैशांसाठी छळ

घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणावेत यासाठी सासरकडील मंडळी छळ करीत असल्याची तक्रार मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये एका महिलेने दाखल केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार मानसीक व शारिरीक छळ सुरु होता बुधवारी संध्याकाळी ६ वाजता अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून दिल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

इंदिरानगरमध्येही तक्रार

नवऱ्याला नोकरी लावण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपये आणावे यासाठी सासरच्यांकडून वारंवार मानसिक व शारीरिक छळ होत असल्याची तक्रार महिलेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पैसे देत नसल्याने उपाशी ठेवून शिवीगाळ करीत अंगावरचे दागिने काढून घेत बुधवारी रात्री घरातून बाहेर काढून दिल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कडीतोडून ऐवज लंपास

घराला कुलूप असल्याने व घरातील व्यक्ती बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा तोडून घरातील रोख रुपये २५ हजार, सोन्याचे दागिने, पितळी भांडे व गॅस सिंलेडर चोरुन नेल्याची घटना पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी घडली सर्व मिळून १ लाख ३१ हजार पाचशे रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडल्याचा पोलिसांना संशय आहे. पंचवटी पोलिसस्टेशनमध्ये गुन्हा नोदविण्यात आला आहे.

ढिकले नगरला चोरी

गेल्या अनेक दिवसांपासून ढिकले नगर परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरू असून, सोमवारी रात्री ३१ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढिकले नगर येथील एक कुटूंब बाहेर गेल्याची संधी साधत रात्री ९.३० वाजता अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून घरातील रोख रुपये २५ हजार, सोन्याचे वेढे, निरंजन असा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, ढिकलेनगर परिसरातील चोरीसत्र तातडीने थांबवावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या भागात पोलिस गस्त वाढवावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

मोटार सायकलची चोरी

घराबाहेर लावलेली यामाहा कंपनीची वाय. झेड. इ. आर, ७० हजार किमतीची मोटार सायकल अज्ञात व्यक्तीने इंदिरानगर परिसरातून चोरीला नेली असल्याची तक्रार इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. मोटार सायकलाचा क्रमांक एमएच १५ एफडी ०६७५ असा आहे. ही गाडी कुणाला आढळल्यास इंदिरानगर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जुगार खेळताना अटक

इंदिरानगर येथील सप्तश्रृंगीमाता मंदिराजवळ अंदर बाहर नावाचा जुगारवर धाड टाकून एक जणाला अटक करण्यात आली. इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून ३३० रुपये जप्त करण्यात आले.

धावत्या रेल्वेतून पिस्तुलाची चोरी

धावत्या रेल्वेत ड्यूटीवर असणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्याचे पिस्तूल व ९ काडतुसे चोरट्यांनी हातोहात लांबवली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी रात्री उशिरा चोरीचा गुन्हा दाखल केला.

मलकापूर येथील रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक निरीक्षक सुमित किशनचंद सैनिक सहकाऱ्यांसह हावडा-एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर होते. डब्यातील स्वच्छतागृहात जाताना त्यांनी पिस्तूल व ९ काडतुसे सहकारी आर. एस. मिश्रा यांच्या बॅगमध्ये ठेवल्या. मनमाड स्थानक आल्यावर मिश्रा हे प्लॅटफार्मवर उतरले. गाडी सुरू झाल्यावर सदर बॅग चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. रेल्वे पोलिसांच्या तपासात चोरीला गेलेली बॅग मनमाड येथे रेल्वे ओव्हरब्रिजमागे सापडली. मात्र, त्यात पिस्तूल व काडतुसे आढळून आली नाहीत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओकडून शुल्क दुप्पट; एक ते पाच हजारांची आकारणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा करण्यात आल्याने आता विविध परवान्यांसाठी सुधारित शुल्क लागू होणार आहेत. हे शुल्क जवळपास दुप्पट झाले असून, यापुढे आता १ हजारांपासून ५ हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारले जाणार आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ चे नियम ७५ (१)(अ) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे विविध परवान्यांसाठीच्या शुल्कात वाढ झाली आहे. मीटर बसविलेल्या मोटार कॅब, मीटर न बसविलेल्या मोटार कॅब, मॅक्सी कॅब, करारावरील वाहने, टप्पा वाहने, माल वाहतूक वाहने, खाजगी सेवा वाहने यांना परवाना देणे किंवा परवान्याचे नवीकरण किंवा प्रतिस्वाक्षरी यासाठी शुल्क आकारले जाते. आता हे शुल्क प्रत्येकी १ हजार रुपये सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे.

पर्यटक कॅबसाठी परवाना देणे किंवा परवान्यांचे नवीनीकरण आणि राष्ट्रीय परवाना देणे किंवा त्यांचे नवीनीकरण करण्यासाठी प्रत्येक २ हजार रुपये सुधारीत शुल्क असणार आहे. पर्यटक कॅब व्यतिरिक्त अन्य पर्यटन वाहनांसाठी उशीर झाल्यास प्रत्येक महिन्यासाठी प्रतिवाहन ५ हजार रुपये शुल्क लागणार आहे. ऑटोरिक्षा आणि टॅक्सी परवाना मुंबई बाहेर प्रत्येकी १० हजार, नवीन टॅक्सी परवान्यासाठी २० हजार रुपये परवाना शुल्क असणार आहे.


सुधारीत शुल्कासंदर्भात काही हरकती किंवा सूचना असतील तर त्या अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन), दुसरा मजला, मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२ यांच्याकडे सादर कराव्यात.

-भारत कळसकर

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी अन् संशोधनच केंद्रबिंदू ठेवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भविष्यातील वैद्यकीय सेवेचा कणा असणारा विद्यापीठातील आजचा विद्यार्थी हाच केंद्रबिंदू असेल. सोबतीला वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनावर भर देण्यासोबतच विद्यापीठात वर्षानुवर्षे राहिलेला अनुशेष भरून काढण्यात येईल, अशा उद्दिष्टांची त्रिसूत्री आपल्या भूमिकेतून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी मांडली.

डॉ. म्हैसेकर यांनी कुलगुरूपदाचा कार्यभार गुरूवारी स्वीकारला. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय कॉलेजचे प्रभारी अधिष्ठाता तसेच 'श्वसनविकारशास्त्र' विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दिलीप म्हैसेकर यांची नियुक्ती पाच वर्षासाठी केली आहे.बुधवारी डॉ. म्हैसेकर यांचे स्वागत कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ यांनी केले. याप्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण व प्रभारी वित्त व लेखाधिकारी एन. एस. कळसकर उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, की 'विद्यापीठाने आजवर केलेल्या प्रगतीचा अभिमान आहे. विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू मानुन विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक व संशोधनाच्या विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबिवण्यावर भर राहिल. विद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे शासनस्तरावर असलेले प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रंसगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ यांनी सांगितले, की नवनियुक्त कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा याआधी आरोग्य विद्यापीठाशी ऋणानुबंध राहिला आहे. आरोग्य विद्यापीठातर्फे त्यांची भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे सदस्य म्हणुन निवड करण्यात आली आहे. तसेच ते आरोग्य विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापरिषद या प्राधिकरणांचे सदस्य राहिले आहेत.

जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कालिदास चव्हाण, प्रभारी वित्त व लेखाधिकारी एन. एस. कळसकर, प्रकाश पाटील, संजय नेरकर व संदिप राठोड यांची स्वागतपर भाषणे झाली. विद्यापीठाच्या ऑफिसर्स फोरम, वर्ग तीन व चार कर्मचारी संघटना व अधिकारी कर्मचारी पतसंस्थेतर्फे कुलगुरूंचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याची मादी जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या अनेक दिवसांपासून तारूखेडले (ता. निफाड) शिवारात दहशद पसरवणारी बिबट्याची मादी अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाली. या मादीसोबत पिंजऱ्यात दोन मृत बछडेही आढळून आले.

मादीने पिंजऱ्यात अडकल्यानंतर मारलेल्या धडकांमुळे बछड्यांचा अंत झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर मादीनेच पिल्लांना संपविले असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. याबाबत खात्रीशीर माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. वन विभागाने मादीला नाशिक येथे रवाना केले, तर दोन्ही बछड्यांना सिन्नर येथे नेऊन त्यांची उत्तरीय तपासणी करून माळेगाव येथील उद्यानात त्यांचे दहन करण्यात आले. तारूखेडले शिवारात यापूर्वी ४ बिबट्यांना वनविभागाने जेरबंद केले आहे. याच परिसरात काही महिन्यांपूर्वी एक सातवर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथालयांनी घ्यावा योजनांचा लाभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानामार्फत विविध उपक्रमांसाठी निधी उपलब्ध केला जातो. राज्यातील जास्तीत जास्त ग्रंथालयांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकातातर्फे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यान्वित असलेल्या अर्थसहाय्याच्या समान निधी व असमान निधी योजनांमधून राज्याच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. समान निधी योजना राज्य शासनाच्या ५० टक्के अर्थसहाय्यामधून असणाऱ्या या योजनेतून परिसंवाद, चर्चासत्रे व कार्यशाळा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन, ग्रंथप्रदर्शने व वाचन संस्कृती रुजविण्यासाठीचे उपक्रम यासाठी अर्थसहाय्य करण्यात येते. तसेच सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार, बांधणीसाठी आणि फिरत्या ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य केले जाते.

तसेच असमान निधी योजनेतून ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामुग्री फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य देण्यात येते. सार्वजनिक ग्रंथालयातील बालविभाग, महिलाविभाग, ज्येष्ठ नागरिक विभाग, नवसाक्षर विभाग, स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभाग यासाठी प्रतिष्ठानकडून १०० टक्के अर्थसहाय्य दिले जाते. असमान निधी योजनांतर्गत महोत्सव करण्यासाठी प्रतिष्ठानकडून १०० टक्के अर्थसहाय्य केले जाते. शारीरिकदृष्ट्या विकंलाग व्यक्तींसाठी विभाग स्थापन करण्यासाठीही प्रतिष्ठानकडून १०० टक्के अर्थसहाय्य्‍ा देण्यात येते.

या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच, अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर मेनू बारमधील असिस्टंस या लिंकवर पाहावे. ग्रंथालयांनी समाननिधी व असमाननिधी योजनेसाठी विहीत पध्दतीत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदीतील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात २५ फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव पालिकेत कामबंद!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील नगरसेविका अखत्तरुन्निसा मोहम्मद अनिस यांचे पुत्र सादीक अहमद अनिस याने गुरुवारी मनपाच्या स्वच्छता कार्यालयात घुसून स्वच्छता अधीक्षक व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच, कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी शुक्रवारी मनपा प्रवेशद्वाराजवळ कामबंद आंदोलन केले. मनपा कर्मचारी व अधिकारी यांना दमदाटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

मनपाच्या स्वच्छता विभागातील जेसीबी शहरातील ६० फुटीरोडवरील गटारींची स्वच्छता करण्यासाठी पाठवावे, अशी मागणी नगरसेविका पुत्र सादीक अहमद अनिस याने स्वच्छता अधीक्षक गोविंद परदेशी यांच्याकडे केली होती. मात्र, सध्या शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून, मोहीम आटोपली की जेसीबी स्वच्छता कामासाठी पाठवण्यात येईल, असे सादीक यास कळवण्यात आले होते. असे असताना देखील गुरुवारी त्याने स्वच्छता विभागाच्या कार्यालयात अधीक्षक गोविंद परदेशी व अन्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्कबुक्की केली. तसेच, कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. यामु‌ळे मनपा अधिकारी-कर्मचारी यांच्यात असंतोष निर्माण झाला होता.यावेळी मनपा उपायुक्त कमरूदीन शेख, राजेंद्र फातले, विलास गोसावी, शकील सैय्यद, राजेश धसे, खालिद महवी, जहीर अन्‍सारी, युनियन नेते महादू पगारे, मनोहर पेंटर आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

काळ्या फिती लावून कर्मचा-यांकडून निषेध

या घटनेचा निषेध म्हणून मनपा अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने सकाळपासून कामबंद आंदोलनास सुरुवात झाली होती. मनपाच्या प्रवेशद्वारवार कर्मचारी अधिकारी यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. यावेळी उपायुक्त कमरुद्दीन शेख यांनी गुन्हेगाराला तत्काळ अटक करावी व आशा पध्दतीने अरेरावी व गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच, दिवसभर काळ्या फिती लावून कार्यालयात कामे तसेच, प्रभाग एकचे अधिकारी पंकज सोनवणे आणि त्यांचे कर्मचारी यांनी कार्यालय ते मनपा असा मोर्चा देखील काढला.

आयुक्तांनीही घेतली दखल या प्रकरणी आयुक्त किशोर बोर्डे यांना निवेदन देण्यात येऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. आयुक्तांनी देखील या प्रकरणाची गंभीर दाखल घेत गुन्हा नोंदवण्याचे आदेश उपायुक्त राजेंद्र फातले यांना दिले होते. त्यानुसार शिवीगाळ व धक्काबुक्की करून कार्यालयातील समानाची तोडफोड करणाऱ्या सादिक अहमद अनिस याच्यावर येथील किल्ला पोलिस व पवारवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाेटीतील भाजीबाजाराचे लवकरच स्थलांतर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील रस्त्यावर असलेल्या भाजी बाजाराचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आठ दिवसात पर्यायी जागेत भाजीबाजारासह रस्त्यावरील बाजार स्थलांतर होणार आहे.

घोटी शहरातील रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते व अन्य विक्रेत्यांशी चर्चा करण्यासाठी नवीन व पर्यायी जागेचे नियोजन करण्यासाठी प्रभारी गटविकास अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. भटिंडा ए. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी, ग्रामपालिका सदस्य व विक्रेते यांची संयुक्त बैठक घोटी ग्रामपालिका कार्यालयात पार पडली. या बैठकीस सरपंच कोमल गोणके, उपसरपंच समाधान जाधव, ग्रामविकास अधिकारी संजय बेनाडे यांच्यासह ग्रामपालिका सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत पर्यायी जागेचे नियोजन, जागेचा आराखडा, देण्यात येणाऱ्या सुविधा, विक्रेत्यांची भूमिका यावर साधकबाधक चर्चा झाली. प्रारंभी विक्रेत्यांची भूमिका जाणून घेतली. विक्रेत्यांनी आपली भूमिका मांडली. दूरवर भाजीबाजार जाणार असल्याने खरेदी-विक्रीवर होणारा प्रतिकूल परिणाम, संभाव्य सुविधांचा अभाव यावरही चर्चा झाली. दरम्यान, टप्याटप्याने ग्रामपालिका सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे नमूद करण्यात आले. रस्त्यावरील सर्वच विक्रेत्यांना पर्यायी जागेत स्थलांतर करण्याच्या निर्णयावर एकमत झाले. किमान आठवडे बाजाराच्या दिवशी तरी रस्त्यावरील सध्याच्या जागेवर बसू देण्याची विक्रेत्यांची विनंतीही अधिकाऱ्यांनी धुडकावून लावली. या बैठकीत प्रभारी अधिकारी भटिंडा ए. राजा दयानिधी, तहसीलदार महेंद्र पवार, उपसरपंच समाधान जाधव, सदस्य संतोष दगडे, रामदास शेलार, बाळासाहेब झोले, ग्रामसेवक संजय बेनाडे व विक्रेते आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

घोटी शहरातील रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्या व व्यापाऱ्यांनी विक्रीस ठेवलेल्या वस्तू मार्किंगच्या आत ठेवाव्यात. दोन दिवसात मार्किंगच्या आत बसण्याची व्यवस्था व अंमलबजावणी करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल. - भतांडा ए राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय पथकही झाले आवाक्

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकऱ्यांच्या अर्थकारणातील कांदा पिकाला गेल्या काही दिवसांपासून मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने लासलगाव बाजार समितीला अन्न नागरी पुरवठा मंत्रालयातील संचालक जाकीर हुसेन आणि उपसंचालक दिनेश कुमार यांच्या पथकाने भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चाचा ताळेबंद समितीपुढे मांडल्याने समितीचे सदस्यही आवाक् झाले.

लासलगाव कृषी उत्पन बाजार समितीमध्ये कांद्याची आवक गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने कांदादरात घसरण सुरू आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गत आठवड्यात जिल्ह्यातील बाजार समितीत भाव घसरल्याने लिलावही बंद झाले होते. कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणातील अनियमितता दिसून आल्याने दिल्ली येथील अन्न नागरी पुरवठा मंत्रालयातील संचालक यांनी लासलगाव बाजार समितीला भेट देऊन सभापती नानासाहेब पाटील, कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी चर्चा केली.

याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी लासलगावमध्ये कोल्ड स्टोअरेज उभारण्याची मागणी केली. यावेळी पणन महामंडळाचे चंद्रशेखर बारी, निफाडचे तहसीलदार संदीप आहेर, बाजार समिती संचालक राजाराम दरेकर, व्यापारी प्रतिनिधी नितीन जैन, मनोज रेदासनी, सचिव बी. वाय. होळकर, राजाराम काळे, निवृती न्याहारकर आदी उपस्थित होते.

मागणी आणि पुरवठ्यात समतोल साधणार कांद्यास मिळालेला भाव आणि उत्पादनास झालेला खर्च बघता हातात काहीच शिल्लक राहत नसल्याचे या पथकाच्या लक्षात आले. घाऊक बाजारात हा कांदा पाच ते सहा रुपयांनी विकला असला तरी शहरात हाच कांदा २५ ते ३० रुपये किलो विकला जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात इतका फरक कसा पडत आहे, असा प्रश्न या समितीलाही पडला. येणाऱ्या काळात कांदा भावामध्ये अनियमितता राहू नये, मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल राहावा यासाठी हा दौरा असल्याचे या पथकाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा करतोय पुन्हा वांधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

एकीकडे दुष्काळाच्या दाहकतेचे चटके सोसताना मेटाकुटीस आलेला शेतकरी आता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या कांदा बाजारभावामुळे हवालदिल झाला आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत महिनाभरापूर्वी प्रतिक्विंटल हजार ते बाराशे असलेला कांदा गेल्या तीन चार दिवसात खाली खाली येऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पुन्हा वांधा झाला आहे.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून रांगडा कांद्याचे बाजारभाव सातत्याने कोसळत आहेत. महिनाभरापूर्वी हजार ते बाराशे रुपये क्विंटल असलेला कांदा गेल्या काही दिवसात तब्बल ६०० ते ७०० रुपयांनी खाली आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात या आठवड्यातील बुधवारी १५ हजार ५५४ क्विंटल रांगडा कांद्याची आवक होताना त्याला प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल १११४ (सरासरी ७००) असा बाजारभाव मिळाला होता. गुरुवारी या आवारात ९ हजार १६७ क्विंटल रांगडा कांदा शेतकऱ्यांकडून विक्रीला आणला जाताना त्याला किमान ३०० ते कमाल ९९२ (सरासरी ६५०) असा बाजारभाव मिळाला. शुक्रवारी जवळपास १४ हजार क्विंटल इतकी आवक होताना देखील अशीच काहीशी परिस्थिती होती.

अर्थचक्र कोलमडले रांगडा कांद्याचे बाजारभाव गडगडू लागल्यानं शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडून पडलं आहे. रांगडा कांदा पीक घेताना शेतीची मशागत, बियाणासाठी मोजावे लागलेले दाम, बरोबरच सेंद्रिय खतांसह रासायनिक खते, किटकनाशके फवारणी, मजुरी, कृषीपंपाचे वीजबिल, वाहतूक खर्च आदी सर्व बघता सध्या कांदा विक्रीनंतर हाती पडणारे दाम यातून ताळमेळ बसणे मुश्कील झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांचे धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहरात रेशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांना धान्य वाटपात विलंब होत आहे. तसेच, धान्य वाटप नियमांनुसार होत नसल्याने अशा धान्य दुकानदारांवर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस आमदार आसिफ शेख यांनी येथील तहसील कार्यालयाबाहेर एकदिवसीय लक्षणिक धरणे आंदोलन केले.

शहरातील धान्य व रॉकेल वाटप दुकानदार पिवळे व अंत्योदय कार्डधारकांना शासकीय आदेशानुसार वाटप करीत नसल्याची तक्रारी आमदार आसिफ शेख यांच्याकडे लाभार्थ्यांकडून करण्यात आल्या. त्यानुसार आमदार शेख यांनी २७ जानेवारी रोजी या संदर्भात तहसीलदारांकडे लेखी स्वरुपात निवेदन करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र, अद्याप देखील अशा अनियमित दुकानदारांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने त्यांनी हे धरणे आंदोलन केले. प्रांत अजय मोरे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन यासंबंधी कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस नगरसेवक असल्म अन्‍सारी, शकील बेग, खुशीद अस्लम, जमील मौलाना, कालिम खान मन्सुरी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले.

हॉकर्स झोन निश्चित करा

मालेगाव मनपाकडून हाती घेण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम स्तुत्य आहे. मात्र, या मोहिमेदरम्यान रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर अन्याय होत आहे. तसेच, अतिक्रमण हटवण्यात आलेल्या भागात रस्त्यालगत असलेले विजेचे व टेलिफोनचे खांब तसेच आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने हॉकर्स झोनची निर्मिती करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विभागाचे वर्चस्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नाशिक जिल्हा हौशी रोलबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेत पुणे संघाने आपले वर्चस्व राखले. विभागीय क्रीडा संकुलातील मीनाताई ठाकरे इनडोअर हॉलमध्ये बुधवारी समारोप झाला.

स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सभापती अॅड. नितीन ठाकरे, फिल्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष कुणाल पाटील, विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयाचे क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी महेश पाटील, राज्य संघटनेचे सचिव प्रताप पगार, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण, जिल्हा सचिव बाळासाहेब रायते, स्पर्धा संयोजक संजय होळकर आदी उपस्थित होते.

बुधवारी झालेल्या स्पर्धेत १९ वर्षांआतील मुलींच्या गटात अंतिम सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर यांच्यात होऊन पुणे संघाने सहा विरुद्ध तीन गोलने सामना जिंकला. तर तृतीय क्रमांक मुंबई विभागाने प्राप्त केला. मुलांच्या स्पर्धेत अंतिम सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर यांच्यात होऊन पुणे संघाने चार विरुद्ध तीन गुणांनी विजय संपादन केला. तर तृतीय क्रमांक अमरावती संघाने मिळविला.

१४ वर्षे वयोगटात मुलांचा अंतिम सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झाला. त्यात सहा विरुद्ध दोन गोलने पुणे संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर तृतीय क्रमांक नाशिक (नंदुरबार) विभागाच्या संघाने प्राप्त केला. मुलांच्या गटात अंतिम सामना नागपूर विरुद्ध पुणे यांच्यात होऊन नागपूर संघ विजयी झाला. तृतीय क्रमांक मुंबई विभागाने प्राप्त केला.

या सर्व विजयी संघांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पदके व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्पर्धेसाठीचे संघ निवडण्यात आले. निवडसमिती सदस्य म्हणून रवि देसाई, अमित पाटील, प्रभाकर वडवेराव, रफिक इनामदार, बाळासाहेब रायते, नंदू पाटील यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>